गोआधारित वैदिक शेतीचे यशस्वी मॉडेल

विवेक मराठी    20-Apr-2026   
Total Views |
Vedic agriculture
भारतासारख्या विशाल देशात गोआधारित वैदिक शेती शाश्वत पर्याय म्हणून उदयास येत असताना, सातार्‍यातील युवा शेतकरी सचिन ताम्हाणे यांनी या संकल्पनेला वास्तवात उतरवले आहे. गोपालन, मूल्यवर्धित उत्पादने, नैसर्गिक शेती आणि पारंपरिक उद्योग यांचा संगम साधत त्यांनी समृद्धीचे प्रभावी मॉडेल उभे केले आहे. निसर्ग, शुद्धता आणि आत्मविश्वासाच्या जोरावर घडलेली ही प्रेरणादायी यशोगाथा अनेकांसाठी दिशादर्शक ठरते.
 
cow
 
 
भारतासारख्या विशाल, खंडप्राय देशात शाश्वत शेतीचा सक्षम आणि परिणामकारक पर्याय म्हणून गोआधारित वैदिक शेती आज ठामपणे उभी राहिली आहे. विविध वैज्ञानिक प्रयोगांनीही या पद्धतीची उपयुक्तता अधोरेखित केली असून, निसर्गस्नेही आणि किफायतशीर शेतीचा हा मार्ग अधिकाधिक बळकट होताना दिसतो. त्यामुळेच ‘गोमय वसते लक्ष्मी’ हा प्राचीन मंत्र आज नव्या अर्थाने पुन्हा एकदा सत्य ठरतो आहे. या विचारधारेचे प्रत्यक्ष कृतीत रूपांतर करणारे सचिन ताम्हाणे हे खर्‍या अर्थाने या परिवर्तनाच्या माळेतील एक उज्ज्वल मणी ठरतात. आजच्या बदलत्या कृषी जगतात ताम्हाणे यांच्या गोआधारित वैदिक शेतीच्या मॉडेलची जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे.
 
 
सातारा जिल्ह्यातील फलटण हा फळबागांसाठी ओळखला जाणारा समृद्ध तालुका. याच भूमीत आसू गावातील युवा शेतकरी सचिन जगन्नाथ ताम्हाणे यांनी आपल्या कर्तृत्वाने वेगळी आणि प्रेरणादायी ओळख निर्माण केली आहे. ‘बीबीएम’ (बिझनेस मॅनेजमेंट) पदवीधर असलेल्या ताम्हाणे यांनी शिक्षणानंतर नोकरीच्या पारंपरिक वाटेवर न जाता, शेतीतच नवे क्षितिज गाठण्याचा धाडसी निर्णय घेतला. घरची दहा एकर बागायत शेती हीच त्यांची प्रयोगशाळा बनली आणि त्यांनी गोआधारित वैदिक शेतीचा मार्ग स्वीकारत एक वेगळे मॉडेल उभे केले. 2016 साली ’कृषिवेद ऑर्गेनिक फार्म’ची निर्मिती करत हरियाणातून साहिवाल जातीच्या आठ गायी आणल्या. यासाठी त्यांनी सुमारे पाच लाखांची गुंतवणूक केली. गोपालनाची भक्कम पायाभरणी करण्यासाठी त्यांनी घराशेजारीच 50 बाय 45 फूटांचे दोन मोठे मुक्तसंचार गोठे बांधले. त्यावर मजबूत सावलीसाठी शेड बांधले. आठ गायींच्या साथीने सुरू झालेल्या या उपक्रमाचा विस्तार आज लहान-मोठ्या 45 गायींच्या गोकुळात झाला आहेे.
 
 
शेतकरी कुटुंबात जन्मलेले सचिन, धावपळीच्या शहरी आयुष्याला पूर्णविराम देऊन आपल्या मातीकडे परतले. शहरातील तणावपूर्ण ’रेस’ नाकारून सचिन यांनी पुन्हा शेती आणि देशी गोपालनाचा मार्ग स्वीकारला. हा मार्ग निवडताना त्यांना लोकांचा विरोध आणि त्यांच्या अविश्वासाचा सामना करावा लागला; पण खंबीर आत्मविश्वासाने त्यांनी यशाची नवी वाट कशी निर्माण केली, याविषयी सचिन सांगतात,”माझा जन्म एका साध्या पण समृद्ध अशा शेतकरी कुटुंबात झाला. आमच्या पणजोबांपासून सुरू झालेली शेतीची परंपरा आजही तितक्याच अभिमानाने पुढे चालू आहे. मातीशी नाळ जोडलेली, श्रमांशी मैत्री केलेली आणि निसर्गाशी जुळवून घेतलेली ही जीवनशैली माझ्या रक्तातच होती. गावातच माझे शिक्षण सुरू झाले. शाळा आणि शेत हीच माझी दोन विद्यापीठं होती. वडिलांना शेतात मदत करत करत दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं. मात्र, घरच्यांची एकच इच्छा होती आपला मुलगा मोठा साहेब व्हावा! त्यासाठी मला पुण्यात पुढील शिक्षणासाठी पाठवण्यात आले.”
 
 
शहरातल्या त्या अनुभवाविषयी सचिन सांगतात, ”शहरात पाऊल ठेवले आणि एक वेगळीच दुनिया डोळ्यांसमोर उभी राहिली. तिथे चकाकी होती, पैसा होता, सोयी-सुविधा होत्या; पण त्यासोबतच एक अनामिक, अदृश्य ताणही होता. कुटुंबाने माझ्यासाठी यूपीएससी, एमपीएससी देऊन अधिकारी होण्याची मोठी स्वप्नं रंगवली होती... पण माझे मन मात्र त्या गर्दीत कुठेतरी हरवल्यासारखे वाटायचे. शहराची ही ’रेस’ मला कधीच आपलीशी वाटली नाही. आणि मग एक दिवस मी मनाशी ठाम निर्णय घेतला- आपण पुन्हा आपल्या मातीशी नाते जोडून घ्यायचे!”
 
 
समाज आणि स्वतःच्या मनातील द्वंद्वावर मात करून सचिन यांनी यशाची गुढी कशी उभारली, त्याविषयी ते सांगतात,”2013 मध्ये गावाकडे परतलो. पुन्हा शेती सुरू केली. त्यासोबत देशी गोपालनही सुरू केले. माझ्या आयुष्याला खरी दिशा देणारी प्रेरणा म्हणजे माझे आजोबा. त्यांचे साधे, शांत आणि संतुलित आयुष्य मला खूप काही शिकवून गेले. या प्रवासात एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे Youth Leadership Training Program (Art of Living). या अनुभवाने मला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले आणि गावाकडे परतण्याचं धाडस दिले. शेती सुरू करताना अनेक प्रश्न उभे राहिले, यातून पैसा मिळेल का? इतके शिक्षण करून शेती? घरच्यांचा विरोध, समाजाचा दबाव सगळे होते. पण माझा हेतू स्पष्ट होता, पैसा नव्हे, तर शुद्ध जीवन जगायचे! मी कोणत्याही अपेक्षेविना शेती सुरू केली. हळूहळू समाजाचे बोलणे कमी झाले आणि माझा आत्मविश्वास वाढत गेला.”
 

cow 
 
वैदिक शेती पद्धतीने गोपालन
 
आपल्या वैदिक शेती गोपालनाचे स्वरूप उलगडताना सचिन यांनी अत्यंत प्रभावी आणि समृद्ध अशी माहिती मांडली, ते म्हणाले -”वैदिक शेती म्हणजे निसर्गावर विश्वास ठेवून, त्याच्याशी सुसंगत राहून केलेली शेती. हीच पद्धत शाश्वत, निरोगी आणि समृद्ध भविष्यासाठी दिशादर्शक ठरते. या संकल्पनेत आत्मबल, देहबल आणि मनोबल या तिन्ही शक्तींना महत्त्व दिले जाते. अग्निहोत्र, ध्यान आणि प्राणायाम यांसारख्या दैनंदिन साधनांमुळे मन शांत राहते, शरीर सुदृढ होते आणि निर्णयक्षमता वाढते. याच सकारात्मक ऊर्जेचा परिणाम शेतीत आणि गोपालनात दिसून येतो. वैदिक गोपालन ही या पद्धतीची खास वैशिष्ट्यपूर्ण बाजू आहे. गायींना मुक्त गोठ्यात ठेवले जाते, याठिकाणी 75 टक्के मोकळे आणि 25 टक्के सावलीचे वातावरण असते.”
 
 
गोठ्याचे वेगळेपण आणि त्याच्या उभारणीमागचा मानवतावादी दृष्टीकोन याविषयी सचिन सांगतात, ”गोठ्याची रचना अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने विभागलेली असून सध्या लहान-मोठ्या मिळून तब्बल 45 गायींचा समावेश आहे. यामध्ये सर्व साहिवाल वाणाच्या गायी, एक खिलार आणि एक नंदी अशा देशी परंपरेचा सन्मान राखणारी गोसंवर्धनाची ही वाटचाल आहे. गायींच्या आरोग्यासाठी संपूर्ण आयुर्वेदिक पद्धतीचा अवलंब केला जातो. विविध औषधी चूर्ण, नैसर्गिक खुराक आणि पारंपरिक उपचार पद्धतींमुळे गायी तंदुरुस्त व निरोगी राहतात. विशेष म्हणजे, दररोज चार तास गायींना विविध रागांवर आधारित संगीत ऐकवले जाते. यामुळे गायी प्रसन्न राहतात, त्यांचा ताण कमी होतो आणि त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या आरोग्य आणि दूध उत्पादनावर दिसून येतो.”
 
 
गोपालनातील आध्यात्मिक विज्ञान (Spiritual Science) आणि शिस्तबद्धता अधोरेखित करताना सचिन म्हणाले, ”या गोपालन व्यवस्थेची आणखी एक विशेष आणि आध्यात्मिक बाजू म्हणजे दररोज सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे केले जाणारे अग्निहोत्र. सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या पवित्र क्षणी गोठ्यात अग्निहोत्र केल्याने परिसरातील वातावरण शुद्ध, सकारात्मक आणि ऊर्जावान राहते. या प्रक्रियेमुळे गायींवरही चांगला परिणाम होतो, त्यांचा ताण कमी होतो, रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि एकूणच आरोग्य अधिक सुदृढ राहते. अग्निहोत्रातून निर्माण होणारी राखही अत्यंत उपयुक्त ठरते. ती पाण्यात मिसळून गायींना पिण्यास दिली जाते. यामुळे त्यांच्या पचनक्रियेला मदत होते आणि नैसर्गिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळते. दिवसाची सुरुवात पहाटे चार वाजता होते आणि संपूर्ण व्यवस्थापन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने चालते.आहार व्यवस्थेत दिवसभरात दोन वेळा विविध प्रकारचा चारा कुट्टी स्वरूपात दिला जातो. सकाळी पाच आणि सायंकाळी पाच वाजता हाताने धारा काढण्याची पद्धत आजही जपली आहे.”
 
 
शुद्ध तुपाची यशस्वी झेप
 
 
दुधापुरते मर्यादित न राहता मूल्यवर्धित उत्पादनांतून गोपालनाला खरी समृद्धी मिळते. शुद्ध देशी तूप, आयुर्वेदिक व नैसर्गिक उत्पादनांतून गुणवत्ता जपत देश-विदेशात विश्वास निर्माण करत गोआधारित शेतीला आर्थिक बळ कसं दिलं, याबाबत सचिन प्रभावीपणे सांगतात, ”देशी गोपालन केवळ दुधावर आधारित असेल, तर ते दीर्घकाळ परवडणारे ठरत नाही. खर्‍या अर्थाने या व्यवसायाला बळ मिळतं ते मूल्यवर्धित उत्पादनांमधून. याच विचारातून घरापासूनच सुरुवात करत, दैनंदिन वापरातील नैसर्गिक आणि आरोग्यदायी उत्पादनांची निर्मिती येथे सुरू करण्यात आली. दंतमंजन, साबण, गोमूत्रापासून तयार केलेला शॅम्पू, धूपकांडी, फेस पॅक, ताकापासून तक्रासव अशा विविध उत्पादनांमुळे गोपालनाला एक नवा आर्थिक आधार मिळाला. मात्र, या सर्वांमध्ये सर्वात महत्त्वाचं स्थान आहे शुद्ध देशी तुपाचं. सुमारे 30 लीटर दुधापासून एक लीटर तूप तयार होत असून, दररोज दीड ते दोन लीटर तूप निर्मिती केली जाते. महिन्याला साधारण 40 ते 90 लीटरपर्यंत तूप तयार होतं. या तुपापासूनही पुढे विशेष आयुर्वेदिक उत्पादने तयार केली जातात, जसे ‘नस्य’ (नाकासाठी औषधी तूप) आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेली मॉइश्चरायझिंग क्रीम (शतधौत घृत). तांब्याच्या भांड्यात हजारो वेळा मंथन करून बनवलेली ही क्रीम त्वचेसाठी अत्यंत लाभदायक ठरते. आयुर्वेदात तुपाला ‘आयुष्य’ मानलं गेलं आहे. योग्य पद्धतीने तयार केलेलं तूप शरीराला आवश्यक चांगले फॅट्स पुरवतं, पचन सुधारतं आणि आरोग्य सुदृढ ठेवतं. परंतु बाजारात भेसळयुक्त तूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने शुद्ध तुपाची निर्मिती हीच या गोपालनाची खरी प्रेरणा ठरली. गायीच्या आहारापासून ते तुपाच्या पॅकेजिंगपर्यंत प्रत्येक टप्प्यावर शुद्धतेची काटेकोर काळजी घेतली जाते. कोणतेही रासायनिक घटक गायीच्या आहारात जाऊ नयेत, यासाठी विशेष लक्ष दिलं जातं.”
 

Vedic agriculture 
 
’कृषिवेद’ ब्रँडच्या यशाचे सूत्र आणि गोमय उत्पादनांच्या गुणवत्तेविषयी सचिन सांगतात, ”तूप निर्मिती करताना आदल्या दिवशी दुधाला विरजण लावून दही तयार केलं जातं. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास लाकडी रवीच्या साहाय्याने दही घुसळण्यास सुरुवात होते. घुसळणीतून तयार झालेलं लोणी मातीच्या भांड्यात कडवून, चुलीवर मंद आचेवर तूप तयार केलं जातं. या संथ प्रक्रियेमुळे तुपाची गुणवत्ता आणि पोषणमूल्य जपलं जातं. या प्रक्रियेमुळे तुपातील सर्व पोषक तत्त्व जतन होतात. सध्या आमचं शुद्ध देशी तूप सुमारे साडेतीन हजार रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे, आणि याची खासियत म्हणजे हे तूप केवळ भारतातच नाही, तर जगातील यूएसए, युके, कॅनडा, जर्मनी, न्यूझीलंड, संयुक्त अरब अमिराती, सिंगापूर, स्वित्झर्लंड आदी आठ ते दहा देशांमध्ये पोहोचत आहे. गुणवत्तेवर असलेल्या विश्वासामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही आमच्या उत्पादनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज आमच्याकडे एकूण 22 विविध नैसर्गिक व आरोग्यदायी उत्पादने उपलब्ध आहेत. ’कृषिवेद’ ब्रँड अंतर्गत तूप व इतर उत्पादनांची विक्री केली जाते. यातील इतर सर्व उत्पादने संपूर्ण भारतभर कुरिअरद्वारे, अ‍ॅडव्हान्स पेमेंटच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचवली जातात. केवळ गोपालन व्यवसायातूनच दरवर्षी सुमारे 15 लाखांची उलाढाल साधली जाते, तर शेती व पूरक उपक्रम मिळून एकूण वार्षिक उलाढाल तब्बल 40 ते 45 लाखांच्या आसपास पोहोचते.”
 
 
नैसर्गिक शेतीचा स्मार्ट फॉर्म्युला
 
 
सचिन ताम्हाणे यांनी गोआधारित नैसर्गिक शेतीचा एक यशस्वी आदर्श समोर ठेवला असून, या प्रवासातील आपल्या आठवणींना उजाळा देताना ते सांगतात, ”नैसर्गिक शेतीत येथे घरच्या गरजांपासून सुरुवात करून सर्व प्रकारचा भाजीपाला, हंगामी पिके, खपली गहू, गावरान हरभरा, तूर, शेवगा आणि ऊस अशी विविध पिके घेतली जातात. शेवग्याच्या पाल्यापासून पौष्टिक पावडरही तयार केली जाते. या शेतीचं वेगळेपण म्हणजे एकही उत्पादन कच्च्या स्वरूपात थेट बाजारात विकलं जात नाही. प्रत्येक पिकावर पारंपरिक पद्धतीने प्रक्रिया केली जाते. हरभर्‍याची जात्यावरची डाळ (प्रतिकिलो 200 रूपये), खपली गव्हाचं जात्यावरचं पीठ (प्रतिकिलो 150 रूपये) अशा प्रक्रियेमुळे उत्पादनाची शुद्धता आणि पोषणमूल्य जपलं जातं.”
 
 
पुढे तेे असेही म्हणाले की, ”उत्पादनाचा दर ठरवताना उत्पादन खर्च, प्रक्रिया खर्च आणि मर्यादित नफा यांचा योग्य समतोल साधला जातो. त्यामुळे ग्राहकांना दर्जेदार आणि विश्वासार्ह उत्पादने मिळतात. या व्यवस्थेची खरी ताकद आहे ‘डिमांड बेस्ड शेती’. ग्राहकांची जितकी मागणी, तितकंच उत्पादन ना जास्त, ना कमी. यामुळे उत्पादन वाया जात नाही, दर घसरत नाहीत आणि अर्थकारण स्थिर राहते.”
 
 
बैलचलित घाण्याचं तेल
 
ताम्हाणे यांनी गोपालन व दुग्ध व्यवसायातून समृद्धी साधत, शेतीला लाकडी घाणतेल व्यवसायाची प्रभावी जोड दिली आहे; या अभिनव प्रयोगामागील अनुभव सांगताना सचिन म्हणाले, ”आमच्या उत्पादनांमध्ये सर्वात विशेष आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे महाराष्ट्रातील पहिला बैलचलित लाकडी तेल घाणा. या पारंपरिक घाण्यावर शेंगदाणा, तीळ, मोहरी, बदाम, खोबरे, करडई यांसारखी विविध तेलं तयार केली जातात.”
 
 
”या प्रक्रियेचं वैशिष्ट्य म्हणजे अतिशय मंद गती-फक्त 2 RPM. (प्रति मिनिट 2,000 फेर्‍या) या स्लो प्रक्रियेमुळे तेलातील नैसर्गिक गुणधर्म आणि चांगले फॅट्स जळत नाहीत. परिणामी हे तेल अधिक पौष्टिक, पचायला हलकं आणि शरीरासाठी अत्यंत लाभदायक ठरतं. त्यामुळेच या तेलाची गुणवत्ता उत्कृष्ट असून मागणीही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या हे तेल सरासरी 600 रुपये प्रति किलो दराने विक्रीस उपलब्ध आहे. आमच्यासाठी सर्वात आनंदाची गोष्ट म्हणजे आमचे ग्राहकच आमचे खरे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहेत. त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या शिफारसीतून नवीन ग्राहक जोडले जातात. ‘माऊथ पब्लिसिटी’ हीच आमची खरी ताकद आहे.काही ग्राहकांना बाजारातील स्वस्त उत्पादनांच्या तुलनेत आमची उत्पादने महाग वाटतात. पण त्यामागचं कारण म्हणजे गुणवत्ता, शुद्धता आणि पारंपरिक प्रक्रिया. त्यामुळे आम्ही त्यांना केवळ एकच सांगतो, आमची प्रक्रिया स्वतः येऊन पाहा आणि बाजारातील प्रक्रियेशी तुलना करा. मगच निर्णय घ्या.” अशाप्रकारे सचिन यांनी ’शुद्धता ही स्वस्त नसते आणि आरोग्य ही तडजोडीची गोष्ट नाही. आम्ही ग्राहकांना केवळ उत्पादन विकत नाही, तर ’विश्वास आणि आरोग्य’ विकतो. जेव्हा तुम्ही गुणवत्तेचा अनुभव घेता, तेव्हा किंमत गौण ठरते’ असा महत्त्वाचा संदेश दिला.
 
 
युट्यूबच्या माध्यमातून ज्ञानाची शेती
 
शेती आणि गोपालनात मिळालेले सकारात्मक अनुभव स्वत:पुरते न ठेवता, ते इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी ताम्हाणे गेल्या सात वर्षांपासून ’कृषिवेद फार्म ’ (https://www.youtube.com/krishived) युट्यूब चॅनेल चालवतात. विशेष म्हणजे, गायीवरच्या अनेक पारंपरिक उपचार पद्धती अशा होत्या की ज्यांची माहिती पशुवैद्यकीय क्षेत्रातही सहज उपलब्ध नव्हती. त्यामुळे शेतकर्‍यांचा औषधांवरील वाढता खर्च कमी व्हावा आणि त्यांना पर्यायी, नैसर्गिक उपाय मिळावेत, हा या युट्यूब चॅनल निर्मितीमागील उद्देश आहे. ”प्रत्येक प्रयोग, प्रत्येक उपचार आधी सखोल निरीक्षणातून (Observation) पार पाडला जातो आणि त्यानंतरच तो युट्यूबच्या माध्यमातून प्रसारित केला जातो. आज या ज्ञानयात्रेला तब्बल 54 हजारांहून अधिक शेतकरी जोडले गेले आहेत. यासोबतच तरुण शेतकर्‍यांसाठी दर महिन्याला शेतावर प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्र आयोजित केली जातात. यात शेती, गोपालन आणि नैसर्गिक पद्धतींची संपूर्ण माहिती प्रत्यक्ष दाखवून दिली जाते,” असे ताम्हाणे यांनी सांगितले.
 
 
डोंगरावर उभं राहणार ‘नैसर्गिक विश्व’
 
 
निसर्गाशी अधिक सखोल नातं जोडण्याच्या ध्येयातून ताम्हाणे यांनी तब्बल बारा एकरांचा डोंगर खरेदी करून एक वेगळा प्रयोग सुरू केला आहे. या ठिकाणी वन्य वनस्पती, विविध प्राणी, नैसर्गिक जैवविविधता यांचा समतोल साधत एक सजीव परिसंस्था तयार करण्याचं काम यंदापासून सुरू होत आहे. या उपक्रमामागे आणखी एक महत्त्वाचा उद्देश आहे तो म्हणजे शहरात राहणार्‍या लोकांना खर्‍या ग्रामीण जीवनाची ओळख करून देणे. आजच्या धावपळीच्या जगात बहुतांश लोकांना हायब्रीड अन्न आणि रासायनिक शेतीचाच अनुभव आहे. पण खरं बीज, शुद्ध अन्न आणि पारंपरिक शेती काय असते, याची जाणीव जनजागृती केली जाणार आहे.
 
 
निसर्ग, परंपरा आणि विज्ञानाचा सुंदर संगम साधत सचिन ताम्हाणे यांनी गोआधारित शेतीतून समृद्धीचा नवा मार्ग दाखवला आहे. शुद्धतेवरचा विश्वास, प्रयोगशीलता आणि जिद्दीच्या जोरावर उभं राहिलेले हे मॉडेल आजच्या पिढीसाठी प्रेरणा देणारे ठरत आहे.

विकास पांढरे

सध्या 'कृषी विवेक' (विवेक समूह) चे कार्यकारी संपादक. एम.ए.बीएड पर्यंतचे शिक्षण. वयाच्या १६ व्या वर्षापासून सोलापूर 'तरुण भारत' मध्ये वार्ताहर म्हणून कामास प्रारंभ. पुढे दैनिक तरूण भारत, सुराज्य,पुढारी याठिकाणी वार्ताहर व उपसंपादक म्हणून अनुभव. कृषी, समाज, साहित्य व वंचित समाजाविषयी लिखाण.