जगे राष्ट्र नारी का गौरव

विवेक मराठी    13-Mar-2026
Total Views |
@ डॉ. लीना गहाणे

Nari se Narayani 
दि. 7 आणि 8 मार्च 2026
असे दोन दिवस ‘भारती - नारी से नारायणी’,
ही राष्ट्रीय परिषद दिल्लीच्या विज्ञान भवन येथे संपन्न झाली. ‘भारतीय दृष्टीकोनातून स्त्रीच्या आंतरिक शक्तीची ओळख तसेच तिच्या बाह्य कौशल्याचा सार्वभौम विकास’ या मध्यवर्ती विचारसूत्रावर परिषदेतील सगळ्या सत्रांचे नियोजन करण्यात आले होते. स्त्रीच्या जीवनातील विविध टप्प्यांवर असलेल्या जबाबदार्‍या आणि तिच्या इच्छा-आकांक्षा ह्यातील समन्वय यावर विचारमंथन झाले. या परिषदेसाठी 26 राज्यांतून 1300 महिलांनी नोंदणी केली होती.
 
 
नारी हूं मैं और जगत की हूं मैं आदी शक्ती,
प्रेरणा मैं जीवात्मा की, मैं धृती मेधा भक्ती,
नटेश्वर की शक्ती, नटेश्वर की शक्ती
 
या काव्यपंक्ती परिषदेमागची मूळ भूमिका अधोरेखित करत होत्या. त्याचे प्रतिबिंब विविध सत्रांमध्ये पडले होते.
 
सुप्त शक्ती ते धोरणात्मक शक्ती
 
सुुप्त शक्ती ते धोरणात्मक शक्ती इथवर महिलांची वाटचाल झाली आहे. ती कौतुकास्पद आहे, अभिमानास्पद आहे. ज्या एकेकाळी न बोलता आधार देणार्‍या, निव्वळ सहनशीलतेची मूर्ती होत्या, तिथून आज त्या प्रगतीच्या दृश्यमान शिल्पकार बनल्या आहेत. कुटुंबांचे संगोपन करणे, परंपरा जपणे आणि समाज टिकवून ठेवणे या कामांत महिलांनी नेहमीच आपल्या शक्तीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आज केवळ महिलांचे सशक्तीकरण झालेले नाही तर महिलांच्या नेतृत्वाखाली समाजाच्या विविध क्षेत्रांचा विकासही झालेला आहे. या बदलामुळे ही नारी शक्ती आता समाज, अर्थव्यवस्था आणि राष्ट्र घडवणारी धोरणात्मक शक्ती बनली आहे. समाजात संतुलन आणि सौहार्द निर्माण करण्याची महिलांमध्ये विलक्षण क्षमता आहे आणि त्या जगाला अधिक चांगल्या उद्याकडे नेण्याचे सामर्थ्य बाळगतात.
 
 
जागतिक स्तरावर W20 हा, जो G20चा महिलांचा अधिकृत सहभाग असलेला मंच आहे, तोही हे अधोरेखित करतो की, महिलांचा सहभाग समावेशक आणि शाश्वत विकासासाठी अत्यावश्यक आहे. भारतीय संदर्भातही ही संकल्पना अतिशय सुसंगत वाटते-महिलांना संघटित करून भारताला बलशाली करणे ही केवळ कविकल्पना नाही तर भारत घडविण्याचा तो खात्रीचा मार्ग आहे. राज्य शासन, प्रशासन, व्यवसाय यातल्या महिलांच्या सहभागितेने सामूहिक ज्ञान उलगडता येते, नवोन्मेषाला चालना मिळते आणि सामाजिक व आर्थिक परिवर्तन घडविणारी एकसंध शक्ती तयार होते.
 
 
दोन दिवस चाललेल्या राष्ट्रीय परिषदेने महिला विचारवंतांना मुक्त चर्चा, संवादासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी परिवर्तनकारी उपाययोजना विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले. हे एकत्रिकरण केवळ महिलांच्या यशाचा उत्सव साजरा करणारे नाही, तर नव्या कल्पना आणि भागीदारीसाठी प्रेरक ठरेल आणि उद्याच्या भारताच्या जडणघडणीत महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास वाटतो.
 
Nari se Narayani 
 
ही परिषद महिलांमधील परिवर्तन घडविण्याची क्षमता-नेतृत्व, विचारमंथन आणि समाजपरिवर्तनाच्या शक्ती म्हणून-उपयोगात आणण्यासाठी एक संधी ठरू शकते. देशभरातील महिलांना असे एकत्र आणल्याने त्यातून भारत जोडता येतो. अशा पद्धतीने महिलांच्या भविष्याला आकार देताना आपण राष्ट्राचेही भविष्य घडवतो.
 
 
ही परिषद भारत सरकारच्या विविध उपक्रमांना - जसे की, बेटी बचाओ बेटी पढाओ, नारी शक्ती वंदन अधिनियम, मिशन शक्ती, सखी सेंटर्स आणि प्रधानमंत्री मुद्रा योजना अशा योजनांना भक्कम आधार देते. या योजनांचा जास्तीत जास्त लाभ गरजू महिलांना मिळण्यासाठी त्या त्यांच्या अपेक्षित लाभार्थींपर्यंत पोहोचणे अत्यावश्यक आहे. ही परिषद 2047 पर्यंत महिलांना सशक्त करून आणि त्यांना परस्परांशी जोडून ‘विकसित भारत’ घडविण्याच्या पंतप्रधानांच्या उद्दिष्टाची पूर्तता करण्यात महत्त्वपूर्ण योगदान देईल असे वाटते. समाजाच्या सर्वसमावेशक विकास प्रक्रियेत आणि राष्ट्रीय प्रगतीत महिला अग्रभागी असाव्यात, यासाठी ही परिषद प्रयत्नशील असेल.
 
 
परिषदेची मुख्य उद्दिष्टे
 
* विविध पार्श्वभूमीतून आलेल्या महिलांना एकत्र आणणारे समावेशक व्यासपीठ निर्माण करणे.
 
* एकत्रितपणे प्रणालीतील अडथळे ओळखण्यासाठी आणि धोरणात्मक शिफारसी तसेच स्थानिक कृती आराखडे तयार करण्यासाठी महिलांना सक्षम करणे.
 
* महिलांच्या नेतृत्वाखालील गटाची शासन, नागरी समाज आणि खाजगी क्षेत्र यांच्याशी आंतर-क्षेत्रीय भागीदारी निर्माण करून सुचवलेल्या उपायांची अंमलबजावणी करणे.
 
* अडथळ्यांवर मात करून समाजात सकारात्मक बदल घडविणार्‍या महिलांच्या यशाचा गौरव करणे.
 
 
* भारती या समान व्यासपीठावर महिला विचारवंतांना एकत्र आणून पुढील पिढीला सक्षम करणार्‍या चर्चासत्रांचे आयोजन करणे.
निष्पत्ती व परिणाम
 
या परिषदेच्या निमित्ताने महिला विचारवंतांसाठी नियमित संवाद आणि सहभागाचे व्यासपीठ म्हणून भारतीची निर्मिती झाली. या दोन दिवसीय परिषदेतून,
 
 
* भारत सरकारकडे सादर करण्यासाठी महत्त्वपूर्ण धोरणात्मक शिफारसी तयार करण्यात आल्या.
 
* महिला तसेच पुरुषांना मार्गदर्शन करण्यासाठी क्षेत्रनिहाय महिला नेत्यांच्या समूहांची स्थापना करण्यात आली.
 
 
* राष्ट्राच्या धोरणात्मक विकासात महिला नेत्यांचे व्यापक जाळे (नेटवर्क) उभारणीला सुरुवात झाली.
 
 
* महिला विचारवंतांच्या वार्षिक राष्ट्रीय अधिवेशनासाठी दृष्टीकोन आणि आराखडा तयार करण्याच्या दृष्टीने सूतोवाच झाले.
 
 
Nari se Narayani 
 
परिषदेेतील विषय आणि मंथनातून निघालेले नवनीत
 
ज्ञानशक्ती -Knowledge as Power
 
शिक्षण हे भौतिक, भावनिक आणि आध्यात्मिक उन्नती प्राप्त करण्याचे प्रभावी साधन आहे. महिलांना शाळा व उच्च शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळावा यासाठी राज्यांकडून अनेक प्रयत्न केले जात असले तरी मुलींनी शाळा सोडण्याचे प्रमाण हे अजूनही एक मोठे आव्हान आहे. त्यामुळे विशेषतः उच्च शिक्षणामध्ये महिलांच्या शिक्षणावर धोरणात्मक लक्ष देणे अत्यावश्यक आहे. उच्च शिक्षणामुळे वैयक्तिक विकास, आर्थिक स्वावलंबन आणि सामाजिक प्रगतीसाठी अनेक संधी उपलब्ध होतात आणि त्यातूनच महिलांना राष्ट्राच्या भविष्यनिर्मितीत सक्रिय भूमिका बजावण्याची संधी मिळते. शिक्षण क्षेत्रातील विचारवंत महिलांचा उच्च शिक्षणातील Gross Enrolment Ratio (GER) वाढवण्यासाठी, कौशल्य विकासासाठी आणि पुढील रोजगार संधी वाढवण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदलांसाठी विचारमंथन करण्यात आले. ज्ञान आणि विद्या ह्यातील बारकाव्यांवर देखील सखोल चर्चा करण्यात आली.
 
 
आत्मनिर्भरता - Self reliance
 
आत्मनिर्भरता ही अशी शक्ती आहे जी स्त्रीमध्ये जीवनातील विविध आव्हानांना स्वतंत्रपणे आणि समर्थपणे सामोरे जाण्याची क्षमता प्रदान करते. या विषयात विशेषतः एकल महिलांमधील आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन देण्यावर परिषदेत भर देण्यात आला. त्यासाठी आवश्यक कौशल्ये, संसाधने आणि आत्मविश्वास विकसित करून महिलांना स्वतंत्र व समृद्ध जीवन घडविण्यास सक्षम कसे करता येईल ह्यावर विचार झाला. आर्थिक साक्षरता, व्यावसायिक कौशल्य, निर्णयक्षमता आणि सामाजिक सुरक्षा यांना बळकट करणारी समर्थ व्यवस्था निर्माण करणे हे या विषयाचे उद्दिष्ट होते. उद्योग, उद्योजकता, कर्जसुविधा आणि व्यवसाय परवानग्या यामध्ये महिलांना संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. भारताच्या समग्र तत्त्वज्ञानावर आधारित धर्म-अर्थ-काम या मूल्यांवर आधारित सशक्तीकरणामुळे महिलांची प्रगती केवळ आर्थिक न राहता नैतिक, अर्थपूर्ण आणि समाधानकारक बनते, असा विचार मंथनातून पुढे आला.
 
 
स्वातंत्र्य - Liberating Self
 
खरे स्वातंत्र्य आत्मजाणिवेतून येते. ही आत्मजाणीव महिलांना जीवनातील निर्णय स्पष्टतेने आणि निश्चित उद्दिष्ट ठेवून घेण्यास सक्षम बनवते. मानसिक विकास, भावनिक बुद्धिमत्तेचा विकास, आत्मविश्वास आणि आव्हाने, टीका किंवा अपयशासमोर टिकून राहण्याची क्षमता हे याचे सुरुवातीचे टप्पे आहेत. याचबरोबर सामाजिक जागरूकता आणि महिलांच्या शिक्षण, रोजगार आणि नेतृत्वातील सहभागाला अडथळा ठरणार्‍या रूढ व अनिष्ट समजुती ओळखून त्यांना दूर करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वातंत्र्य म्हणजे केवळ बाह्य स्वातंत्र्य नाही, तर स्वतःच्या क्षमतेची आणि सन्मानाची जाणीव होणे आहे. यात गरिबी, अज्ञान, घरगुती हिंसा, शोषण तसेच लादलेल्या बंधनांपासून मुक्ती समाविष्ट आहे. तसेच अभिव्यक्ती स्वातंत्र्य, स्वतःच्या निवडीचे, उद्देशपूर्ण आणि स्वाभिमानाने जीवन जगण्याचे स्वातंत्र्यही अंतर्भूत आहे. अशा सर्वांगीण स्वातंत्र्याबद्दल देशव्यापी जागरूकता निर्माण करण्याच्या रणनीतींची चर्चा या विषयांतर्गत करण्यात आली.
 
चेतना - The She Energy
 
कार्यस्थळी असमानता अनेक क्षेत्रांमध्ये अजूनही कायम आहे आणि ती अनेकदा सूक्ष्म स्वरूपात दिसून येते. महिलांना कमी वेतनाच्या पदांवर मर्यादित ठेवले जाते आणि नेतृत्वाच्या संधींमध्ये पुरुषांचे वर्चस्व दिसून येते. संस्थांमध्ये ग्लास सीलिंग ही वास्तव समस्या आहे. अनौपचारिक क्षेत्रातील महिलांचे योगदान अनेकदा दुर्लक्षित राहते. या मूक असमानतेवर प्रकाश टाकणे आणि न्याय, समानता व समावेशकता यांना प्रोत्साहन देणे हा या विषयाचा उद्देश होता. पुरुष व महिलांमधील हे अंत कमी करून जिथे गुणवत्ता, क्षमता आणि सहकार्याच्या आधारे प्रगती होईल आणि महिलांना निर्णयप्रक्रिया व धोरणनिर्मितीत सक्रिय सहभाग घेता येईल असे कार्यपरिसर निर्माण करणे आवश्यक आहे, यावर प्रकाश टाकण्यात आला.
 
Nari se Narayani 
 
प्रकृती ते पालनपोषण - Nature to Nurture (Respecting the She)
 
महिलांच्या जीवनात काही विशिष्ट जैविक आणि जीवनचक्राशी संबंधित टप्पे असतात, जे त्यांच्या शारीरिक, भावनिक आणि सामाजिक अनुभवांना आकार देतात. मासिक पाळी, मातृत्व, बालसंगोपन आणि रजोनिवृत्ती हे टप्पे शारीरिक व मानसिकदृष्ट्या आव्हानात्मक असू शकतात. त्यासाठी आधारभूत आणि समजूतदार वातावरण निर्माण करणे हा या विषयामागचा उद्देश होता. असे झाले तर या टप्प्यांमधून महिलांना सन्मानाने आणि सुलभतेने पुढे जाता येईल. या काळात कामाच्या ठिकाणी आणि कुटुंबात संतुलन साधण्यासाठी सहाय्यक व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. जीवनचक्राशी संबंधित या जबाबदार्‍यांमुळे अनेकदा महिलांच्या सहभागावर परिणाम होतो. त्यामुळे योग्य आधारव्यवस्था तयार केल्यास महिलांचे जीवन अधिक सक्षम आणि स्थिर होऊ शकते असा विचार करण्यात आला.
 
संस्कृती - Strengthening the Roots
 
मूल्यसंवर्धन आणि पुढील पिढीला योग्य दिशा देणे हे सुदृढ समाजासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. कुटुंब व समाज यांच्या माध्यमातून परंपरा, नैतिकता आणि मूल्ये पुढील पिढीकडे पोहोचतात. आजच्या काळात जाहिराती आणि सोशल मीडियाच्या प्रभावामुळे बाह्य आकर्षण, स्वकेंद्रितता आणि धोकादायक वर्तनांना प्रोत्साहन दिले जाते. अशा परिस्थितीत आत्मजाणीव, चिकित्सक विचारसरणी आणि स्वतःच्या संस्कृतीबद्दल अभिमान निर्माण करणे आवश्यक आहे. या विषयाच्या माध्यमातून महिलांची संस्कृती आणि नैतिक मूल्ये जपण्यातील महत्त्वपूर्ण भूमिका अधोरेखित केली गेली, तसेच त्यांच्या क्षमतेला मर्यादा आणणार्‍या रूढींचा गांभीर्याने पुनर्विचार करण्यावर भर देण्यात आला .
 
 
सिद्धी - Stories of Success
 
सिद्धी म्हणजे प्राप्ती, यश आणि समाधान. समाज, व्यवसाय किंवा नेतृत्वातील दृश्यमान यशाबरोबरच महिलांच्या शांत आणि न दिसणार्‍या योगदानालाही मान्यता देणे महत्त्वाचे आहे. शतकानुशतके महिलांनी कुटुंबे, संस्कृती आणि समाज घडविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. मूल्यांचे संगोपन, परंपरांचे जतन, कौटुंबिक शिक्षणाला आधार देणे आणि समाजातील भावनिक नातेसंबंध टिकवणे. या अदृश्य पण महत्त्वपूर्ण योगदानाची अनेकदा नोंदही घेतली जात नाही. मात्र महिलांच्या यश, संघर्षाच्या या कथा इतरांना प्रेरणादायी ठरू शकतात. या विषयातील अशा प्रेरणादायी कथांना व्यापकतेने समाजासमोर आणण्याचा प्रयत्न या निमित्ताने झाला.
 
 
कृती - Plan of action
 
कृती म्हणजे विचारांना कृतीत रूपांतरित करणे. या अधिवेशनाचे खरे यश केवळ चर्चेच्या समृद्धीत किंवा ठरावांमध्ये नसून त्यांची सातत्यपूर्ण अंमलबजावणी करण्याच्या दृढनिश्चयात होते. हीच भावना संकल्पनांना योजनांमध्ये आणि योजनांना प्रगतीत रूपांतरित करते. त्यामुळे हे अधिवेशन केवळ संवादाचे व्यासपीठ न राहता परिवर्तनाची सुरुवात करणारे केंद्र बनू शकते, जिथे महिलांच्या सामूहिक कृतीद्वारे या दृष्टीकोनाला वास्तवात आणले जाऊ शकेल. म्हणूनच या दोन दिवसीय परिषदेत कृती संकल्पांचा गांभीर्याने विचार करण्यात आला.
 
या अधिवेशनाचा एक महत्त्वाचा परिणाम म्हणजे महत्त्वपूर्ण शिफारसींसह एक Position Paper तयार होणे, जो पुढील कृतीसाठी मार्गदर्शक दस्तावेज म्हणून काम करेल. हा दस्तावेज परिषदेपूर्वी आयोजित केलेल्या सॅटेलाइट कार्यक्रमांमधील चर्चांवर आधारित तयार होणार आहे.
 
 
या परिषदेचे उद्घाटन दिल्लीच्या मा.मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या हस्ते तर समारोप महामहिम राष्ट्रपती आदरणीय द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत झाला. दोन दिवसीय परिषदेत अनेक गणमान्य व्यक्तींचे विचार ऐकावयास मिळाले.
 
 
महिला कुलगुरू संगम, संत संंगम आणि महिला सांसद संगम अशी विशेष सत्रे देखील आयोजित करण्यात आली होती. परिषदेला राष्ट्र सेविका समितिच्या प्रमुख संचालिका वंदनीय शांताक्कांचे उद्बोधन आणि मार्गदर्शन लाभले. प्रमुख कार्यवाहिका सीता अन्न दानम्, डॉ. शरद रेणू जी आणि शैक्षिक जगतातील अनेक मान्यवर परिषदेला उपस्थित होते.