इस्रायलने मात्र जाहीर केले की, तो आयातोल्ला पदावर कोणाला टिकू देणार नाही. त्यांचा तो वध करत राहील. त्याचा अंत:स्थ अर्थ असा की, अतिरेकी आणि इस्रायल-अमेरिकेचा केवळ धार्मिक आततायीपणापायी द्वेष करणारी व्यक्ती आयातोल्ला न होता मवाळ आणि सामोपचाराची वृत्ती असणारी व्यक्ती आयातोल्ला झाली तर ते दोघांनाही स्वीकारार्ह असेल. तोवर इराणच्या उच्चपदस्थांचे शिरकाण विशेषतः इस्रायल करत राहील, यात शंका नाही.

युद्ध सुरू झाल्याच्या आठव्या दिवशी इराणचे अध्यक्ष मसौद पेझेश्कियान यांनी आपल्या मुस्लीम शेजारी देशांची सपशेल माफी मागितली. शेजारी देशांवर हल्ले करणे ही इराणची चूक होती. या पुढे आम्ही त्यांना थेट पल्ल्यांपासून दूर ठेवू. ही घोषणा होताच ट्रम्प त्यांच्या सवयीप्रमाणे छाती बडवायला लागले की इराणने शरणागती पत्करली. त्यांचा हा भ्रम काही तासच टिकला. लगेच क्रांतिकारी रक्षक दलाच्या प्रवक्त्याने त्याच्या विरोधात घोषणा केली की, आम्ही शेजारी देशांवरील हल्ले थांबवणार नाही. आखाती देशांत असलेल्या अमेरिकेच्या सैन्यावर आमचे हल्ले सुरूच राहतील. लगोलाग दुबईच्या विमानतळावर जोरदार हल्ला करण्यात आला. हल्ल्यांचे सत्र तसेच सुरू राहिले. एवढेच नव्हे तर त्याची व्याप्ती वाढली.
रविवारी 8 मार्च रोजी सौदी अरेबियाची राजधानी रियादमध्ये एका मोठ्या ह़ॉटेलवर हल्ला झाला. बहरीनमधे समुद्राच्या पाण्याचे निर्क्षारिकरण (वशीरश्रळपरींळेप) करून आसपासच्या 30 गावांना पिण्याचे पाणी मिळत असे. त्याच प्रकल्पावर हल्ला करून लोकांचे पिण्याचे पाणी तोडण्यात आले. जोपर्यंत क्रांतिकारी रक्षक दलाचे कंबरडे मोडत नाही तोवर हे हल्ले सुरू राहतील. तसे पाहिले तर काही तासांच्या अंतराने समोर आलेले इराणमधील अंत:स्थ फुटीचे हे पडसाद क्रांतिकारी रक्षक दलाच्या अधिकार्यांच्या उद्दामपणाचे निदर्शक होते. राजकारणी पेझेश्कियान यांना घडलेली चूक लक्षात आली. एकंदर स्थिती लक्षात घेता पेझेश्कियान यांनी 2-4 महत्त्वाच्या व्यक्तिंशी सल्लामसलत केल्यावरच ते विधान केले असावे.
पूर्वी दिल्याप्रमाणे क्रांतिकारी रक्षक दल हे राजकारण्यांच्या नव्हे तर आयातोल्ला पदावर असलेल्या व्यक्तिच्या आदेशानुसार वागते. आयातोल्ला खामेनीच्या मृत्यूनंतर त्या संपूर्ण दलाला स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची सूट देण्यात आली होती. तिचे पडसाद इतरत्रही उमटले.इराणच्या वायव्य भागातील प्रांताचे नाव अझरबैजान आहे. त्याला लागून उत्तरेकडे आणि कास्पियन समुद्राच्या पश्चिम किनार्याला लागून स्वतंत्र मुस्लीम देश अझरबैजान आहे. त्यात मोठ्या प्रमाणावर शिया मुस्लीम राहतात. विशेषतः दक्षिण भागात अझरबैजान प्रांताला लागून त्यांचे प्राबल्य आहे. हे लोक शिया असले तरी वंशाने अझेरी, थोडे वेगळे आहेत. जसे साधारणपणे मुस्लीम देशांत पंथीय आणि वांशिक भेदांवरून अल्पसंख्याकांवर अन्याय केला जातो, थेट तसाच प्रकार अझेरी अल्पसंख्याकांबाबत इराणमधे घडत आला आहे. तेथेही इराणी सैन्याने हल्ले केले. अझरबैजान प्रांताच्या पश्चिमेला कूर्द अल्पसंख्याकांची वस्ती आहे. हे कूर्द लोक चार देशांत, तुर्कीये, इराक, इराण आणि आर्मेनिया यांच्या एकमेकांना लागून असलेल्या सीमा प्रदेशात मोठ्या प्रमाणात आहेत. मध्यपूर्वेतील एकमेकांना लागून असलेल्या चार देशांत मिळून त्यांची सुमारे तीन कोटी लोकसंख्या आहे. ही लोकसंख्या जगातील इतर अनेक स्वतंत्र आणि स्वायत्त देशांपेक्षा काही पटीने मोठी आहे. ते या चारही देशांतील बहुसंख्याकांपेक्षा वेगळ्या वंशाचे असल्याने अपेक्षेप्रमाणे या तिन्ही इस्लामी देशांत त्यांना सापत्नपणाची वागणूक पूर्वीपासून मिळते आहे. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र कूर्दीस्तान स्थापन करण्यासाठी लढा सुरू ठेवला आहे. एवढेच नव्हे तर सीमाभागात ज्या ठिकाणी खनिज तेलाचे विपुल साठे आहेत तेथे कुर्दांनी स्वायत्तता असलेला देश, हवे तर प्रदेश म्हणा, कूर्दीस्तान, स्थापन केला आहे. तो लगतच्या तिन्ही देशांना खुपत असतो.
इराणकडून कुर्दांची स्वायत्तता असलेल्या भागात हल्ले झाले. ज्यावेळी आसपासच्या दहा देशांना एकाच वेळी दुखवण्याचे दुःसाहस इराणने केले. त्यात आधीच जे वांशिक गट अतिरेकी कारवाया करण्यास सरावले आहेत त्यांच्यावर हल्ले करण्याची दुर्बुद्धी इराणी सैन्याला झाली. प्रस्तुत लेखकाच्या अंदाजाप्रमाणे हे हल्ले क्रांतिकारी रक्षक दलाने स्वतंत्रपणे निर्णय घेऊन केले. त्याचा उलट परिणाम आता दिसतो आहे. अमेरिकेने कूर्दांना आता पाठिंबा दिला आहे. फार वेळ न घालवता त्यांना जमिनीवरील युद्धासाठी शस्त्रसज्ज करण्यास शस्त्रे, दारूगोळा आणि चिलखती वाहने यांचा पुरवठा केला आहे. काही वाहिन्यांवर दृश्ये दाखविल्याप्रमाणे, कूर्द सैनिक दले इराणच्या दिशेने कूच करत आहेत. येत्या आठवडाभरात योजनाबद्ध रितीने इराणमधे घुसून कूर्दांनी हल्ले सुरू केलेत हे पाहायला मिळेल.
इराणचे विभाजन
फोडा आणि झोडा या नीतीचा उपयोग फार प्राचीन काळापासून राजकारणी करत आले आहेत. अनेक देशांत त्या नीतीचा वापर पाश्चात्य देशांनी केला आहे. अखंड भारताचे विभाजन घडवून आणण्याचे कारस्थान इंग्रजांनी यशस्वीपणाने राबवले. त्यातून अखंड भारताची शक्ती कमी करता आली. दोन देशांना आपापसात लढवत ठेवण्यात आले. हेच धोरण इराणमधे अवलंबिण्याचा ट्रम्पचा विचार दिसतो.
इराणमध्ये सध्या तीन प्रमुख फुटिरतावादी समाज आहेत. कूर्द, अझेरी आणि बलुची. त्यांच्या फुटिरतावादी संघटना स्थानिक स्तरांवर कमीजास्त प्रमाणात कार्यरत आहेत. त्याच्यांपैकी कूर्द मोठ्या प्रमाणावर मैदानात उतरू शकतील अशी सध्यातरी स्थिती आहे. यांच्या अंतर्गत छोट्यामोठ्या काही लढाऊ संघटना असल्या तरी जगाला विशेष करून माहिती असलेल्या संघटनेचे नाव पेशमर्गा म्हणजे मृत्यूला सामोरे जाणारे आहे. हे संघटन त्यांच्या आत्यंतिक लढाऊ बाण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यांना पुरेसे शस्त्रसज्ज करून अमेरिका-इस्रायल पुढे पाठवून जमिनीवरील युद्धाला तोंड फोडेल असे दिसते.
अमेरिकेच्या वतीने लढण्यासाठी कूर्दांनी काही अटी घातल्या आहेत. सध्या त्यांच्याकडे फक्त रायफल, हँडग्रेनेड आणि छोट्या पल्ल्याची शस्त्रे आहेत. इराणच्या सुसज्ज सैन्याशी निर्णायक लढा देण्यासाठी त्यांना केवळ शस्त्रसज्ज करणे पुरेसे नाही. कूर्दांनी त्या बदल्यात हवाई हल्ल्यांपासून संरक्षण करण्याची हमी आणि इराणी सैन्याच्या हालचालींची गुप्त माहिती मिळण्याचे आश्वासन मागितले आहे. अमेरिका-इस्रायल मिळून ते देऊ शकतील. एक अट बाहेर आलेली नाही. जो काही प्रदेश कूर्द पादाक्रांत करतील तो त्यांच्या होऊ घातलेल्या स्वतंत्र देशाचा भाग असेल. युद्ध संपताच अमेरिका-इस्रायलने मिळून त्याला स्वतंत्र देशाची मान्यता द्यावी. त्या पाठोपाठ इतर अनेक देशांकडूनही मान्यता मिळवून द्यावी. अर्थात कूर्दांचा सद्दाम हुसेनवर चढाई करण्याच्या वेळी नंतर कूर्दांना वार्यावर सोडून अमेरिकेने दगा दिला होता. तरीही येत्या काही दिवसांतच वायव्येकडून कूर्दांची इराणमधे चढाई सुरू होऊ शकते.
इराणमधे दुसरा फुटीर गट बलुचींचा आहे. अझरबैजानप्रमाणेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान सीमांना लागून सिस्तान-बलुचिस्तान असे जोड नाव असलेला जिल्हा इराणच्या आग्नेयेस आहे. इराणमधे बलुचींची वस्ती अगदी 3-4 टक्के आहे. त्यांची जुन्दाल्ला नावाची सशस्त्र प्रतिकार करणारी संघटना गेल्या दोन दशकांपासून इराणी लष्कराशी लढा देते आहे. सध्या सर्व बलुच मिळून पाकिस्तानमधून वेगळे होऊन स्वतंत्र बलुचिस्तान स्थापण्याच्या मागे आहेत. त्यांना जर इराण विरोधात उतरवायचे असेल तर बलुचिस्तान फोडून ते स्वतंत्र अस्तिवात यावे लागेल. तरच बलुचींच्या प्रतिकार संघटना एकत्र येऊन इराण विरोधात उभ्या राहतील. तेव्हा इराणचे विभाजन करण्यासाठी अमेरिकेला प्रथम पाकिस्तान विभाजित करणे आवश्यक आहे.
इराणमधे अझेरी लोकांची संख्या 20-25 टक्के एवढी आहे. तसे पाहिले तर पाकिस्तानातील शियांसारखे ते लोक इराणी लोकांमधे सामावून गेले आहेत. पण कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच या म्हणीनुसार मुस्लीम असले तरी अझेरी लोकांना आपल्यात सामावून न घेता वेगळे काढून त्याच्यावर अत्याचार करण्याचे इराणचे धोरण राहिले आहे. त्यांच्या नेत्यांना कारणे न देता पकडून तुरुंगात टाकणे, फाशी देणे असले प्रकार तेथे अगदी आताआतापर्यंत होत आले आहेत. पाकिस्तान आणि बलुची संघर्षाशी त्याचे साम्य आहे. सध्या तरी त्यांच्या संघर्षाची तीव्रता कमी आहे. आता तर इराणमधील विघ्नसंतोषी क्रांतिकारी रक्षक दलाने अझरबैजानवर हल्ले करून त्याचे शत्रुत्व ओढवून घेतले आहे. अमेरिकेला त्यात तेल ओतता येईल. इराणशी संघर्ष आटोक्यात आणता आला नाही तर इराणी सैन्याला तीन दिशांनी गुंतवून ठेवून इराणचे लचके तोडण्याची योजना अमेरिका-इस्रायलने मिळून आखल्याचे दिसते.
इराणी नेतृत्त्वाचे खच्चीकरण
इस्रायल आणि अमेरिका दोघांनी मिळून हल्ल्याच्या काही तासांत इराणचे सर्वोच्च नेतृत्त्व अक्षरशः नामशेष केले. आयातोल्ला खामेनीसह इतर अनेक नेते आणि लष्करी अधिकारी त्या हल्ल्यात मारले गेले. कोणत्याही देशात अथवा संघटनेत सर्वोच्च पद रिकामे राहिले तर गोंधळ माजून संघटनाच नामशेष होते. तसे होऊ नये म्हणून इराणने नवा आयातोल्ला निवडण्यासाठी उच्चपदस्थ मुल्ला-मौलवींची बैठक ज्या इमारतीत बोलावली होती तीच ऐनवेळी हल्ला करून जमीनदोस्त करण्यात आली. ती बैठक रद्द करावी लागली. खामेनींनी आपला दुसरा मुलगा मोज्तबा याला वारस म्हणून तयार केले होते. तो या हल्ल्यात वाचला. हल्ल्यामुळे आयातोल्ला पदाची निवडणूक पुढे ढकलली गेली. त्याच वेळी ट्रम्पने दर्पोक्ती केली की आयातोल्लाच्या पदावर येणारी व्यक्ती अमेरिकेच्या पसंतीची असेल. काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्कच्या महापौरपदी मुस्लीम उमेदवार निवडून येणार असे दिसत होते. त्याच्या निवडी विरोधात ट्रम्प महाशयांनी डरकाळ्या फोडल्या होत्या. तरीही जोहरान ममदानी न्यूयॉर्कच्या महापौरपदी निवडून आला. ट्रम्पच्या दर्पोक्तीचा फुगा एका इराणी प्रवक्त्याने फोडला. ज्या राष्ट्राध्यक्षाला आपल्या पसंतीचा महापौर निवडून आणता येत नाही त्याने इराणच्या सर्वोच्च नेता ठरविण्याच्या वल्गना करू नये. दोन दिवसांनी झालेल्या उच्चपदस्थ मौलवींच्या सभेने मोज्तबा अली खामेनीच्या नावावर आयातोल्ला पदाचे शिक्कामोर्तब केले. आता पाहूया की, मोज्तबा महाशयांची सद्दी कुठपर्यंत टिकते.
इस्रायलने मात्र जाहीर केले की, तो आयातोल्ला पदावर कोणाला टिकू देणार नाही. त्यांचा तो वध करत राहील. त्याचा अंत:स्थ अर्थ असा की, अतिरेकी आणि इस्रायल-अमेरिकेचा केवळ धार्मिक आततायीपणापायी द्वेष करणारी व्यक्ती आयातोल्ला न होता मवाळ आणि सामोपचाराची वृत्ती असणारी व्यक्ती आयातोल्ला झाली तर ते दोघांनाही स्वीकारार्ह असेल. तोवर इराणच्या उच्चपदस्थांचे शिरकाण विशेषतः इस्रायल करत राहील, यात शंका नाही.