सरस्वती नदीचा नव्याने घेतला जाणारा पुनर्शोध

विवेक मराठी    09-Feb-2026
Total Views |
@ डॉ. श्रीकांत कार्लेकर
9764769791
Saraswati River
लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा नव्याने घेतला जाणारा पुनर्शोध वायव्य भारतातील प्राचीन नद्या आणि त्यांच्या काठी बहरलेल्या वस्त्यांचा इतिहास आणि संस्कृती आपल्यासमोर नेमकेपणाने आणण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत.
24 जानेवारी 2026 च्या सरस्वती महोत्सवाच्या समारोप समारंभाला संबोधित करताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी सांगितले की, सरस्वती नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी हरियाणा राज्य सरकार नद्यांची जोडणी (interlinking rivers) करून आणि सरस्वती जलाशय व जलसाठे बांधून सध्या सक्रियपणे काम करत आहे. सरकार या नदीशी संबंधित प्रमुख तीर्थस्थळे ‘सरस्वती तीर्थे’ म्हणून विकसित करत आहे. गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांनी नर्मदा आणि साबरमती यांच्याशी सरस्वती नदीला जोडून तिचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न केले होते याची आठवण सैनी यांनी करून दिली आणि हरियाणाही अशाच मार्गावर चालत असल्याचे सांगितले. सरस्वती नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी राज्य सरकार इसरो, भारतीय भूगर्भ सर्वेक्षण, ओएनजीसी, भाभा अणु संशोधन केंद्र आणि केंद्रीय भूजल मंडळासह 75 हून अधिक प्रमुख संशोधन संस्थांसोबत काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
 
या संस्थांनी केलेल्या वैज्ञानिक अभ्यासातून असे दिसून आले आहे की, सरस्वती ही केवळ एक पौराणिक नदी नाही आणि आदि बद्री ते कच्छच्या रणापर्यंत या प्राचीन नदीचे प्रवाह मार्ग अजूनही अस्तित्वात आहेत. या नदीप्रवाहातील भूजल 5,000 ते 14,000 वर्षांपूर्वीचे आहे आणि ते हिमाचल प्रदेशातील विविध हिमनद्यांना जोडलेले आहे, असे सैनी म्हणाले. सरस्वती नदीशी संबंधित सर्व प्रमुख तीर्थस्थळे सरस्वती तीर्थ म्हणून विकसित करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे आणि आदि बद्री ते सिरसापर्यंतचा संपूर्ण भाग राष्ट्रीय पर्यटन सर्किट म्हणून विकसित करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
 
 
या सर्किटमध्ये कुरुक्षेत्र, पेहोवा, कैथल, हिसार, राखीगढी, फतेहाबाद आणि सिरसा यासारख्या ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश असेल, ज्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल आणि तरुणांसाठी नवीन रोजगार आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री म्हणाले. गेल्या 10 वर्षांत, सरस्वती नदीच्या मार्गांवर 18 नवीन पूल बांधण्यात आले, तिच्या काठावरील 111 वारसा स्थळे पुनर्संचयित करण्यात आली आणि पेहोवा सरस्वती जंगलात सरस्वती वाटिका स्थापन करण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
 

Saraswati River 
 
वर्ष 2016 पासून हरियाणा सरस्वती हेरिटेज डेव्हलपमेंट बोर्ड (HSHDB) द्वारे ’सरस्वती नदी पुनरुज्जीवन’ प्रकल्प चालविला जात आहे. स्थापना झाल्यानंतर, मंडळाने नदीचे पुनरुज्जीवन करण्याचे प्रयत्न सुरू केले. हरियाणातील आदि बद्री ते राजस्थान सीमेपर्यंतचा मार्ग नेमका ओळखण्यावर लक्ष केंद्रित केले. 2017 मध्ये सरस्वती नदीच्या प्रवाह मार्गावर पुनर्संचयित करण्यासाठी आणि संशोधनासाठी 100 विहिरी विकसित करण्यासाठी या बोर्डाने तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ओएनजीसी) सोबत एक सामंजस्य करार केला. सरस्वती नदीला पाणीपुरवठा करणार्‍या हिमाचल प्रदेशातील सोंब नदीवर आदि बद्री धरण बांधण्यासाठी हरियाणा आणि हिमाचल प्रदेश यांच्यात जानेवारी 2022 मध्ये एक महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला. 2022-2024 या काळात, पावसाळ्यात सरस्वती नदीच्या पात्रातून सुमारे 400 किलोमीटर अंतरापर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात हरियाणा सरस्वती हेरिटेज डेव्हलपमेंट बोर्डला यश आले. 2025 मध्ये, प्रकल्पाचा विस्तार करण्यात आला. जयपूरमधील बैठकीनंतर राजस्थानने प्राचीन नदी प्रणालीतून पाणी प्रवाह पुन्हा सुरू करण्यासाठी कडकऊइ सोबत काम करण्यासाठी एक समिती स्थापन केली.
 
 
2024-2025 मध्ये आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने राजस्थानमधील बहज गावात 23 मीटर खोल, 3,500 वर्षे जुना प्राचीन प्रवाह (paleochannel) शोधून काढला, ज्यामध्ये मानवी वस्तीचे पुरावे आहेत. यामुळे वैदिक काळातील नदीशी असलेला गावाचा संबंध अधिक दृढ झाला. सोंब नदीद्वारे सतलजचे पाणी सरस्वती नदीशी जोडण्यासाठी योजना आखल्या जात आहेत.
 
 
 
वर्ष 2026 च्या सुरुवातीपासूनच, भारतातील सरस्वती नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाने नदीत बारमाही पाणी प्रवाह राबविण्याच्या प्रयत्नांत प्रगती केली आहे. हरियाणा सरस्वती हेरिटेज डेव्हलपमेंट बोर्ड (HSHDB) ने पावसाळ्यात नदीच्या पात्रातून जाणारा जवळजवळ 400 कि.मी. लांबीचा जलप्रवाह पुन्हा यशस्वीरित्या वहनक्षम केला आहे.
 
 
वायव्य भारतांत अतिप्राचीन काळात लुप्त झालेली सरस्वती नदी हे प्रत्येक भारतीयासाठी महत्त्वाचा भूवारसा स्थळ आहे. सरस्वती नदीचे अस्तित्व हे संशोधकांसाठी आजही मोठे आव्हान आहे. तिचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आजवर अनेक देशी आणि विदेशी संशोधकांनी भरपूर प्रयत्न केलेत. ख्रिस्तपूर्व 1200 ते 1500 वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदातही सरस्वती नदीचा उल्लेख आढळतो. वायव्य भारतात, पूर्वेकडील यमुना आणि पश्चिमेकडील सतलज या दोन नद्यांच्या दरम्यान दहा ते सतरा हजार वर्षांपूर्वी सरस्वती नदी होती, असा उल्लेख त्यात दिसतो. ’वाळवंटात कोरडी पडलेली नदी’ असा महाभारतात तिचा उल्लेख आहे. ही नदी बीन्सना (सध्याचं सिरसार (29.5 उत्तर अक्षांश आणि 75.03 पूर्व रेखांश ) या गावापाशी लुप्त झाली आणि पुढे छामासोदभेडा (23.9 उत्तर अक्षांश आणि 72.36 पूर्व रेखांश ) या 675 कि.मी. अंतरावरील सौराष्ट्रातील गावापाशी पुन्हा दिसू लागली, असाही उल्लेख महाभारतात आढळतो.
 
 
आज भूरूपशास्त्रीय व भूगर्भशास्त्रीय नकाशे आणि कृत्रिम उपग्रहांनी घेतलेल्या प्रतिमांच्या अभ्यासातून असे लक्षात आले आहे की, वायव्य भारतातील घग्गर हाकरा नदीमधला कोरडा पडलेला नदीमार्ग म्हणजे प्राचीन सरस्वती नदीचा मार्ग आहे. कांस्य युगात (Bronze age) म्हणजे ख्रिस्तपूर्व 1200 ते 3300 या काळात घग्गर हाकरा नदी खोर्‍यात संपन्न हराप्पा संस्कृती अस्तित्वात होती.
 
 
आजचे संशोधन असेही सांगते की, प्राचीन सरस्वती नदीची लांबी 1500 कि.मी., रुंदी 3 ते 15 कि.मी. आणि सरासरी खोली 5 मीटर असावी. एका मताप्रमाणे 4000 वर्षांपूर्वी पृथ्वीवर झालेल्या भूप्रक्षोभक (Tectonic) हालचालींमुळे, नदीला पाणी पुरवणार्‍या मूळ स्रोतात स्थानबदल झाले असावेत आणि त्यामुळे नदीचा उर्वरित मार्ग भूमिगत झाला असावा. नदीला पाणी पुरवणारा मूळ स्रोत हिमालयातच असावा. घग्गर आणि तिच्या हरयाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात यांमधील असंख्य उपनद्या सरस्वती नदीचे अस्तित्व अधोरेखित करतात, असाही दावा केला जातो. वर्ष 2016 मध्ये हरयाणातील यमुनानगरमधे भूगर्भात असलेल्या पाण्याच्या नदीसदृश प्रवाहाचे काही पुरावे सापडल्यानंतर लुप्त झालेल्या या नदीच्या पुनर्शोधाचा विचार सुरू झाला. अलीकडेच जैसलमेरमधे खोदण्यात आलेल्या कूपनलिकांतही मोठ्या प्रमाणावर, हजारो वर्षं जुने भूजल सापडले आहे. या वाळवंटी भागात पाण्याचा कितीही उपसा केला तरी ते कमी होत नाही, असे दिसून आले आहे.
 
 
भारताच्या पुरातत्व सर्वेक्षण विभागातर्फे हरयाणातील यमुनानगर जिल्ह्यातील आदि बद्री (30.46 उत्तर अक्षांश आणि 77.34 पूर्व रेखांश) पासून राजस्थानच्या कच्छ जिल्ह्यातील खिरसरा (23.12 उत्तर अक्षांश आणि 69.05 पूर्व रेखांश) पर्यंतच्या विस्तीर्ण प्रदेशात उत्खनन करण्यात आले असून घग्गर नदीच्या प्राचीन प्रवाहाचा (Palaeo channel) शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 2002 ते 2004 आणि 2009 ते 2014 या काळात पुरातत्व विभागातर्फे हरयाणातील आदि बद्री, कुरुक्षेत्र, फतेहबाद, हिस्सार, राजस्थानातील गंगानगर, हनुमानगड आणि करणपुरा गावी आणि गुजरातमधील खिरसारा आणि कच्छ या ठिकाणी स्वतंत्रपणाने उत्खनने केली गेली आणि त्यात सरस्वती नदी नक्कीच अस्तित्वात होती हे सिद्ध करणारे पुरावे आढळले आहेत.
 
 
जैसलमेरच्या आजूबाजूला संशोधन करताना तिथल्या स्थानिकांकडून कळले की, रानाउ या जवळच्या गावांत कधीही पाण्याची कमतरता भासत नाही. एवढेच नाही तर इथे खोदण्यात आलेल्या कूपनलिकेतून नेहमीच गोड पाणी मिळते. बाकीच्या गावांत मिळते तसे खारट पाणी इथे मिळत नाही. इथले गावकरी सांगतात की, या गावांखालून सरस्वती नदीच्या पाण्याचा प्रवाह वाहतोय!
सरस्वतीचा उगम उत्तराखंड मधील बंदरपूंछ या गढवाल हिमालयातील शिवालिक पर्वतरांगांतील हिमनदीतून झाला असावा असे म्हटले जाते. ग्राउंड पेनिट्रेटींग रडारचा वापर करून घग्गर नदीपात्रातील लुप्त प्रवाहाचा मार्ग निश्चित करण्याचा प्रयत्नही आता सुरु झाला आहे. इसरोच्या संशोधनानुसार सरस्वतीच्या प्राचीन प्रवाह रेषेवरून आज घग्गर नदी वाहते आणि तोच खरा प्राचीन सरस्वती नदीचा मार्ग आहे. या नदीच्या आजूबाजूच्या एकूण 14 विहिरीतील पाण्याच्या कार्बन डेटिंग पद्धतीने केलेल्या कालनिर्णयानुसार हे पाणी 8 हजार ते 14 हजार वर्षं जुने असावे. इथली पाण्याची प्रतही खूप चांगली आहे. या प्रवाहमार्गाच्या नजीक असलेल्या वनस्पतीही वर्षभर आणि तीव्र उन्हाळ्यातही टिकून राहत असल्याचे आढळून आले आहे. नदीकाठची गावे गेली 40 वर्षं या विहिरी वापरत असूनही एकदा सुद्धा पाण्याची कमतरता जाणवली नाही, असे गावकरी सांगतात.
 
 
उपग्रह प्रतिमांचा अभ्यास आणि प्रदेशाला दिलेल्या प्रत्यक्ष भेटी यावरून या भागातील सरस्वती नदीच्या परित्यक्त (Abandoned) प्रवाहाच्या अस्तित्वाचा अंदाज येऊ शकतो. रैनी आणि वहिंदा या नद्या सरस्वती नदीत समाविष्ट होण्यापूर्वीपासूनच अस्तित्वात असाव्यात आणि त्यांनी नदीखोर्‍यात भरपूर गाळ संचयन केले असावे, असेही या अभ्यासातून सूचित होत आहे. पंजाब, हरयाणा आणि उत्तर राजस्थानातून वाहात सरस्वती नदीप्रवाह खंबातच्या आखातात समुद्राला जाऊन मिळत असावा. राजस्थानमध्येे प्रवाह कोरडा होऊन पुढे हनुमानगड, पिलिबंगन, अनुपगडच्या दिशेने जात असावा. सरस्वती नदीचा नेमका मार्ग सापडणे कठीण झाल्यामुळे आणि तिच्या अस्तित्वाबद्दल अजूनही ठोस पुरावे न सापडल्यामुळे अनेकांना सरस्वती नदी ही एक कपोलकल्पित गोष्ट असावी, असे अजूनही वाटते. मात्र प्रत्यक्षांत वास्तव वेगळे आहे. लुप्त झालेल्या सरस्वती नदीचा नव्याने घेतला जाणारा पुनर्शोध वायव्य भारतातील प्राचीन नद्या आणि त्यांच्या काठी बहरलेल्या वस्त्यांचा इतिहास आणि संस्कृती आपल्यासमोर नेमकेपणाने आणण्यासाठी मोलाचे योगदान देत आहेत, हे नक्की !