@उत्तरा मोने
आपल्या मनात अशा खूप गोष्टी असतात पण त्या पूर्णत्वाला येण्यासाठी विचारांची बैठक पक्की असावी लागते, आत्मविश्वास असावा लागतो आणि ठरवलेल्या गोष्टी नेटाने पूर्ण करण्याची जिद्द असावी लागते. अशीच जिद्द उराशी घेऊन मुंबईत सुस्थितीत असलेल्या प्रज्ञा आणि मिलिंद जोगळेकर यांनी रत्नागिरीतील एका छोट्याशा गावाची निवड करून आपल्या स्वप्नाला मूर्तरुप दिले. आज त्यांनी स्वतःच्या कामातून स्वतःची एक छान ओळख निर्माण केली आणि आज त्या परिसरात एक पॉवर कपल म्हणून या दोघांना ओळखलं जातंय...
प्रत्येकाने आपापल्या दृष्टीने आपल्या आयुष्याची आखणी केलेली असते. बहुतांश लोकांच्या आयुष्यात बालपण, शिक्षण, नोकरी, लग्न, संसार, मुलं, नातवंडं असा क्रम असतो. पण काहींच्या बाबतीत मात्र हा आलेख थोडा वेगळा मांडला जातो.
आमच्या सोमय्या कॉलेजमधली माझी एक मैत्रीण प्रज्ञा तांबे. लेखनात, कविता करण्यात हुशार. शिक्षणानंतर नोकरी-लग्न, मुलं या पायर्या तिच्याही बाबतीत योग्य वेळी पार पडल्या. पण जेव्हा 1993 साली प्रज्ञा आणि मिलिंद जोगळेकर यांनी लग्न करायचं ठरवलं तेव्हाच आपलं भावी आयुष्य कसं असेल, याचा आराखडा त्यांनी ठरवला होता. वयाच्या पन्नाशीपर्यंत नोकरी करायची आणि त्यानंतर समाजोपयोगी वेगळं काम करायचं, हे त्या दोघांनी तेव्हाच ठरवलं होतं. अर्थात त्याप्रमाणे वयाच्या त्या टप्यावर खरंच दोघांनी नोकर्या सोडून सुखासीन आयुष्य बाजूला सारून ग्रामीण भागात जाऊन समाजासाठी आपल्या अनुभवाचा, कौशल्याचा वापर करायचा हे ठरवलं.
मिलिंदने एनवायके लॉजिस्टिक्स, डीएचएल, एक्सेल इंडिया अशा मोठ्या कॉर्पोरेट कंपनीमधून फायनान्स डिपार्टमेंटचे सर्व प्रकारचे पोर्टफोलिओ हँडल केले होते. त्यामुळे बजेट, अकाउंट्स, रिकवरी अशा सगळ्या कामांचा 28 वर्षांचा मोठा अनुभव त्याच्या गाठीशी होता. प्रज्ञा खादी आणि ग्रामोद्योग आयोगातून संचालक म्हणून सेवानिवृत्त झाली होती. एकूण 32 वर्षांचा सरकारी प्रशासनाचा अनुभव तिच्या गाठीशी होता. त्यापैकी खादी आणि ग्रामोद्योग आयोगात काम करण्याचा 26 वर्षांचा अनुभव. प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम ही योजना ऑनलाईन झाली त्यावेळी तिला संचालक म्हणून काम करायची संधी मिळाली. तीन वर्षे राष्ट्रीय स्तरावर प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम प्रमुख म्हणून तिला काम करता आलं. या अनुभवामुळे गरजू बेरोजगार युवक आणि बचत गटांपर्यंत विविध शासकीय योजना कशा पोहोचवता येतील? याचा अंदाज आला.
या सगळ्या कामाविषयी बोलताना मिलिंद आणि प्रज्ञा म्हणाले, पर्यावरण संवर्धन करण्यासाठी आमच्याकडे कापडी पिशवी प्रकल्प आहे. चिपळूणच्या आसपासच्या स्थानिक बाजारपेठेत आम्ही 5.50 लाखांहून अधिक कापडी पिशव्यांचा पुरवठा केला आहे. कस्टमाईज्ड कापडी पिशव्या हा आमचा यूएसपी आहे आणि आमचे ग्राहक मुंबई, पुणे, चिपळूण, नागपूर येथे आहेत. आम्ही पिशव्यांवर स्क्रीन प्रिंटींग करून देतो, जेणेकरून तिथे स्वतःच्या ब्रँडची जाहिरात करता येईल. आम्ही महामारीच्या काळात कापडाचं पीपीई किट बनवत होतो आणि डॉक्टरांना देत होतो, शिवाय आम्ही वेगवेगळ्या प्रशिक्षणांची व्यवस्था करतो जसं की मेणबत्ती बनवणे, अगरबत्ती बनवणे, केक बनवणे. आम्ही मधमाशापालन प्रशिक्षणाचीही व्यवस्था करतो. नजीकच्या भविष्यात महिलांना सक्षम बनवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील शंभरहून अधिक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
संपर्क : मिलिंद जोगळेकर : 7447448966
प्रज्ञा आणि मिलिंद दोघांनी या परिसरातल्या मागणीचा अंदाज घेऊन कामाला सुरुवात केली आणि आज 10 वर्षांनतर त्यांच्या कामाला निश्चितच एक गती आली आहे. मुळात प्रज्ञा-मिलिंदला स्वत:चं गाव नव्हतं. त्यामुळे गावाकडे आपलं एक घर असावं हे दोघांच्याही मनात होतं. त्याच विचारातून त्यांनी कर्जतमधे 26 गुंठे जमीन घेऊन एक फार्म हाऊसही बांधलं होतं. पण कोकणात जमीन घेऊन तिथे काही करावं याला चालना मिळाली ती 2013 साली.
प्रज्ञाची धाकटी बहीण डॉ. श्रुतिका मानसोपचारतज्ज्ञ आहे आणि तिचा पती डॉ. सुनील मधुमेहतज्ज्ञ आहे. ते दोघे इंग्लंडला राहात होते. पण आपल्या देशात येऊन काहीतरी करण्याची ओढ त्यांच्या मनात होती. 2013 साली इंग्लंड सोडून ते सहकुटुंब भारतात चिपळूणमधे येऊन स्थायिक झाले. त्यांच्या विचारांना त्यांनी मूर्तरूप दिलं आणि डॉ. श्रुतिका ही त्या भागातली पहिली महिला मानसोपचारतज्ज्ञ ठरली. आज मधुमेह आणि मानसोपचार या क्षेत्रात चिपळूणमध्येे हे जोडपं काम करतंय.
सुनील आणि श्रुतिकाच्या या निर्णयाने मिलिंद आणि प्रज्ञा यांच्या स्वेच्छानिवृत्तीनंतर काय? या विचाराला चालना मिळाली आणि आपणही चिपळूण हेच आपलं गाव ठरवावं, हे त्यांनी नक्की केलं. लग्नाच्या वेळी ठरवलेल्या विषयाला त्यांनी मूर्तरूप दिलं. मिलिंद कॉर्पोरेट सेक्टरमध्ये फायनान्स मॅनेजर पदापर्यंत काम करून पन्नाशीला 2015 साली चिपळूणमध्ये आला. 2015 ते 2018 पर्यंत चिपळूण आणि आसपासच्या भागाची ओळख करून घेऊन, तेथे गरजा काय आहेत? आणि तेथे आपल्याला काय करता येईल याचा अभ्यास त्याने केला. याच दरम्यान सुरुवात करण्यासाठी टाटा स्कायचं सर्व्हिस सेंटर त्याने चालवलं. यामुळे त्या परिसरातल्या त्याच्या ओळखी वाढल्या आणि त्याचा उपयोग पुढे काम करताना निश्चितच झाला.
चिपळूणमध्येे राहायचं आणि सावर्डा येथे शेती करायची हे ठरलं. तेथील डोंगरउतारावरची एक जागा नक्की केली. पण जेव्हा सरकारी मोजणी झाली तेव्हा मात्र तो प्लॉट पूर्ण फिरला. जागा मिळवून देणारा एजंट म्हणाला की, मी तुम्हाला दुसरी जागा देतो. पण प्रज्ञा-मिलिंदने ठरवलं की, जी जागा आपल्या वाट्याला आली तीच आपली. मग त्यांनी तीच जागा लँडस्केपिंग करून घेतली आणि पायर्या-पायर्यांच्या उताराच्या जागेवर शेतीचे प्रयोग करायला सुरुवात केली. सावर्ड्यातल्या दहिवली गावात, गावातल्या वाडीपासून जरा लांबच ती 53 गुंठे जागा होती. सुरुवातीला ती जागा तयार करताना खूप अडचणी आल्या. पण त्या अडचणींवर मात करून तिथे 900 स्क्वेअर फूटांचं घर उभं राहिलं. आजूबाजूचा परिसरही झाडाझुडपांनी, शेतीने सजला, बहरला. फळबाग, हळद, सुरण, गवती चहा, नारळ, सुपारी, आंबा, चिकू, अननस, स्टारफ्रुट याचं उत्पादन सुरू झालं. शेतीतले वेगवेगळे प्रयोगही मिलिंद करू लागला. या दोघांसारखेच 40 वर्षे मुंबईत नोकरी करून गावात राहायला आलेले आजोबा म्हणजे श्रीयुत लांबे. आजोबांचा शेजार मात्र या प्रज्ञा-मिलिंदचा चांगलाच आधार बनला. 2018साली प्रज्ञानेही स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि तीही या कामात पूर्णपणे जोडली गेली.
2018च्या ऑक्टोबर महिन्यापासून त्यांनी ग्रामकौशल्य फाऊंडेशनची सुरुवात केली. ग्रामकौशल्याने आतापर्यंत चिपळूणच्या आसपास बर्यापैकी संपर्क वाढवला. शाळा आणि कॉलेज यांमधून स्वयंरोजगार या विषयावर कार्यशाळा घेणे, विद्यार्थी आणि महिला यांच्यासाठी विविध प्रकारचं प्रशिक्षण पुरविणे, ज्यांना शासकीय योजनांची माहिती आणि मदत हवी असेल त्याला शासकीय योजनांमध्ये सामील होण्यासाठी मदत करणे, असे ग्रामकौशल्य फाऊंडेशनचे उपक्रम सुरू झाले. आतापर्यंत 40 लाख रुपयांची कर्ज प्रकरणं तयार करून लोकांना कर्ज मिळवून देण्यासाठी प्रज्ञाने मदत केली आहे. तसंच आतापर्यंत 400 ते 500 महिलांनी देखील अशा अनेक योजनांचा लाभ घेतला आहे.
पर्यावरण पूरक अशा कस्टमाईज्ड कापडी पिशव्यांची निर्मिती आणि विक्री करणे, खादी ग्रामोद्योग आयोगाच्या अंतर्गत येणार्या मध आणि मधुमक्षिकापालन याच्याबद्दल जनजागृती करून लोकांना ऑरगॅनिक मध पुरवणे. हे सगळं करताना प्रज्ञा-मिलिंद यांनी 2022 मध्ये चिपळूणजवळील पिंपळी या गावात खादी ग्रामोद्योग आयोगातर्फे 15 महिलांना अगरबत्ती बनवण्याचे पेडल मशीन पुरवून स्वयंरोजगारासाठी प्रवृत्त केलं. सजग क्लिनिकच्या डॉ श्रुतिका कोतकुंडे आणि ग्राम कौशल्यच्या प्रज्ञा जोगळेकर दोघींनी मिळून ग्रामवर्धिनी या बचत गटाची सुरुवात केली ज्यात मिलेट्स चे बनवलेले प्रिमिक्स जातात, यातील प्रिमिक्स उदा. थालीपीठ प्रिमिक्स, इडली प्रिमिक्स, आंबोळी प्रिमिक्स, तेलबियांच्या चटण्या, तेलबियांचे मुखवास इत्यादी उत्पादनांना सुरुवात केली. या उत्पादनांमध्ये आरोग्यदृष्ट्या कोणते घटक असले पाहिजेत याचं मार्गदर्शन डॉ. श्रुतिका करते आणि मार्केटिंग तसंच रोजगार याविषयीचा विचार प्रज्ञा-मिलिंद करतात. या वर्षीपासून आनंदी पालकत्व या विषयावर बालक, पालक आणि शिक्षक यांच्याबरोबर काम करायला सुरुवात केली. आनंदी पालकत्व या विषयावर जानेवारी महिन्यात एक ऑनलाईन कार्यशाळा झाली. यात पालक आणि शिक्षक यांचा समावेश होता. या उपक्रमात सहभागी पालकांची मुले घेऊन किलबिल नावाचा एक नवीन उपक्रम सुरू केला.

आज ग्रामकौशल्य फाऊंडेशन आपल्या नावाप्रमाणेच ग्रामीण कौशल्याला प्राधान्य देत आहे. ग्रामीण भागात बनणार्या विविध वस्तू मध, खादी ग्रामोद्योगची उत्पादने या सगळ्याची विक्री त्यांच्या दुकानात केली जाते. तसंच अनेक उत्पादनांचं मार्केटिंग करून अनेकांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते.
या कामातून मिळणार्या समाधानाविषयी बोलताना प्रज्ञा म्हणते की, ग्रामकौशल्याच्या कापडी पिशव्यांच्या पहिल्या प्रोजेक्टमध्ये 15 ते 20 जणी सहभागी झाल्या होत्या. ऑर्डर नियमित मिळत होती. या ग्रुपमध्ये पहिल्यांदाच घराबाहेर पडून काम करणार्या काही जणी होत्या. त्यातल्या एका सखीचा अनुभव म्हणजे घरातलं लाईट बिल आणि गॅसचे पैसे तिने पहिल्यांदा स्वतःच्या मिळकतीमधून दिल्यानंतर तिला झालेल्या आनंदाने चमकणारा तिचा चेहरा किंवा मग तिच्या दुसर्या मैत्रिणीचा अनुभव - मी मला मिळणार्या पैशातून माझ्या मुलाचा वाढदिवस साजरा केला. हे कौतुक या सख्या येऊन जेव्हा सांगतात तेव्हा त्यांना आपण करत असलेल्या कामाने कोणालातरी समाधान व आनंद मिळतो आहे, हे बघून खूप कृतज्ञ वाटतं..
आता या महिला त्यांच्या इतर मैत्रिणींसोबत मार्केटमध्ये वेगळ्या प्रकारचे काम करत आहेत. प्रज्ञा सांगते - ज्या थोड्या काही लोकांना कर्ज मिळवून द्यायला मी मदत केली. त्यामध्ये एक संयुक्ता गुजर हिने स्वतःचा नाचणीची बिस्किट बनवण्याचा उद्योग सुरू केला. हिची पुढे प्रधान सखी म्हणूनही निवड झाली. भारतातील स्वतःचा उद्योग उभा करणार्या अनेक महिलांना प्रधान सखी या योजनेअंतर्गत पंतप्रधानांशी फोनवर संवाद करायची संधी मिळते. हे क्षण त्यांच्यासाठी आनंदाचे असतात आणि आमच्यासाठी समाधानाचे..
आज मिलिंद चिपळूण बांबूसंघाच्या कामातही सक्रिय आहे. बांबूपासून तयार केलेल्या वस्तूंची विक्रीही त्यांच्या दुकानात केली जाते. सध्या कोकणात जमिनी ओस पडल्या आहेत. त्यांना बांबू लागवडीसाठी प्रोत्साहन देण्याचं काम सुवर्ण फार्मर प्रोड्युसर कंपनी तर्फे केलं जातं. तसंच कोकणातल्या शेतकर्यांना एकत्र आणून त्यांच्या मदतीसाठी अनेक उपक्रम घेतले जातात. मधमाशीपालन प्रशिक्षण, सेंद्रिय शेती, बांबू लागवड अशा शेतकर्यांना उत्पन्न वाढवण्यासाठी लागणार्या अनेक गोष्टींचं प्रशिक्षण शेतकर्यांनी मिळून स्थापन केलेल्या या कंपनीतर्फे दिलं जातं. प्रज्ञा आणि मिलिंदला ही सेकंड इनिंग सुरू करून 10 वर्षे झाली. आज दोघेही मजेत आपलं आयुष्य, स्वतःला हवं तसं जगतायंत. मुलगा प्रसाद आणि सून युगंधरा दोघंही इंजिनियर आहेत आणि अमेरिकेत ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करतायंत. मुलगी प्राची जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेत आहे.
आपण लहान असतो तेव्हा खूप गोष्टी आपल्या मनात असतात किंवा काही गोष्टींचा आपल्या मनावर प्रभाव असतो. मिलिंदच्या लहानपणी त्यांचे नातेवाईक सांगलीचे गोरे बंधू यांचं स्वतःचं दुकान होतं. लहानपणी मिलिंद दिवाळीच्या सुट्टीत त्यांच्या दुकानात बसायचा. तेव्हापासून त्याच्या मनात होतं की, आपलं स्वतःचं दुकान असावं. आज स्वतः उभं केलेलं स्वतःचं दुकान मिलिंदकडे आहे. तसेच प्रज्ञाच्या वडिलांचं समाजोपयोगी काम प्रज्ञाच्या बालमनावर संस्कार करून गेलं आणि आपला हातून असंच काही चांगलं काम घडावं, ही प्रज्ञाची इच्छाही आज पूर्ण झाली.
अर्थात आपल्या मनात अशा खूप गोष्टी असतात पण त्या पूर्णत्वाला येण्यासाठी विचारांची बैठक पक्की असावी लागते, एक आत्मविश्वास असावा लागतो आणि ठरवलेल्या गोष्टी नेटाने पूर्ण करण्याची जिद्द असावी लागते. प्रज्ञा आणि मिलिंद दोघांनी स्वतःच्या कामातून स्वत:ची एक छान ओळख निर्माण केली आणि आज त्या परिसरात एक पॉवर कपल म्हणून या दोघांना ओळखलं जातंय...