वानप्रस्थाश्रम हा गृहापासून विरक्तीचा आणि वाढत्या एकांताचा काळ मनाला गेला. वानप्रस्थाश्रम म्हणजे एका कुटुंबकेंद्री व्यक्तीचा हळूहळू समाजकेंद्री व्यक्तीमध्ये विकास होणे. या संस्काराने स्वार्थसाधना करणारा मनुष्य आता समाजकल्याण करण्याकडे वळतो. समजाच्या हितासाठी निःस्वार्थ परोपकारी भावनेने जगण्याकडे झालेली ही उत्क्रांती आहे.
लाखात एखादाच मनुष्य स्वामी विवेकानंदांसारखा असतो, ज्याला जीवनाचे ध्येय सापडते. असे लोक ध्येय मिळेपर्यंत तळमळत असतात आणि ते शोधण्यासाठी साधना करतात. आपल्यासारख्या सामान्य लोकांना, ज्यांना हे जमणार नाही, त्यांची सोय धर्माने करून ठेवली आहे. आपल्यासाठी स्मृतींनी जीवनाचे ध्येय लिहून ठेवले आहे. ती ध्येय आहेत चार पुरुषार्थ - धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्माच्या चौकटीत राहून अर्थार्जन आणि कामानांची तृप्ती. आणि शेवटी मोक्ष.
मोक्ष हे जीवनयात्रेचे गंतव्य स्थान म्हणू शकतो. या जीवनयात्रेत काही स्टेशन लागतात - ब्रह्मचर्य, गृहस्थ आणि वानप्रस्थ. यांना आश्रम म्हटले आहे. आश्रम या शब्दाला अनेक अर्थ आहेत. एक आहे - जिथे श्रम करावे लागतात ते ठिकाण. किंवा जिथे काही काळासाठी ( temporary) आश्रय घेतला जातो ते ठिकाण.
म्हणजे एखाद्याने अगदी ठरवले तरी त्याला जन्मभर बालक राहता येत नाही. मोठे व्हावंच लागते, गृहस्थाची जबाबदारी घ्यावीच लागते. किंवा एखादा गृहस्थ असे म्हणू शकत नाही, की मी आता मरेपर्यंत गृहस्थच राहणार. नाही! त्याला रिटायर व्हावचं लागते. वानप्रस्थ आश्रम स्वीकारून त्याने आणखी मोठे होणे अपेक्षित असते.
एका आश्रमातून पुढच्या आश्रमात, बोटाला धरून घेऊन जाणारी संस्था म्हणजे संस्कार. हे संस्कार ब्रह्मचार्याला शिकवतात -आता आई तुला भरवणार नाही. स्वत:चे स्वत: खायचे. स्वत:चे कपडे स्वत: धुवायचे. शाळेत जायचे. अभ्यास करायचा. गुरुजींनी सांगितलेले ऐकायचे. हेच संस्कार गृहस्थाला शिकवतात - आता तुला पत्नीसह अर्थार्जन करायचे आहे. घर बांधायचे आहे. मुलांना मोठे करायचे आहे. पंचमहायज्ञ करायची आहेत.
हे चार आश्रम आहेत -
ब्रह्मचर्य आश्रम - उपनयन संस्काराने ह्या आश्रमाची सुरुवात होते. गुरूगृही वास करून शिक्षण घेण्याचा काळ म्हणजे ब्रह्मचर्य आश्रम.
गृहस्थाश्रम- विवाह संस्काराने पती आणि पत्नी दोघे मिळून गृहस्थाश्रमात प्रवेश करतात. यज्ञ, अर्थार्जन, प्रजनन आणि दान हे गृहस्थाश्रमात करावयाची कर्तव्ये.
वानप्रस्थाश्रम- गृहस्थाने आपल्या संततीची जबाबदारी पार पाडल्यानंतर, माता-पित्यांची सेवा केल्यानंतर, वानप्रस्थाश्रमात - प्रवेश करण्यास सिद्ध होतो. वृद्धापकाळी वनात जाऊन चिंतन करत साधे जीवन जगणे हा वानप्रस्थाश्रम. पतीने वानप्रस्थाश्रम स्वीकारला तरी पत्नीला घरात सुना-मुलांसोबत राहणे अथवा पतीबरोबर वनात जाणे हे दोन्ही पर्याय उपलब्ध असत.
संन्यासाश्रम- ह्या तीन आश्रमांच्या शिवाय सर्वसंगपरित्याग करणारा संन्यासाश्रम सांगितला आहे. सर्व आश्रम जीवनात एका मागोमाग एक येतात. संन्यासाश्रम मात्र कधीही सुरु करता येतो. मात्र ब्राह्मचार्याला संन्यास स्वीकारण्यासाठी माता-पित्याची आणि गृहस्थाला पत्नीची अनुमती आवश्यक असे.
स्मृती सांगतात की, गृहस्थाश्रम हा इतर तीन आश्रमांना उपकारक आहे. त्यामुळे गृहस्थाश्रमाचे मोठे महत्त्व आहे; त्याला तिन्ही आश्रमांचे मूळ म्हटले आहे. जसे सर्व प्राणी आपल्या मातेच्या आश्रयाने जगतात, तसेच सर्व आश्रम गृहस्थाश्रमाच्या आश्रयानेच टिकून राहतात. आणि गृहस्थाश्रम पत्नीच्या आधाराने टिकतो. गृहिणीमुळेच घराला ‘गृह’ ही संज्ञा प्राप्त होते. तसेच ज्या घरात पतिव्रता स्त्री आहे, तोच गृहस्थ होय.
गृहस्थ आश्रमचा महिमा असा गायला गेला आहे. या नंतर येणारा आश्रम म्हणजे वानप्रस्थ किंवा रिटायर्ड लाईफ. आजकाल कुणालाही रिटायर व्हायचे नसते. सध्या पाहिले तर दोनच आश्रम आहेत - ब्रह्मचर्य आणि गृहस्थ. गृहस्थाचे अर्थार्जन संपत नाही. वस्तू जमावण्याचा सोस संपत नाही. अधिकार चालवणे संपत नाही. आजीला नातसून आली तरी तिचा स्वयंपाकघरावरील ताबा सुटत नाही. मुलगा साठीला आला तरी वडील त्याच्याकडे व्यवसाय सोपवत नाहीत. कुणी आपली कंपनी तशीच जुन्या पद्धतीने चालवत राहील पण पुढच्या पिढीच्या हातात देणार नाही. नोकरीमध्ये ठराविक वयाला रिटायरमेंट असली, तरी मनुष्य घरातून, मुलांच्या आयुष्यातून रिटायर होईलच असे नाही.
मग हे कुणीतरी शिकवावे लागते. हाताला धरून सांगावे लागते - आता चेहर्यावर सुरकुत्या पडल्या आहेत. केस पांढरे झाले आहेत. नातवंड झाली आहेत .. आता वानप्रस्थाला लागले पाहिजे. हे काम कोण करते? तर ‘संस्कार’ करतात.
वानप्रस्थ म्हणजे वनाकडे प्रस्थान करणे. घरापासून दूर जाणे. आता पुन्हा घरी जाणे नाही. घराची लोक येऊन भेटून जाऊ शकतात. पण ज्यांनी वानप्रस्थ आश्रम स्वीकारला त्यांना पुन्हा परत जाणे नाही.
महाभारतात धृतराष्ट्राने वानप्रस्थ स्वीकारला तेव्हा त्याने दानयज्ञ केला. त्याच्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू त्याने देऊन टाकल्या. आपल्या सगळ्या सेवकांना काही ना काहीतरी देऊन तृप्त केले. घराला नमस्कार केला. आतापर्यंत या वास्तूने मला छत्र पुरवले, ऊन पावसापासून वाचवले; सावली दिली त्याचे कृतज्ञतेने स्मरण करून घराचा निरोप घेतला. आणि अगदी गरजेच्या वस्तू सोबत घेऊन धृतराष्ट्र आणि गांधारी वनाकडे निघाले. त्यावर कुंती, विदुर आणि संजय देखील त्यांच्या सोबत गेले.
हस्तिनापूर सोडल्यावर त्यांनी फार दूरवर यात्रा करून संध्याकाळी गंगेच्या तटावर वास्तव्य केले. त्या रात्री पासून ते सगळे दर्भशय्येवर झोपू लागले. काही दिवसांनी त्यांना शतयूप नावाचा केकयचा राजा भेटला. शतयूपने आपल्या मुलाला सिंहासनावर बसवून वानप्रस्थ आश्रम स्वीकारला होता. त्याने धृतराष्ट्राला वनात रहाण्याचा संपूर्ण विधी सांगितला. धृतराष्ट्र, गांधारी, कुंती, विदुर आणि संजय त्या व्रताचे पालन करत तपश्चर्येत रमू लागले.
पूर्वी वनातील अशा ठिकाणी अनेक वृद्ध एकत्र राहत असत. एकमेकांना सोबत करत, काळजी पण घेत असत. अशा अनेक स्थानांचे आता तीर्थक्षेत्रात रूपांतर झाले आहे.
काही लोक आपली सगळी संपत्ती दान देऊन अशा दूरच्या ठिकाणी जाऊन वास्तव्य करत. पण पूर्वी सुद्धा सगळ्यांनाच असे करणे शक्य नव्हते. बहुतेक लोक आपल्या कुटुंबाच्या जवळपास राहत असत. अर्थात, असे असले तरी त्यांनी आपल्या भूमिकेत निश्चित बदल करणे आवश्यक होते. वाढत्या वयानुसार नवी भूमिका स्वीकारत. वानप्रस्थाश्रम हा गृहापासून विरक्तीचा आणि वाढत्या एकांताचा काळ मनाला गेला. या काळात काय करावे? तर त्याने (किंवा तिने), कुणी विचारले किंवा मागितले तरच -
* सल्ला द्यावा.
* उपदेश द्यावा
* Counselling करावे
* लहान मुलांना, तरुणांना शिकवावे
* आणि मध्यमवयातील लोकांचा मार्गदर्शक व्हावे.
तसेच धनसंचय करू नये. कुठलाच संचय करू नये. कमी बोलावे. भांडू नये. वाद घालू नये. भूमीवर निजावे. कंदमुळे आणि फळे खावीत. ब्रह्म मुहूर्तावर उठावे. धार्मिक ग्रंथ वाचावेत. उपासना करावी. उपवास करावेत. मानद (Honorary) पद स्वीकारून काम करावे. आपल्या अनुभवाचा फायदा समाजाला करून द्यावा.
वानप्रस्थाश्रम म्हणजे एका कुटुंबकेंद्री व्यक्तीचा हळूहळू समाजकेंद्री व्यक्तीमध्ये विकास होणे. या संस्काराने स्वार्थसाधना करणारा मनुष्य आता समाजकल्याण करण्याकडे वळतो. समजाच्या हितासाठी निःस्वार्थ परोपकारी भावनेने जगण्याकडे झालेली ही उत्क्रांती आहे.