विवाह संस्कार

विवेक मराठी    02-Feb-2026   
Total Views |
marriage
विवाह हे दोन आत्म्यांचे पवित्र मिलन आहे. भारतीय दृष्टीने स्त्री-पुरुषाचे मिलन एक पवित्र व शुद्ध कार्य मानले आहे. उत्तम संतती निर्माण करणे हे धर्मकार्य मानले आहे. वधू-वराचे मिलन हे पुरुष व प्रकृती, शिव व शक्ती यांच्या मिलनाप्रमाणे दैवी आहे.
शिक्षण संपल्यावर एक वर्ष देशाटनास जाण्याची पद्धत होती. ह्या वर्षभरात स्नातकाने, म्हणजे ग्रॅज्युएट झालेल्या युवकाने गावोगावी फिरून, रीतीभाती जाणून घ्याव्यात, विविध भाषा त्याच्या कानावर पडाव्यात, वेगवेगळ्या लोकांची ओळख व्हावी, लोक कसे राहातात, कसे वागतात, त्यांच्या समस्या काय आहेत... अशा अनेक गोष्टी शिकाव्यात याकरिता लावून दिलेली व्यवस्था होती. त्यानंतर मुलगा घरी आला की, त्याच्यासाठी योग्य मुलगी पाहून विवाह करून देत असत.
 
 
विवाह हे दोन आत्म्यांचे पवित्र मिलन आहे. भारतीय दृष्टीने स्त्री-पुरुषाचे मिलन एक पवित्र व शुद्ध कार्य मानले आहे. उत्तम संतती निर्माण करणे हे धर्मकार्य मानले आहे. वधू-वराचे मिलन हे पुरुष व प्रकृती, शिव व शक्ती यांच्या मिलनाप्रमाणे दैवी आहे. आपल्या अध्यात्मिक देवता पण पाहा, सीता-राम, विष्णू-लक्ष्मी, शंकर-पार्वती अशा जोडीनेच येतात. विवाहामध्ये स्त्री व पुरुष दोघेही या मिलनाचे समान भागीदार असतात. त्यांची भूमिका भिन्न असली तरी अधिकार किंवा जबाबदारी समान मानली आहे. महाभारतात विवाहाचे आठ प्रकार सांगितले आहेत. त्यातील पहिले चार मान्यवर होते तर शेवटचे चार अयोग्य होते-
 
 
1. ब्रह्म विवाह: योग्य वर पाहून, वडिलांनी मुलीचे लग्न लावून देणे. हा सर्वश्रेष्ठ विवाह मनाला जात असे.
2. दैव विवाह: यज्ञकार्यात मदत करणार्‍या पुरोहिताशी आपल्या मुलीचा विवाह करवून देणे.
3. आर्ष विवाह: वधू पित्याला दोन गाई किंवा बैल देऊन, त्याच्या कन्येशी लग्न करणे.
4. प्रजापत्य विवाह: योग्य वधू पाहून, वराच्या वडिलांनी मुलाचे लग्न लावून देणे.
5. गंधर्व विवाह: प्रेमात पडलेल्या मुलाने आणि मुलीने स्वतःच्या इच्छेने लग्न करणे (प्रेमविवाह).
6. असुर विवाह: वधूच्या पित्याला पैसे देऊन त्याच्या मुलीशी लग्न करणे.
7. राक्षस विवाह: वधूला पळवून नेऊन तिच्याशी लग्न करणे. हा विवाह केवळ क्षत्रियांमध्ये संमत होता.
8. पैशाच विवाह: मुलीला फसवून, तिची इच्छा नसताना, तिच्याशी बळजबरीने लग्न करणे. हा सर्वात निंदनीय विवाह प्रकार मानला गेला होता.
 
 
यातील एकाही विवाह प्रकारात मुलाला हुंडा देण्याची पद्धत दिसत नाही. काही प्रकारात वधूच्या पित्याला ‘वधू शुल्क’ दिले जात असे, परंतु ती पद्धत सुद्धा निंदनीय मानली जात होती.
 
 
विवाह संस्काराचा साक्षी अग्निदेव असतो. त्याच्या साक्षीने वधूवर विवाहबद्ध होतात. या मध्ये तीन विधी आवश्यक आहेत-लाजा होम, सप्तपदी आणि कन्यादान किंवा स्वयंवर. याशिवाय इतर विधी जसे - ग्रहमख, हळदी, सीमान्त पूजन, गौरीहर पूजा, ग्रंथीबंधन, अक्षतारोपण, पाणिग्रहण, अश्मारोहण, मंगलसूत्रबंधन, मंगलाष्टक, वरमाला, गृहप्रवेश, सत्यनारायण, लक्ष्मीपूजन आदि विधी मंगल परिणय परिपूर्ण करतात.
 
 
लाजाहोम हा यज्ञ आहे. यावेळी लाह्यांची अग्निमध्ये आहुती देतात. वधू आणि वर अग्नीला प्रदक्षिणा घालतात. इंद्र, अग्नि, वरुण, सूर्य आदि देवतांकडून आशीर्वाद मागतात.
 
त्या वेळी वर म्हणतो -
 
अग्नीने ज्या धर्माच्या साहाय्याने पृथ्वीचा हात हातात धरला होता, तसे, हे वधू! मी तुझा हात माझ्या हातात घेतो.
मी तुझा हात हातात घेतला आहे! मला आयुष्यभर साथ दे! मी गृहस्थ धर्माची कर्तव्ये पार पाडावीत म्हणून देवाने मला तुझी साथ दिली, हे माझे भाग्य आहे!
 
सर्व देवता माझ्या वधूचे मंगल करोत! तिला दीर्घायुष्य लाभो! तिला आरोग्य लाभो! तिला नातवंडांच्या बरोबर खेळायचे सुख लाभू दे!
 
तर वधू म्हणते - हे अग्निदेवा! आम्ही पती-पत्नी कधीही एकमेकांपासून दूर न जावो. विलग न होवो!
 
माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभू दे!
 
आमचे एकमेकांवर अखंड प्रेम राहो!
 
कन्यादान करताना वधूपिता आपल्या मुलीला वराकडे सोपवतात. विवाहाच्या दिवशी वराला विष्णुस्वरूप तर वधूला साक्षात लक्ष्मी मानले जाते. कन्यादान म्हणजे विष्णू आणि लक्ष्मीचे पुनर्मिलन. या वेळी वधूपिता प्रार्थना करतात, हे बृहस्पती! हा नवरा वधूशी प्रेमाने वागणारा व गोड बोलणारा होवो! तो तिच्याशी सहमत असणारा होवो! हे इंद्र देवा! या दोघांना विवाह बंधनात बांध! मग ते चक्रवाक पक्ष्यांप्रमाणे सदैव सोबत राहतील. त्यांना आनंदाने सुखासमाधानाने जगू दे! तसेच ते वराकडून शपथ घेतात-
त्याने वधूला जे अनुकूल असेल तेच करावे.
 
त्याने पत्नीशी मृदू भाषेत बोलावे!
 
त्याने पत्नीला मान्य असेल अशा प्रकारे वागावे.
 
त्याने पत्नीची काळजी घ्यावी. तिला सर्व कार्यांत स्वत:बरोबर सामील करून घ्यावे.
 
तसेच त्याने त्रिवार नातिचरामि अशी शपथ द्यावी. अर्थात - धर्म, अर्थ आणि काम या क्षेत्रात मी पत्नीच्या मर्यादांचे उल्लंघन करणार नाही. वराकडून ह्या शपथा घेताना, वधूपिता कन्येला नवीन संसारासाठी अनेक आशीर्वाद देतात आणि तिला देखील ते उपदेश देण्यास विसरत नाहीत, विवाहातील मंत्रात ते वधूला सांगतात - नवीन घरात सर्वांशी आदरपूर्वक वाग, आपल्या कर्तव्यांविषयी जागरूक राहा. घरातील कर्ती स्त्री होऊन तू सर्वांशी प्रेमाने वाग, कटू बोलून कुणाचे अंत:करण दुखवू नकोस.
 
नवर्‍याचा विश्वास संपादन कर. तुला सुख, समाधान व सौभाग्य लाभो! अमृत्त्वाच्या पथाने तुझी वाटचाल होवो. अशा प्रकारे वागल्याने तू नवीन घरातील सम्राज्ञी होशील!
 
महाभारतातील वनपर्वात सत्यवान-सावित्रीचे उपाख्यान आले आहे. त्या कथेत सत्यवानाचे प्राण गेल्यावर, सावित्री यमराजांच्या मागे मागे चालू लागली आणि ती यमराजांना म्हणाली-
 
दोन जण जेव्हा एकत्र सात पावले चालतात, तेव्हा त्यांच्यात मैत्री निर्माण होते!
 
प्राहुः साप्तपदं मैत्रं बुधास्तत्त्वार्थदर्शिनः ।
 
ज्ञानी लोक सांगतात की, सात पावले एकत्र चालल्याने मैत्री जुळते. आता आपली मैत्री झाली आहे. आता तू माझा मित्र झालास, मला सहाय्य करणारा झालास! महाभारतातील ह्या विचाराचा आजही अनुभव येतो. ज्यांच्या सोबत आपण एकत्र प्रवास करतो ते आपले मित्र होतात! हीच संकल्पना विवाहसंस्कारातील ‘सप्तपदी’ मध्ये दिसते. सप्तपदीच्या वेळी, वधू आणि वर सात पावले एकत्र चालतात आणि प्रत्येक पावलाला एक एक शपथ घेतात -
 
1. ॐ इष एकपदी भव सा मामनुव्रता भव।
 
आम्ही दोघे एक पाऊल एकत्र चाललो आहोत. आम्ही दोघे एकमेकांचे जीवनसाथी होऊ! आम्ही जीवनभर एकत्र चालायचे वचन देतो.
 
2. ॐ ऊर्जे द्विपदी भव सा मामनुव्रता भव।
 
आम्ही एकमेकांना आरोग्यवान, बलवान आणि सक्रीय होण्यास साहाय्य करू. आम्ही एकमेकांच्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याचे रक्षण करू.
 
3. ॐ रायस्पोषाय त्रिपदी भव सा मामनुव्रता भव।
 
आम्ही चांगल्या मार्गाने अर्थार्जन करू. आम्ही एकमेकांच्या विचाराने, चांगल्या कार्यासाठी त्या अर्थाचा व्यय करू.
4. ॐ मयोभवाय चतुष्पदी भव सा मामनुव्रता भव।
आम्ही आमचे घर सुख, शांती आणि आनंदाने ओतप्रोत भरू. आम्ही सुखदु:खात एकमेकांना साथ देऊ.
5. ॐ प्रजाभ्यां पंचपदी भव सा मामनुव्रता भव।
आम्ही उत्तम कुटुंब निर्माण करू आणि दोन्हीकडच्या परिवारातील सदस्यांचे रक्षण करू.
6. ॐ ऋतुभ्यः षट्पदी भव सा मामनुव्रता भव।
आम्ही युवा, प्रौढ आणि वृद्ध ह्या तिन्ही काळांत एकमेकांना साथ देऊ. आम्ही सर्व ऋतूंचा आनंद एकत्र घेऊ, एकमेकांचा आदर करू.
7. ॐ सखे सप्तपदी भव सा मामनुव्रता भव।
आम्ही एकमेकांचे चांगले मित्र होऊ. आम्ही एकमेकांसोबत सात पावले चाललो आहोत... आता आमचे नाते दृढ झाले आहे.
इतर संस्कारांच्या प्रमाणे, हा संस्कारदेखील जीवनातील एक मैलाचा दगड आहे. लग्न होईपर्यंत वधू आणि वर हे कुणाचा तरी मुलगा आणि कुणाची तरी मुलगी असतात. लग्नाच्या दिवशी ते नवरा-मुलगा आणि नवरी-मुलगी असतात. पण लग्न झाल्यावर मात्र ओळख बदलून ते - कुणाचा तरी नवरा, कुणाची तरी नवरी होतात. ह्या संस्कारात त्यांचे ‘मूल’पण संपते आणि गृहस्थपण सुरू होते. नोकरीत जसे बढती मिळाल्यावर मान वाढतो, आणि जबाबदारी वाढते. तसे विवाहानंतर नवदांपत्याचा कुटुंबात आणि समाजात मान वाढतो आणि जबाबदारीपण. ती जबाबदारी कुठली ते आपण पुढील लेखात पाहू.

दीपाली पाटवदकर

दीपाली पाटवदकर

9822455650

 deepali.patwadkar@gmail.com