शतायुषी संघाशी जोडलेलं कुटुंब

विवेक मराठी    25-Apr-2026
Total Views |
@मंदाकिनी अरविंदराव असोलकर
rss
 
 
पोलीस खात्यातील शिस्त आणि मिशनरी शाळेतील शिक्षण अशा वेगळ्या वातावरणातून लग्नानंतर ‘घर संघाचे’ असलेल्या परिवारात आले. लवकर लग्न झाल्यामुळे शालेय शिक्षण थांबलं खरं, पण संघ आणि समितीच्या संस्कारांनी मला आयुष्याचं मोठं शिक्षण दिलं. समितीचं काम, घरी येणार्‍या संघ स्वयंसेवकांशी होणारा संवाद ते खुद्द सरसंघचालकांच्या आदरातिथ्यापर्यंतचा हा प्रवास माझं भावजीवन समृद्ध करणारा होता.
मी मंदाकिनी अरविंदराव असोलकर...पूर्वाश्रमीची मंदाकिनी मल्हारराव देशपांडे(चारठाणकर). माझं माहेर मराठवाडा. तिथल्याच खुलताबाद(भद्रामारुतीचे प्रसिद्ध ठिकाण) या गावी माझा जन्म झाला.
 
 
माझे वडील मल्हारराव देशपांडे पोलीस विभागात सर्कल इन्स्पेक्टर होते. नोकरीतील वडिलांच्या सतत होणार्‍या बदल्यांमुळे माझं बालपण मराठवाड्यातील विविध ठिकाणी गेलं. ते सरकारी नोकरीत असल्यामुळे तसं पाहायला गेलं तर आमचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी काहीच संबंध नव्हता.
 
 
पाच बहिणी आणि एक भाऊ... अशा आम्हा सहा भावंडांनी आमचं घर गजबजलेेलं असायचं. माझं नववीपर्यंतचं शिक्षण ख्रिश्चन मिशनरी शाळेत झालं. मोठ्या बहिणीसाठी लग्नाचं स्थळ पाहत असताना आई-वडिलांच्या मनात विचार आला की, दोन्ही बहिणींची लग्न एकाच मांडवात उरकून टाकायची.
 
 
आईवडिलांच्या या विचारामुळे माझं लग्न 24 जून 1962 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील माननीय सिंदखेडराजा येथील नारायणराव असोलकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव अरविंदराव असोलकर यांच्याशी झालं. लग्नामुळे संघाचा नुसता परिचयच नाही तर संघाशी खूप जवळून ओळख झाली.
 
 
विवाहानंतर माझा संबंध महिलांचं संघटन असलेल्या ‘राष्ट्र सेविका समिती‘शी झाला. नियमितपणे समितीत जाऊ लागले. चिखलीमधील राष्ट्र सेविका समितीचं काम पाहणार्‍या मीराताई राजे यांच्याशी खूप जवळून परिचय झाला. त्यांच्यामुळेच मी समितीशी खूप चांगल्या प्रकारे जोडली गेले. मला समितीची एवढी गोडी वाटू लागली की कधी संध्याकाळचे सहा वाजतात आणि मी समितीच्या शाखेत जाते, असं वाटायचं.
 
 
सुमारे 30 ते 35 वर्षं दर उन्हाळ्यामध्ये माझे पती मुलांच्या परीक्षा झाल्यावर मला व मुलांना माहेरी सोडण्यासाठी यायचे. त्यानंतर स्वतः एक महिना संघ शिक्षा वर्गात जायचे. संघ शिक्षा वर्ग संपल्यानंतर मला व मुलांना परत चिखलीला घेऊन जाण्यासाठी येत असत. चिखलीला येऊन आम्ही सर्वजण सिंदखेडराजा येथे जात असू. माझे सासरे संघाचे कार्यकर्ते स्वयंसेवक होते. त्यांच्यामुळे आमच्या घरी संघ प्रचारक, अधिकारी व कार्यकर्ते यांचं नेहमी येणं-जाणं असायचं.
 
 
एक गोष्ट मला येथे नमूद करावी वाटते की, लवकर लग्न झाल्यामुळे माझी शिकण्याची इच्छा अपूर्ण राहिली, पण ही खंत मला पुढे कधीच भासली नाही, कारण संघाच्या माध्यमातून मी आयुष्यभर काहीतरी नवीन शिकतच राहिले.
 
 
माझे पती, माझा मुलगा व नातू हे संघाच्या शाखेत नियमितपणे जातात ही आमच्यासाठी खूप आनंदाची बाब आहे.
18 मार्च 2019ला शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीच्या आदर्श विद्यालयाच्या नूतन वास्तूच्या लोकार्पणासाठी रा. स्व. संघाचे पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत चिखलीला येणार होते. तेव्हा माझ्या नातवानं अथर्वेशनं त्याच्या आजोबांकडे हट्ट धरला की, मोहनजींना आपल्या घरी बोलवा. आजोबांनी नातवाची इच्छा मोहनजींना सांगितली. नातवाच्या इच्छेचा मान राखत आदरणीय मोहनजी घरी आले. पूजनीय सरसंघचालक आमच्या घरी येणं ही आमच्या पूर्ण परिवारासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. तो आमचा अमूल्य ठेवा आहे.
रा. स्व. संघाच्या स्थापनेला यावर्षी 100 वर्षं पूर्ण झाली आहेत. संघ ही जगातील सर्वात मोठी संघटना आहे. माझं कुटुंब ह्या संघटनेचे स्वयंसेवक असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.