अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना इराण जबरदस्त प्रत्युत्तर देईल हे अपेक्षित होतेच, पण एकाच वेळी अनेक देशांवर हल्ले करून महायुद्धाला तोंड फोडेल याची कल्पना केलेली नव्हती. युद्ध सुरू झाले त्याच वेळी सहा आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी ठाण्यांवर हल्ले करून इराणने सर्व जगाला महायुद्धात ढकलले. एका वेळी किती लष्करी आघाड्यांवर लढता येईल, याचा सारासार विचार न करता युद्धाला सुरवात केली. यात मुत्सद्देगिरीचा पूर्णपणे अभाव दिसला. इराणने जणू अरब देशांवर ठरवून हल्ले केले. इतर वेळी त्याच्या बाजूने उभ्या राहणार्या कतार, ओमान यांनाही सोडले नाही. पण दोन बलाढ्य शत्रूंच्या सैनिकी शक्तीपुढे इराण कितपत आणि किती दिवस तग धरतो हे पाहावे लागेल.
28 फेब्रुवारी 2026 रोजी अमेरिका आणि इस्रायल यांनी इराणवर हवाई हल्ले चढवून युद्धाला सुरवात केली. त्या युद्धाची नांदी मागच्या वर्षी जूनमध्येच झाली. त्यावेळीही दोन्ही देशांनी संगनमत करून इराणवर हल्ले केले. त्यांचे लक्ष्य इराणच्या अण्वस्त्रनिर्मितीची उत्पादन केंद्रे उद्धवस्त करुन युरेनियम साठा नष्ट करण्याचे होते. नेहमीप्रमाणे बोलभांड ट्रम्पने ती केंद्रे नष्ट करण्याचा डांगोराही पिटला होता. अमेरिकेची क्षेपणास्त्रे कशी अचूक मारा करतात त्याची ग्वाही दिली होती. थोडे दिवस जाताच पितळ उघडे पडले. थोडीफार क्षती पोहचून ते उत्पादन सुरूच राहिले. ते उघड झाल्यावर पुन्हा युद्धाला तोंड फुटणार हे ठरलेच होते.
यावेळी ट्रम्प महाशयांनी जय्यत तयारी करून प्रथम शक्तीप्रदर्शन केले. इराणवर दबाव आणून आपल्याला सोईस्कर अटी लादणे आणि अण्वस्त्रनिर्मिती थांबवण्याची सक्ती करण्याचे धोरण अवलंबले. त्यासाठी इराणला वाटाघाटी करण्यास भाग पाडले. शक्तीप्रदर्शनाचा एक महत्त्वाचा भाग इराणला सर्व बाजूंनी घेरण्याचा होता. अमेरिकेने इराणच्या दक्षिणेला अरबी समुद्रात, होरमुझच्या खाडीच्या आसपास फार मोठ्या प्रमाणावर नौदलाची जमवाजमव केली. ट्रम्प यांनी दावा केला की, आजवर कधीही एवढी नौदले याप्रमाणात एकत्र आलेली नव्हती. इराणला सर्व बाजूंनी घेरण्यासाठी आखाती देशांत ज्या ठिकाणी अमेरिकेचे सैन्यतळ होते तेथे अधिक सेनादले आणि शस्त्रसाठा करून उघडपणे इराणला धमक्या देण्यास आणि जे 60 टक्के युरेनियम तयार केले होते ते अमेरिकेच्या आणि नाही तर रशियाच्या हवाली करण्याचा पर्याय ठेवला. या अटींबरोबरच इराणने 300 कि.मी.पेक्षा मोठा पल्ला असलेली क्षेपणास्त्रे तयार करू नये ही कोणालाच न पटू शकणारी अट इस्रायलने घातली.
वाटाघाटींचे गुर्हाळ तारीख पे तारीख पडत असतानाच इराणवर हल्ला करून युद्धाला तोंड फोडले. त्याला त्वरेने प्रतिकार करत इराणने खाडी देशांतील अमेरिकी सैनिकी ठिकाणांवर हल्ले केले. दुसर्या दिवशी उघड झाल्याप्रमाणे पहिल्या काही तासांतच आयातोल्ला अली खामेनीच्या प्रचंड बंदोबस्त आणि पक्के सुरक्षा कवच असलेल्या निवासस्थानावर उच्च अधिकार्यांची बैठक सुरू असताना जबरदस्त मोठा आणि अत्यंत सुनियोजित हल्ला केला. त्या हल्ल्यात खामेनी, नंतर त्या पदावर येऊ शकेल असा मोठा मुलगा, कुटुंबातील इतर सदस्य यांच्याबरोबरच अनेक बिनीचे पदाधिकारी ठार झाले. शीर्षस्थ पदाधिकारी एका झटक्यात निपटल्याने इराण लगेच शरण येईल, असा चुकीचा होरा त्या दोघांनी बांधलेला असावा. इराण काय चीज आहे त्याची समज कमी पडली.
इराणी मानसिकता
मागच्या शतकात अमेरिकेने इराणमधे रितसर निवडून आलेले सरकार पाडून शहा पहलवी घराण्याची राजवट आणली होती. ती अर्थातच अमेरिकाधार्जिणी होती. त्या राजवटी दरम्यान मुल्लाशाहीला झुगारून आधुनिक समाजरचना आणण्याचा प्रयत्न रझा पहलवी यांनी केला. त्यावेळच्या नव्या पिढीला तो बदल हवासा वाटला तरी जुनी पिढी आणि समाजमानसावर धार्मिक पकड असलेल्या मुल्लाशाहीला ते अजिबात स्वीकारार्ह नव्हते. शहांच्या सावाक गुप्तहेरखात्याच्या दमनकारी दहशतीमुळे लगेच उठाव झाला नाही. दमन करणार्यांना कुठे थांबायचे ते नेहमीच कळत नसते. इराणमध्येही तेच घडले. 1979 साली इराणमधे शहा विरोधात क्रांती होऊन आयातोल्ला खामेनींच्या धार्मिक नेतृत्त्वाखाली नवी राजवट प्रस्थापित झाली. ती धर्मसत्ता होती. राज्यशासन, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर व्यवस्था आयातोल्लांच्या मर्जीनुसार चालू लागली. या धर्मसत्तेने जनतेवर जुलूम करून धार्मिक कायदे आणि मध्ययुगीन आचारविचार लादायला सुरवात केली. इस्लामच्या सर्वच पंथोपपंथात महिलांवर अनेक प्रकारची बंधने असतात. इराणमध्ये तेच घडले. समाजात वावरताना थोडा जरी बुरखा ढळला तरी आसपास असलेले नैतिक सैनिक (मॉरल पोलीस) सटासट छड्या मारत असत. हे नियम पुरुषधार्जिणे असल्याने त्याला पुरुषांची संमती असे.
इराणी सैन्य तर होतेच पण आयातोल्लांच्या संपूर्णपणे अधिकाराखाली असलेल्या क्रांतिकारी रक्षक दलाची निर्मिती हे दमनकारी शासनाचे पुढचे पाऊल ठरले. या सैन्याची सर्वप्रकारे सैनिकी तर्हेने बांधणी करण्यात आली मात्र त्याची प्रथम निष्ठा आयातेल्लांशी होती. ते कडवे धार्मिक असावेत हे बंधन होते. एक प्रकारे केवळ धार्मिक सत्तेसाठी अंतर्गत शत्रू आणि सैन्याच्या समांतर लढणारे हे सैन्यदल आहे. त्याच्या एकछत्री अधिकाराविरोधात विशेषतः इराणी महिला वर्गाने बंड पुकारले. ते नृशंसपणे मोडून काढल्याच्या घटना ताज्या आहेत. पुरुषप्रधान समाजाला त्याचे वावडे नाही.
त्याच वेळी दुसरेही स्थित्यंतर नव्या पिढीत घडून येते आहे. ती आधुनिकतेपासून दूर राहू शकत नाही. धर्मसत्तेविरोधात वेळोवेळी ती रस्त्यांवर उतरली. तेही बंड नृशंसपणे मोडून काढण्यात क्रांतिकारी रक्षक दलाचा पुढाकार होता. अगदी महिनाभरापूर्वी इराणच्या अनेक शहरांमधून लाखोंच्या संख्येने तरुणवर्ग रस्त्यांवर उतरला. त्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी हजारो लोकांना गोळ्या घालण्यात आल्या. त्या दरम्यान सुमारे 25-30 हजारांचे बळी गेले. पाश्चात्य वृत्तवाहिन्यांनी दिलेला हा आकडा जरी अवास्तव मोठा असला तरी जनमानसावर दहशत बसविण्याइतपत मोठ्या संख्येत नक्कीच होता. ट्रम्पने इराणी जनतेला रस्त्यावर उतरण्याचे आवाहन केले. आता इराणमधे सत्तापालट होण्यात मोठा अडसर या क्रांतिकारी रक्षक दलाचा असेल. ते जोवर कमजोर होत नाहीत तोवर इराणी जनता ट्रम्पच्या आवाहनाला प्रतिसाद देत रस्त्यांवर उतरण्याची शक्यता कमी आहे. आता तर क्रांतिकारी रक्षक दलाला पूर्ण स्वायत्तता दिली आहे.
इराणचे आत्मघातकी पाऊल
अमेरिका-इस्रायलच्या हल्ल्यांना इराण जबरदस्त प्रत्युत्तर देईल हे अपेक्षित होतेच, पण एकाच वेळी अनेक देशांवर हल्ले करून महायुद्धाला तोंड फोडेल याची कल्पना केलेली नव्हती. युद्ध सुरू झाले त्याच वेळी सहा आखाती देशांतील अमेरिकेच्या लष्करी ठाण्यांवर हल्ले करून इराणने सर्व जगाला महायुद्धात ढकलले. एका वेळी किती लष्करी आघाड्यांवर लढता येईल, याचा सारासार विचार न करता युद्धाला सुरवात केली. यात मुत्सद्देगिरीचा पूर्णपणे अभाव दिसला. इराणने जणू अरब देशांवर ठरवून हल्ले केले. इतर वेळी त्याच्या बाजूने उभ्या राहणार्या कतार, ओमान यांनाही सोडले नाही. हे करताना एक प्रकारे पांथिक आणि वांशिक बदला घेण्याची संधी घेतली.
इराण गैरअरब कट्टर शिया आणि अरब देश एकजात सुन्नी हे लक्षात घेतले पाहिजे. या अरब देशांत अमेरिकेचे तळ आहेत. त्याच वेळी खनिज तेल उत्पादनाला खीळ घालून जगाला सहजपणे वेठीस धरता येईल हा इराणचा उद्देश होता. आपल्याच पायावर धोंडा मारून घेण्याची दुर्बुद्धी झाली की सारासार विवेक सुटतो. दोन दिवसांच्या अवधीत इराणने सायप्रस सारख्या नाटो संघटना सदस्य देशावर, ब्रिटिश आणि फ्रेंच लष्करी तळांवर हल्ला करून संपूर्ण युरोपला आपल्या विरोधात उभे केले. इराणने चार दिवसांत पंधरा देशांविरोधात आघाडी उघडली. आजच्या घटकेला जगातील 50 पेक्षा जास्त मुस्लीम देशांपैकी एकही देश इराणच्या बाजूने उभा नाही. युरोपही दूर गेला आहे. रशियाने इराणच्या तोंडाला पाने पुसली. चीन इराणपेक्षा अमेरिकेच्या विरोधात इराणच्या बाजूने उभा आहे.
आखाती देशांवर वारंवार हल्ले करताना केवळ लष्करी ठिकाणांपुरते ते मर्यादित न ठेवता विशेष करून खनिज तेल उत्पादनांच्या ठिकाणी करण्यामागे एक तर ते बंद पाडणे आणि त्या देशांमधून झालेल्या प्रगतीला असूयेपोटी खीळ घालणे हा उद्देश आहे. युद्धाच्या चार दिवसांत सौदी अरेबियातील दोन मोठ्या रिफायनरींवर आणि इतरही देशांच्या रिफायनरींवर इराणने थेट हल्ले करून त्या बंद पाडण्याचे उद्दिष्ट पूर्ण केले. आता जगापुढे ऊर्जा संकट काही दिवसात आ वासून उभे राहील. माझे भले तर मी करणार नाही पण तू कसा खोलात जाशील ते पाहतो, ही इराणची मानसिकता या हल्ल्यांत दिसते.
इराणची राखरांगोळी
या युद्धात प्रमुख सहभाग अर्थातच अमेरिका आणि इस्रायलचा आहे. अनेक अरब देश हल्ल्यांमुळे दुखावले जाऊन तेही युद्ध आघाड्या उघडतील. प्रारंभी जरी इराणमधे सत्तापालट घडविण्याचा उद्देश असला तरी त्याची व्याप्ती आता सर्वंकष नाशाकडे झुकली आहे. केवळ आयातोल्ला खामेनीला ठार मारून इराण शरण आला नाही, उलट इराणने हल्ले अधिक तीव्र केले आहेत. इराण त्याच्या हाताशी असलेल्या क्षेपणास्त्रे, ड्रोन आणि मारक क्षमता वापरत तुटून पडला आहे. त्यामुळे संघर्षाची व्याप्ती वाढली आहे. इस्रायलला तेच पाहिजे होते. इराणची अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्र निर्मिती क्षमता पुरेपूर नष्ट करून इराणला पांगळे करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्याचे त्याच्या हातात अनायसे घबाड मिळावे तसे आले आहे. मागच्या जूनमधे जे काम अर्धवट राहिले होते ते आता करण्याच्या मागे इस्रायल लागला आहे.
चार दिवसांत अमेरिका आणि इस्रायलने मिळून इराणचे नौदल निकामी केल्याची वृत्ते आहेत. क्षेपणास्त्रे आणि ड्रोन सोडण्याचे तळ - लाँचपॅड हल्ले करून एकेक निकामी करण्याचे सुरू आहे. इराणने क्षेपणास्त्रे जमिनीखाली सुरक्षित ठेवली आहेत. त्या ठिकाणांवर हल्ले करून ती सरसकट निकामी झाल्याचे वृत्त हे लेखन होईपर्यंत आलेले नाही. ते झाले तर इराणची कंबरच मोडेल, अण्वस्त्र उत्पादन केंद्रांवर हल्ले होण्याचेही वृत्त आहे. त्यांना कितपत क्षती पोहोचली ते अजून स्पष्ट झालेले नाही. गाझा पट्टीत जशी राखरांगोळी इस्रायलने केली त्याच वाटेवर इराणला हे दोन देश ढकलत आहेत. युद्ध संपेपर्यंत इराणमधे अपरिमित प्राणहानी, वित्तहानी होईल. इराणही धमक्या देत खाडी देशांत तांडव करत आहे. अमेरिकेने इराणला अण्वस्त्र निर्मिती कधीही करू न देण्याचा प्रण केला आहे. तेच इस्रायलला करायचे आहे.
या संघर्षाची मोठी झळ इस्रायललाही पोहोचली आहे. त्याचे लोखंडी सुरक्षाकवच ठिकठिकाणी गळताना दिसते. तेल अवीव, येरूशलेमचा ज्यूंनी व्यापलेला भाग, हैफा बंदर आणि अनेक नागरी वस्त्यांवर इराणी क्षेपणास्त्रांचे हल्ले झाले असून जन-धन हानीची वृत्ते येत आहेत. अमेरिकेचे काही सैनिक ठार झाले आणि विमाने पडली आहेत. हानी कमीजास्त प्रमाणात दोन्हीकडे होणारच. दोन बलाढ्य शत्रूंच्या सैनिकी शक्तीपुढे इराण कितपत आणि किती दिवस तग धरतो हे पाहावे लागेल.