स्थैर्यातून सृष्टी - देवगढ येथील अनंतशयन शिल्पपट्ट

शिल्पसंवाद

विवेक मराठी    04-Apr-2026   
Total Views |

Devgarh
देवगढच्या मंदिरातला अनंतशयन शिल्पपट्ट केवळ एखाद्या पौराणिक कथेचे दगडात कोरलेले दृश्य रूपांतर नाही, तर तो आहे गुप्तकालीन वैष्णव तत्त्वज्ञानाचा अत्यंत सुसंस्कृत, विचारपूर्वक घडवलेला शिल्पात्मक अनुवाद, जिथे पुराणकथा, तत्त्वमीमांसा आणि तत्कालीन राजकीय आणि सामाजिक नीती एकाच शिल्पात एकवटलेली दिसते. तसेच अनंतशयन शिल्पपट्ट आपल्याला हे शिकवतो की सृष्टीचा खरा आधार गती नाही, तर स्थैर्य आहे; संघर्ष नाही, तर संतुलन आहे.
गेले चार आठवडे आपण उत्तर प्रदेशमधील झांशी जवळच्या देवगढ येथील दशावतार मंदिरातली विविध शिल्पे आणि त्यांचा अर्थ जाणून घेतोय. पाचव्या शतकात बांधलेले गुप्तकालीन मंदिर आपल्या शिल्पकलेसाठी केवळ भारतातच नव्हे, तर संपूर्ण जगात विख्यात आहे. मी जेव्हा काही वर्षांपूर्वी ह्या मंदिरात गेले तेव्हा मला काय बघू आणि काय नको असं झालं होतं, इतकी इथली शिल्पे अप्रतिम आहेत. इथल्या नाजूक कोरलेल्या द्वारशाखा, मंडोवरावरील शिल्पपट्टांचे विषय, त्यांची अभिव्यक्ती, या शिल्पांमागचा धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आशय सारेच थक्क करणारे आहे. गेल्या तीन आठवड्यात आपण देवगढ इथल्या मंदिरातली देवकी-वसुदेव-कृष्ण, गजेंद्रमोक्ष आणि नर-नारायण ही शिल्पे समजून घेतली.
 
 
आज आपण ओळख करून घेणार आहोत ती इथल्या सर्वात प्रसिद्ध अशा अनंतशयन विष्णू ह्या शिल्पपट्टाची. तीन स्तरांमध्ये तब्बल सोळा वेगवेगळ्या प्रमुख आकृत्या असलेला हा शिल्पपट्ट म्हणजे भारतीय शिल्पकलेमधल्या अभिजात कॉम्पोजिशनचा एक उत्तम नमुना आहे. ह्या शिल्पपट्टाचे वर्णन सहसा गाईड पुस्तकातून ‘शेषावर शयन करणारा विष्णू’ ह्या इतक्याच सोप्या शब्दांत आणि एका ओळीत केले जाते. ते वर्णन चुकीचे नाही, पण फार सहजीकरण केलेले आणि अपुरे आहे. देवगडच्या मंदिरातला हा शिल्पपट्ट केवळ एखाद्या पौराणिक कथेचे दगडात कोरलेले दृश्य रूपांतर नाही, तर तो आहे गुप्तकालीन वैष्णव तत्त्वज्ञानाचा अत्यंत सुसंस्कृत, विचारपूर्वक घडवलेला शिल्पात्मक अनुवाद, जिथे पुराणकथा, तत्त्वमीमांसा आणि तत्कालीन राजकीय आणि सामाजिक नीती एकाच शिल्पात एकवटलेली दिसते.
 
 
कलेच्या दृष्टीने पाहिले, तर हा शिल्पपट्ट तीन आडव्या स्तरांत विभागलेला आहे. ही रचना केवळ कथा सांगण्यासाठी नाही, तर दैवी आणि मानवी ह्या दोन स्तरांमधले अंतर दाखवण्यासाठी वापरलेली आहे. सर्वात वरच्या स्तरात विष्णूच्या अंगातून निघणार्‍या कमळातून प्रकट होणारे ब्रह्म देव, नंदीवरचे शिव-पार्वती, ऐरावतावरचा इंद्र आणि मोरावरचा कार्तिकेय कोरलेले आहेत. मधल्या स्तरात ह्या शिल्पातलं मुख्य नाट्य आहे, योगनिद्रेत असलेले श्रीविष्णू आणि त्यांचे पाय चुरणारी देवी लक्ष्मी.
 
 
यातली श्रीविष्णूची मूर्ती नीट निरखा, ते अनंतशेषावर झोपलेले आहेत, पण शिल्पकाराने ना त्याचा देह झोपेने शिथिल झालेला दाखवलाय, ना जागेपणी असतो तसा ताणलेला. योगनिद्रा म्हणजे विष्णुपुराण आणि भागवत पुराण यांत वर्णन केलेली श्रीविष्णूची ध्यानमग्न अवस्था, जिथे सृष्टी क्षणभर थांबते, स्वतःत एकवटते, आणि पुन्हा प्रकट होण्यासाठी सज्ज होते. त्यांचे पाय चुरणारी लक्ष्मी बघा, ती नुसतीच सेवाभाव प्रकट करत नाहीये. तिच्या डाव्या हाताने ती श्रीहरीची पोटरी दाबतेय, तर उजव्या हाताच्या बोटांनी ती श्रीविष्णूच्या पायाच्या अंगठ्यावरच्या एका विवक्षित मर्मबिंदूवर दाब देतेय. आयुर्वेद सांगतो, की या पायाच्या तळव्यावरच्या ह्या काही मर्मबिंदूंमधूनच ऊर्जा वरच्या दिशेने प्रवाहित होते.
 
 
ही नुसती एका पत्नीने पतीची केलेली सेवा नाही तर इथे साक्षात देवी लक्ष्मी विश्वपालकाचे पोषण करत आहे. देवी लक्ष्मीच्या या प्रतिमेत शिल्पकाराने दाखवलेली विलक्षण कोमलता पहा, लक्ष्मींचे अर्धवट मिटलेले डोळे, स्थिर व संयत अशी लांबसडक बोटे, भक्ती, सेवा, आणि शृंगार यांचे एकत्रित प्रकटीकरण करणारी तिची संपूर्ण देहबोली आणि श्रीहरींच्या सुदृढ पोटरीचे ते देखणे वळण, ज्याला देवी अत्यंत प्रेमाने स्पर्श करते आहे. हे सगळे कठीण अश्या वालुकाश्मात कोरले आहे यावर विश्वास बसणे कठीण जाते आपल्याला.
 
 
श्रीविष्णू ज्या अनंतशेषनागाच्या देहावर रेलून योगनिद्रेत आहेत त्या अनंताच्या देहाची वेटोळी देवांची शय्याही आहेत आणि आधारही. शेषनागाच्या सर्व फण्या इथे धोक्याचे नव्हे, तर संरक्षक छायेचे रूप घेऊन श्रीविष्णूच्या मस्तकावर झुकल्या आहेत. या शिल्पपट्टाचा स्थायीभाव हा शांत रस आहे, काळच जणू इथे थबकला आहे. या शिल्पपट्टाच्या मधल्या स्तरात नाट्य नाही, कसली घाई नाही. देवांच्या, देवी लक्ष्मीच्या, अनंत शेषाच्या अनेक मुखांवरच्या, अगदी पाठीमागे उभ्या असलेल्या देवीच्या दासीच्या चेहेर्‍यावरच्या सुद्धा सार्‍या भावछटा अगदी शांत आहेत.
 
 
या शिल्पात नाट्य घडतेय ते सर्वात खालच्या स्तरात, ज्यात सहा आकृत्या दाखवलेल्या आहेत. पाच पुरुष आणि एक स्त्री. त्यातले डावीकडचे दोन पुरुष आत शिरू पाहत आहेत आणि उजवीकडचा पहिला पुरुष त्यांना अटकाव करण्यासाठी तलवार उपसू पाहतोय असे शिल्पांकन आहे. ह्या मूर्ती कोणाच्या आहेत ह्या विषयावर अभ्यासकांचे एकमत नाही. देवगढचे गाईड तुम्हाला सांगतात की या पाच पांडव आणि द्रौपदीच्या मूर्ती आहेत, पण त्यांची देहबोली पाहता हे पटण्यासारखे नाही.
 
 
 
काही अभ्यासकांच्या मते डावीकडील आत शिरू पाहणारे दोघे हे मधू-कैटभ नावाचे दानव आहेत जे योगनिद्रेतल्या श्रीविष्णूच्या कानातील मळापासून निर्माण झाले. विष्णू देव योगनिद्रेत असताना त्यांच्या देहातून एक कमळ उमलले आणि त्या कमळावर सृष्टीकर्ता ब्रह्मा बसून विश्वनिर्मितीचा विचार करू लागला. त्या कमळावर विष्णूंनी पाण्याचे दोन थेंब निर्माण केले. त्यापैकी एक थेंब मधासारखा गोड होता, त्या थेंबापासून मधु उत्पन्न झाला आणि त्याच्यात तमस म्हणजे जडत्व हा गुण अधिष्ठित होता. दुसरा थेंब कठीण होता, त्यापासून कैटभ जन्माला आला आणि त्याच्यात रजस म्हणजे क्रियाशीलता हा गुण अधिष्ठित होता. सत्त्वाने सृष्टी संतुलित होण्याआधी रज आणि तम जन्मला आहे तो हा बिंदू आहे. हे मधू-कैटभ श्रीविष्णूची योगनिद्रा भंग करू पाहत आहेत आणि श्रीविष्णूचे आयुधपुरुष, सुदर्शन चक्र, पांचजन्य शंख, नंदक खड्ग आणि कौमोदकी गदा, जी स्त्री रूपात दाखवली आहे, हे त्यांना अटकाव करू पाहत आहेत. मला हे स्पष्टीकरण जास्त सयुक्तिक वाटते.
 
 
जॉर्ज मिचेलसारखे भारतीय मूर्तिशास्त्राचे अभ्यासक सांगतात की गुप्तकालीन मंदिरशिल्पे ही नुसत्या पुराकथा सांगत नाहीत, तर ती तत्कालीन धर्मतत्त्वज्ञान उलगडून दाखवत असतात. गुप्तकालीन शिल्पकलेत आदर्श राजेसत्तेचे प्रतिबिंब दिसते. संयम, स्थैर्य, आणि जबाबदारीने राबवलेली राजसत्ता. खालच्या स्तरात हे नाट्य घडत असले तरी मधल्या स्तरातले श्रीविष्णू गाढ अशा योगनिद्रेतच आहेत.
 
 
देवगढ येथील दशावतार मंदिरातला अनंतशयन शिल्पपट्ट आपल्याला शिकवतो की सृष्टी नेहमी गोंधळातूनच जन्माला येते, पण त्या गोंधळावर मात करण्यासाठी हिंसा किंवा घाई आवश्यक नसते. खरी दैवी सत्ता ही शांत, स्थिर आणि अंतर्मुख असते. श्रीविष्णू येथे युद्ध करत नाहीत, उठून उभे राहत नाहीत, आवेशाने कृती करत नाहीत. खालच्या स्तरात मधु-कैटभांच्या रूपाने असंतुलित रजस-तमस शक्तींचे नाट्य घडत असले, तरी मधल्या स्तरातली विष्णूंची योगनिद्रा भंग होत नाही. हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.
 
या शिल्पातून गुप्तकालीन राजकीय नीतीचाही स्पष्ट संकेत मिळतो. आदर्श राजा तोच, जो गोंधळाने अस्वस्थ होत नाही, जो संकटातही संयम राखतो, आणि जो सत्ता प्रदर्शनासाठी नव्हे, तर संरक्षण आणि पोषणासाठी वापरतो. म्हणूनच देवगढचा विष्णू हा केवळ देव नाही; तो आहे तत्कालीन समाजासाठी मांडलेला आदर्श नेतृत्वाचा नमुना. अनंतशयन शिल्पपट्ट आपल्याला हे शिकवतो की सृष्टीचा खरा आधार गती नाही, तर स्थैर्य आहे; संघर्ष नाही, तर संतुलन आहे. म्हणूनच हा शिल्पपट्ट पाहताना आपल्याला ‘विष्णू शेषावर झोपले आहेत’ असे एका वाक्यात त्याचे वर्णन करता येत नाही.
 
 
देवगढ इथल्या दशावतार मंदिरातील शिल्पसंवादाच्या प्रवासाचा शेवट करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या मंदिरातली शिल्पे केवळ दगडात कोरलेल्या पौराणिक कथा नाहीत, तर एका सुसंस्कृत, विचारशील संस्कृतीची दृश्य तत्त्वमीमांसा आहेत. देवकी-वसुदेवाच्या त्यागाचा करुण क्षण, गजेंद्रमोक्षाची आर्त हाक, नर-नारायणातील शांत तपश्चर्या आणि अनंतशयनातील स्थैर्य, या सगळ्या शिल्पांमधून गुप्तकालीन भारताचा एक स्पष्ट राजकीय आणि सामाजिक भावनावकाश उमटतो. ही शिल्पे आपल्याला शिकवतात की सत्ता म्हणजे केवळ आक्रमकता नव्हे आणि धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नव्हे. देवगढचे अनाम शिल्पकार आपल्या कलेमधून आजही आपल्याला हाच संदेश देत आहेत.

शेफाली वैद्य

शेफाली वैद्य या एक लेखिका, सोशल मीडिया प्रभावक आणि हिंदुत्ववादी विचारसरणीच्या भाष्यकार आहेत, ज्या राजकारण, संस्कृती आणि सामाजिक विषयांवर परखड मत मांडतात; त्या विशेषतः '#NoBindiNoBusiness' मोहिमेसाठी ओळखल्या जातात आणि त्यांनी विविध माध्यमांवर लेखन केले आहे, तसेच त्या हिंदू स्थापत्यशास्त्र आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासक म्हणूनही ओळखल्या जातात.