@ सीए वैभव देवधर
यंदाचा अर्थसंकल्प लोकप्रिय घोषणांपेक्षा स्थैर्य, क्षमतानिर्मिती, आणि दीर्घकालीन स्पर्धात्मकता यावर भर देतो. केंद्रीय अर्थसंकल्प केवळ येत्या वर्षाचा आर्थिक आराखडा नाही, तर पुढील दशकातील भारताची दिशा स्पष्ट करणारा दस्तऐवज आहे. जागतिक अस्थिरता, भू-राजकीय तणाव आणि देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि वाढ यांमधील धोरणात्मक तडजोडी यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प तात्पुरत्या उपायांपेक्षा दीर्घकालीन भूमिकेवर भर देतो. मजबूत सार्वजनिक गुंतवणूक, कौशल्याधारित रोजगार, स्वदेशी उत्पादन, रणनीतिक क्षेत्रांतील आत्मनिर्भरता आणि सर्वसमावेशक वाढ या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून लवचीक, आत्मविश्वासपूर्ण पण आत्मसंतोषी नसलेल्या भूमिकेतून जागतिक स्तरावर अपरिहार्य होण्यासाठी भारत मार्गक्रमण करू लागला आहे.
जागतिक अर्थव्यवस्था आज अभूतपूर्व अस्थिरतेच्या व संक्रमणाच्या टप्प्यावर उभी आहे. भू-राजकीय तणाव, व्यापारयुद्धे, तंत्रज्ञानावर वाढते निर्बंध, ऊर्जा आणि वित्तीय बाजारातील अनिश्चितता या सगळ्या पार्श्वभूमीवर भारतासमोरचे आव्हान केवळ वाढ टिकवण्याचे नाही, तर ती वाढ लवचीक, समावेशक आणि दीर्घकालीन ठेवण्याचे आहे. 2025-26च्या आर्थिक पाहणी अहवालाने स्पष्टपणे दाखवून दिले होते की, आजची जागतिक व्यवस्था एखाद्या देशाच्या मजबूत आर्थिक मूलभूत घटकांना पूर्वीसारखी अनुकूल राहिलेली नाही. अर्थव्यवस्थेच्या मजबुतीचे निकष उत्तम असूनही चलनांवर दबाव येतो, भांडवली प्रवाह अस्थिर होतात आणि अशा परिस्थितीत धोरणात्मक चुकांसाठी फारसा वाव उरत नाही. याच पार्श्वभूमीवर सादर झालेला 2026-27चा केंद्रीय अर्थसंकल्प हा केवळ जमाखर्चाचा दस्तऐवज न राहता, भारत कोणत्या दिशेने चालला आहे याचा धोरणात्मक आरसा ठरतो. आर्थिक सर्वेक्षण अहवालाने लवचीकता, देशांतर्गत मागणी, गुंतवणूक, धोरणात्मक आत्मनिर्भरता आणि दीर्घकालीन सुधारणांवर भर ही भारताची पुढील आर्थिक प्रवासाची दिशा असावी, ही भूमिका मांडली होती. येणार्या वर्षासाठी सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प हा त्या विचारांचा प्रत्यक्ष अवतार असल्याचे स्पष्टपणे दिसते.
या पार्श्वभूमीवर यंदाचा अर्थसंकल्प लोकप्रिय घोषणांपेक्षा स्थैर्य, क्षमतानिर्मिती, आणि दीर्घकालीन स्पर्धात्मकता यावर भर देतो. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना सुरुवातीला तीन कर्तव्यांचा उल्लेख केला:
1) आर्थिक वाढ वेगाने आणि सातत्याने पुढे नेणे,
2) नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करून त्यांची क्षमता वाढवणे आणि
3) ‘सबका साथ, सबका विकास’ या तत्त्वानुसार समावेशक विकास सुनिश्चित करणे.
या कर्तव्याच्या चौकटीतून शेतकरी, महिला, युवा, नोकरदार आणि उद्योजक इत्यादी समाजातील प्रत्येक घटकासाठी स्वतंत्र पण परस्परपूरक धोरणात्मक दिशा ठरवण्यात आली आहे.
शेती: फक्त अनुदानाऐवजी उत्पन्नवाढ, जोखीम व्यवस्थापन आणि मूल्यसाखळी
शेती क्षेत्रासाठी अर्थसंकल्प 2026-27मध्ये केवळ अनुदानात्मक मदतीपुरते मर्यादित न राहता तंत्रज्ञान, मूल्यवर्धन आणि उद्यमशीलता यांवर आधारित दीर्घकालीन दृष्टीकोन स्पष्टपणे दिसतो. या अर्थसंकल्पामधील सर्वांत महत्त्वाचा निर्णय म्हणजे Bharat-VISTAR या बहुभाषिक कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्लॅटफॉर्मची घोषणा. AgriStack आणि ICAR यांच्या डेटाचा एकत्रित वापर करून ही AI प्रणाली शेतकर्यांना पीक निवड, हवामान जोखीम, बाजारभाव आणि खत-पाणी व्यवस्थापन याबाबत थेट मार्गदर्शन देणार आहे. यामुळे पारंपरिक अंदाजांवर आधारित शेतीऐवजी डेटा-आधारित शेतीकडे भारताचा प्रवास सुरू होत आहे. याचबरोबर सरकारने उच्च मूल्य पिकांवर विशेष भर दिला असून नारळ, काजू, कोको, चंदन, अगरवुड आणि इतर बागायती पिकांसाठी स्वतंत्र प्रोत्साहन योजना जाहीर केल्या आहेत. Coconut Promotion Scheme अंतर्गत जुनी झाडे बदलून नव्या जातींची लागवड केली जाणार असून, काजू व कोकोसाठी आत्मनिर्भर उत्पादन आणि 2030पर्यंत जागतिक ब्रँडिंगचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
शेतीपूरक क्षेत्रांमध्येही अर्थसंकल्पाचा भर लक्षणीय आहे. पशुपालन आणि दुग्धव्यवसायासाठी कर्जाशी संलग्न भांडवली अनुदान योजना जाहीर करण्यात आली असून, खासगी क्षेत्राच्या सहभागातून पशुवैद्यकीय महाविद्यालये, रोगनिदान प्रयोगशाळा आणि प्रजनन केंद्रे उभारली जाणार आहेत. पुढील पाच वर्षांत 20,000पेक्षा जास्त पशुवैद्यकीय आणि साहाय्यक व्यावसायिक उपलब्ध करून देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. पशुपालनातील Farmer Producer Organisations (FPOs) च्या माध्यमातून शेतकर्यांना बाजारात थेट सहभाग, किंमत स्थैर्य आणि प्रक्रिया उद्योगाशी जोडले जाण्याची संधी मिळेल. मत्स्य क्षेत्रात 500जलाशय आणि अमृत सरोवरांचा एकात्मिक विकास करून अंतर्गत मत्स्यपालनाला चालना देण्यात येणार आहे, तर किनारपट्टी भागात महिला-नेतृत्वाखालील गट आणि स्टार्टअप्सना बाजार साखळीशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, तरुणांना बागायती आणि फळबाग पुनरुज्जीवन, उच्च घनता लागवड आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीत टिकवून ठेवण्याचा स्पष्ट हेतू या बजेटमधून दिसून येतो. एकूणच, अर्थसंकल्प 2026-27 शेतकर्याला केवळ अनुदानाचा लाभार्थी न मानता, तंत्रज्ञान-सक्षम उद्योजक म्हणून पाहतो आणि हीच या अर्थसंकल्पाची सर्वांत मोठी दिशासूचक बाब आहे.
महिला: लाभार्थींपासून नेतृत्वाकडे
अर्थसंकल्पात महिलांकडे केवळ लाभार्थी म्हणून न पाहता, आर्थिक वाढीच्या केंद्रस्थानी असलेल्या ‘निर्मितीशील शक्ती’ म्हणून पाहण्याचा स्पष्ट दृष्टीकोन दिसतो. याचे सर्वांत ठळक उदाहरण म्हणजे SHE-Marts ही संकल्पना. ग्रामीण आणि निमशहरी भागात महिला-स्वामित्वाखालील समुदाय आधारित किरकोळ विक्री केंद्रे उभारून महिलांना थेट बाजारपेठेत प्रवेश देण्याचा हा प्रयत्न आहे. स्वयं-सहायता गटांच्या उत्पादनांना स्थिर बाजारपेठ मिळावी, स्थानिक उद्योजिकांना ब्रँड ओळख मिळावी आणि महिलांचे उत्पन्न दीर्घकाळ टिकावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर लखपती दीदी 2.0 ही संकल्पना केवळ कर्जपुरवठ्यापुरती मर्यादित न राहता महिलांना सूक्ष्म उद्योजकतेकडे नेणारा पुढचा टप्पा ठरते, जिथे उत्पादन, प्रक्रिया, पॅकेजिंग आणि बाजार उपलब्धता यांवर भर देण्यात आला आहे.
शिक्षण आणि कौशल्य क्षेत्रात महिलांसाठी संरचनात्मक अडथळे दूर करण्यावर या अर्थसंकल्पामध्ये लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. प्रत्येक जिल्ह्यात मुलींसाठी वसतिगृह उभारण्यासाठी भांडवली सहाय्य देण्याचा निर्णय हा केवळ सामाजिक नव्हे तर आर्थिक गुंतवणूक म्हणून पाहावा लागेल, कारण उच्च शिक्षणातील सहभाग वाढल्याशिवाय महिलांचे श्रमबाजारातील योगदान वाढू शकत नाही. विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (STEM) याविषयांमध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी प्रयोगशाळा, संशोधन सुविधा यांना अनुकूल अशी पायाभूत सुविधा विकसित करण्याचा सरकारचा हेतू या अर्थसंकल्पामधून स्पष्ट होतो. याचबरोबर 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये उभारल्या जाणार्या AVGC Creator Labs मुळे मुलींना अॅनिमेशन, गेमिंग आणि डिजिटल कंटेंटसारख्या नव्या अर्थव्यवस्थेतील क्षेत्रांमध्ये संधी मिळणार आहे.
आरोग्य आणि केअर इकॉनॉमी हे महिलांसाठी रोजगार वेगाने वाढवणारे क्षेत्र असेल. पुढील पाच वर्षांत सुमारे दीड लाख केअरगिव्हर्स घडवण्याचा निर्णय, तसेच एक लाख नव्या संलग्न वैद्यकीय व्यावसायिक तयार करण्याची योजना, या दोन्ही गोष्टी महिलांसाठी स्थिर आणि सन्मानजनक रोजगारनिर्मितीचा पाया घालतात. आयुष क्षेत्रातील नव्या संस्था, उत्पादन आणि निर्यात संधींमुळे महिलांचा सहभाग मूल्यसाखळीच्या प्रत्येक टप्प्यावर वाढण्याची शक्यता आहे. पर्यटन आणि वारसा आधारित उपक्रमांमध्ये स्थानिक महिलांना मार्गदर्शक, व्यवस्थापक आणि सेवा पुरवठादार म्हणून संधी देण्याचा दृष्टीकोनही या अर्थसंकल्पामध्ये दिसतो. एकूणच अर्थसंकल्प महिलांच्या सबलीकरणाकडे कल्याणाच्या चौकटीपलीकडे जाऊन, आर्थिक भागीदारी आणि उद्यमशील नेतृत्व या दिशेने निर्णायक पाऊल टाकतो, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
युवा: कौशल्य, रोजगार आणि भारताच्या नव्या अर्थव्यवस्थेची तयारी
या अर्थसंकल्पात युवकांकडे केवळ रोजगार शोधणारा घटक म्हणून न पाहता, विकसित भारताचा सक्रिय भागीदार म्हणून पाहिल्याचे स्पष्ट दिसते. शिक्षण, कौशल्य, सेवा क्षेत्र, पर्यटन, सर्जनशील उद्योग आणि आरोग्यसेवा या सर्व क्षेत्रांतून युवकांसाठी नव्या संधी निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
सेवा क्षेत्र हे भारताच्या वाढीचे प्रमुख इंजिन राहणार असल्याचे लक्षात घेऊन, सरकारने 'Education to Employment and Enterprise' या विषयावर उच्चस्तरीय स्थायी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचा उद्देश शिक्षण, रोजगार आणि उद्योजकता यांमधील दरी कमी करणे आणि युवकांच्या कौशल्यांना प्रत्यक्ष रोजगाराशी जोडणे हा आहे.
आरोग्य क्षेत्रातही युवकांसाठी मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण केल्या जात आहेत. पुढील पाच वर्षांत 1 लाख संलग्न वैद्यकीय व्यावसायिक तयार करण्याचा संकल्प करण्यात आला असून, यासाठी विद्यमान संस्थांमध्ये सुधारणा आणि नवीन संस्थांची उभारणी केली जाणार आहे. यामुळे केवळ रोजगारनिर्मितीच नव्हे, तर भारताला वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय पर्यटनाचे केंद्र बनवण्याची दिशाही स्पष्ट होते. याच अनुषंगाने पाच प्रादेशिक वैद्यकीय केंद्रे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्जनशील आणि डिजिटल अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ‘ऑरेंज इकॉनॉमी’ हा महत्त्वाचा भाग ठरत आहे. मुंबईतील Indian Institute of Creative Technologies मार्फत देशभरातील 15,000 शाळा आणि 500 महाविद्यालयांमध्ये AVGC (Animation, Visual Effects, Gaming, Comics) Content Creator प्रयोगशाळा स्थापन केल्या जाणार आहेत. यामुळे डिजिटल कंटेंट, गेमिंग आणि क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रात युवकांना जागतिक दर्जाच्या संधी उपलब्ध होतील.
पर्यटन क्षेत्रातील कौशल्यविकासावरही या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. 10,000 टूरिस्ट गाईड्सना प्रशिक्षित करण्यासाठी पथदर्शी योजना जाहीर करण्यात आली असून, ही 12 आठवड्यांची संरचित प्रशिक्षण योजना IIMच्या सहकार्याने राबवली जाणार आहे. या प्रशिक्षणात केवळ पर्यटनस्थळांची माहिती नव्हे, तर storytelling, heritage interpretation, ग्राहक संवाद, डिजिटल साधनांचा वापर आणि आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा कौशल्ये विकसित केली जाणार आहेत. याशिवाय, National Destination Digital Knowledge Grid उभारून देशातील सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक स्थळांची डिजिटल नोंद तयार केली जाणार आहे. पर्यटन क्षेत्राला कमी भांडवलात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीची क्षमता असल्याने, ही पावले ग्रामीण आणि अर्धशहरी युवकांसाठी विशेष महत्त्वाची ठरणार आहेत.
एकूणच, या अर्थसंकल्पातून युवकांसाठी स्पष्ट संदेश दिला गेला आहे; भारताची पुढील वाढ कौशल्याधारित, सेवा-केंद्रित आणि जागतिक स्पर्धेला तोंड देणारी असेल, आणि त्या प्रवासाचे नेतृत्व युवकांकडे असेल.
नोकरदार वर्ग: तात्काळ दिलासा नाही तर दीर्घकालीन रोजगारक्षमता
अर्थसंकल्पामध्ये नोकरदार वर्गासाठी थेट करसवलतींपेक्षा रोजगाराच्या गुणवत्तेत सुधारणा, कौशल्याधारित नोकर्या आणि दीर्घकालीन स्थैर्य यावर भर दिलेला दिसतो. सेवा क्षेत्राला ‘विकसित भारत’चा मुख्य आधार मानत Education-to-Employment and Enterprise Standing Committee स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, यामागचा उद्देश केवळ नोकर्यांची संख्या वाढवणे नसून, उत्पादक, स्पर्धात्मक आणि भविष्यातील कौशल्यांशी सुसंगत रोजगारनिर्मिती हा आहे. आयटी, AVGC, आरोग्यसेवा, पर्यटन, लॉजिस्टिक्स, आरोग्य आणि केअर इकॉनॉमी या क्षेत्रांमध्ये यामुळे मोठ्या संधी निर्माण होणार आहेत. पाच प्रादेशिक मेडिकल पर्यटन केंद्रांमुळे डॉक्टर, नर्सेस, टेक्निशियन्स, हॉस्पिटॅलिटी आणि सपोर्ट स्टाफसाठी उच्च-मूल्याच्या नोकर्या उपलब्ध होतील.
12.2 लाख कोटींच्या सार्वजनिक भांडवली खर्चासह डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर्स, राष्ट्रीय जलमार्ग, शिप रिपेअर इकोसिस्टम आणि कोस्टल कार्गो स्कीम यामुळे अभियंते, तंत्रज्ञ, प्रकल्प व्यवस्थापक आणि कुशल कामगारांसाठी रोजगार वाढेल, तोही टियर-2 व टियर-3 शहरांमध्ये. याशिवाय High Level Committee on Banking for Viksit Bharat मुळे वित्तीय स्थैर्य, रोजगार सुरक्षा आणि करिअरसंधींना बळ मिळेल. एकूणच, हा अर्थसंकल्प नोकरदार वर्गाला तात्काळ दिलासा देण्याऐवजी दीर्घकालीन रोजगारक्षमतेकडे नेणारे आहे.
उद्योजक आणि MSME: विकासाचे इंजिन
या अर्थसंकल्पात उद्योजक आणि MSME क्षेत्राला केवळ कर्जपुरवठ्यापुरते मर्यादित न ठेवता ‘विस्तारक्षमता, तंत्रज्ञान आणि जागतिक स्पर्धा’ या टप्प्यावर नेण्याचा स्पष्ट प्रयत्न दिसतो. 10,000 कोटींच्या SME Growth Fund द्वारे निवडक निकषांवर आधारित "Champion SMEs' घडवण्याची संकल्पना ही पारंपरिक सबसिडी मानसिकतेपासून मोठी उडी आहे. याला पूरक म्हणून Self-Reliant India Fund मध्ये 2,000 कोटींची भर घालून मायक्रो उद्योजकांसाठी जोखीम भांडवलाचा प्रवाह टिकवून ठेवण्यात आला आहे. यामुळे स्टार्ट-अप्स आणि सूक्ष्म उद्योग केवळ टिकणार नाहीत, तर औपचारिक आणि विस्तारक्षम बनतील.
उद्योजकांसाठी सर्वांत महत्त्वाचा बदल म्हणजे सात Strategic and Frontier Sectors मध्ये उत्पादन वाढवण्याचा आक्रमक अजेंडा. बायोफार्मा SHAKTI, सेमीकंडक्टर मिशन 2.0, इलेक्ट्रॉनिक्स घटक उत्पादन, रेअर अर्थ कॉरिडॉर्स, केमिकल पार्क्स, कॅपिटल गुड्स आणि टेक्सटाईल्स या क्षेत्रांमधील गुंतवणूक चडचए साठी मोठ्या मूल्यसाखळीची संधी उघडते. उच्च-तंत्रक्षम टूलरूम्स, कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग स्कीम आणि Construction Equipment Initiative यामुळे स्थानिक उत्पादक जागतिक दर्जाचे घटक कमी किमतीत तयार करू शकतील.
भांडवलासोबतच ‘कायदेशीर अनुपालन आणि कॅश-फ्लो’ हा TReDSचा जुना प्रश्नही हाताळण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील खरेदीसाठी TReDSचा सक्तीचा वापर, GeM-TReDS एकत्रीकरण, TReDS इनव्हॉइसवर क्रेडिट गॅरंटी आणि सेकंडरी मार्केट लिक्विडिटी यामुळे पैसे मिळण्यास लागणारा विलंब कमी होईल. ICAI, ICSI आणि ICMAI मार्फत Corporate Mitras तयार करण्याचा निर्णय म्हणजे लहान उद्योजकांसाठी परवडणारी व्यावसायिक मदत उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. एकूणच, हे बजेट MSMEला ‘कुटुंबीय उद्योग’ या चौकटीतून बाहेर काढून ‘राष्ट्रीय विकासाचे इंजिन’ बनवण्याच्या दिशेने टाकलेले ठोस पाऊल आहे.
शेती-महिला-युवा-नोकरदार-उद्योजक या पाचही घटकांकडे जरी स्वतंत्रपणे पाहता आले तरीही या अर्थसंकल्पाची खरी ताकद त्यांच्या परस्परसंबंधांत आहे. शेतीतून ग्रामीण मागणी वाढते, महिलांचा सहभाग अर्थव्यवस्थेला खोली देतो, युवक कौशल्यामुळे उत्पादकता वाढते, नोकरदार वर्ग स्थिरतेचा आधार बनतो, आणि उद्योजक नव्या संधी निर्माण करतात. हा एकात्मिक विकासाचा प्रयत्न आहे.
हा केंद्रीय अर्थसंकल्प केवळ येत्या वर्षाचा आर्थिक आराखडा नाही, तर पुढील दशकातील भारताची दिशा स्पष्ट करणारा दस्तऐवज आहे. जागतिक अस्थिरता, भू-राजकीय तणाव आणि देशाचे सार्वभौमत्व, सुरक्षा आणि वाढ यांमधील धोरणात्मक तडजोडी यांच्या पार्श्वभूमीवर हा अर्थसंकल्प तात्पुरत्या उपायांपेक्षा दीर्घकालीन भूमिकेवर भर देतो. मजबूत सार्वजनिक गुंतवणूक, कौशल्याधारित रोजगार, स्वदेशी उत्पादन, रणनीतिक क्षेत्रांतील आत्मनिर्भरता आणि सर्वसमावेशक वाढ या सगळ्यांचा एकत्रित परिणाम म्हणून लवचीक, आत्मविश्वासपूर्ण पण आत्मसंतोषी नसलेल्या भूमिकेतून जागतिक स्तरावर अपरिहार्य होण्यासाठी भारत मार्गक्रमण करू लागला आहे. आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त केलेल्या अपेक्षेप्रमाणे
'India has started running sprint and marathon simultaneously.'