वर्चस्वाची लढाई

विवेक मराठी    12-Mar-2026
Total Views |
iran israel and america 
आता चालू असलेले युद्ध हे भूमी जिंकण्यासाठी चाललेले नाही किंवा इराणच्या तेलसाठ्यावर ताबा मिळविण्यासाठी चाललेले नाही. दुसर्‍या महायुद्धाची ही कारणे होती. नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळविणे, भूमी जिंकून घेणे, हे युद्धाचे हेतू आता राहिलेले नाहीत. हे युद्ध वर्चस्वाची लढाई आहे.
इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धाची ऐतिहासिक पार्श्वभूमी Golbal Conflict च्या साईटवर सविस्तर उपलब्ध आहे. हे युद्ध 28 फेब्रुवारीला सुरू झाले, म्हणजे काही वर्षांपूर्वी थांबलेले युद्ध पुन्हा सुरू झाले. जून 2025ला इस्रायलने इराणवर हल्ला केलेलाच होता. तेव्हा अमेरिका आजच्या प्रमाणे युद्धात उतरलेली नव्हती. परंतु इस्रायलच्या मागे खंबीरपणे उभी होती. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या अध्यक्षीय कालखंडात इराण आणि अमेरिका संघर्ष अधिक तीव्र झाला.
 
 
प्रत्येक युद्धाला कारण असते, तसे या युद्धाला कारण आहे. अमेरिकेचे कारण असे आहे की, इराण अणुबाँब बनविण्याच्या मागे लागलेला आहे. इराणचा अणुबाँब जागतिक शांततेला धोका निर्माण करेल, म्हणून इराणने अणुबाँब बनविण्याचा कार्यक्रम सोडून दिला पाहिजे. इराण ते ऐकायला तयार नाही. म्हणून अमेरिकेने युनोच्या मदतीने इराणवर प्रचंड आर्थिक निर्बंध लादले. तरीदेखील इराण नमते घ्यायला तयार नव्हता.
 
 
अमेरिकेचे दुसरे कारण असे आहे की, इराणची शिया इस्लामी राजवट ही दहशतवादाला प्रोत्सहन देणारी राजवट आहे. इराण हा दहशतवादाचे समर्थन करणारा देश झालेला आहे. गाझा पट्टी, लेबनॉन या क्षेत्रात इराणने हमास आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांना ड्रोन आणि मिसाइल देऊन अधिक मारक केलेले आहे. इराणला जर आज रोखले नाही तर उद्या इराण अमेरिकेवरही हल्ला करण्याच्या स्थितीला येईल.
 
 
इस्रायलचे कारण असे आहे की, इराणचा अणुकार्यक्रम हा इस्रायलच्या नाशास कारणीभूत होईल. इस्रायलला संपवून टाकणे हे इराणचे जगजाहीर धोरण आहे. त्यासाठी इराणने आंतरखंडीय क्षेपणास्रांचा विकासही केलेला आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारची क्षेपाणास्रे आणि ड्रोन इराणने विकसित केली आहे, इस्रायलच्या अस्तित्वाला याने प्रचंड धोका निर्माण होईल. म्हणून इस्रायलने इराणच्या अणुप्रकल्पांवर हल्ले केले आहे. अनेक इराणी अणु शास्त्रज्ञांना वेचून वेचून ठार मारले आहे. इराणने समृद्ध युरेनियम (अणुबाँबसाठी आवश्यक असलेला पदार्थ) बनविण्यासाठी सुरुवात केली आहे. ही इराणची शक्ती पूर्णपणे नष्ट करण्यासाठी हे युद्ध चालू आहे.
 
 
या युद्धाचे तीन चेहरे आहेत. आयातुल्ला खामेनी (जे ठार झाले), दुसरा चेहरा आहे डोनाल्ड ट्रम्प आणि तिसरा चेहरा आहे बेंजामिन नेत्यानाहू. यापैकी इराणची महत्त्वाकांक्षा मुस्लीम जगताचे नेतृत्त्व करण्याची आहे. कुराण आणि शरियतच्या आधारे इराणमध्ये खामेनी यांनी इस्लामी राजवट प्रस्थापित केली. मुलींचे लग्नाचे वय वर्षे नऊ करून टाकले. स्त्रियांना बुरखा घालणे सक्तीचे केले.
 
 
नेेत्यानाहू ज्यू धर्मीय आहेत, डोनाल्ड ट्रम्प ख्रिश्चन आहेत आणि इराण शिया मुस्लीम आहे. म्हटले तर हे तिन्ही धर्म अब्राहमिक धर्म आहेत. म्हणजेे तिघांचा उगम एकाच ठिकाणाहून झालेला आहे, परंतु ते कमालीचे असहिष्णू आहेत. माझा धर्म श्रेष्ठ आणि इतरांनी तो स्वीकारला पाहिजे अशी त्यांची मानसिकता आहे. ज्यू या दृष्टीने विस्तारवादी धर्म राहिलेला नाही. पण तो कमालीचा आक्रमक आणि असहिष्णू आहे. पॅलेस्टाइनमध्ये इस्रायली देश झाल्यानंतर तेथील अरबांना म्हणजे मुसलमानांना हुसकून लावण्याचे काम मोठ्या प्रमाणात झाले.
 
 
हे युद्ध भूमी जिंकण्यासाठी चाललेले नाही किंवा इराणच्या तेलसाठ्यावर ताबा मिळविण्यासाठी चाललेले नाही. दुसर्‍या महायुद्धाची ही कारणे होती. नैसर्गिक साधनसंपत्तीवर ताबा मिळविणे, भूमी जिंकून घेणे, हे युद्धाचे हेतू आता राहिलेले नाहीत. हे युद्ध वर्चस्वाची लढाई आहे. अमेरिकेला हे बघायचे आहे की, इराण वाजवीपेक्षा अधिक शक्तीशाली होणार नाही आणि इस्रायलला हे बघायचे आहे की, इराण समर्थित दहशतवादचे कंबरडेच मोडले गेले पाहिजे.
 
 
या युद्धाच्या बुडाशी एकच कारण आहे ते म्हणजे टोकाची असहिष्णुता. मीच जगणार आणि तुला जगायचे असेल तर मी सांगतो तसं तुला जगावे लागेल, ही त्यामागची मानसिकता आहे. ती इराणची आहे, अमेरिकेची आहे, इस्रायलची आहे आणि अमेरिकेला समर्थन देणार्‍या सर्व युरोपीय देशांची आहे. ही मानसिकता मानवतेला घातक आहे. त्यावर अत्यंत कठोर शब्दात स्वामी विवेकानंदांनी आपले विचार मांडलेले आहेत. शिकागो येथे 11 सप्टेंबर 1893 रोजी सर्वधर्म परिषदेत स्वामी विवेकानंदांचे अजरामर भाषण झाले. ते म्हणाले,“सांप्रदायिकता, कट्टरता, कर्मठता आणि धर्मांधतेने बर्‍याच काळापसून पृथ्वीला आपल्या पंजात जखडून टाकले आहे. या सार्‍यांनी पृथ्वीला हिंसाचाराने भरून टाकले आहे. अनेकदा ही पृथ्वी रक्ताने लाल झाली आहे. कितीतरी संस्कृतींचा विनाश झाला आहे आणि कितीतरी देश नष्ट झाले आहेत. जर हे भयानक राक्षस नसते तर मानव समाज आज कितीतरी प्रगत झाला असता.” ट्रम्प, खामेनी आणि नेत्यानहू यांना राष्ट्रप्रमुख म्हणायचे की राक्षस म्हणायचे हे वाचकांनी ठरवावे.
 
 
याच भाषणात स्वामी विवेकानंदांनी आणखी एक विषय मांडला आहे. तो त्यांच्या भाषेत असा,“मला अभिमान आहे की, मी अशा धर्मातून आहे, ज्याने जगाला सहिष्णुता व सर्वसमावेशकतेचा संदेश दिला. आम्ही केवळ सर्वसमावेशकता आणि सहिष्णुतेवरच विश्वासच ठेवतो असे नाही तर जगातील प्रत्येक धर्माचा सत्य म्हणून आम्ही स्वीकार करतो.”
 
 
जगाला युद्धमुक्त करण्याची भारताची ऐतिहासिक जबाबदारी आहे. हिंदू धर्माची ही ऐतिहासिक जबाबदारी आहे, असे विवेकानंदांना सुचवायचे आहे. आणि त्यासाठी आपण सक्षम झालो आहोत का, हा प्रश्न आहे. आजही अनेक मतमतांरात विभागलेला समाज, जातीपातीच्या चिखलात अडकलेला समाज, सार्वत्रिक बंधुभावनेचा अभाव असलेला समाज ही आपली स्थिती आहे. गेली शंभर वर्षे या स्थितीतून बाहेर पडून सबल आणि समर्थ होण्याचा प्रयास सर्व देशभर चालू आहे. त्याचे यश लक्षणीय असले तरी जागतिक परिस्थितीवर प्रभाव पाडू शकेल असे सामर्थ्य अजून प्राप्त झालेले नाही. ‘जगाला युद्ध नको बुद्ध हवा’, हे वाक्य चांगले आहे, पण ते प्रत्यक्षात यायचे असेल तर भौतिक आणि आध्यात्मिक सामर्थ्याने समाज शक्तिमान होणे फार आवश्यक आहे. या दोन्ही आघाड्यांवर येणार्‍या काळात आपण किती वाटचाल करू, यावर जगभर चालणारी युद्धे थांबतील़ की नाही याचे उत्तर अवलंबून आहे.