@चंदन पाटील
9404353454
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र नव्या परिवर्तनाच्या उंबरठ्यावर उभे आहे. पारंपरिक शेतीपासून तंत्रज्ञानाधारित, मूल्यवर्धित आणि बाजाराभिमुख शेतीकडे होत असलेली वाटचाल शेतकर्यांच्या आत्मनिर्भरतेला नवी दिशा देत आहे. उत्पन्नवाढ, जलव्यवस्थापन, पीक विविधता आणि प्रक्रिया उद्योग यांच्या जोरावर शेती आता नफ्याचा व्यवसाय बनत आहे. या बदलातूनच राज्याच्या एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेच्या स्वप्नाला बळ मिळणार आहे.
महाराष्ट्राची अर्थव्यवस्था दीर्घकाळापासून कृषी क्षेत्रावर आधारित राहिली आहे. राज्यातील 55% ते 60% लोकसंख्या थेट किंवा अप्रत्यक्षपणे शेतीवर अवलंबून आहे. मात्र, आज कृषी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पारंपरिक शेतीपद्धतींपलीकडे जाऊन महाराष्ट्र आता कृषी क्षेत्राला तंत्रज्ञानाधारित, मूल्यवर्धित आणि बाजारपेठेशी जोडलेले एक सक्षम आर्थिक इंजिन बनवण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. ही दिशा राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या उद्दिष्टाशी तसेच 2047 पर्यंत भारताला जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याच्या राष्ट्रीय ध्येयाशी पूर्णपणे सुसंगत आहे. या रूपांतरणात शेतकर्यांचे हित केंद्रस्थानी आहे. शेतकर्यांचे उत्पन्न वाढवणे, त्यांना आर्थिक स्थैर्य प्रदान करणे आणि शेतीला नफ्याच्या व्यवसायात रूपांतरित करणे हा या बदलाचा मूलमंत्र आहे. यामुळे केवळ शेतकरी समृद्ध होणार नाहीत तर राज्याची एकूण अर्थव्यवस्था मजबूत होऊन एक ट्रिलियन डॉलरच्या लक्ष्याकडे वेगाने वाटचाल करेल.
कृषी क्षेत्रातील प्रगती व विकासाची उद्दिष्टे
महाराष्ट्राच्या कृषी धोरणाचा मुख्य उद्देश म्हणजे पारंपरिक, उत्पादन-केंद्रित शेतीपासून उच्च मूल्य, टिकाऊ आणि बाजाराभिमुख शेतीकडे संक्रमण करणे. उत्पादन वाढवणे हे एकमेव ध्येय नसून शेतकर्यांचे उत्पन्न वाढवणे, जोखीम कमी करणे आणि शेतीला उद्योगाशी जोडणे हे महत्त्वाचे उद्दिष्ट असायला हवे. या उद्दिष्टांमागे शेतकर्यांच्या हिताचाच विचार प्रधान असणे आवश्यक आहे. शेतकरी हा केवळ उत्पादक नसून आर्थिक विकासाचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्याच्या कष्टाला योग्य मोबदला मिळाला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत होईल आणि राज्याची प्रगती वेगवान होईल.
शेतकर्यांचे उत्पन्न वाढ व स्थैर्य
शेतकर्यांचे उत्पन्न वाढवणे आणि त्यात स्थिरता आणणे हे प्रमुख ध्येय असायला हवे. हवामान, बाजारभाव आणि खर्च यामुळे उत्पन्नात अस्थिरता येते. त्यामुळे फळबाग, दुग्धव्यवसाय, मत्स्यपालन आणि इतर पूरक व्यवसायांना प्रोत्साहन दिले जात आहे. उदाहरणार्थ, द्राक्ष, डाळिंब किंवा आंबा यासारख्या फळपिकांकडे वळल्यास एका हंगामात मिळणारे उत्पन्न पारंपरिक धान्यपिकांच्या तुलनेत दुप्पट ते तिप्पट होऊ शकते. यामुळे उत्पन्नाचे विविध स्रोत निर्माण होतात आणि आर्थिक जोखीम कमी होते. शेतकरी कुटुंबांना वर्षभर स्थिर उत्पन्न मिळते, त्यामुळे कर्जबाजारीची साखळी तुटते आणि शिक्षण, आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजांसाठी खर्च करता येतो.
सिंचन विस्तार आणि जलव्यवस्थापन
महाराष्ट्रातील मोठा भाग अजूनही पावसावर अवलंबून आहे. सध्याचे सिंचनाखालील क्षेत्र सुमारे 16-17% आहे. सरकार 225 प्रकल्प पूर्ण करून 33.45 लाख हेक्टरपर्यंत सिंचन क्षमता वाढवण्याचे प्रयत्न करत आहे. ठिबक व तुषार सिंचनासारख्या सूक्ष्म सिंचन पद्धतींमुळे पाण्याची बचत आणि उत्पादनवाढ साध्य होते. सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याचा वापर 40-50% कमी होतो आणि उत्पादन 20-30% वाढते. यामुळे शेतकरी कमी पाण्यात जास्त उत्पादन घेऊ शकतात. यातून शेतकर्यांचे खर्च घटतात आणि नफा वाढतो. जलव्यवस्थापनातील हे प्रयत्न शेतकर्यांना हवामान बदलाच्या संकटापासून संरक्षण देतात आणि दीर्घकालीन स्थैर्य प्रदान करतात.
पीक विविधीकरण
महाराष्ट्र द्राक्ष, डाळिंब, आंबा यांसारख्या फळपिकांमध्ये अग्रेसर आहे. राज्यात शेतकर्यांना धान्यपिकांऐवजी भाजीपाला, मसाले, फुले आणि निर्यातक्षम पिकांकडे वळण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. यामुळे उत्पन्न वाढते आणि जोखीम कमी होते. एका पिकावर अवलंबून राहिल्यास बाजारभाव पडला किंवा रोग आला तर संपूर्ण वर्ष वाया जाते. विविधीकरणामुळे शेतकरी एकाच वेळी अनेक पिके घेऊ शकतात. यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न स्थिर राहते आणि बाजारपेठेच्या चढ-उतारांपासून संरक्षण मिळते. ही पद्धत शेतकर्यांच्या आर्थिक हिताचे संरक्षण करते आणि राज्याला निर्यातक्षम उत्पादनांचा स्रोत बनवते.
या नगदी पिकांसोबतच श्रीधान्य (भरड धान्य), कडधान्य आणि गळिताची धान्य ही पारंपरिक पिके नजीकच्या भविष्यामध्ये महाराष्ट्रातील शेती आणि शेतकर्याला स्थैर्य प्रदान करणारी ठरणार आहेत. अस्थिर तसेच बदलत्या कृषी हवामानामुळे खूप मोठ्या भांडवली गुंतवणुकीची शेती धोक्यात आलेली आहे. या पिकांना खूपच कमी पाणी तसेच भांडवली गुंतवणूक लागते. त्यामुळे नुकसान झाले तरीही ते सोसण्याची ताकद शेतकर्यांमध्ये निश्चितच असते. तसेच पीक विमा योजनेसारख्या उपक्रमांवरील ताणही कमी करता येऊ शकेल.
राज्याच्या बर्याच भागांमध्ये भांडवली गुंतवणूक अधिक करून शेती किफायतशीर करण्याऐवजी नफ्याची करण्यामागे आपण खूप मोठ्या धोक्याच्या पातळीवर आलेलो आहोत. अजूनही वेळ गेलेली नाही. कारण राज्यामध्ये या तीनही प्रकारच्या पिकांमधून येणारे उत्पादन हे अधिक रोजगार निर्मिती करू शकते त्यासाठी कमी भांडवल व आधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असते आजही या पिकांचे महत्त्व वाटणारी पिढी अस्तित्वात आहे. राज्यामध्ये एकूण 80 टक्के पेक्षा अधिक शेतकरी हे अल्पभूधारक किंवा अत्यल्प भूधारक आहेत. त्यांच्यासाठी ही पीक पद्धती आजही वरदान ठरणारी आहे. तसेच Per Drop More Employment हे उद्दिष्ट ही साध्य करता येणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व शेती उत्पादनांवर प्रक्रिया करून जागतिक बाजारपेठेमध्ये आपले स्थानही निश्चित करता येणार आहे. ही पिके महाराष्ट्राची बलस्थाने आहेत.
मूल्यसाखळी बळकटीकरण
राज्यामध्ये देशातील अग्रगण्य उपक्रमांपैकी गणला गेलेला साखर उद्योग हा मूल्य साखळीचे उत्तम उदाहरण आहे. ऊस उत्पादन आणि त्यावर आधारित साखर उद्योग ही पूर्ण संतुलित मूल्य साखळी महाराष्ट्रामध्ये विकसित पावली. तसेच दूध उत्पादन आणि प्रक्रिया उद्योग याची सुद्धा मूल्य साखळी महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीमध्ये प्रभावी ठरली आहे. त्याचप्रमाणे अनेक पिकांच्या त्यातही भरडधान्य कडधान्य आणि गळिताची धान्य या छोट्या शेतकर्यांसाठी वरदान ठरणार्या शेतमालांच्या मूल्य साखळ्या विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे. यातून शेतीमध्ये शाश्वत चक्रीय अर्थव्यवस्था विकसित होईल. परिणामी ग्रामीण भागातील 80 टक्केपेक्षा अधिक असलेल्या छोट्या शेतकर्यांसाठी अशी अर्थव्यवस्था संजीवनी ठरेल.
कच्चा माल विकण्याऐवजी प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि थेट विक्री यावर भर दिला जात आहे. अन्नप्रक्रिया उद्योग, कोल्ड स्टोरेज आणि लॉजिस्टिक साखळी विकसित करून शेतकर्यांना अधिक मूल्य मिळवून देण्याचा प्रयत्न आहे. ऋरीा ीें ऋेीज्ञ ही संकल्पना यामध्ये महत्त्वाची ठरते. शेतकर्यांना कच्चा माल विकल्यास मध्यस्थांचा फायदा होतो. प्रक्रियेद्वारे शेतकर्यांना थेट 30-50% अतिरिक्त मूल्य मिळते. कोल्ड स्टोरेजमुळे उत्पादन वाया जाण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे शेतकर्यांचा नफा वाढतो आणि ते स्वतंत्र उद्योजक बनतात. हे शेतकर्यांच्या हितासाठी क्रांतिकारी पाऊल आहे कारण त्यांना बाजारपेठेचा पूर्ण फायदा मिळतो.
तंत्रज्ञानाचा वापर
आधुनिक शेतीत तंत्रज्ञानाचा मोठा वापर होत आहे. ड्रोन, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), प्रिसिजन फार्मिंग यामुळे उत्पादनक्षमता वाढते. डिजिटल प्लॅटफॉर्ममुळे हवामान, माती आणि बाजारभावाची माहिती शेतकर्यांना सहज मिळते. शेतकर्यांसाठी हे तंत्रज्ञान श्रम कमी करते आणि निर्णय घेणे सोपे करते. उदाहरणार्थ, माती परीक्षण किट किंवा मोबाईल अॅपद्वारे शेतकरी योग्य खत आणि पाणी वापरू शकतात. यामुळे खर्च 20-25% कमी होतो आणि उत्पादन वाढते. शेतकरी आता ज्ञानाधारित शेती करतात, त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि आर्थिक स्थैर्य मिळते.
शेतकरी संघटनांचे बळकटीकरण शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) यांना प्रोत्साहन दिले जात आहे. सामूहिक खरेदी-विक्रीमुळे खर्च कमी होतो आणि बाजारात चांगला दर मिळतो. सध्या देशात 8,875 FPO नोंदणीकृत आहेत, त्यापैकी महाराष्ट्रात 579+ FPO कार्यरत आहेत. FPO द्वारे शेतकरी एकत्र येतात, सामूहिकरित्या बी-बियाणे, खते खरेदी करतात आणि उत्पादन विक्री करतात. यामुळे मध्यस्थ कमी होतात आणि शेतकर्यांना 15-20% जास्त दर मिळतो. हे शेतकर्यांच्या सामूहिक हिताचे रक्षण करते आणि त्यांना बाजारातील ताकद प्रदान करते.
एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा वाटा
महाराष्ट्राने एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचे ध्येय ठेवले आहे (2029-30पर्यंत). हे साध्य करण्यासाठी कृषी क्षेत्राची महत्त्वाची भूमिका आहे.
सध्याची स्थिती - 2024-25 मध्ये कृषी व संलग्न क्षेत्राचा GSDP मधील वाटा सुमारे 11.2% आहे (आर्थिक सर्वेक्षण 2025-26). रोजगारात मात्र 45-50% वाटा कायम आहे. 2025-26 मध्ये कृषी क्षेत्राचा वास्तविक वाढ दर 3.4% अपेक्षित आहे.
अपेक्षित योगदान - भविष्यात कृषी व संलग्न क्षेत्रांचा एकत्रित वाटा 15-18% पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेत हे सुमारे 150-180 अब्ज डॉलर इतके योगदान असेल. मूल्यवर्धनावर भर दिला जाईल. उत्पादन वाढीपेक्षा प्रक्रिया, निर्यात, साठवण आणि लॉजिस्टिक यामुळे कृषी क्षेत्र अधिक नफ्याचे बनेल. यामुळे शेतकर्यांचे उत्पन्न वाढेल आणि राज्याची अर्थव्यवस्था मजबूत होईल. कृषी क्षेत्रातील हे योगदान केवळ आकडेवारी नसून शेतकर्यांच्या कष्टाचे फळ आहे.
2047 पर्यंत भारताच्या अर्थव्यवस्थेत
महाराष्ट्राची भूमिका
भारताने 2047 पर्यंत 25-30 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. या प्रवासात कृषी क्षेत्राचे स्वरूप बदलत जाईल. 2047 पर्यंत कृषीचा GDP मधील वाटा 8-10% पर्यंत कमी होण्याची शक्यता आहे, परंतु एकूण मूल्य मोठ्या प्रमाणात वाढेल.
2047 पर्यंत महाराष्ट्रातील कृषी क्षेत्राचा सहभाग
कृषी निर्यात क्षेत्रातील नेतृत्व - महाराष्ट्र सध्या भारताच्या कृषी निर्यातीत 14-15% योगदान देतो. 2024-25 मध्ये राज्याच्या कृषी व प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीचे मूल्य 47,017 कोटी होते (15% वाढ). 2047 पर्यंत हा वाटा 25% पेक्षा अधिक होण्याची क्षमता आहे. फळे आणि प्रक्रिया उत्पादनांच्या निर्यातीद्वारे राज्य जागतिक बाजारपेठेत आघाडी घेईल. यामुळे शेतकर्यांना आंतरराष्ट्रीय दर मिळतील आणि परकीय चलन कमाई वाढेल.
उच्च मूल्य शेती केंद्र - फळबाग, सेंद्रिय शेती आणि निर्यातक्षम उत्पादनांमध्ये महाराष्ट्र जागतिक स्तरावर आघाडी घेऊ शकतो. द्राक्ष, डाळिंब आणि वाईन उद्योग यामध्ये मोठी संधी आहे. शेतकर्यांना सेंद्रिय शेतीत प्रोत्साहन मिळाल्यास प्रीमियम दर मिळतील आणि आरोग्यदायी उत्पादनांची मागणी वाढेल.
अन्नप्रक्रिया उद्योगात प्रगती - अन्नप्रक्रिया उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात मूल्यवर्धन होईल. मेगा फूड पार्क, कोल्ड स्टोरेज आणि प्रक्रिया उद्योग ग्रामीण भागात रोजगारनिर्मिती करतील. यामुळे शेतकर्यांच्या मुलांना गावातच नोकर्या मिळतील आणि स्थलांतर थांबेल.
ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया - कृषी क्षेत्र ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देईल, स्थलांतर कमी करेल आणि समतोल विकास साधेल. शेतकर्यांच्या हितासाठी हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण ग्रामीण भागात राहणार्या शेतकर्यांना आर्थिक सशक्तीकरण मिळेल.
आव्हाने आणि पुढील दिशा
या उद्दिष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी काही आव्हाने आहेत: हवामान बदल आणि दुष्काळ, पाण्याची टंचाई, बाजारभावातील चढ-उतार, अपुरी पायाभूत सुविधा. यावर मात करण्यासाठी शासन, खाजगी क्षेत्र आणि शेतकरी यांचे समन्वय आवश्यक आहे. शेतकर्यांना प्रशिक्षण, सबसिडी आणि तंत्रज्ञान उपलब्ध करून देणे, पाणी व्यवस्थापनासाठी सामूहिक प्रयत्न आणि बाजार स्थिरतेसाठी धोरणे याची गरज आहे. शेतकर्यांच्या हिताला प्राधान्य देऊनच हे आव्हान ओलांडता येईल.
महाराष्ट्रातील शेती उत्पादनाचा खर्च अन्य राज्यांच्या तुलनेने दीड ते अडीच पट इतका अधिक आहे. तसेच महाराष्ट्रातील शेतकर्याचे जीवनमानही उंचावलेले आहे. त्यामुळे जीवनावश्यक गरजा आणि शेती उत्पादनाचा खर्च यासाठी दिवसेंदिवस अधिकाधिक नफा मिळवणे शेतकर्याच्या दृष्टीने जिकिरीचे झाले आहे. यासाठी शेतकर्यांनी एकत्र येऊन इर्जिक, सावड असे परंपरागत सहयोगाने व परस्परावलंबन असलेले उपक्रम नव्या पद्धतीने राबवणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांना शासनाने प्रोत्साहन देणेही गरजेचे आहे.
महाराष्ट्रातील शेती उत्पादनातील आव्हाने स्वीकारून कोरडवाहू तसेच छोट्या बागायती शेतकर्यांनी शेतीपूरक उद्योग अंगीकारून त्याच्यासोबतच सेंद्रिय शेतीची कास धरली आहे. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 28 प्रकारच्या जैविक शेती पद्धतींचा अवलंब शेतकरी करत आहेत. या शेतकर्यांच्या केवळ प्रोत्साहन योजना राबवून उपयोग होणार नाही तर शासनाकडून राजमान्यता मिळणे अत्यावश्यक ठरते.
पूर्वजांनी जीवनाचा अत्यावश्यक भाग बनवलेले तसेच निसर्ग संवर्धनाचाही अवलंब केलेले उपक्रम आम्ही भांडवली शेतीच्या मागे तसेच लवकर नफा मिळवण्याच्या पद्धतीमुळे सोडून दिले आहेत. कोकणामध्ये आमसूल, काजू बोंड, तसेच सर्वत्र आढळणारे सिंधी, विशिष्ट भागात महू, बिब्बा तसेच असंख्य औषधी वनस्पती या नैसर्गिक साधनसंपत्तीकडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे दिसते. ही नैसर्गिक देणगी त्याचा संयमित उपयोग केल्यास जैवविविधता टिकण्यास तसेच भूमिहीन आणि अत्यल्प भूधारक कोरडवाहू शेतकर्यांसाठी उत्पन्नाचे शाश्वत स्त्रोत निर्माण होऊ शकतात. त्यामुळे या पिकांचे महत्त्व अधोरेखित होते.
त्याचप्रमाणे शासनाच्या कृषी कल्याणकारी योजना शेतकर्यांपर्यंत वेळेत पोहोचून त्याची अंमलबजावणी सुलभ करणे क्रमप्राप्त ठरते. शेतकर्यांना जागतिक हवामान बदल, कार्बन उत्सर्जन, ड्रोन, ए आय यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याबाबत अवगत करणे हे सुद्धा आवश्यक आहे. कमी खर्चाची अधिक उत्पादन देणारी निर्यातक्षम गुणवत्ता व प्रत असलेले शेती उत्पादन देणारी शाश्वत शेती पद्धती ही काळाची गरज आहे. याचा अवलंब केल्यास शेतीतील भांडवली गुंतवणूक व अन्य समस्या कमी होऊन शेतकर्यांच्या आत्महत्या कमी होतील. शेती केवळ उत्पादनाची न राहता प्रक्रिया उद्योग व निर्यातक्षम उत्पादन निर्मिती या दिशेने वाटचाल झाल्यास शेती अर्थोत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरेल आणि उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ नोकरी हे सूत्र पुन्हा प्रस्थापित होऊ शकेल. शेती आणि शेतकर्याचा आर्थिक सन्मान ही केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा मुद्दा ठरत आहे.
महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर उभे आहे. पारंपरिक शेतीपासून आधुनिक, तंत्रज्ञानाधारित आणि मूल्यवर्धित शेतीकडे होत असलेला हा बदल राज्याच्या आर्थिक प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे. एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचा 15-18% वाटा महत्त्वाचा ठरेल. 2047 पर्यंत भारताला जागतिक आर्थिक महासत्ता बनवण्यात महाराष्ट्रातील कृषी क्षेत्र निर्यात, प्रक्रिया उद्योग आणि ग्रामीण विकासाच्या माध्यमातून मोठे योगदान देईल. शेवटी, कृषी क्षेत्र हे केवळ अन्नपुरवठा करणारे क्षेत्र नसून आर्थिक विकासाचे शक्तिशाली साधन बनत आहे. योग्य नियोजन आणि अंमलबजावणीद्वारे महाराष्ट्र कृषी क्षेत्रात जागतिक स्तरावर एक आदर्श निर्माण करू शकतो. शेतकर्यांचे हित आणि राज्याची प्रगती यांचा समन्वय साधल्यास हा प्रवास यशस्वी होईल आणि महाराष्ट्र सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल.
- लेखक भारतीय किसान संघ
महाराष्ट्र प्रातांचे प्रांत संघटनमंत्री आहेत.