जो माणूस वेळ पडेल तेव्हा स्वतः उपाशी राहिलेला असतो आणि काबाडकष्ट करून मोठा झालेला असतो त्यालाच इतरांच्या कष्टाची आणि संघर्षाची किंमत समजते. मुळातच तनुजा फार संवेदनाशील वृत्तीची आहे आणि समोरच्याला समजून घेऊन घेण्याची सहसंवेदना तिच्या ठायी आहे. त्यामुळेच तिने तिच्या स्वभावाला अनुसरून रुग्णसेवेसारखं कार्यक्षेत्र निवडल. आरोग्य क्षेत्रात काम करणारी तनुजा विकास देशमुख आज छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन किंवा सी एस क्रिएटिव्ह सोल्युशन्स ही व्यावसायिक कंपनी असली तरी ते करत असलेल्या कामाचे स्वरूप सामाजिक उद्योगाशीलतेचे आहे. या कंपनीच्या माध्यमातून शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणीचे काम केले जाते. तिच्या कार्याचा आढावा घेणारा लेख..
आम्ही लहान होतो तेव्हाची गोष्ट. घरची परिस्थिती हलाखीची होती. हौसेमौजेच्या वस्तू फार परवडत नव्हत्या. आईवडिलांचे कष्ट डोळ्यांसमोर दिसत होते. अशा वेळी एका दिवाळीचा प्रसंग मला आठवतो. आम्ही दोघी बहिणींनी दिवाळी शुभेच्छा देणारी अनेक कार्ड्स बनवली आणि दहा-दहा पैशाला मित्र-मैत्रिणींना विकली. त्यातून आलेल्या पैशातून आम्ही फटाके विकत घेतले होते. आता मागे वळून बघताना त्या छोट्याशा प्रयत्नाचे हसू येते पण कदाचित आमच्या दोघींच्या पुढील आयुष्यातील यशाचा तो पाया होता. त्यावेळची माझी लहान बहीण तनुजा मला आठवते. आम्ही तिला दीदी म्हणत असू. ग्रीटिंग कार्ड विकण्यासाठीची तिने केलेली मार्केटिंग स्ट्रॅटेजी त्या वयाला अनुसरून असली तरी त्या मागच्या तिच्या विचारशक्तीचे कौतुक करावेच लागेल.
आज मी जेव्हा तनुजाला करोडोंचा तिचा व्यवसाय समर्थपणे सांभाळताना बघते तेव्हा तिच्यामध्ये मला आठ-दहा वर्षांची ग्रीटिंग कार्ड मित्र-मैत्रिणींच्या गळ्याखाली उतरवणारी माझी लहान बहीणच दिसते.
संपूर्ण लहानपण दहा बाय दहाच्या घरात राहून स्वकष्टाने मोठे होत आज करोडोंच्या व्यवसायाची उलाढाल करताना दहा बाय दहाच्या घरात राहणार्या अनेकांच्या आयुष्यात आनंद पसरवणारी तनुजा विकास देशमुख म्हणजेच माझी धाकटी बहीण पूर्वाश्रमीची तनुजा रमेश सावंत.
खरंतर लहानपणापासून परिस्थितीशी केलेल्या संघर्षामुळे आम्हा तिन्ही भावंडांना अधिक कणखर, विचारशील आणि उद्योगी बनवले आहे. त्यामुळे तनुजाच्या उद्यमशीलतेचा पाया हा आमच्या लहानपणच्या संघर्षात नक्कीच आहे. जो माणूस वेळ पडेल तेव्हा स्वतः उपाशी राहिलेला असतो आणि काबाडकष्ट करून मोठा झालेला असतो त्यालाच इतरांच्या कष्टाची आणि संघर्षाची किंमत समजते. मुळातच तनुजा फार संवेदनाशील वृत्तीची आहे आणि समोरच्याला समजून घेऊन घेण्याची सहसंवेदना तिच्या ठायी आहे. त्यामुळेच तिने तिच्या स्वभावाला अनुसरून रुग्णसेवेसारखं कार्यक्षेत्र निवडलं यात नवल ते काय.
सुदैवाने यात तिला तिच्या पतीची, विकास देशमुख याची, भक्कम साथ लाभलेली आहे. ते दोघं आरोग्य क्षेत्रात काम करतात म्हणजे नक्की काय करतात हे सर्वप्रथम जाणून घेऊ.
छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन - एक लेखाजोखा
त्यांची कंपनी छत्रपती शिवाजी क्रिएटिव्ह सोल्युशन किंवा सी एस क्रिएटिव्ह सोल्युशन्स ही व्यावसायिक कंपनी असली तरी ते करत असलेल्या कामाचे स्वरूप सामाजिक उद्योगाशीलतेचे आहे. या कंपनीच्या माध्यमातून शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणीचे काम केले जाते.
आता नऊ राज्यांमध्ये 50 हून अधिक रुग्णालयांमध्ये ते काम करतात. अगदी एका वाक्यात सांगायचं तर, 66 लाखांपेक्षा अधिक रुग्णांना आतापर्यंत विविध शासकीय योजनेतून सेवा मिळवून दिली आहे. 26288 कोटीपेक्षा जास्त रकमेचा निधी विविध योजनांच्या मार्फत रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांना मिळवून दिला आहे. 413 जणांची प्रशिक्षित टीम आहे त्यामध्ये 25 डॉक्टर आहेत.
एक लाख पंचाहत्तर हजारपेक्षा अधिक आयुष्यमान भारत कार्डाचे वितरण केला आहे. दीडशेपेक्षा अधिक आरोग्य शिबीर घेतली आहेत. हजारो रुग्णांना मोफत शस्त्रक्रिया सहाय्य मिळवून दिले आहेत. त्यांच्यावर यशस्वी उपचार करून दिले आहेत. अधोरेखित करण्याची बाब अशी की, हे सगळे करत असताना रुग्णांकडून कोणतीही रक्कम घेतली जात नाही.
एक सॉफ्टवेअर सी एस कंपनीने डेव्हलप केलेले आहे आरोग्यदूत नावाचं. सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णाला किंवा त्याच्या नातेवाईकांना बर्याचदा योजनेच्या काऊंटरवर धावपळ करावी लागते. पुन्हा पुन्हा रांग लावावी लागते. त्यांचा बराचसा वेळही जातो आणि एनर्जीही जाते. त्यात कोणी मार्गदर्शन करणारे नसते. हे सर्व टाळण्यासाठी आरोग्यदूत सॉफ्टवेअर खूप उपयोगाचे आहे. पेशंटला सुद्धा त्याचा एक्सेस आहे आणि ते डायरेक्ट योजनेच्या डॉक्युमेंट घरबसल्या त्यात जोडू शकतात. त्याचबरोबर डॉक्टर क्लेम स्टेटस बघू शकतात. रियल टाईम डेटा मिळू शकतो. शासकीय योजनांच्या या क्षेत्रात काम करता करता आलेल्या आव्हानातून आणि निर्माण झालेल्या गरजेतून या सॉफ्टवेअरचा जन्म झाला आहे.
रुग्णांची सावली - सावली केअर सेंटर
त्याचबरोबर चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने आणि पाठबळाने तनुजा आणि विकास सावली केअर सेंटर हा एक प्रकल्प मुंबईत चालवत आहेत. ज्यामध्ये पन्नास रुग्णांची राहण्याची, जेवणाची व्यवस्था आहे. मुंबईमध्ये खूप रुग्ण बाहेरून उपचार घेण्यासाठी येतात. अनेक वेगवेगळ्या सरकारी हॉस्पिटलच्या बाहेर फुटपाथवर अतिशय हलाखीच्या अवस्थेत रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक राहतात. त्यांची सोय करण्याचा हा एक छोटासा प्रयत्न त्यांनी चालवला आहे. गेल्या सहा वर्षांत 8000 पेक्षा जास्त रुग्णांनी सावली केअर सेंटरचा लाभ घेतला आहे.
रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा -
आपल्या नवर्याबरोबर जेव्हा तिने या कामात पूर्णपणे उतरायचं ठरवलं त्यावेळी तिच्या हाताशी बँकेतली परमनंट नोकरी होती. ज्याचा ठरावीक वेळ होता. चांगल्या आकड्याचा पगार होता आणि सगळ्या हक्काच्या सुट्ट्या मिळत होत्या. तिचा स्वभाव कितीही झोकून देऊन काम करायचा असला तरी किमान कामावरून घरी आल्यावर डोक्याला निवांतपणा होता. त्यामुळे हे अग्निदिव्य तिने स्वतः निवडले, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
असं म्हणतात की, नोकरी हा आठ तासांचा व्यवसाय असतो आणि व्यवसाय ही 24 तासांची नोकरी. ही बाब तनुजाच्या कामाला तंतोतंत लागू पडते. कारण तिचं कार्यक्षेत्र हे रुग्णांशी संबंधित आहे. त्यामुळे कधी काय अडचण येईल, कधी कोणत्या इमर्जन्सीसाठी धावावं लागेल, हे प्रत्यक्ष विधात्याला सुद्धा सांगता येणार नाही. शिवाय हे काम करतानाचा तिचा दृष्टीकोन कितीही सेवेचा असला तरी काम म्हटल्यावर व्यवहार आलाच. मी वर उल्लेख केल्याप्रमाणे टेंडर भरणे, त्यासाठी असलेल्या स्पर्धेला सामोरे जाणे, ते टेंडर जिंकण्यासाठी केल्या जाणार्या हीन पातळीच्या राजकारणाचा धीराने सामना करणे या गोष्टी ती सातत्याने करत असते.
अशाच एखाद्या हताश प्रसंगी माझ्याशी बोलताना ती म्हणाली, आपले सगळेच निर्णय बरोबर येतातच ठरतातच असं नाही ना. प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्याच बाजूने निकाल देईल असेही नाही. मात्र निराशेचा तो दिवस संपल्यावर दुसर्या दिवशीपासून पुन्हा ती पंख झडझडून त्या संकटाला झुंजायला सामोरी जाते. तिची ही सगळी धावपळ मी फार जवळून बघते. मी कधीतरी तिला म्हणतेच की, स्वतःच्या हाताने व्याप वाढवून घेतलेस. अर्थात तिच्या कर्तृत्वावर मला शंका नाही. पण शेवटी ती माझी लहान बहीण आहे आणि तिची होणारी धावपळ, उडणारी तारांबळ मला बघवत नाही. अशाच आमच्या एखाद्या संवादात ती मला म्हणाली होती, ताई खूप टेन्शन्स आहेतच. कुठलाही नवीन प्रकल्प हाती घेतला की, त्याचा पहिला क्लेम पास होऊन त्याचे पैसे आमच्या हातात येण्यासाठी सहा महिने जातात. तोवर त्या प्रकल्पावर काम करणार्या टीमचा पगार थकू नये ही आमची जबाबदारी असते. अनेक वेळा हा पगार देण्यासाठी कर्ज घ्यावं लागतं. त्यामुळे दिसायला पसारा कितीही मोठा असला तरी आर्थिक चणचण असते. पण हे सगळे टेन्शन असले तरी आपण केलेल्या कामामुळे अनेकांना रोजगार मिळतो. अनेकांच्या आरोग्य समस्यांवर उपाय शोधला जातो. हे सुख का थोडं आहे, असं उत्तर जेव्हा ती मला देते तेव्हा माझी लहान बहीण इतकी मोठी कधी झाली, असा प्रश्न मला पडतो.
अडथळ्यांची शर्यत
आरोग्य क्षेत्र निवडल्यामुळे तिला लोकांसाठी 24 तास उपलब्ध राहावं लागतं. अशा वेळी काय अडचणी येतात असं विचारल्यावर ती सांगते, कधी कधी महिला असल्यामुळे आपल्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जातात. विशेषतः आरोग्य क्षेत्रात अनिश्चित वेळा आणि जबाबदार्या असल्यामुळे सुरुवातीला लोकांचा दृष्टीकोन संशयाचा असतो. परंतु सातत्यपूर्ण कामगिरी, प्रामाणिक सेवा आणि परिणामकारक कार्य यामुळे हळूहळू तो विश्वास दृढ होतो.
कोविडचा कालावधी हा सगळ्यांसाठी अतिशय परीक्षेचा काळ होता. विशेषतः आरोग्य क्षेत्रात काम करणार्या लोकांना या आगीत तावूनसुलाखून निघावे लागले. या काळातही तनुजा आणि विकास मागे सरले नाहीत. तनुजाला स्वतःला चिमुकल्या बाळासकट कोविड झाला होता आणि आयसोलेशन सेंटरमध्ये राहावे लागले होते. त्यावेळी सगळे जगच कठीण काळातून जात होते. तनुजाला आणि तिच्या बाळाला आयसोलेशन सेंटरमध्ये ठेवल्यावर आम्ही सगळे हवालदिल झालो होतो. आमच्या डोळ्यांना सतत पाण्याची धार लागलेली असायची. पण तिने हा सगळा प्रसंग अतिशय धीराने निभावला. या काळातही तिने तिच्या टीमची साथ सोडली नाही हे विशेष. फोनवरून व्हिडिओ कॉलवरून ती सातत्याने तिच्या टीमच्या संपर्कात होती आणि आपले काम पुढे नेतच होती. याच काळात विकासने आपली पत्नी आणि मुलगा आयसोलेशन सेंटरमध्ये असताना सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या योजनेप्रमाणे चालू असलेल्या कोविड अभियानाचे नेतृत्व केले. या कार्यासाठी सीएस चे सीईआ विकास देशमुख यांना तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते कोविड योद्धा सन्मान देखील मिळाला.
साथसंगत
आमच्या आईवडिलांनी आमच्यावर केलेले संस्कार, अतिशय कठीण परिस्थितीतही त्यांनी जीवनात पाळलेली तत्त्वे, प्रामाणिकपणा, कष्ट यांचे खोलवर परिणाम आम्हा तिघा भावंडांच्या जीवनावर झालेले आहेत. त्यामुळेच तनुजा इतकी सच्ची, प्रामाणिक आणि समर्पित कार्यकर्ती म्हणून समोर येऊ शकते. याखेरीस तिने विद्यार्थी परिषदेच्या पूर्णवेळ कामाचा अनुभव घेतलेला आहे. त्यातूनही ती एक स्वयंसेवक कार्यकर्ता म्हणून कसोशीने घडलेली आहे. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचे श्रेय आईबाबांइतकेच तिच्या नवर्याला आणि खर्या अर्थाने तिच्या खाजगी आणि व्यावसायिक आयुष्यातील साथीदाराला विकासला देते. ती म्हणते, आज मला लोक एक यशस्वी महिला उद्योजिका म्हणून ओळखत असले तरी व्यवसायातील माझा गुरु माझा नवरा आहे. त्याने अक्षरशः मला हात पकडून व्यवसायात आणले आणि त्यातले काटेकुटे पार करत पुढे जायचे शिकवले.
इतका मोठा व्यवसायाचा डोलारा सांभाळताना आई-मुलगी-सून-पत्नी म्हणून कर्तव्य पार पाडताना आपली दमछाक होते, हे ती मान्यच करते पण हे सगळे करत असताना तिच्या सासू-सासर्याची तिला भक्कम साथ आहे. घरातून बाहेर पडल्यावर अगदी कितीही वाजेपर्यंत घराबाहेर राहिले तरी घरात मुलांची व्यवस्थित काळजी घेतली जाते. आजी-आजोबांच्या मायेची पाखर त्यांच्यावर सदैव असते. यासाठी ती त्यांची ऋणी आहे. आपल्या पिल्लांची काळजी घेणारा घरात कोणीतरी भक्कमपणे उभा आहे, या भावनेनेच आपण बाहेर इतकी प्रगती करू शकतो हे ती मान्य करते. याखेरीज कंपनीच्या यशात कंपनीमध्ये गेली कित्येक वर्षे समर्पित भावनेने सातत्याने काम करणार्या अनेक सहकार्यांचा वाटा आहे, हे देखील मोकळ्या मनाने नमूद करायला ती चुकत नाही.
कर्तृत्वाची दखल
नुकताच तनुजाला आदिशक्ती भवानी शक्तीपीठ संस्थान तर्फे राष्ट्र शक्ती पुरस्कार जाहीर झाला. देवी रूपात स्त्रीशक्तीची पूजा करणार्या शक्तीपीठाने एका स्त्री उद्योजिकेचा तिच्या समर्पणासाठी गौरव करावा हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. याखेरीज मुंबई सामाजिक उद्योजक गौरव पुरस्कार (आरोग्य क्षेत्रामध्ये विशेष उल्लेखनीय कामगिरीसाठी), कोविड योद्धा पुरस्कार (कोविडमध्ये दिलेल्या योगदानासाठी) मंथन पुरस्कार, माय होम इंडियातर्फे ज.छ.ए खपवळर उरीव असे अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
तनुजा तिच्या संघर्षाने अशीच झळाळत राहो, मात्र ती कितीही मोठी झाली तरी माझ्यासाठी दोन वेण्या घालणारी, माझा हात पकडून चालणारी माझी धाकटी बहीण ‘दिदी’च राहील. आज या लेखाच्या निमित्ताने हे सगळे शब्दबद्ध करताना माझ्या मनात लहानपणीची एक कविता रुंजी घालते आहे. जी माझ्या धाकट्या बहिणीला आणि तिच्या कार्यकर्तृत्वाला तंतोतंत लागू पडते -
लहान माझी बाहुली, मोठी तिची सावली...
तिची सावली अशीच मोठी होत जावो आणि माउलीचे रूप धारण करो, हीच त्या परमेश्वरा चरणी प्रार्थना!