कालायन - विज्ञानाचा भारतीय वारसा

विवेक मराठी    30-Apr-2026
Total Views |
@प्रवीण शेटे
9373972906
 


kalyan 
‘कालायन’ हे वैदिक घड्याळ भारतीय ऋषीमुनींचे खगोलशास्त्र आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा एक अपूर्व संगम आहे. विनायक बेडेकर यांचे ‘कालायन’ हे घड्याळ केवळ भिंतीवर टांगण्याचे वेळ दाखवण्याचे साधन नसून, ते भारतीय ज्ञान परंपरेतील संगीत, आयुर्वेद आणि निसर्ग चक्र यांचा मानवी जीवनाशी असलेला संबंध दर्शवणारे एक माध्यम आहे. शिवाय उज्जैनच्या ऐतिहासिक ‘झिरो मेरीडियन’ महत्त्वाचा वारसा सांगणार्‍या या घड्याळाची गोष्ट, काळाची नवी परिभाषा मांडणारी आहे.
काळाची गती ही केवळ सेकंद आणि मिनिटांच्या काट्यात मोजता येत नाही, तर ती निसर्गाच्या, ग्रहांच्या आणि ऋतूंच्या लयीत सामावलेली असते. दुर्दैवाने, आधुनिक जीवनशैलीत आपण तांत्रिक वेळांच्या मागे धावताना ही नैसर्गिक लय हरवून बसलो आहोत. याच हरवलेल्या सूत्रांचा वेध घेत, भारतीय ऋषीमुनींचे खगोलशास्त्र आणि आजचे प्रगत तंत्रज्ञान यांचा एक अपूर्व संगम विनायक बेडेकर यांनी ’कालायन’ या वैदिक घड्याळाच्या रूपाने साकारला आहे.
 
 
भारतीय परंपरांचे गाढे अभ्यासक विनायक बेडेकर यांच्याशी संवाद साधताना ’कालायन’ या भारतीय वैदिक घड्याळाचे अनेक थक्क करणारे पैलू उलगडत गेले. ’कालायन’चा परिचय देताना बेडेकर सांगतात, ”’कालायन’ हे केवळ भिंतीवर टांगण्याचे घड्याळ नसून, ती काळाची गती समजून घेण्याची एक पद्धत आहे. ’कालायन’मध्ये ’अयन’ म्हणजे गती! भारतीय पंचांगाला अर्थात तिथी, वार, नक्षत्र, योग आणि करण यांना दृष्य स्वरूपात लोकांसमोर आणणे, हा या घड्याळाचा मुख्य उद्देश आहे. पंचांगाच्या तुलनेत ’कालायन’ हे वैदिक घड्याळ वापरणे अधिक सोपे आणि प्रभावी आहे.“
 
 
या घड्याळात नक्षत्र, राशी आणि ग्रहांची स्थिती दृश्य स्वरूपात समोर दिसते. पूर्व क्षितीजापासून सुरू होऊन पूर्ण 360 अंशात ग्रह कुठे आहेत, हे केवळ ह्या घड्याळाकडे पाहून समजते. ’कालायन’ या वैदिक घड्याळाच्या डायलमध्ये सूर्य, चंद्र, शुक्र, गुरू यांसह नऊच्या नऊ ग्रह त्यांच्या प्रत्यक्ष वर्तमानातील स्थितीनुसार दिसतात. हे ग्रह आकाशातील नक्षत्र मंडळात नेमके कुठे आहेत, हे या घड्याळात दिसेल अशा स्वरूपात मांडलेले आहे.
 
 
कालायन केवळ वेळ दाखवत नाही, तर 360 अंशांच्या रचनेत नक्षत्र आणि राशी (सायन व निरयन) यांची स्थिती दर्शवते. ग्रहांच्या खगोलीय गतीनुसार ते या नक्षत्र मंडळात फिरताना दिसतात.
 
 
या घड्याळाला प्रत्यक्ष खगोलीय गती देण्यात आली आहे, ज्यामुळे घड्याळ पाहिल्यावर आकाशात नेमकी कोणती राशी कोणत्या स्थानावर आहे, हे त्वरित समजते. त्याचप्रमाणे वापरकर्त्याच्या जीपीएस (GPS) स्थानानुसार, पूर्व क्षितिजापासून (Eastern Horizon) सुरू होऊन संपूर्ण 360 अंशांच्या परिघात राशी आणि नक्षत्रांची सध्याची स्थिती काय आहे, हे या घड्याळात दिसते. डायलवरील राशींची स्थिती समजून घेणे अधिक सुलभ व्हावे यासाठी, घड्याळाच्या खाली असलेल्या स्क्रीनवर संख्यात्मक स्वरूपात (Numeric) माहिती दिली जाते. त्यामुळे तांत्रिक गुंतागुंत न होता वापरकर्त्याला सायन आणि निरयन राशींची माहिती वाचूनही समजू शकते.
 

kalyan 
 
व्यवहारात लागणार्‍या दोन वेळा अर्थात भारतीय प्रमाणवेळ (IST), जी रेल्वे किंवा विमानाच्या नियोजनासाठी लागते, आणि स्थानिक वेळ (Local Time), जी वैयक्तिक आचार-विचारांसाठी लागते, या दोन्ही वेळा एकाच वेळी दिसतात. यांमधील 28 मिनिटांचा (किंवा स्थानानुसार बदलणारा) फरकसुद्धा दोन प्रकारे पाहता येतो. घड्याळाच्या मुख्य डायलवर स्थानिक आणि प्रमाण वेळ या दोन्ही स्थिती एकाच वेळी दर्शवल्या जातात. हे घड्याळ 24 तासांच्या रचनेनुसार असल्याने, सूर्योदय आणि काळाची गती पाहताना हा सूक्ष्म फरक लक्षात येतो.
 
 
डायलच्या खाली असलेल्या डिजिटल स्क्रीनवर संख्यात्मक स्वरूपात दोन्ही ‘वेळा’ स्पष्टपणे दिसून येतात. यामुळे वापरकर्त्याला कोणतीही आकडेमोड न करता सध्याची भारतीय प्रमाणवेळ काय आहे आणि आपल्या स्थानानुसार स्थानिक वेळ काय आहे, हे लगेच समजते. हे घड्याळ जीपीएस आणि वायफायशी जोडलेले असल्याने भारताची प्रमाणवेळ (IST) ही 82.5 अंश पूर्व रेखांशावर प्रयागराज जवळ आधारित आहे हेही समजून येते.
 
 
बेडेकरांच्या म्हणण्यानुसार कालायनचा व्यावहारिक उपयोग मॅक्रो प्लॅनिंगसाठी उदा. रेल्वे, विमान किंवा कार्यालयीन कामे ज्यात आपल्याला प्रमाण वेळेची गरज असते, तर स्वतःची दिनचर्या, आहार-विहार आणि योग-साधना यांसारख्या गोष्टींसाठी जिथे स्थानिक वेळ समजणे आवश्यक असते तिथे (Local Time) होतो.
 
 
”जेव्हा एखादी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी (उदा. मुंबईहून पुण्याला) प्रवास करते, तेव्हा घड्याळातील स्थानिक वेळ आपोआप बदलते, परंतु प्रमाणवेळ तीच राहते, ज्यामुळे हा फरक सतत अद्ययावत होत राहतो,” अशी महत्त्वपूर्ण माहिती बेडेकर यांनी दिली.
 
 
भारतीयांचे लक्ष्मीपूजन, दसरा किंवा गुढीपाडवा यांसारखे सण आणि महत्त्वाचे मुहूर्त थेट घड्याळात पाहता येतात. यामध्ये आधुनिक आणि प्राचीन एककांचा मेळ साधला असल्याने कालायन केवळ तास-मिनिटेच नाही, तर घटी-पल-विपल ही नैसर्गिक कालमापनाची एककेदेखील दाखवते, ज्यामुळे वापरकर्त्याला दोन्ही पद्धतींमधील परस्पर संबंध सहज समजतो.
 
 
’कालायन’ या वैदिक घड्याळात ’ब्राह्म मुहूर्त’ ओळखणे अत्यंत सोपे आहे. त्याविषयी बेडेकर सांगतात, ”या घड्याळाच्या 24 तासांच्या रचनेत ब्राह्म मुहूर्त, उषःकाल, सूर्योदय, निशिथ काल आणि प्रदोष काल यांसारख्या विविध कालखंडांची मांडणी समोर दिसेल अशी करण्यात आली आहे. त्यामुळे पंचांगाप्रमाणे कोणतीही आकडेमोड न करता केवळ घड्याळाकडे पाहून ब्राह्म मुहूर्त ओळखता येतो. शास्त्राप्रमाणे, सूर्योदयाच्या पूर्वीची दोन घटिका म्हणजेच 48 मिनिटे हा ’ब्राह्म मुहूर्त’ होय. हे घड्याळ याच सिद्धांतावर आधारित आहे. उदाहरणार्थ, थंडीच्या दिवसात सूर्योदय उशिरा (उदा. 6:45 वा.) होत असल्यास ’कालायन’घड्याळ त्यानुसार ब्राह्म मुहूर्त मागे सरकवून दाखवते, तर उन्हाळ्यात सूर्योदय लवकर होत असल्यास तो काळ आपोआप बदलतो.
 
 
“ ’कालायन’ या वैदिक घड्याळात ’तिथी’ मोजण्याची पद्धत सूर्य आणि चंद्र यांच्यातील अंतरावर आधारित आहे. शास्त्रानुसार, सूर्य आणि चंद्र यांच्यातील अंतराला ’तिथी’ म्हटले जाते. जेव्हा सूर्य आणि चंद्र पृथ्वीच्या सापेक्ष एकाच रेषेत किंवा एकाच दिशेला असतात, तेव्हा त्याला अमावस्या (0-0 स्थिती) म्हणतात. चंद्राची आकाशातील फिरण्याची गती ही सूर्यापेक्षा जास्त असते. जेव्हा चंद्र आपल्या गतीने सूर्यापासून 12 अंश (12 डिग्री) पुढे जातो, तेव्हा एक तिथी पूर्ण होते. अशा प्रकारे जेव्हा सूर्य आणि चंद्रामध्ये 180 अंशांचे अंतर होते, तेव्हा पौर्णिमा होते आणि जेव्हा हे अंतर 360 अंशांवर पोहोचते, तेव्हा पुन्हा दुसरी अमावस्या येते. घड्याळाच्या 24 तासांच्या रचनेत नक्षत्रांच्या चक्रात सूर्य आणि चंद्र नेमके कुठे आहेत, हे स्पष्टपणे दिसते. त्यांच्यातील हे अंतर पाहून कोणती तिथी सुरू आहे, हे वापरकर्त्याला सहज समजू शकते,“ अशी महत्त्चपूर्ण माहिती विनायक बेडेकर यांनी सांगितली.
आधुनिक काळात आपण वेळ मोजण्यासाठी तास, मिनिटे आणि सेकंद ही ’तांत्रिक’ (Technical) एकके वापरतो. या घड्याळातून दोन्ही एकके समजू शकतील. दोन घटिका म्हणजे 48 मिनिटे असे लक्षात घेता, 1 घटी म्हणजे 24 मिनिटे असे प्रमाण लक्षात येते. ’कालायन’ घड्याळाच्या डायलमध्ये तास आणि मिनिटांच्या सोबतच ‘घटी’, ’पल’ आणि ’विपल’ या एककांचे गणित दिलेले असल्याने वापरकर्त्याला प्रचलित ’ग्रेगोरियन’ वेळ आणि ’वैदिक’ वेळ या दोन्ही वेळा एकाच वेळी पाहता येतात आणि त्यांमधील परस्पर संबंध (Correlation) समजून घेणे सोपे जाते.” बेडेकरांच्या अभ्यासानुसार ब्राह्म मुहूर्त (सूर्योदयापूर्वीचे 48 मिनिटे), सूर्योदय, उषःकाल, निशिथ काल आणि प्रदोष काल यांसारख्या संकल्पना या घड्याळात सहजपणे स्पष्ट होतात.
 
 
kalyan
 
’कालायन’ घड्याळ दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत.
 
1. व्यावहारिक आणि दिशा-दर्शक : याचे महत्त्व पाहता जेव्हा हे घड्याळ दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावले जाते, तेव्हा ते दिशा-सापेक्ष (Direction Specific) बनते. घड्याळाकडे बघताना डाव्या बाजूची स्थिती (पारंपरिक घड्याळातील 9 ची जागा)पूर्व दिशा दर्शवते आणि उजवीकडील स्थिती (पारंपरिक 3 ची जागा)पश्चिम दिशा दर्शवते. यामुळे वापरकर्त्याला कोणत्याही कल्पनेशिवाय पूर्व क्षितीजावर सध्या कोणते नक्षत्र आहे, हे प्रत्यक्ष समोर स्पष्टपणे दिसते.
 
 
2. धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व : भारतीय शास्त्रानुसार, काळाचे अधिष्ठात्री दैवत महाकाल आहेत आणि त्यांचे प्रशासक यमराज आहेत, जे दक्षिण दिशेचे स्वामी मानले जातात. काही आधुनिक वास्तू सल्लागार दक्षिणेच्या भिंतीवर घड्याळ लावू नये असा सल्ला देतात; परंतु विनायक बेडेकर यांच्या मते, ”या वैदिक घड्याळाच्या बाबतीत ही संकल्पना वेगळी असून दक्षिण दिशा हीच या घड्याळासाठी सर्वात महत्त्वाची आहे.”
 
पारंपरिक 12 तासांच्या घड्याळाऐवजी यात 24 तासांची रचना असून दिवसाची सुरुवात सूर्योदयापासून (सकाळी 6 ची सरासरी वेळ) दाखवली जाते.
 
 
कालायन घड्याळाचा संगीत व आयुर्वेदाशी संबंध आहे असे सांगताना बेडेकर म्हणाले, “भारतीय शास्त्रीय संगीतातील राग आणि काळ यांचा जवळचा संबंध असून, तो ’कालायन’ घड्याळाच्या संकल्पनेत स्पष्ट होतो. भारतीय संगीतामध्ये प्रत्येक राग हा दिवसाच्या किंवा रात्रीच्या एका विशिष्ट प्रहरात गाण्यासाठी किंवा वाजवण्यासाठी निश्चित केलेला आहे. ही संकल्पना केवळ मनोरंजनासाठी नसून ती निसर्गचक्राशी जोडलेली आहे. रागांचा काळाशी असलेला हा संबंध ’संगीत रत्नाकर’सारख्या प्राचीन संगीत ग्रंथांवर आणि जुन्या संगीत साहित्यावर आधारित आहे. जरी गेल्या काही वर्षांच्या कालखंडात यामध्ये काही प्रमाणात तफावत आली असली, तरी मूळ शास्त्रीय आधार आजही महत्त्वाचा मानला जातो.”
 
 
प्रत्येक सजीवाचे एक ’जैविक घडयाळ’ असते. भारतीय परंपरेने आयुर्वेद, योग आणि संगीत यांचा मानवी शरीराच्या घड्याळाशी (दिनचर्येशी) असलेला समन्वय विचारात घेतला आहे. त्याला अनुसरून ’कालायन’ घड्याळाच्या येणार्‍या नवीन सुधारित आवृत्तीमध्ये (Upgradation) भारतीय संगीतातील रागांच्या वेळेची माहिती समाविष्ट केली जाणार आहे. साधारण एक ते दीड वर्षांत या घड्याळाद्वारे कोणत्या वेळी कोणता राग गायला जावा, याची माहिती दृक-श्राव्य किंवा लिखित स्वरूपात उपलब्ध करून देण्याचे बेडेकर यांचे नियोजन आहे.
 
 
* थोडक्यात सांगायचे तर, ’कालायन’ घड्याळ केवळ वेळ दाखवण्याचे साधन नसून, ते भारतीय ज्ञान परंपरेतील संगीत, आयुर्वेद आणि निसर्ग चक्र यांचा मानवी जीवनाशी असलेला संबंध दर्शवणारे एक माध्यम आहे.
 
 
हे घड्याळ येत्या दोन ते तीन वर्षांत एक स्वतंत्र डिजिटल प्लॅटफॉर्म म्हणून विकसित केले जाणार असून याद्वारे भारतीय ज्ञान परंपरेशी संबंधित माहिती आधुनिक जीवनशैलीला अनुरूप अशा स्वरूपात प्रसारित केली जाईल.
 
 
आत्ताच्या कालायन घड्याळाच्या सुधारित आवृत्तीत आयुर्वेदिक दिनचर्या आणि ऋतूचक्र यांना समाविष्ट करण्यासाठी साधारण एक ते दीड वर्षांचा कालावधी लागेल. या सुधारित आवृत्तीमुळे लोकांची आयुर्वेदाबद्दलची समज वाढत जाईल आणि त्यांना निसर्गचक्राशी जुळवून घेणे सोपे होईल. या माहितीचा उपयोग करून वापरकर्त्याला आपली आयुर्वेदिक दिनचर्या, आहार आणि विहार अधिक चांगल्या प्रकारे ठरवता येईल.
 
 
प्रचलित ग्रेगोरियन कॅलेंडरला न नाकारता, भारतीय ज्ञान परंपरेचे ’प्रत्यक्ष उपयोजन’ (Applied Science) म्हणून हे घड्याळ लोकांसमोर आणले जात आहे
 
 
थोडक्यात, ”हे घड्याळ भविष्यात अशा प्रकारे विकसित केले जाईल की ज्यामुळे वापरकर्त्याला केवळ वेळच नाही, तर ऋतूंनुसार आपल्या जीवनशैलीत कोणते बदल करावेत याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन लाभेल,” असे बेडेकर यांचे मत आहे.
 
 
1 एप्रिल 2026 रोजी उज्जैन येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या घड्याळाचे औपचारिक उद्घाटन करून ते लोकार्पण करण्यात आले. उज्जैनला जागतिक ’झिरो मेरिडियन’ (Zero Meridian) म्हणून पुन्हा प्रस्थापित करण्याचा विचारही यामागे आहे. भारतीय संस्कृतीत हजारो वर्षांपासून उज्जैनला ’झिरो मेरीडियन’ गृहीत धरूनच भारतीय पंचांग बनवले जात होते.
 
खगोलशास्त्रीय गणना आणि काळाची गती मोजण्यासाठी उज्जैन हे मुख्य केंद्र होते. 1880च्या दशकात जेव्हा ब्रिटिशांनी भारतावर राज्य करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना झिरो मेरीडियनचे महत्त्व समजले. ग्रीनिच मीन टाईम (GMT)ची संकल्पना 1885 मध्ये आली. ब्रिटिश हे शासनकर्ते होते आणि त्यांना स्वतःला ’जगाचे नियंते’ म्हणून प्रस्थापित करायचे होते. त्यामुळे त्यांनी उज्जैनचे महत्त्व ओळखून, मूळची झिरो मेरीडियन उज्जैनवरून हलवून ती स्वतःच्या देशात म्हणजेच ग्रीनिच (Greenwich) येथे नेली. नुकत्याच उज्जैनमध्ये पार पडलेल्या ’महाकाल: द मास्टर ऑफ टाईम’ या आंतरराष्ट्रीय परिषदेचा एक मुख्य उद्देश ’उज्जैनला पुन्हा जागतिक झिरो मेरीडियन म्हणून प्रस्थापित करणे’ (Reclaiming Ujjain Global Zero Meridian) हा होता. थोडक्यात सांगायचे तर, आता ’कालायन’ सारख्या उपक्रमांतून उज्जैनचे ऐतिहासिक महत्त्व पुन्हा समोर आणले जात आहे.
 
 
विनायक बेडेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार,’कालायन’ घड्याळाची मनगटी आणि घरगुती आवृत्ती लवकरच उपलब्ध होणार आहे. घरामध्ये वापरण्यासाठीची आवृत्ती साधारणपणे जुलै महिन्यापर्यंत उपलब्ध होण्याची शक्यता असून ते साधारण एक ते अडीच फुटांपर्यंतच्या विविध आकारात असेल. सध्या या घड्याळाचे ’कम्युनिटी सेंटर मॉडेल’ (शाळा, मंदिरे किंवा मोठ्या संस्थांसाठी) उपलब्ध असून येत्या दोन महिन्यांत त्याचा प्रसार अधिक वेगाने होईल.’
 
 
या निर्मितीमागे बेडेकर यांचे अनेक वर्षांचे सातत्यपूर्ण संशोधन आहे. यासाठी त्यांनी ’सूर्य सिद्धांत’, ’सिद्धांत शिरोमणी’ आणि भास्कराचार्यांचे ’लीलावती’ यांसारख्या प्राचीन ग्रंथांचा आधार घेतला आहे.