दु:ख आणि कर्तव्य

03 Feb 2026 18:06:21
 स्त्री ही मातृशक्तीचे रूप असते. महाकवी टेनिसन यांनी चार कडव्याच्या या कवितेत तिचे हृदयस्पर्शी दर्शन घडविले आहे. पतीच्या अकाली निधनाचे दु:ख काय असते, हे ते दु:ख भोगणारी स्त्री जाणते. जिजाऊंना देखील अकस्मात पतिनिधनाचे दु:ख भोगावे लागले. त्या स्तब्ध झाल्या. पतीबरोबर सहगमन करण्याचा त्यांनी निर्णय केला. त्यांचा बाळ, शिवरायांनी त्यांना रोखले. पतिनिधनाचे दु:ख पचवून मुलासाठी म्हणजे मुलाच्या स्वराज्यबाळासाठी जगण्याचा निर्णय जिजाऊंनी केला.
 
Sunetra Pawar 
 
अजितदादा पवार यांचा विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांचे पार्थिव घरी आणले गेेले. सुनेत्राताई पवार यांना हा अनपेक्षित फार मोठा मानसिक धक्का होता. त्यांच्या सांत्वनासाठी अनेक राजनेते गेले, त्या हात जोडून स्तब्ध बसून होत्या. त्यांची ही प्रतिमा पाहिल्यानंतर मला ऑल्फ्रेड लॉर्ड टेनिसन यांच्या कवितेची आठवण झाली. या कवितेचे शीषर्क आहे -
 
Home they brought her warrior dead.
 
कवितेतील प्रसंग अशा आहे की, घरी रणवीराचे पार्थिव आणले गेले आहे. त्या रणवीराच्या पत्नीच्या सांत्वनासाठी लोक आले आहेत. पत्नी स्तब्ध झालेली आहे. ती काही बोलतच नाही. चार कडव्याची ही कविता आहे. ती हृदयाला स्पर्श करून जाते.
 
कवितेचा मराठी भावनुवाद असा आहे.
 
त्यांनी तिच्या रणवीराचे पार्थिव घरी आणले,
तिची शुद्ध हरपली नाही.
तिच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले नाहीत...
तिच्या सख्या हे पाहत असताना वदल्या...
तिनेे अश्रुपात करावा अन्यथा दु:खभाराने ती संपेल.
तिच्या दु:खवियोगासाठी त्यांनी रणवीराची स्तुती केली.
तो मनमिळावू आणि नम्र होता, प्रेमादरास पात्र होता.
सच्चा मित्र आणि दिलदार विरोधक होता.
पण ती बोलली नाही. काही प्रतिसाद तिने दिला नाही.
तिची एक सखी उठली आणि तिने
रणवीराच्या चेहर्‍यावरची चादर काढली.
चेहरा बघूनही ती शोकाकुल झाली नाही,
तिचा प्रतिसाद शून्यवत होता.
नव्वद वर्षांची एक दाई उठली.
तिने तिच्या बाळाला तिच्या मांडीवर ठेवले,
वळवाच्या पावसाच्या सरी तिच्या डोळ्यांतून वाहू लागल्या.
“माझ्या बाळा, मी तुझ्यासाठी जगणार आहे.”
 
अजितदादांनी जन्मास घातलेले राष्ट्रवादीचे बाळ सुनेत्राबाईच्या मांडीवर सहकार्‍यांनी ठेवले. आता या बाळासाठी जगायचे आहे. त्याला वाढवायचे आहे. त्याचे संवर्धन करायचे आहे. ही कर्तव्यभावना जागी झाली आणि दु:खावर कर्तव्याने मात केली. महाराष्ट्राच्या उप मुख्यमंत्री म्हणून त्यांचा शपथविधी झाला.
 
स्त्री ही मातृशक्तीचे रूप असते. महाकवी टेनिसन यांनी चार कडव्याच्या या कवितेत तिचे हृदयस्पर्शी दर्शन घडविले आहे. पतीच्या अकाली निधनाचे दु:ख काय असते, हे ते दु:ख भोगणारी स्त्री जाणते. जिजाऊंना देखील अकस्मात पतिनिधनाचे दु:ख भोगावे लागले. त्या स्तब्ध झाल्या. पतीबरोबर सहगमन करण्याचा त्यांनी निर्णय केला. त्यांचा बाळ, शिवरायांनी त्यांना रोखले. पतिनिधनाचे दु:ख पचवून मुलासाठी म्हणजे मुलाच्या स्वराज्यबाळासाठी जगण्याचा निर्णय जिजाऊंनी केला.
 
हा मराठी बाणा धीरोदात्तपणे सुनेत्राताईंनी जपला, जबाबदारी स्वीकारली. मातृशक्ती रूपाने ही जबादारी पार पाडण्यासाठी ईश्वराने त्यांना सर्व शक्ती द्यावी, एवढीच प्रार्थना आपण करू शकतो.
Powered By Sangraha 9.0