umpires
खेळ सुरळीत, न्याय्य आणि विश्वासार्ह राहण्यासाठी मैदानावर दिसणार्या खेळाडूंइतकाच महत्त्वाचा एक अदृश्य आधार म्हणजे अंपायर आणि रेफरी. त्यांच्या निर्णयक्षमतेवर संपूर्ण खेळाची दिशा, गती आणि अंतिम निकाल अवलंबून असतो. अंपायर आणि रेफरी ही भूमिका आज पूरक न राहता, स्वतंत्र ओळख आणि वाढत्या संधींसह एक सन्माननीय करिअर म्हणून उभी राहत आहे.
खेळ म्हणजे केवळ जिंकणे-हरणे नव्हे. तो शिस्त, नियम, प्रामाणिकपणा आणि क्रीडा स्पिरिट यांचा सुंदर संगम आहे. मैदानावर खेळाडू आपली कौशल्ये दाखवतात, पण हा खेळ न्याय्य आणि सुरळीत पार पडावा यासाठी ज्यांची सर्वात महत्त्वाची भूमिका असते, ते म्हणजे अंपायर आणि रेफरी.
क्रीडा क्षेत्रातील निःशब्द नायक म्हणजे अंपायर आणि रेफरी.कोणताही खेळ फक्त खेळाडूंनीच जिंकला जात नाही, तर तो न्याय, शिस्त आणि नियमांच्या आधारे घडतो.
अंपायर आणि रेफरी हे दोन भिन्न व्यवसाय आहेत. सर्वप्रथम ह्या दोघांमधील फरक समजून घेऊया.
क्रीडा स्पर्धेत दोघेही महत्त्वाचे असतात पण त्यांची भूमिका वेगवेगळी असते.
* अंपायर - मैदानावर निर्णय घेतात.
* मॅच रेफरी - संपूर्ण सामन्याचे निरीक्षण करतात आणि शिस्त राखतात.
अंपायर आणि रेफरी हे खेळातील न्यायाधीश असतात. ते कोणत्याही एका संघाच्या बाजूने नसून पूर्णपणे तटस्थ असतात.
उदा. क्रिकेटमध्ये LBW किंवा रन-आऊटचा निर्णय एका क्षणात घ्यावा लागतो. हा निर्णय योग्य असेल तरच सामन्याचा निकाल न्याय्य ठरतो.
तसेच, फुटबॉलमध्ये पेनल्टी किंवा ऑफसाईडचा निर्णय संपूर्ण खेळाची दिशा बदलू शकतो.
म्हणूनच अंपायर/रेफरीची उपस्थिती खेळाला विश्वासार्हता आणि पारदर्शकता देते.
* अंपायर किंवा रेफरी होणे म्हणजे फक्त नियम माहिती असणे नाही, तर दबावाखाली अचूक निर्णय घेण्याची क्षमता असणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
* हजारो प्रेक्षक, खेळाडूंचा ताण, आणि सामन्याचा महत्त्वाचा क्षण, अशा परिस्थितीत शांतपणे आणि योग्य निर्णय घेणे ही मोठी जबाबदारी आहे.
आज खेळ केवळ मनोरंजन नाही, तर तो एक मोठे व्यावसायिक क्षेत्र बनले आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये प्रचंड पैसा, प्रतिष्ठा आणि करिअर यांचा संबंध असतो. अशा वेळी अंपायर आणि रेफरी, खेळाची गुणवत्ता टिकवून ठेवतात, वादविवाद टाळतात, प्रेक्षकांचा खेळावरील विश्वास वाढवतात.
त्यांच्या अचूक आणि निष्पक्ष निर्णयांमुळेच खेळाची प्रतिष्ठा आणि सन्मान अबाधित राहतो.
अंपायरची भूमिकाही On-field Judgeसारखी असते.
अंपायर हा मैदानावर उपस्थित असतो आणि थेट खेळाशी संबंधित निर्णय घेतो.
LBW,, रन-आउट, कॅचआऊट यांसारखे निर्णय देतो, नो-बॉल, वाईड, फेअर/फाउल ठरवतो.
खेळ नियमांनुसार चालतोय का ते पाहतो.
उदा. समजा फलंदाजाच्या पॅडवर चेंडू लागतो आणि अपील होते अशा वेळी अंपायर क्षणात निर्णय देतो - आऊट किंवा नॉटआऊट
क्रिकेटच्या सामन्यांमध्ये असे अनेक निर्णय अंपायरने घेतलेले आपण पाहिले आहेत.
अनिल कुंबळे यांच्या 10 विकेट्सच्या ऐतिहासिक कामगिरीत अंपायरचा अचूक निर्णय महत्त्वाचा होता
मॅच रेफरीची भूमिकाही Off-field Authorityचीअसते.
मॅच रेफरी मैदानावर निर्णय देत नाही, तो संपूर्ण सामन्यावर लक्ष ठेवतो आणि शिस्त राखतो.
खेळाडूंच्या वर्तनावर नजर ठेवतो, नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करतो, दंड, निलंबन किंवा चेतावणी देतो, सामन्यानंतर रिपोर्ट तयार करतो.
उदा. जर एखादा खेळाडू वाद घालतो किंवा गैरवर्तन करत असेल तर मॅचरेफरी त्यांना दंड किंवा सस्पेन्शन देऊ शकतो.
International Cricket Council (ICC)च्या सामन्यांमध्ये मॅच रेफरी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो.
आवश्यक कौशल्ये आणि पात्रता
अंपायर/रेफरी होण्यासाठी फक्त खेळाची आवड पुरेशी नाही, तर काही गुणही आवश्यक असतात.
* नियमांचे सखोल ज्ञान
* तटस्थता आणि प्रामाणिकपणा
* झटपट आणि अचूक निर्णय क्षमता
* मानसिक स्थैर्य आणि दबावाखाली काम करण्याची क्षमता
* उत्कृष्ट फिटनेस (विशेषतः फुटबॉल/हॉकी रेफरीसाठी)
भारतामध्ये विविध क्रीडा संघटना अंपायर/रेफरीसाठी परीक्षा आणि प्रशिक्षण घेतात.
* क्रिकेटसाठी
Board of Control for Cricket in India (BCCI)
* फुटबॉलसाठी All India Football Federation (AIFF)
* हॉकीसाठी Hockey India
* तसेच राज्यस्तरीय क्रीडा संघटना
सुरुवात जिल्हा/राज्यस्तरावरून करत जसजसा अनुभव वाढत जाईल तसतसे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचता येते.
* ह्या परीक्षांसाठी शैक्षणिक पात्रता किमान 12वी पास लागते (काही ठिकाणी पदवी आवश्यक असू शकते).
* जर का संबंधित खेळाचे प्रमाणपत्र/अनुभव असल्यास त्याचा निश्चितच फायदा होऊ शकतो.
अंपायर/रेफरीचे उत्पन्न अनुभव आणि स्तरानुसार बदलते.
स्थानिक/शालेय स्तरावर मानधन 2,000 पर्यंत असते परंतु राज्यस्तरावर साधारण 3000 ते 10,000 प्रति सामना अपेक्षित असते.
राष्ट्रीय स्तरावर 20,000 ते 60,000 प्रतिसामना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर लाखोंमध्ये मानधन + प्रवास व राहण्याची सुविधादेखील दिली जाते.
ICC पॅनलवरील अंपायरना उच्च दर्जाचे मानधन दिले जाते.
अंपायर/रेफरीची गरज अनेक ठिकाणी भासते, जसे की
* शाळा व महाविद्यालयीन स्पर्धा
* जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धा
* प्रोफेशनल लीग्स (IPL, ISL इ.)
* आंतरराष्ट्रीय स्पर्धा (World Cup, Olympics)
* स्पोर्ट्स अकॅडमी आणि प्रशिक्षण केंद्रे
खेळाडू मैदानावर खेळ जिंकतात; पण अंपायर आणि रेफरी खेळाची प्रतिष्ठा जपतात!
ह्या क्षेत्राकडे एक व्यावसाय म्हणून कोण पाहू शकते?
* माजी खेळाडू (Former Players)- जे खेळाडू पूर्वी क्रिकेट, फुटबॉल, हॉकी इ. खेळले आहेत, त्यांना नियम आणि खेळाची समज आधीपासूनच असते, त्यामुळे ते या क्षेत्रात सहज प्रगती करू शकतात.
* क्रीडाप्रेमी (Sports Enthusiasts) - ज्यांना खेळाची आवड आहे पण पोशनल खेळाडू नाहीत, ते नियम शिकून आणि परीक्षा देऊन अंपायर/रेफरी बनू शकतात.
* क्रीडा शिक्षक / प्रशिक्षक (PE Teachers / Coaches) शाळा किंवा अकॅडमीमध्ये काम करणारे आणि खेळाचे ज्ञान असल्यामुळे ते उत्तम निर्णय कर्ता बनू शकतात.
खेळाडू असणे गरजेचे नाही, पण खेळ समजणे आवश्यक आहे.
निष्पक्षता आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल, तर तुम्ही अंपायर/रेफरी बनू शकता.
- लेखिका क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि मेंटॉर आहेत आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स अॅडव्हायझरीच्या संचालिका आहेत.