आताच्या भारतीय संघाने हे विजेतेपद आपल्याकडे राखताना नवीनच आदर्श घालून दिला आहे. या संघाकडे विजयाचं सातत्य आहे, न डगमगणारं धैर्य आहे, समोरच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवण्याची मर्दुमकी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकालाभिमुख खेळण्याची कणखर मानसिकता आहे. युवा खेळाडूंचा हा संघ खर्या अर्थाने निडर आहे. पराभवाने ते विचलित होत नाही. त्यांना आस आहे मोठ्या कामगिरीची. भारतीय संघाने मिळवलेलं यश पाहिलं तर, वैयक्तिक मापदंडांनी नाही तर सांघिक कामगिरीने या संघाने हे यश खेचून आणलं आहे. हे यश मिरवताना जे वर्चस्व राखलं आहे ते सुखावणारं आहे. हाच टी-20 क्रिकेटमध्ये जिंकण्याचा राजमार्ग आहे, भारतीय संघाने घालून दिलेला हा वस्तुपाठ आहे!
साधारण एका महिन्यापूर्वी साप्ताहिक विवेकमध्येच, महिलांचा एकदिवसीय विश्वचषक विजय साजरा करताना, आपण भारतातील ही नवीन नीलक्रांती असल्याचं म्हटलं होतं. निळ्या जर्सीतील आपले पुरुष व महिला शिलेदार वेगवेगळ्या आघाड्यांवर नेत्रदीपक विजय मिळवत आहेत, त्या वर्चस्वाचं केलेलं ते वर्णन होतं. हरमनप्रीतच्या ‘मर्दानी’ मुलींनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या आघाडीवर निडर वृत्ती दाखवत सोनेरी चषकावर आपलं नाव कोरलं. जेमिमा, दीप्ती, स्मृती या विजयाच्या शिल्पकार होत्या आणि त्याचवेळी या मुलींची तुलना आपण आपल्या पुरुष शिलेदारांशी केली होती. मैदानावर वर्चस्व गाजवत ‘हा चषक आपलाच आहे,’ असं स्वत:ला बजावत विजय मिळवायची धडाडी, हा दोन्ही संघातील समान दुवा होता. म्हणूनच पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंनी मिळून देशात नीलक्रांती आणली आहे, असं आपण म्हटलं होतं.
आता आनंद या गोष्टीचा होतोय की, सूर्यकुमार यादवच्या सेनेनं आपलं म्हणणं खरं करून दाखवलं आहे. संघ जेव्हा चॅम्पियनसारखा खेळतो, तेव्हा विजय हा कधी कधी फक्त एक निष्कर्ष असतो. आताच्या भारतीय संघाचं तसंच झालं आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला जराही संधी न देता, 96 धावांनी मिळवलेला विजय हा भारत चॅम्पियन संघ आहे हे सांगणारा आहे. आपल्या खेळाने ती हुकूमत भारताने मिळवली आहे. टी-20 विश्वचषक सुरू झाला तेव्हा एक जाहिरात टीव्हीवर दिसायची. महिला क्रिकेटपटू या जाहिरातीत म्हणत होत्या, ‘एक कप देश में आया है! दूसरा घर से जाने नही देंगें!’ महिलांनी एकदिवसीय विश्वचषक खेचून आणला आणि पुरुषांनी आता 2024 मध्ये जिंकून आणलेला चषक आपल्याकडेच राखण्यात यश मिळवलं आहे.
स्पर्धा फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली तेव्हा भारतीय संघ विजयासाठी दावेदार संघांपैकी एक खचितच होता. मायदेशातच सामने होणार असल्यामुळे विजयाची भट्टीही जमलेली होती. संघात अकरा महिने सलग आयसीसी क्रमवारीत अव्वल राहिलेला फलंदाज अभिषेक शर्मा होता आणि टी-20 प्रकारात हमखास बळी मिळवण्याचं वरदान प्राप्त असलेला रहस्यमय चेंडू टाकणारा फिरकीपटू वरुण चक्रवर्ती होता. जसप्रीत बुमराला तर व्यग्र कार्यक्रमातून राखून ठेवून आपण या स्पर्धेसाठी ताजंतवानं ठेवलं होतं. असा हा संघ आव्हानात्मक तर होताच. पण, स्पर्धा सुरू झाली आणि कळलं, ऐनवेळी मैदानात अभिषेक आणि तो आजारी असताना संघात संधी मिळालेला दुसरा सलामीवीर संजू सॅमसन धावा जमवू शकत नाहीत. वरुण बळी तर मिळवत होता. पण, त्यासाठी खूप जास्त धावा देत होता. अगदी सुपर 8 मध्येही इंग्लंडविरुद्ध त्याने 4 षटकांत तब्बल 64 धावा दिल्या आणि मग एक बळी मिळवला. जसप्रीत बुमरा एका पिढीत एकदाच जन्माला येणारा गोलंदाज म्हणावं तर शेवटच्या षटकांत तो चौकार आणि षटकार लुटत होता. त्यामुळे त्याच्या षटकांतही 30-35 धावा लुटल्या जात होत्या.
साखळी फेरीतील पहिले 4 सामने अमेरिका, नामिबिया, पाकिस्तान आणि नेदरलँड्स अशा दुबळ्या संघांविरुद्घ होते (पाकिस्तानचा अपवाद वगळता) आणि तिथे मधल्या फळीने तसंच कामचलाऊ गोलंदाजांनी सामना जिंकून दिला. पण सुपर 8 मध्ये पहिल्याच सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं अस्मान दाखवलं. खरंतर भारताच्या या प्रकारात ‘सुपरपॉवर’ असण्यालाच आव्हान दिलं. कारण त्यांच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची धुलाई करत 187 धावा केल्या. आणि याला उत्तर देताना नरेंद्र मोदी स्टेडिअमवर भारतीय संघ 111 धावांत गारद झाला. सुरुवातीलाच हा दणका बसल्यामुळे भारताच्या मोहिमेलाच धक्का बसल्यासारखं झालं.
पण इथेच तर आताच्या भारतीय संघाचं वेगळेपण दिसतं! युवा खेळाडूंचा हा संघ खर्या अर्थाने निडर आहे. पराभवाने ते विचलित होत नाही. त्यांना आस आहे मोठ्या कामगिरीची. सलामीला डावी-उजवी जोडी असावी म्हणून संजू सॅमसनला पुन्हा एकदा सलामीला खेळवायचं ठरलं. वॉशिंग्टन सुंदर ऐवजी संघात अक्षर पटेल परतला आणि संघ आधीचं विसरून नवीन आव्हानासाठी सज्ज झाला. हा भारतीय संघ फक्त निकालासाठी खेळतो. संघातील फलंदाज 180,190 धावा करण्यासाठी नाही तर 20 षटकांत 240 धावा करण्यासाठी जीवाची बाजी लावतात, असं प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी विजयानंतर म्हटलं आहे. म्हणजे प्रतिस्पर्धी संघाला काहीही झालं तरी पुरतं नामोहरम करण्यासाठीच खेळायचं, छोटे-मोठे मापदंड नाही तर मोठे विजय मिळवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र झटायचं आणि कायम मोठं उद्दिष्टं समोर ठेवायचं, हा मंत्र गंभीर सरांनी या संघाला दिला आहे. भारतीय संघाने मिळवलेलं यश पाहिलं, तर हाच टी-20 क्रिकेटमध्ये जिंकण्याचा राजमार्ग आहे, असं आता वाटायला लागलं आहे. भारतीय संघाने घालून दिलेला तो वस्तुपाठ आहे!
आयपीएलमुळे असेल कदाचित पण देशात टी-20 प्रकाराची पाळंमुळं देशभर व्यापक आणि खोलवर रुजली आहेत. उत्तराखंडचा ईशान किशन, अलिगढचा रिंकू सिंग भारतीय संघापर्यंत पोहोचले आहेत. कसोटी तसंच एकदिवसीय संघाचा कर्णधार असलेल्या शुभमन गिलला तसंच कसोटीत आक्रमक आणि सातत्यपूर्ण फलंदाजीसाठी ओळखल्या जाणार्या यशस्वी जयसवालला या संघात स्थानही मिळू शकत नाही, यातून भारतीय क्रिकेटची समृद्धी दिसून येते. इथे एकेका जागेसाठी कर्णधारालाही स्पर्धा करावी लागते. तुमच्याकडे कौशल्य असेल तर बिहार, उत्तराखंड भागातील एरवी दुर्लक्षित राज्यातील खेळाडूंनाही संघात हक्काचं स्थान मिळतं. (जम्मू व काश्मीर संघाने रणजी करंडक जिंकणं हा देशातील क्रिकेटच्या व्याप्तीचा आणखी एक मापदंड ठरावा.)
कौशल्य आणि स्पर्धात्मक वृत्ती हे दोन्ही संजू सॅमसनकडे होतं. त्यामुळे पहिल्या पाच सामन्यांपैकी फक्त दोनच सामन्यात संधी मिळूनही आणि त्यात अपयश पदरी पडूनही संजूने नियमित सराव सोडला नाही. मिडविकेटला झेल देण्याची चूक होत होती, त्यावरही काम सुरूच ठेवलं. सुपर 8 मध्ये दुसर्यांदा संधी मिळाली त्याने तेव्हा धमाकाच उडवून दिला. झिंबाब्वेविरुद्ध आधी 15 चेंडूंत 24 धावा करणारा सॅमसन वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात सुसाट सुटला. 50 चेंडूंत 94 धावा करत त्याने संघाला महत्त्वाच्या सामन्यात एकहाती विजय मिळवून दिला. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध उपांत्य फेरीत त्याने 42 चेंडूंत 89 धावा केल्या. पुन्हा एकदा अंतिम सामन्यात त्याची बॅट तळपली. त्याने 46 चेंडूंत 89 धावा केल्या. दुसर्या बाजूने गडी बाद होत राहिले, गोलंदाजाने एखाद्या चेंडूवर चकवलं तरी संजू सॅमसन डगमगला नाही. भारतीय डावाचं नेतृत्व करत त्याने शेवटच्या तीनही सामन्यांवर आपली मोहोर उमटवली. अख्ख्या स्पर्धेत पाचच सामने खेळूनही तो खेळाडू मालिकावीर होण्याचा प्रसंग विरळाच. पण संजू सॅमसनने तो मान पटकावला.
भारतीय खेळपट्ट्यांवर 200 पेक्षा जास्त धावा होणार आणि फलंदाज ही स्पर्धा गाजवणार हे ठरलेलं होतं. त्यात भारतीय फलंदाजी आठव्या, नवव्या क्रमांकापर्यंत खोल असल्याचा प्रचंड फायदा झाला. जेव्हा अभिषेक आणि आघाडीची फळी खेळत नव्हती, तेव्हा मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी भार उचलला. ईशान किशन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पांड्या यांनी विजयी मालिका कायम ठेवली. वरुण चक्रवर्ती चालत नव्हता, तेव्हाही अर्शदीप, हार्दिक लढत राहिले. जसप्रीत बुमरा बद्दल काय सांगायचं? मोठ्या स्पर्धेत हुकुमी कामगिरी करणारा हा चॅम्पियन खेळाडू असतो. जसप्रीत बुमरा हा डोळे झाकून कर्णधाराने विश्वास ठेवावा असा खेळाडू आहे. उपांत्य सामन्यात इंग्लंड आणि अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध आपल्या अचूक गोलंदाजीने त्याने अक्षरश: सामना फिरवला. इंग्लंडविरुद्ध भारताने 240 च्या वर धावा करूनही फक्त 7 धावांनी विजय मिळवला. कारण इंग्लिश फलंदाजांनी लढत दिली. पण तुल्यबळ दोन संघातील फरक ठरला तो त्याच्या तिसर्या षटकांत फक्त 7 धावा देणारा जसप्रीत बुमरा. या एका षटकाने खेळाचा नूर पालटला. अंतिम सामन्यात तर त्याने न्यूझीलंडची मधली फळी कापताना 15 धावांत 4 बळी मिळवले. संघाला गरज असताना बुमरासारखे एकेक मॅचविनर खेळाडू संघासाठी मैदानात उभे राहिले. साधारणपणे स्पर्धेत 9 पैकी 8 सामने जिंकणार्या संघातील खेळाडूंनीच स्पर्धेत सर्वाधिक धावा कराव्यात आणि सर्वाधिक बळी घ्यावेत असा दंडक आहे. कारण या इन-फॉर्म खेळाडूंनीच संघाला अंतिम फेरीपर्यंत नेलेलं असतं. पण सर्वाधिक धावा करणार्यांच्या यादीत संजू सॅमसन 321 धावांसह तिसरा आहे. पहिल्या 10 फलंदाजांमध्ये तीनच भारतीय आहेत. तर गोलंदाजीतही वरुण चक्रवर्ती आणि जसप्रीत बुमरा हे 14 बळींसह यादीत पहिले असले तरी या दोघांनंतर थेट क्रमांक लागतो तो अक्षर पटेलचा दहावा.
म्हणजेच वैयक्तिक मापदंडांनी नाही तर सांघिक कामगिरीने या संघाने हे यश खेचून आणलं आहे. हे यश मिरवताना जे वर्चस्व राखलं आहे ते सुखावणारं आहे. ‘हा एक सुरेख प्रवास होता आणि आता थांबायचं नाही,’ असं सूर्यकुमार यादव अंतिम फेरीनंतर म्हणाला. त्याच्याबरोबर प्रशिक्षक गौतम गंभीरही होता. सूर्यकुमारच्या डोळ्यात विजेतेपदाची चमक होती. गंभीर नावाप्रमाणे डगआऊटमध्ये गंभीर बसलेला असतो, त्याच्या चेहर्यावर अखेर हास्य फुललं होतं. का नाही दोघांचे चेहरे फुलणार? 2024 मध्ये मिळवलेलं टी-20 विश्वचषकातील विजेतेपद, त्यानंतर चॅम्पियन्स करंडकातील विजेतेपद, मध्ये आशिया चषकातील विजय आणि आता आता दोन वर्षांत पुन्हा एकदा टी-20 विश्वचषक नावावर करणं या प्रवासालाच सूर्यकुमार सुरेख म्हणत होता. आता ऑलिम्पिकपर्यंत आणि पुढेही थांबणार नाही, अशी ग्वाही तो देत होता.
कपिलच्या संघाने 1983 मध्ये भारताला विजयाची पहिली चव चाखायला दिली, त्यानंतर 2007 मध्ये युवा महेंद्रसिंग धोनीने टी-20 प्रकार अतिशय नवीन असताना पहिलावहिला चषक जिंकून दिला. त्यातूनच धोनीचं नेतृत्व आणि विराट कोहलीचा उदय झाला. धोनीनेच 2011 मध्ये भारतासाठी दुसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकला. पुढे विराटने कसोटीतही भारताला नियमितपणे जिंकायला शिकवलं. रोहित, राहुल द्रविड या जोडीने भारताला दुसर्यांदा टी-20 विजेतेपद 2024 मध्ये मिळवून दिलं. आताच्या भारतीय संघाने हे विजेतेपद आपल्याकडे राखताना नवीनच आदर्श घालून दिला आहे. या संघाकडे विजयाचं सातत्य आहे, न डगमगणारं धैर्य आहे, समोरच्यावर पूर्ण वर्चस्व गाजवण्याची मर्दुमकी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकालाभिमुख खेळण्याची कणखर मानसिकता आहे.
2007मध्ये टी-20प्रकारातील पहिली विश्वचषक स्पर्धा झाली तेव्हा हा प्रकार नेमका काय आहे, याचीच फारशी कुणाला कल्पना नव्हती. सचिन तेंडुलकरनेही तेव्हा हा नवीन प्रकार कसा असेल याची उत्सुकता आहे, अशी टिपण्णी केली होती. म्हणजे त्यालाही तो पुरता कळला नव्हता. पण यावेळी भारताने सलग दोन विजय मिळवत हा प्रकार कसा खेळायचा याचंच प्रात्यक्षिक जगाला दाखवून दिलं आहे. 4 तासांत सामन्याचा निकाल लावणारा हा प्रकार तरुणांना आवडेल याची कल्पना बीसीसीआयला सर्वप्रथम आली होती. त्यांनी मागोमाग 2008 मध्ये आयपीएल लीग काढली. टी-20 प्रकार भारतात आणि परदेशातही रुजवला. त्याचवेळी भारतीय क्रिकेटला चांगल्या खेळाडूंचा दारुगोळा मिळत राहावा यासाठी बंगळुरूत क्रिकेट अकादमी सुरू केली. राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्यासारखे माजी खेळाडू तिथे बसवले. खेळाडूंना तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शन आणि दुखापतींवर उपचार मिळावेत यासाठी अद्ययावत यंत्रणा तिथे उभारली. अगदी आसाम, काश्मीरपर्यंत स्टेडिअम उभारून क्रिकेट देशात सर्वदूर पसरवलं. त्याची फळं आपण सध्या क्रिकेटमध्ये चाखतो आहोत. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या पलीकडे क्रिकेट पोहोचलं, तेव्हा वेस्ट इंडिज हा कसोटीवर वर्चस्व गाजवणारा पहिला गौरेतर संघ ठरला. 1970, 80 चं दशक त्यांनी गाजवलं. एकदिवसीय विश्वचषकातही पहिल्या दोन स्पर्धा त्यांनीच जिंकल्या. त्यानंतर 1990 आणि 2000 चं दशक ऑस्ट्रेलियाचं होतं. वॉ बंधू, शेन वॉर्न, ग्लेन मॅग्रा यांच्या काळात ऑस्ट्रेलियाची सद्दीच अशी होती की, परिपूर्ण खेळ म्हणजे ऑस्ट्रेलियाचा, असं बघणार्यांना वाटावं.
या संपूर्ण कालावधीत भारतानेही या साहेबी खेळाला आपलसं केलं होतं. खेळाची लोकप्रियता देशात वाढत होती आणि नवनवीन खेळाडू तयार होतच होते. गावसकर, कपिल, सचिन, धोनी, विराट, रोहित असे दिग्गज खेळाडू भारताने क्रिकेटला दिले. आता पुढची काही वर्षं ही टी-20 आणि एकदिवसीय प्रकारात भारताच्या वर्चस्वाची असणार आहेत. भारतात क्रिकेटला लोकप्रियता आहे, राजाश्रय आहे आणि ताज्या दमाच्या खेळाडूंकडे विजयी मानसिकताही आहे.