आत्मनिर्भर महिला, आत्मनिर्भर देश

विवेक मराठी    06-Feb-2026
Total Views |
 
seva vivek
 
‘नारी सक्षम तो परिवार सक्षम, परिवार सक्षम तो समाज सक्षम, समाज सक्षम तो राष्ट्र सक्षम, राष्ट्र सक्षम तो विश्व सक्षम’ ....अर्थात् एक आत्मनिर्भर स्त्री कुटुंब, समाज आणि देशाला आत्मनिर्भरतेच्या वाटेवर एक-एक पाऊल पुढे नेत असते. हेच विचारसूत्र भालिवली येथील सेवा विवेक ग्राम विकास केंद्राच्या कार्याच्या केंद्रस्थानी आहे.
 
आत्मनिर्भरतेची प्रेरणा निर्माण होण्यासाठी, निर्माण झालेली प्रेरणा टिकून राहण्यासाठी, अधिक जणींमध्ये तिचे संक्रमण होण्यासाठी; प्रत्यक्ष केंद्रात आणि आसपासच्या गावात सेवा विवेकच्या माध्यमातून बांबू हस्तकलेचे काम करणार्‍या महिलांपैकी काही निवडक महिलांना दर वर्षी ’आत्मनिर्भर आदिवासी महिला सन्मान’ कार्यक्रमांतर्गत गौरवण्यात येते. यंदा या कार्यक्रमासाठी लोढा फाउंडेशनच्या डॉ. मंजु मंगलप्रभात लोढा यांची प्रमुख उपस्थिती होती.
 
seva vivek 
 
 
आदिवासींच्या वैशिष्ट्यपूर्ण अशा पारंपरिक तारपा नृत्याने कार्यक्रमाची सुरुवात झाली. केंद्रावर काम करणार्‍या आदिवासी बंधुभगिनींनीच हे नृत्य सादर केले.
 

seva vivek 
 
seva vivek 
 
सेवा विवेकच्या संचालिका राजकुमारी गुप्ता यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमामागचा तसेच सेवा विवेकच्या कामामागचा उद्देश त्यांनी प्रास्ताविकातून विशद केला. केंद्रावर आणि गावातल्या प्रशिक्षण केंद्रांवर काम करत असलेल्या महिलांपैकी प्रातिनिधिक महिलांनी आपापली मनोगते यावेळी व्यक्त केली. सेवा विवेकच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या जीवनात घडलेले सकारात्मक बदल, आत्मनिर्भरतेतून - स्वावलंबनातून वाढलेला आत्मविश्वास, घराविषयीची/कुटुंबाविषयीची स्वप्ने पूर्ण करण्याची नव्याने जागी झालेली उमेद असे खूप काही मोलाचे या महिलांनी अतिशय प्रांजळ कथनातून उपस्थितांसमोर मांडले. अल्पशिक्षणामुळे असलेला आत्मविश्वासाचा अभाव सेवा विवेकमध्ये काम करायला लागल्यावर कसा कमी झाला, हे त्यांनी व्यक्तिगत आयुष्यातील उदाहरणे देत सर्वांसमोर मांडले. त्यांच्या बोलण्यातली सहजता आणि ठामपणा, डोळ्यात दिसणारी आत्मविश्वासाची चमक, बोलताना सहजपणे भरून येणारा गळा यामुळे त्यांची मनोगते प्रभाव पाडून गेली.
 
अभिनव दत्तक योजना

आजही आदिवासी समाजासमोर अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. अत्यल्प शिक्षण वा निरक्षरता, रोजगाराचा अभाव, व्यसनाधीनता, अंधश्रद्धांचा पगडा या सगळ्याच्या गुंत्यामुळे गरिबीत खितपत पडलेली आदिवासी कुटुंबे आजही आहेत. त्यांच्या सगळ्या समस्यांचे मूळ रोजगाराच्या अभावात आहे. त्यांच्यातली उपजत हस्तकौशल्ये विकसित करून त्यांच्या हाताला काम मिळवून देणे, त्यातून रोजगाराच्या वाटा खुल्या करणे हा सेवा विवेकच्या ग्रामविकसनाचा गाभा आहे. त्यातूनच घरातली महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांना बांबूकामाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन रोजगारक्षम बनवले जाते. त्यांच्या हाताला काम आणि बदल्यात योग्य दाम देण्यात येते. महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली की कुटुंब सक्षम होते..हळूहळू समाज सक्षम होतो. अशा आर्थिकदृष्ट्या सक्षम महिलांमध्ये स्वत:च्या समस्यांचे निराकरण करण्याची मानसिकता व क्षमता येते. हे विचारात घेऊन सेवा विवेकने या महिलांसाठी मासिक दत्तक योजना चालू केली आहे.

seva vivek



seva vivek

या योजनेमध्ये मासिक 21 हजार रूपये देऊन एका महिलेला एका महिन्यासाठी दत्तक घ्यायचे. या 21 हजाराच्या बदल्यात त्या महिलेने तयार केलेली बांबू उत्पादने मिळतील. अशा प्रकारे दात्याने दिलेल्या 21 हजारांच्या देणगीतले साधारण 10/12 हजार रूपये त्या महिलेलाच मिळतील. त्यातून तिच्या आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग खुला होईल. या संदर्भात अजून जाणून घेण्यासाठी वा मासिक पालक होण्यासाठी इच्छुक दात्यांनी सेवा विवेकशी अवश्य संपर्क करावा.

संपर्क - प्रगती भोईर (मुख्य सक्षमता अधिकारी)
8484922232 ( www.sevavivek.com)


 
आपल्या सहजस्फूर्त संवादी बोलण्याने डॉ. मंजु लोढा यांनी उपस्थितांची मनं जिंकून घेतली आणि काम करण्यातला आदिवासी भगिनींमधला उत्साह द्विगुणित केला. सामाजिक कार्यकर्ता असलेल्या डॉ. मंजु लोढा या हिंदी साहित्यविश्वातील मान्यवर कवयित्रीही आहेत. आपल्या बोलण्यात त्यांनी उद्धृत केलेल्या काव्यरचना सर्वांना प्रेरणा देणार्‍या होत्या. ‘आपल्या हातून काही कौतुकास्पद काम झालं तर अन्य कोणी कौतुक करण्याआधी स्वतःच स्वतःचं निःसंकोच कौतुक करायला शिका. त्यासाठी स्वतःला एखादं बक्षीस देण्याची, आपली पाठ थोपटण्याची सवय लावून घ्या. त्यातून अधिक चांगलं काम करायची ऊर्जा, प्रेरणा मिळते’, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.
 
 
seva vivek
 
आवर्जून भेट द्यावी असे भालिवलीचे सेवा विवेक

विरार(मुंबई) पासून जवळच असलेल्या भालिवलीच्या निसर्गरम्य परिसरात महिलांच्या उत्थानाचा आणि त्या माध्यमातून आदिवासी कुटुंबाचा जगण्याचा स्तर उंचावण्यासाठी कटिबद्ध असलेली सेवा विवेक ही संस्था. संघविचारांपासून प्रेरणा घेऊन हे काम चालू आहे. कुटुंबातील महिला आत्मनिर्भर झाली तर कुटुंब, समाज, राष्ट्र आत्मनिर्भर होईल हा विचार केंद्रस्थानी ठेवून चालू असलेले हे कार्य, 15 वर्षानंतर एका महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन पोचले आहे. येथील बांबू हस्तकलेतील नैपुण्याचे देशाच्या राष्ट्रपती मा. द्रौपदीजी मुर्मू यांच्यापासून अनेकांनी विशेष कौतुक केले आहे.
 
योग्य प्रशिक्षण आणि अभिव्यक्ती योग्य संधी मिळाली तर एखादी अल्पशिक्षित आदिवासी महिला आपल्यातील उपजत कलागुणांचे किती देखणे प्रदर्शन करू शकते, याचा ही संस्था वस्तुपाठ ठरत आहे. आपल्यातील हस्तकौशल्याचा विकास केला आणि त्याच्या उत्तमतेसाठी आवश्यक असे आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले तर आपण आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होऊ शकतो, घरात आपल्या शब्दाला मान मिळतो आणि कुटुंबातील निर्णयप्रक्रियेत स्थानही...याचा अनुभव त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवतो आहे. एखादा कुशल पुरुष कारागीर ज्या दर्जाच्या वस्तू करेल त्याच तोडीच्या किंबहुना कांकणभर अधिक देखण्या बांबूंच्या वस्तूंची निर्मिती या आदिवासी भगिनींनी केली आहे. त्याची विक्री केंद्रावर होते तशी ऑनलाईनही केली जाते.
 
फूडमॉलसहित सेंद्रिय भाजीपाला, शेती उत्पादने, अन्य हर्बल उत्पादने तसेच पूजाविधीसाठी लागणारे विविध प्रकारचे साहित्य आणि आज विशेष मागणी असलेली मातीची भांडी यांनी येथील वस्तू विक्रीचे दालन सजले आहे. औषधी वनस्पतींसहित फुलझाडांची नर्सरी, अतिशय देखण्या भारतीय वंशाच्या गीर गायी, शेतीत चाललेले प्रयोग या सगळ्याचा अनुभव घ्यायचा असेल तर उत्तम दर्जाचं पर्यटन केंद्रही इथे उभे आहे. त्यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारण्याऐवजी तिथे निर्माण होणार्‍या वस्तूंची खरेदी करण्याची अट असणारे भारतातील हे एकमेव पर्यटन केंद्र असावे.
 भालिवलीच्या सेवा विवेक केंद्राच्या निसर्गरम्य परिसरात झालेल्या छोटेखानी आणि नेटक्या कार्यक्रमाचे तितकेच नेमके सूत्रसंचालन केंद्रातील मुख्य सक्षमता अधिकारी प्रगती भोईर यांनी केले. मंचावर उपस्थित असलेले आणि सेवा विवेकचे मार्गदर्शक असलेले, ज्येष्ठ विचारवंत पद्मश्री रमेश पतंगे यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचे कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या. विवेकच्या संपादक अश्विनी मयेकर यांनी सेवा विवेकच्या कार्याला शुभेच्छा देतानाच बांबू हस्तकौशल्यात महिलांमधील उपजत कारागिरीचे जे दर्शन घडते त्याने प्रभावित झाल्याचे आवर्जून नमूद केले. अन्य मान्यवरांनीही आपापल्या मनोगतातून सेवा विवेकच्या आजवरच्या वाटचालीचे कौतुक करत, 5 हजार आदिवासी महिलांपर्यंत पोचण्याचा संस्थेचा संकल्प पूर्ण होवो अशा शुभेच्छा दिल्या. संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लुकेश बंड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
 
- विवेक प्रतिनिधी
 
 
***