नारी से नारायणी....एक वैचारिक मंथन

विवेक मराठी    14-Mar-2026
Total Views |
@मंजूषा रेडगावकर
 
Nari se Narayani 
दिनांक 7 आणि 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिवसाच्या निमित्ताने विज्ञान भवन नवी दिल्ली येथे भारतीच्या व्यासपीठावरुन नारी से नारायणी या परिषदेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. विभिन्न क्षेत्रांतील मान्यवर स्त्रियांनी ह्या विद्वत परिषदेत भाग घेऊन आपले विचार ह्या व्यासपीठावरुन मांडले.
 
 
राष्ट्र सेविका समिती आणि तिच्या अनुषांगिक संस्थानी मिळून ह्या कार्यक्रमाला भव्यता प्रदान केली. वंदनीय केळकर मावशींच्या संकल्पनेतून समितीचे कार्य सुरू झाले. समविचारी स्त्रियांना एका सूत्रात बांधून, प्रत्येकीच्या आवडीनुसार, आणि तिच्या सोयीनुसार देखील तिला काम करण्याची मुभा समितीने दिली. कुठल्याही स्त्रीला तिचं घर मुलं-बाळं हे त्या काळी अधिक महत्वाचं वाटत असायचं आणि आज देखील स्त्रीला तिच्या कौटुंबिक जबाबदार्‍या अधिक महत्त्वाच्या वाटतात. समितीने ’राष्ट्र प्रथम’ ही भावना मनामनात फुलवत हा वैचारिक यज्ञ सतत सुरू ठेवला. ’देशज’ विचारांचा प्रचार प्रसार कसा करता येईल, तो प्रत्येकाच्या मनात कसा रुजवता येईल ह्या गोष्टींचा सातत्याने पाठपुरावा केला. आज आम्ही त्याच विचारांचा वटवृक्ष झाल्याचे बघत आहोत.
 
 
अशा ह्या विचार मंथनाच्या कार्यक्रमात संपूर्ण देशातील बाराशेपेक्षा ही अधिक प्रबुद्ध स्त्रियांनी हजेरी लावली. विद्या, सिद्धी, संस्कृती, मुक्ती, चेतना आणि कृती सारख्या वेगवेगळ्या संकल्पनेतूनच ’नारी ते नारायणी’ पर्यंतचा प्रवास स्त्रीने केला आहे.
एकीकडे स्त्री ही शक्तीचे स्वरूप, संयमाची आणि सहनशीलतेची परिसीमा असते तर दुसरीकडे ती समर्पणाची मूर्तिमंत प्रतिमा देखील असते. तिला दैवीशक्तीचे वरदान मिळाले असल्याने ती जात्याच अत्यंत सामर्थ्यवान आहे. शक्ती, युक्ती आणि बुद्धीचा सुंदर मिलाफ म्हणजे स्त्री.
 
 
Nari se Narayani
 
राष्ट्र सेविका समिती, भारतीय विद्वत परिषद आणि शरण्या यांचे हे संयुक्त आयोजन नारी तू नारायणी एक वैचारिक मंथन, भारतीच्या व्यासपीठावर आयोजित करण्यात आले. दोन दिवसांचा हा विचार मंथन सोहळा; देशातील सारस्वत कन्यांच्या आणि महत्त्वपूर्ण पदांवर सुशोभित असणार्‍या बुद्धिमान स्त्रियांच्या उपस्थितीत साजरा झाला. त्यांनी आपापल्या विचारांनी हा मंच गाजविला. ह्या आयोजनाने देशातील स्त्री-वर्गात काही नवीन दिशा सापडेल हा विश्वास निर्माण केला आहे.
 
 
आमच्या संस्कृतीने, धर्माने नारी ही नारायणी आहे असे कां मानले? तर तिच्यातील स्वतंत्र चेतनेला, बुद्धिमत्तेला आमच्या संस्कृतीने तिची योग्यता काय आहे हे ओळखूनच तिला सर्वाधिक उंचीवर नेऊन ठेवलेलं होतं. ती नेहमीच तिच्या ज्ञानाने पूजनीय झाली आहे. तिचे ते स्थान आज देखील अढळ आहे. म्हणूनच तिचा ’नारायणी’ म्हणून वास प्रत्येक सुसंस्कृत मनात झालेला आहे.
 
 
पाश्चिमात्य संस्कृतीने स्त्रीला दुय्यम स्थान दिलं. पूर्वी तर तिला पुरुषांच्या मर्जीनुसार वागण्याची सक्ती केली जात असे. मुस्लिम समाजात तर स्त्री फक्त उपभोगाची वस्तू म्हणून बघितली गेली आहे. तिचं स्वतंत्र अस्तित्वदेखील ह्या समाजाला मान्य नव्हते आणि आजही ते मोठ्या प्रमाणात अमान्यच आहे. तिला फक्त आपल्या पतीच्या इच्छेनुसार, त्याच्या वासनेची पूर्ती करणारी आणि आपल्या मुलांना जन्माला घालणारी म्हणून बघितले जात होते.
 
 
आमची संस्कृती मात्र पूर्णपणे वेगळी आहे. तिने स्त्रीवर असल्या कुठल्याही प्रकारचे बंधन कधीच घातले नाही. ती कुणाच्याही आधीन नाही. म्हणूनच तिला हमें चाहिए आजादी सारख्या घोषणा करण्याची आणि स्वतःसाठी स्वातंत्र्य मागण्याची गरज नाही. ती अनादी काळापासून स्वतंत्रच आहे. ती साक्षात लक्ष्मी आहे, मूर्तिमंत सरस्वतीदेखील तीच आहे. तिला बुद्धी, शक्ती, आणि चातुर्याचे वरदान मिळालेले असल्याने ती पूर्वीपासून सभा गाजवू शकत होती. आपल्या बुद्धीच्या जोरावर ती प्रकांड विद्वान व्यक्तीचे सिद्धांतदेखील खोडून काढू शकत होती, तर विद्वानांनी भरलेल्या सभेत ती केंद्रस्थानी राहू शकत होती. न्यायाधीश म्हणून तिची नेमणूक फार पूर्वीच्या काळात मंडन मिश्र आणि शंकराचार्य ह्यांच्या मधील शास्त्रर्थात केली गेली. इतकेच काय तर शास्त्रार्थ करताना शंकरांचार्यांना देखील आव्हान देण्याचे धारिष्ट्य तिच्यात होते. तिच्या प्रतिभेची खोली दिवसेंदिवस वाढत गेलेली आहे. हे आज सर्वांना मान्य करावे लागते.
 
 
Nari se Narayani
 
ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरीकडे असं देखील दिसून येत की आजही स्त्रीला स्वतःला अनेक पातळ्यांवर सिद्ध करावे लागते. त्याकरता तिला येईल त्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. सहजासहजी तिच्या पदरात काही पडत नाही. तिला आपला हक्क मिळवण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो. हे कटू असले तरीही वास्तव आहे.
 
गेली हजार वर्षे विधर्मी सत्तेच्या जाचात भरडली गेलेली आपली संस्कृती, तिच्या केंद्रस्थानी असलेली स्त्री आणि तिची सुरक्षितता ह्या गोष्टी लक्षात घेता तिला जे चार भिंतीमध्ये दडवून ठेवण्यात आले ती परिस्थिती बदलायला अनेक शतकं जावी लागली. त्यामुळे तिच्या शिक्षणात आणि एकूणच तिच्या सर्वांगीण विकासात अडथळे उत्पन्न झाले. त्यानंतर पाश्चात्य वातावरणाचा प्रभाव, तेथील स्त्रीचे समाजातील स्थान ह्या गोष्टीदेखील तिच्या व्यक्तिमत्त्वाला प्रभावित करू लागल्या.
 
 
आमच्या येथील न्यायव्यवस्था जरी स्त्री पुरुषांना समसमान दर्जा आणि वागणूक देत असली तरीही आजदेखील स्त्रीला आपल्या कार्यस्थळावर, बाहेरच्या जगात अनेकदा दुय्यमच वागणूक दिली जाते. अनेक ठिकाणी तिला कौटुंबिक समस्या येतील अशी काल्पनिक भीती ठेवून तिला कामावरून कमी करण्यात येते. किंवा तिला मूल झाल्यावर आवश्यक ती रजा दिली जात नाही. ह्या सर्व प्रकारच्या अडचणींना सामोरे जाऊन देखील ती आज ताठ मानेने उभी ठाकली आहे ते तिच्या अंगभूत गुणांमुळेच.
 
सर्व क्षेत्रांत स्त्रीने आज आपल्या कर्तृत्वाचा खोल ठसा उमटवला आहे. कुठलेही क्षेत्र तिला वर्ज्य होऊच शकत नाही, तिच्या पंखात इतकी शक्ती आहे की ती विस्तीर्ण आभाळात उंच झेप घ्यायला सिद्ध झाली आहे.
 
 
ह्या संमेलनाच्या माध्यमातून असे विचार व्यक्त करणार्‍या अनेक विद्वान, कर्तव्यदक्ष स्त्रिया उपस्थित होत्या. त्यात प्रामुख्याने खडठज च्या वैज्ञानिक डॉक्टर रितू करिधा उपस्थित होत्या. ज्यांनी मंगळयान कार्यक्रमात रात्रीचा दिवस केला, पूर्व राजदूत लक्ष्मी पुरी उपस्थित होत्या. पंजाब केसरीच्या मालकीण चोप्रा अशा मातब्बर स्त्रियांनी व्यासपीठावर हजेरी लावली होती.
 
 
अनेक विषय येथे हाताळले गेले, विस्तृत चर्चा झाल्यात, संत समागम झाला, आणि मुलींना आणि स्त्रियांना स्वसंरक्षणाची दीक्षा देणारे कलरीपट्टू मास्टर डॉ. गुरुक्कल महेश यांचीदेखील विशेष उपस्थिती लाभली.
 
 
ह्या भव्यदिव्य आयोजनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता, साध्वी ऋतंभरा, सुश्री सीतादेवी, शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान, महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णादेवी, महिला आयोगच्या अध्यक्षा विजया राहटकर, पूर्व खासदार राकेश सिन्हा, सर्वोच्च न्यायालयाच्या सुप्रसिद्ध वकील मोनिका अरोरा, माधुरी सहस्त्रबुद्धे, डॉ. मनीषा कोटेकर, मृदुला प्रधान, तेजस्विनी अनंत कुमार ह्या सरस्वतीच्या कन्यांनी आपली प्रभावी उपस्थिती जाणवून दिली. सामपन सोहळ्यात राष्ट्रीय सेविका समितीच्या प्रमुख माननीय सुश्री शांता कुमारी (शांताक्का) नी व्यासपीठावरून आपले मार्गदर्शनपर वक्तव्य सादर केले.
 
 
विभिन्न क्षेत्रांतील मान्यवर स्त्रियांनी ह्या विद्वत सभेत भाग घेऊन आपले विचार ह्या व्यासपीठावरुन मांडले. ज्ञान भारतीच्या माध्यमातून आयोजित ह्या भव्य सोहळ्यात वीसपेक्षा अधिक राज्यांनी आपला सक्रिय सहभाग नोंदवत आपापल्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व केले.
 
 
भारतीच्या ह्या भव्य कार्यक्रमात नारी तू नारायणी ह्या संकल्पनेतून देशांतील सर्व स्त्रियांना नवीन ऊर्जा आणि बळ मिळणार आहे हे नक्की. आज या विचारांच्या गोड फळांनी बहरलेला वृक्ष ही एक नवीन सुरुवात आहे असे म्हणायला हरकत नाही.
 
ह्या संमेलनात वेगवेगळ्या विषयांवर आधारित दहा सत्रांच्या माध्यमातून प्रकृती, पर्यावरण, स्त्री शिक्षा, संस्कृती, परंपरा, धर्म, वैज्ञानिक दृष्टीकोन ह्या सर्व वैचारिक मंंथनातून निघालेले नवनीत पुढील काळात नीती आणि योजनेच्या निर्माणाला सहाय्यक सिद्ध होईल आणि अशी संमेलनं भारतात आणि भारताबाहेर देखील जागोजागी भरवली जातील असा विश्वास वाटतो.