@सोनाली कदम
9623784976
शेतीत यश मिळवण्यासाठी अंदाजावर नव्हे तर शास्त्रीय आणि खात्रीशीर माहितीवर अवलंबून निर्णय घेणे आवश्यक आहे. ही गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने विकसित केलेले महाविस्तार-ए.आय. अॅप शेतकर्यांना अधिकृत, तज्ज्ञांनी पुष्टी केलेला सल्ला देणारे विश्वासार्ह डिजिटल साथीदार ठरत आहे.
प्रत्येक उद्योग-व्यवसायात यशाची गुरुकिल्ली म्हणजे अभ्यासपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने उचललेले पाऊल. मात्र ज्या शेतीवर आपली अर्थव्यवस्था उभी आहे, त्याच क्षेत्रात अनेकदा प्रयोग अंदाजावर किंवा अप्रमाणित सल्ल्यावर केले जातात. अलीकडे डिजिटल मीडियाचा ग्रामीण भागात वाढलेला वापर शेतीपर्यंत पोहोचला असला, तरी युट्यूब-गुगलवरील प्रत्येक सल्ला विश्वासार्ह असेलच असे नाही. शेतीतील प्रत्येक निर्णय थेट उत्पन्नावर परिणाम करणारा असल्याने चुकीचा सल्ला आर्थिकच नव्हे तर मानसिक नुकसानही करू शकतो. हीच गरज ओळखून महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने शेतकर्यांसाठी महाविस्तार - ए.आय. अॅप विकसित केले आहे. शेतकर्यांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर खात्रीशीर, अधिकृत आणि शास्त्रज्ञांनी पुष्टी केलेला सल्ला देणारे हे एक विश्वासार्ह माध्यम आहे.
महाविस्तार -ए.आय. अॅप हे महाराष्ट्र शासन कृषी विभागाचे अत्याधुनिक मोबाईल अॅप असून शेतकरी ते सहजपणे आपल्या स्मार्टफोनमध्ये इन्स्टॉल करून वापरू शकतात. संपूर्ण माहिती मराठीत, सोप्या व सहज समजणार्या भाषेत उपलब्ध करून देणारे हे अॅप अगदी कमी वाचन-लेखन जाणणार्या शेतकर्यांनाही वापरता येईल अशा पद्धतीने कृषी विभागाच्या पोखरा टीमने विकसित केले आहे. शेतकर्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर क्षणात देणारे, तज्ज्ञ कृषी शास्त्रज्ञांनी पुष्टी केलेले हे चालते-फिरते कृषी विद्यापीठ आहे
का वापरावे महाविस्तार- ए.आय. अॅप?
शेती म्हणजे दररोज नवनव्या प्रश्नांची आणि अडचणींची शृंखला. हवामानातील बदल, कीड-रोग, खत व्यवस्थापन, पाणी नियोजन ते बाजारभावांपर्यंत प्रत्येक निर्णय वेळेवर घ्यावा लागतो आणि तो अचूक माहितीवर अवलंबून असतो. योग्य माहिती उशिरा मिळाल्यास पिकांचे नुकसान होते आणि शेतकर्यांचे कष्ट वाया जातात. अशा वेळी युट्यूब किंवा गुगलवरील अप्रमाणित सल्ल्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा शासनाकडून उपलब्ध करून दिलेला महाविस्तार-ए.आय. अॅप हा अधिक विश्वासार्ह पर्याय ठरतो.
काय बघायला मिळेल महाविस्तार-ए.आय. अॅपमध्ये?
शेतीशी संबंधित प्रत्येक बाब एकाच ठिकाणी, अधिकृत व तज्ज्ञांनी पुष्टी केलेल्या स्वरूपात उपलब्ध करून देणारे हे अॅप शेतकर्यांनी घ्यावयाच्या दैनंदिन निर्णयांना अधिक अचूक आणि परिणामकारक बनवते. या अॅपमध्ये खालील प्रकारची माहिती अचूकपणे देण्यात आली आहे.
पीक सल्ला - पीक लागवडीपासून काढणी व विक्रीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आवश्यक असलेले शास्त्रशुद्ध मार्गदर्शन.
मानक कार्यप्रणाली (SOP) - पूर्वमशागत ते साठवणूकपर्यंत संपूर्ण प्रक्रिया टप्प्याटप्प्याने समजावून सांगणारे मार्गदर्शन.
मृदा आरोग्य पत्रिका - आपल्या गावाची व गटाची माती परीक्षण अहवाल थेट अॅपवर उपलब्ध आहे.
खत गणक यंत्र - मृदा आरोग्य पत्रिकेनुसार पिकनिहाय एकरी व हेक्टरी खतांची अचूक मात्रा, त्यामुळे अनावश्यक खर्चाला आळा बसेल.
हवामान-अनुकूल शेती पद्धती - पेरणीपूर्व तयारीपासून साठवणुकीपर्यंतचे आधुनिक तंत्रज्ञान.
कीड व रोग व्यवस्थापन - किड-रोगांची ओळख, त्यांची चित्रांसह माहिती व नियंत्रणाचे उपाय, तसेच मित्रकिटकांची माहिती उपलब्ध.
बाजारभाव - शेतमाल विक्रीपूर्वी बाजार समितीतील किमान-कमाल दरांची माहिती.
DBT व कृषी योजना - महाडिबीटी व पोखरा अंतर्गत सर्व योजनांचे अर्ज, निकष, पात्रता व कागदपत्रांची संपूर्ण माहिती.
गोदाम व सुविधा - साठवणुकीसाठी उपलब्ध गोदामे, भाडेतत्त्वावरील अवजारे, शेतीविषयक व्हिडिओ व पिकनिहाय डिजिटल शेतीशाळा आदी घटकांची माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे.
एक डिजिटल मित्र - चॅटबोट
शेतकरी बांधवांनो, महाविस्तार-ए.आय. अॅपमधील सर्वांत प्रभावी आणि उपयुक्त सुविधा म्हणजे हे ए.आय.आधारित चॅटबोट. हिरव्या रंगात बोलके दिसणारे हे डिजिटल मित्र तुम्ही विचारलेल्या कोणत्याही शेतीविषयक प्रश्नाचे उत्तर क्षणात देतात. ही माहिती तुम्ही वाचून किंवा ऐकून - अशा दोन्ही प्रकारे वापरू शकता आणि तात्काळ अंमलबजावणी करू शकता.
विशेष म्हणजे, येथे मिळणारा सल्ला कुठल्याही अप्रमाणित ऑनलाईन स्रोतावर आधारित नसून, महाराष्ट्रातील चारही कृषी विद्यापीठांच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावर आधारित असतो. हा सल्ला सर्वांसाठी एकसारखा नसून, आपल्या विभागातील हवामान, माती व स्थानिक परिस्थितीनुसार, संबंधित कृषी विज्ञान केंद्रांच्या पडताळणीनंतर दिला जातो. त्यामुळे अधिकृत, विश्वासार्ह आणि शास्त्रशुद्ध माहितीच्या आधारावर तुम्ही खर्या अर्थाने स्मार्ट शेतकरी बनता.
कसे वापरावे महाविस्तार- ए.आय. अॅप?
महाविस्तार-ए.आय. अॅप वापरणे अतिशय सोपे आणि पूर्णपणे निःशुल्क आहे. आपल्या स्मार्टफोनमधील Play Store मध्ये जाऊन Mahavistar-AI अॅप डाउनलोड करा. त्यानंतर शेतकरी ओळख क्रमांक (Farmer ID) किंवा मोबाईल नंबर टाकून नोंदणी करा. पुढे नाव, गाव आणि आपल्या पिकांची माहिती भरा आणि झाले महाविस्तार-ए.आय. अॅप वापरासाठी सज्ज.
यानंतर हवामान, पीक सल्ला, कीड-रोग, बाजारभाव, योजना किंवा चॅटबोट-हवे ते घटक निवडून आवश्यक माहिती क्षणात मिळवता येते. आज संपूर्ण महाराष्ट्रात दहा लाखांहून अधिक शेतकरी हा डिजिटल मित्र वापरत असून, हीच या अॅपच्या विश्वासार्हतेची साक्ष आहे. शेतकरी बंधूंनो, या अँपचा अधिकाधिक लाभ घेऊन आपली शेती उन्नत करावी.
- लेखिका आडगाव चोथवा (ता.येवला) येथे सहाय्यक कृषि अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.