@भरत इदाते
97642 30343
पर्यटन, परिचय आणि प्रेरणा या तीन हेतूंना धरून नुकतीच साप्ताहिक विवेकच्या प्रतिनिधींची द्वारका दर्शन यात्रा घडली. या यात्रेचा अनुभव सांगणारा हा मनमोकळा वृत्तांत...
साप्ताहिक विवेकद्वारे आपल्या प्रतिनिधींसाठी दरवर्षी मंदिरदर्शन म्हणून पर्यटन घडविले जाते. एका प्रतिनिधी बैठकीत आपल्या योजनेतून विवेक साप्ताहिक प्रतिनिधी समूह हा द्वारका दर्शन करेल, असे ठरले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतून विवेक प्रतिनिधी यात सहभागी झाले होते.
केल्याने देशाटन, पंडितमैत्री, सभेत संचार
शास्त्र-ग्रंथ विलोकन, मनुजा चातुर्य येतसे फार
या वरील उक्तीप्रमाणे मठ-मंदिरे पाहिल्यावर मनामध्ये एक सात्विक भाव संचारतो. याच भावनेने खूप दिवस आम्ही
चातकासारखी या क्षणाची वाट पाहत होतो.
मग ठरल्याप्रमाणे सोमवारी पाच जानेवारीला आम्ही रात्री नऊ वाजता मुंबई सेंट्रलहून सौराष्ट्र मेलने द्वारकेला निघालो. काहीजण नागपूरहून द्वारकेला येणार होते. असे मिळून एकूण 24 प्रतिनिधी संख्या होती. मुंबई सेंट्रल, दादर, बोरीवली अशा ठिकाणी काहीजण ट्रेनमध्ये चढले आणि गाडी द्वारकेकडे मार्गस्थ झाली. द्वारकाधीश भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा गजर करत आम्ही उत्साहाने पुढे निघालो. आमच्यात जास्त संख्या ज्येष्ठ नागरिकांची होती. प्रवास करत जाताना कापसाचे मळे, पिवळसर माती, समुद्रकिनार्यावरील मिठागरे, खुरटी झाडे-झुडपे, विस्तीर्ण सपाट प्रदेश, गुजराती भाषकांचा विशिष्ट पेहराव, पर्यटकांसाठी घोडागाडी व उंट सवारी, खाद्यसंस्कृती, तेथील थंडगार हवा, अशी काही वैशिष्ट्ये आम्हाला पाहावयास आणि अनुभवायला मिळाली. याचा आनंद घेत आम्ही भ्रमंती करत होतो.
शिदोरीतून आणलेला खाऊ एकमेकांना देत आम्ही एकमेकांशी परिचय करून घेत होतो आणि एकमेकांचे विचार ऐकत त्यांच्याशी समरस होत होतो. मध्येच संघकार्य आणि पंच परिवर्तन यासंदर्भात चर्चादेखील होत होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच आपल्या विचारांचा धागा असून सारेजण एक झाले होते. साप्ताहिक विवेक कार्यालयामार्फत हर्षद पनवेलकर आणि राजेश गावडे या दोघांनी चहा, न्याहारी, भोजन, विश्रांती, तसेच देवदर्शन ही आघाडी सांभाळली होती आणि या संदर्भातल्या सर्व सूचना ते वेळोवेळी आम्हा सर्वांना देत होते. दोन डझनभर प्रतिनिधींमध्ये कराडकर काका, अग्निहोत्री, धोंडे, पाध्ये, आराध्ये ही मंडळी वरिष्ठ होती. त्यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन होत होते. काही स्त्रियांचा व बालकांचाही या सहलीमध्ये समावेश होता. तसेच काही परिवार यामध्ये समाविष्ट होते. विवेकजी आणि महेशजी यांच्यासारखे मित्र सोबतीला होते.
सहा तारखेला दुपारी आम्ही द्वारकेला पोहोचलो आणि मग हॉटेल यमुना येथे दोन दिवसांचा निवास केला. स्नान वगैरे आटोपून भगवान श्रीविष्णूचा आठवा अवतार द्वारकाधीशाचे दर्शन घेतले. दर्शनासाठी तेथे खूप मोठी रांग होती; पण शिस्त-नियम पाळून, राधे.....राधे.... म्हणत सावळ्या घनश्यामाचे मनोभावे दर्शन घेतले.
श्रीकृष्ण-सुदामा भेट हा तर श्रीकृष्णचरित्रातील महत्त्वाचा प्रसंग! ज्या मार्गाने सुदामा श्रीकृष्णाला भेटण्यासाठी आला होता, तो गोमती नदीवरील पूल ’सुदामा पूल’ म्हणून ओळखला जातो. तो सुदामा पूलदेखील आम्ही बघितला. येथील मंदिराशेजारी गोमती नदी वाहते. त्या नदीचे दर्शन घेऊन पंचतीर्थ जलकुंडातील गोडे पाणी प्यायलो. गोमती नदीच्या काठावर उभ्या असलेल्या गाईला नैवेद्य खाऊ घातला. त्यानंतर आम्ही बाजारात प्रसाद आणि इतर साहित्य खरेदी केले आणि मग एका गुजराती हॉटेलमध्ये चवदार भोजनाचा आस्वाद घेतला. पोटभर भोजनानंतर मग हिवाळ्यातील गुलाबी थंडीचा अनुभव घेत झोपी गेलो.
सात तारखेला सकाळी काही जणांनी द्वारकाधीशाचे पुन्हा दर्शन घेतले आणि चहा, न्याहरी आटोपून एक मिनीबस करून आम्ही पुढील प्रवासाला निघालो. प्रथमत: आम्ही बेट द्वारका येथे जाऊन दर्शन घेतले. श्रीकृष्णाच्या वैकुंठगमनानंतर द्वारकानगरी खोल समुद्रात बुडाली, त्या ठिकाणी जाण्याचा योग आला. मग तिथून आम्ही गोपी तलाव पाहिला. तिथे काही छोटी-छोटी मंदिरे पाहिली. पुढे जाऊन आम्ही रुक्मिणी मंदिर पाहिले.
द्वारका दर्शनानंतर फिरताना एक गाईड सोबत होता. त्यांनी आम्हाला तेथील असलेल्या ठिकाणांची नीटशी तपशीलवार माहिती सांगितली. त्यापुढे आम्ही श्री नागेश्वर मंदिराचे दर्शन घेतले. तिथे शिवशंकराची 50-60 फुटांची भव्यदिव्य अशी मूर्ती पाहून मन प्रसन्न झाले. त्या मंदिरात अनेक रांगेमधून जाताना शंभर मिनिटे उभे होतो. बम बम भोलेनाथ, ओम् नमः शिवाय... असा गजर करत आम्ही सर्वजण दर्शन घेत होतो. तिथून संध्याकाळी आम्ही श्री भडकेश्वर मंदिर शिवलिंग दर्शन घेतले. सूर्यास्तानंतरचे काही क्षण आम्हाला त्या किनारी टिपता आले. तिथून आम्ही पुन्हा द्वारकेला निवासस्थानी पोहोचलो.
दोन दिवस द्वारकाधीश मंदिराजवळच आम्ही राहात असल्यामुळे अनेकदा मंदिराच्या कळसाचे दर्शन मधल्या रिकाम्या वेळेत जाऊन घेत होतो. काही खरेदी करत होतो. त्या मंदिरावरील ध्वज दिवसातून पाच वेळा तरी बदलत असे. ज्याचा नवस असतो, तो कळसाजवळ जाऊन कळसावर ध्वज फडकवण्याचा मान मिळवतो. तो क्षण वेळोवेळी कळसाचे दर्शन घेताना पाहायला मिळाला. परतीच्या प्रवासाला लागण्यापूर्वी आम्ही पुन्हा एकदा कळसाचे दर्शन घेऊन मागे परतलो आणि मग न्याहारी वगैरे आटोपून दहा-अकरा वाजता द्वारका स्टेशनवर पोहोचलो. त्या रेल्वेस्टेशनवर सुद्धा भगवान श्रीकृष्णाचे जन्मकाळापासूनचे अनेक प्रसंग चित्ररूपाने चितारलेले होते. असे श्रीकृष्णभक्तिमय वातावरण पाहून अंत:करण भरून आले. मनाच्या गाभार्यात श्री द्वारकाधीश रूप कोरले गेले.
आठ तारखेला सकाळी पुन्हा एकदा द्वारकाधीश रूप पाहून जड पावलांनी परतीच्या प्रवासाला निघालो आणि थट्टा-मस्करी करत, गाणी गात-ऐकत, हसत-खेळत कधी चार-पाच दिवसांचा प्रवास संपला कळलाच नाही.
कोणीतरी कवीने म्हटलेच आहे, दोन दिसांची रंगत-संगत, दोन दिसांची नाती... याप्रमाणे अनेकांची मने-मते परिचय करून घेत, आपुलकीचे-बंधुत्वाचे नाते सांगत आपण सगळे या निमित्ताने एकत्र आलो. विवेकानेच विवेक समूहाच्या माध्यमातून जोडलो गेलो. ज्या उत्साहाने सर्वजण एकत्र आले होते, त्याच उत्साहाने योगेश्वराचे स्मरण करत घरी परतले. हिंदुस्थान प्रकाशन संस्था हाच विचार साप्ताहिक विवेकमधून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. जय द्वारकाधीश...