दंडकारण्यातील नक्षलवादाच्या छायेतील वैद्यकीय सेवायोगी

विवेक मराठी    06-Feb-2026
Total Views |
 
@ विवेक गिरीधारी  9422231967
छत्तीसगड- बस्तरमध्ये दोन तपांहून अधिक काळ प्रत्यक्ष राहून काम करणार्‍या डॉ. राम व सुनीता गोडबोले यांना यंदाचा ‘पद्मश्री पुरस्कार’ (वैद्यकीय सेवा) नुकताच घोषित करण्यात आला. नक्षलवादाच्या छायेतील छत्तीसगडमधील दंतेवाडा परिसरात दोन तपांहून अधिककाळ वैद्यकीय सेवाकार्य करणे हे फार मोठे अवघड व आव्हानात्मक कार्य आहे. सर्वसामान्य व्यक्तीच्या कल्पनेच्या आवाक्यापलीकडचे असलेले हे काम महाराष्ट्रातील हे दांपत्य अत्यंत चिवटपणे करीत आहेत.
 
padma shri award
 
डॉ. राम व सुनीता गोडबोले या दांपत्याच्या माध्यमातून कमालीच्या शांतपणे व निरलसपणे चालणारे दंडकारण्यातील नक्षलवादाच्या छायेतील वैद्यकीय सेवाकार्य त्यांच्या प्रसिद्धीपरांड्मुखतेमुळे महाराष्ट्रालाच काहीसे अपरिचित राहिलेले आहे. या महान कामाविषयी व या दोन व्यक्तिमत्त्वांचा प्रेरक परिचय आपण येथे करून घेणार आहोत.
 
 
कौटुंबिक प्रेरक पार्श्वभूमी
 
डॉ. राम गोडबोले यांचे वडील त्या काळी जुन्या 11वीपर्यंत शिकलेले होते. ते सातार्‍यातील कूपर इंजिनिअरिंग वर्क्स या कंपनीत सुरवातीला ड्राफ्टस्मन म्हणून काम करीत होते. पण नंतर त्यांची नोकरी गेली आणि खाऊनपिऊन सुखी असणार्‍या घरात आर्थिक विवंचना सुरू झाली. नंतर काही काळानंतर कूपर कंपनीच्या दवाखान्यात त्यांना कंपाउंडर म्हणून काम मिळाले. त्यांची आई सातारा नगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिका म्हणून काम करत होती. त्या मोठ्या जिद्दीच्या होत्या. लग्नाच्या वेळी आईंचे शिक्षण जेमतेम 7वी पर्यंत झाले होते. लग्नानंतर तीन अपत्ये झाल्यावर त्यांनी 8 वीला प्रवेश घेतला व पुढे अत्यंत चिकाटीने बी.ए.,बी.एड.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले, हे विशेष! शाळेत काम करण्यासोबत आई खासगी शिकवण्याही घेत असे. त्यामुळे विसकळीत झालेली कौटुंबिक घडी सुरळीत होण्यास हातभार लागला.
 
 
आईला सज्जनगडाची विलक्षण ओढ होती. त्या अनेकदा शाळा सुटल्यावर अंधार पडलेला असतानाही छोट्या रामला गडावर घेऊन जात. आईचा स्वभाव बोलका होता. त्यामुळे सातार्‍यातील व्यंकटपुरा या साधारण वस्ती परिसरातील पददलित महिला आपले दुःख सांगायला त्यांच्याकडे हक्काने येत असत. लोकांची दुःखे ऐकायला आपल्याला काय पैसे पडतात का? उलट त्यामुळे त्यांचे मन हलके होण्यास मदतच होते, असे आईचे म्हणणे होते. त्या अडचणीतील महिलांना प्रासंगिक काही थोडीफार मदतही करत असत. या गरीब महिला आपल्या दारुड्या नवर्‍यापासून पैसे सुरक्षित राहावे यासाठी म्हणून त्यांच्याकडेच अनेकदा पैसे ठेवायला देत असत. या सर्व वातावरणाचा कळत-नकळत प्रभाव नक्कीच बालवयातील रामवरही पडत होता.
 

padma shri award 
 
कल्याण आश्रमाशी संपर्क
 
डॉ. राम गोडबोले यांचा जन्म 18 जून 1960रोजी सातारा येथे झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण सातारा नगरपालिकेच्या शाळेत झाले. उर्वरित माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण सातार्‍यातील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. सातार्‍यातीलच आर्यांग्ल वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनी आयुर्वेदामधील बीएएमएसचे वैद्यकीय शिक्षण 1983मध्ये पूर्ण केले. त्यानंतर सामाजिक कामाच्या उत्सुकतेपोटी विदर्भातील आनंदवनाला त्यांनी भेट दिली. त्यावेळी डॉ. विकास आमटे यांच्याशी त्यांची भेट झाली. डॉ. आमटे यांनी कुष्ठरोगाबाबतचा प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण करण्यास त्यांना सुचविले.
 
सातार्‍यात असताना वनवासी कल्याण आश्रमाचे डॉ. मधुकर आचार्य यांचे वनवासी क्षेत्रातील अनुभव ऐकण्याच्या निमित्ताने डॉ. राम गोडबोले यांचा सर्वप्रथम वनवासी कल्याण आश्रमाशी संपर्क आला. या संपर्कातून त्यांनी 1984मध्ये कल्याण आश्रमाच्या नाशिकमधील कनाशी केंद्रावर कार्यास सुरुवात केली. तेथे दवाखाना चालविणे हेच त्यांचे प्रमुख काम होते. पुढे 1988मध्ये आईच्या आजारपणाच्या निमित्ताने ते सातार्‍याला परतले. दरम्यान कल्याण आश्रमाचे तत्कालीन संघटनमंत्री कै. भास्करराव कळंबी यांनी कल्याण आश्रमाच्या कार्यविस्ताराच्या दृष्टीने त्यांना पुढील दीर्घकाळासाठी मेघालय अथवा बस्तरला जावे असे सुचविले. पुढील आयुष्याच्या खडतर वाटचालीशी जुळवून घेऊ शकेल या दृष्टीने डॉ. राम गोडबोले यांनी आपल्या जीवनसाथी म्हणून सुनीता पुराणिक यांची निवड केली. यात कल्याण आश्रमाचे बाळासाहेब दीक्षित यांचा पुढाकार होता. त्यावेळी सुनीता पुराणिक या जांभिवली केंद्रावर वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ कार्यकर्त्या म्हणून कार्यरत होत्या.
 

padma shri award 
 
डॉ. राम गोडबोलेंचा झाडाखालचा दवाखाना
 
डॉ. गोडबोलेंच्या घरातून कल्याण आश्रमाच्या कार्याला विरोध जरी नसला तरी नाराजी मात्र तीव्र होती. त्याचे कारणही तसेच होते. एप्रिल 1988मध्ये त्यांच्या आईचे कर्करोगाने अकाली निधन झाले होते. असे असताना घरातील शिकलेल्या कर्त्यासवरत्या मुलाने चांगले अर्थार्जन करून वडिलांची जबाबदारी स्वीकारावी, अशी घरच्यांची स्वाभाविक अपेक्षा होती. त्यात वावगे काहीच नव्हते. परंतु डॉ. गोडबोले यांनी विवाह झाल्यावर लगेचच बस्तर गाठायचे मनोमन निश्चित केले होते. यामुळे नाराज झालेली मोठी बहिण त्यांच्या लग्नालाही रागावून उपस्थित राहिली नव्हती. इतकेच नव्हे तर पुढील अनेक वर्षे त्यांच्याशी बोलतही नव्हती. नंतर पुढे काही काळानंतर नात्यातील ताण निवळला व एकमेकांशी बोलणे सुरू झाले. त्यांचे वडील सोशिक स्वभावाचे असल्याने त्यांची नाराजी असली तरी या कामाला मात्र त्यांनी आडकाठी कधीच केली नाही.
 
बस्तरची अत्यंत प्रतिकूल व आव्हानात्मक परिस्थिती
 
मध्यप्रदेशचा भाग असलेला तत्कालीन बस्तर जिल्हा हा देशभरातील अत्यंत मागास जिल्ह्यांपैकी एक म्हणून ओळखला जात असे. तेथील आदिवासी जनजाती रहात असलेल्या अबुजमाडसारख्या प्रदेशात तर आजही कलेक्टरच्या रितसर परवानगीशिवाय प्रवेश मिळत नाही. बस्तरच्या दंडकारण्यातला आदिवासी समाज हा अत्यंत पारंपरिक, आपल्या चालीरीतींना कवटाळून बसणारा व भौतिकदृष्ट्या अतिमागास आहे. तो नुसता आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागास नसून त्यापैकी बहुतेक कुटुंबाचे अर्थकारण हे अत्यंत हलाखीचे व जेमतेम असते. भौगोलिक दुर्गमता व सुदूर स्थान यामुळे हा जनजाती समाज मुख्य प्रवाहातील शहरी समाजापासून अगदी वेगळा पडलेला आहे. दुर्गमतेमुळे शहरी समाज त्यांच्यापर्यंत पोहोचणे ही अगदीच दुरापास्त गोष्ट झाली आहे. अंधश्रद्धा व आत्यंतिक रूढिवादी दृष्टीकोन यामुळे या आदिवासींवर आधुनिक उपचार करणेही कमालीचे आव्हानात्मक असते. बदल व प्रागतिक दृष्टीकोन स्वीकारण्यास ते सहजासहजी राजी होत नाहीत. आजारपणामुळे त्यांच्या रोजंदारीवर परिणाम होऊन आधीच जेमतेम असणारे उत्पन्न अधिकच खालावते. तुटपुंजी शिल्लकही हिरावली जाते. त्यांच्या जगण्याचा स्तरही अधिकच खालावतो. अशा लोकांमध्ये वैद्यकीय सेवा करणे हा मोठा महत्त्वाचा विषय होय.
 
 
बस्तरमधील अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचे आव्हान स्वीकारून डॉ. राम व सुनिता गोडबोले हे नवविवाहित दांपत्य मार्च 1990 मध्ये वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमातून बस्तरमधील दंतेवाडा जिल्ह्यातील गीदम तालुक्यातील बारसूर येथे राहण्यास आले. तत्कालीन संघटनमंत्री कै. भास्करराव कळंबी यांची प्रेरणा व योजनेतून आलेले हे जोडपे बस्तरमध्ये पुढे एक तप चांगलेच स्थिरावले. पूर्वयोजनेप्रमाणे त्यांनी तेथे कल्याण आश्रमाच्या माध्यमातून दवाखाना चालू केला. दररोज बाह्यरुग्णचिकित्सा म्हणजे ओपीडी चालवली जात असे. या 1990 ते 2002 या बारा वर्षांच्या कालखंडात त्यांनी हजारो रुग्ण तपासले. अनेकांचे जीव वाचविले. कितीतरी जणांवर तातडीचे उपचार केले. ज्या गंभीर रुग्णांना विशिष्ट तज्ज्ञ डॉक्टरांच्या सेवेची अथवा उपचार/निदानाची गरज भासत आहे अशांना आठवड्यातील प्रत्येक मंगळवारी नियमितपणे 75 किलोमीटर अंतरावरील जगदलपूर या त्यातल्या त्यात मोठ्या व जवळच्या शहरात ते स्वतः घेऊन जात असत.
 
 
पुढे काही कौटुंबिक कारणांमुळे आणि घरातील वडिलधार्‍यांच्या आजारपणामुळे त्यांना परत काही काळ महाराष्ट्रात 2002च्या अखेरीस परतावे लागले. या दरम्यान ते ठाणे जिल्यातील विक्रमगड येथे राहिले. पुढे 2004 मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. महाराष्ट्रात असताना कल्याण आश्रमाच्या आरोग्यरक्षक योजनेचे प्रांताचे आरोग्यप्रमुख म्हणून त्यांनी भरपूर काम केले. धुळे-नंदुरबार व ठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या पाड्यावर पायपीट करत गावा-गावात जाऊन त्यांनी आरोग्यरक्षकांची प्रशिक्षणे घेतली. हे सर्व सुरू असताना पुन्हा एकदा दंडकारण्यातील जंगलाची ओढ त्यांना अस्वस्थ करू लागली. बस्तरच्या तुलनेत महाराष्ट्रातील आदिवासी थोड्या चांगल्या परिस्थितीत असल्यामुळे आपली गरज इथल्यापेक्षा बस्तरच्या आदिवासींना नक्कीच जास्त आहे आणि आपले आयुष्य हे बस्तरमधल्या आदिवासींसाठीच आहे, हे त्यांच्या दोघांच्या मनात घर करून बसले होते. अखेर दंडकारण्याच्या ओढीने पुन्हा एकदा या जोडप्याने 2010मध्ये परत बस्तर गाठले!
 
 आरोग्यविषयक प्रशिक्षण देतांना सुनिता गोडबोले

padma shri award 
 
सेवायोगाचा दुसरा अध्याय
 
2010 मध्ये आल्यानंतर बस्तरमध्येही बराच बदल झाला होता. ते आता पूर्वीसारखे मध्यप्रदेशचा दुर्लक्षित भाग राहिले नव्हते. आता ते स्वतंत्र छत्तीसगड राज्याच्या महत्त्वाचा भाग बनले होते. जुन्या एकमेव महाकाय बस्तर जिल्ह्याचे आता सहा जिल्ह्यांत विभाजन झाले होते. प्रशासकीय यंत्रणेच्या खाणाखुणा आता आढळू लागल्या होत्या. तेथे चांगले अधिकारी लाभल्याने काही काळ का होईना पण जिल्हा रुग्णालयांच्या यंत्रणा सक्षम झाल्या होत्या. त्यामुळे आता पुन्हा पूर्वीसारखी दिवसभराची ओपीडी चालवत बसण्याची तितकीशी गरज राहिलेली नव्हती. आता गरज होती ती जंगलात महिनोन्महिने गंभीर आजाराने खितपत पडलेले रुग्ण हुडकून काढण्याची व त्यांना आरोग्यसेवा प्रदान करण्याची. हळूहळू आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून असे रुग्ण हुडकून काढण्यास डॉ. गोडबोलेंनी सुरुवात केली. 2012 ते 2015 या काळात एकूण 34 आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली.
 
 
2015 पासून हैद्राबाद येथील हृद्यरोगतज्ञ डॉ. मुकुंद करमाळकर हेदेखील आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी होऊ लागले. त्यांच्या तज्ज्ञ वैद्यकीय सेवेची मिळालेली जोड महत्त्वाची होती. पुढे जवळपास प्रत्येकच महिन्याला त्यांची बस्तरला फेरी होऊ लागली. याच दरम्यान चितू हा स्थानिक हरहुन्नरी व उत्साही आदिवासी युवक या आरोग्य शिबिरांच्या व रुग्ण पाठपुराव्याच्या कामात सहभागी होऊ लागला. या दोघांच्या सहभागामुळे एकूण कामाला चांगलीच गती आली. मग एकापाठोपाठ एक शिबिरे आणि मग या रुग्णांचे आधी निदान व नंतर उपचार यासाठी पाठपुरवा करण्याची एकच धावपळ चालू झाली. दक्षिण बस्तर परिसरातील दंतेवाडा, सुकमा आणि बीजापूर या तीन जिल्ह्यात 2025पर्यंत तब्बल 89 आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात आली. दुर्गम वनवासी भागातील गावांमधील नऊ हजारांहून अधिक आदिवासी रुग्णांना तपासण्यात आले.
 
 
आरोग्य तपासणी शिबिरानंतरचे सर्वांत महत्त्वाचे आव्हान म्हणजे गंभीर आजाराचे निदान झालेल्या रुग्णांना मोठ्या सरकारी अथवा धर्मार्थ खासगी रुग्णालयात नेऊन तपासून त्यांच्यावर उपचार करण्याचे! एकेका शिबिराचा पाठपुरावा हा पुढील 3 ते 4 महिने सतत करावा लागतो. शिबिरानंतर तपासण्या करणे, निदान करणे व त्यानुसार उपचार चालू करणे यासाठी न कंटाळता पाठपुरावा करावा लागतो. अनेकदा गंभीर रुग्णांना तेथील सरकारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाते. काहींना 75 किलोमीटर अंतरावरील जगदलपुर किंवा 400 किलोमीटर अंतरावरील रायपूरसारख्या शहरातील धर्मार्थ खासगी रुग्णालयात दाखल करावे लागते. गंभीर आजारांच्या उपचाराबाबत पुनःपुन्हा नियमितपणे पाठपुरावा करणे हेही अत्यंत जिकिरीचे काम असते. तसेच यात अनेक प्रसंगी आदिवासी रुग्णाचा व त्याच्या कुटुंबियांचा मिळणारा थंड प्रतिसाद आपल्या भावना गोठविणारा असतो!
 
 
अलीकडेच या आरोग्य शिबिरांच्या जोडीला निवडक गावांमधील आदिवासी बालके आणि किशोरवयीन मुले व मुली तसेच प्रौढ मंडळी यांच्यासाठी कुपोषणमुक्ती कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. याशिवाय शालेय विद्यार्थ्यांमध्ये मलेरिया व कुपोषण या रोगांबाबत विशेष जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे.
 
 
पुण्यातील कृतज्ञता न्यासाची आश्वासक जोड
 
रुग्णांवर शहरात उपचार करवून आणणे, त्यासाठी तपासणी व उपचाराचा पाठपुरावा या दृष्टीने प्रवास व उपचारखर्चासाठी आता त्यांना चांगलीच आर्थिक विवंचना भेडसावू लागली होती. अशा वेळेस एकेकाळी मुंबई कल्याण आश्रमाचे सचिव म्हणून काम केलेले रमेश कोपरकर मदतीला आपणहून धावून आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार्‍या कोपरकर कुटुंबियांच्या कृतज्ञता न्यासाने हा प्रश्न ‘आपला’ मानला आणि दरमहा गरजेनुसार यथाशक्ती मदत करण्यास प्रारंभ झाला. त्यामुळे चारशेहून अधिक अत्यंत गंभीर आजारी आदिवासींवर अन्य रुग्णालयात नेऊन उपचार करता आले व ही मोठीच उपलब्धी होती. गेली दहा वर्षे बस्तरचे ‘स्वयंघोषित पालकत्व’ स्वीकारणारे कोपरकर काका यांनी नुकतीच वयाची 82 वर्षे पूर्ण केली आहेत. त्यांच्या पत्नी माणिकताई याही तितक्याच उत्साहाने या कामात सहभागी आहेत. आपले जावई व पुतणे यांच्यापर्यंत काकांनी हे उत्साहाचे लोण पोहोचवले आहे.
 
 
असे घडत असले तरी, बस्तरमधील कुपोषणविषयक कार्यासाठी आणि जंगलातील गंभीर व गरीब रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉ. गोडबोले यांना दरमहा निधी उभारण्याची धडपड करावी लागत आहे. आदिवासी कार्यकर्त्यांचा संच सांभाळण्यासाठी, त्यांच्या योगक्षेमासाठीही निधीची गरज असते. दर महिन्याचा रुग्णांच्या उपचारांचा खर्चही वाढता आहे. या सर्व कामासाठी खरे तर एक मोठा दीर्घकालीन निधी उभारण्याची गरज प्रकर्षाने जाणवते आहे. एवढी मोठी रक्कम एकदम उभी करणे हे काहीसे आवाक्यापलीकडचे जरी वाटत असले तरी महाराष्ट्राची दानत जर या कार्याच्या पाठीमागे उभी राहिली तर हा प्रश्न नक्की सहज सुटू शकणारा आहे!
 
 
बस्तरच्या जंगलात अगदी कानाकोपर्‍यात फिरता येईल, कार्यकर्त्यांना गावागावांत बरोबर घेऊन जाता येईल यासाठी स्वतंत्र चारचाकी गाडीचीही गरज आहे. मधल्या काळात स्वतःसाठी नवीन मोठी गाडी खरेदी करतांना मुंबईतील हेमंत व विदुला दंडवते या दांपत्याने आपली 10 वर्षे वापरलेली सुस्थितीतील इंडिका कार डॉ. गोडबोले दांपत्याच्या महनीय कार्यासाठी देऊ केली. स्वखर्चाने त्यांनी बस्तरमध्ये ही गाडी पोहोचवली. परंतु जंगलातील आडरस्त्यावर गेली पाच-सहा वर्षे वेडीवाकडी धावणारी ही गाडी अलीकडेच कायमची बंद पडली आहे. आता वयाची पासष्टी ओलांडलेल्या व आयुष्यभर मिळेल त्या वाहनाने आदिवासी भागात प्रवास करणार्‍या या ध्येयवादी डॉ. गोडबोले दांपत्याला आता प्रवासासाठी चारचाकी गरजेची झाली आहे. या जोडप्याला आता स्वत:चेही आरोग्य जपावे लागणार आहे. सुनिताताईंना गुडघेदुखीचा त्रास चालू झाला आहे व डॉ. गोडबोले यांनाही कंबरदुखी व मानदुखी चालू झाली आहे.
 
 
दुसरा महत्त्वाचा प्रश्न तज्ज्ञ मनुष्यबळाचा आहे. विशेषतः वैद्यकीय क्षेत्रातील विविध तज्ज्ञ डॉक्टर मंडळींनी वर्षांतील काही ठरावीक दिवस जर बस्तरसाठी दरवर्षी वेगळे काढून ठेवले व ते वेळापत्रक निग्रहाने पाळले तर खूप मोठी मदत होऊ शकते. या तज्ज्ञ मंडळीच्या आधारे विविध आजारांवरील तपासणी शिबिरांचे आयोजन बस्तरमध्ये करता येणे शक्य आहे.
 
 
एकेकाळी महात्मा गांधीनी महाराष्ट्राला कार्यकर्त्यांचे मोहोळ म्हणून संबोधिले होते. महाराष्ट्राजवळ पूर्वीचा सेवाभावही आहे आणि आता नव्याने आलेली समृद्धीही आहे. अशा समृद्ध महाराष्ट्राला बस्तरमधील डॉ. गोडबोले दांपत्याच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे, असे वेगळे सांगायची गरज नाही!