आत्मिक समाधानाची अनुभूती

विवेक मराठी    04-Apr-2026
Total Views |
@अश्विनी विवेक शिऊरकर
rss 100 years
rss 100 years
संघकार्यातून माझे व्यक्तिमत्व घडते आहे आणि मला एक प्रकारे देशासाठी फूल ना फुलाची पाकळी काम करण्याचे समाधान मिळते आहे. संघ शताब्दीनिमित्त संघाच्या वेगवेगळ्या आयामांतून बरेच उपक्रम सुरू आहेत. यानिमित्त मी सर्वांनाच आवाहन करते की, त्यांनीदेखील संघाच्या माध्यमातून आपल्या रुचीनुसार यथाशक्ती सहभाग घ्यावा जेणेकरून तुम्ही देखील एका आत्मिक समाधानाची अनुभूती घेऊ शकाल.
खरं म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबाबत मी अगदीच अनभिज्ञ नव्हते. माझ्या माहेरी संघाबद्दल, त्यांच्या कार्याबद्दल आदर आहे. परंतु प्रत्यक्षात संघकार्यात कुणी नाही.
 
माझे लग्न होऊन मी सासरी आले. माझे सासरे नियमित शाखेत जात असत. त्यांचा दिनक्रम अगदी ठरलेला होता. थंडी असो की पाऊस त्यांचा शाखेचा नित्यक्रम कधी चुकत नव्हता. त्यांची स्वयंशिस्त घराला देखील न कळत एक शिस्त लावत होती. त्यांच्या संस्कारात वाढलेले माझे यजमान देखील बालपणापासून शाखेत जात होते, त्यांनी संघाचे वर्गही केले आणि संघात वेगवेगळे दायित्व घेऊन काम करत आहेत. दसरा मेळाव्यातील संचलनामध्ये सासरे आणि यजमानांना बघून अभिमानाने ऊर भरून येतो.
 
संघातील कित्येक जणांची घरी उठबस असे. मोठ्या पदावरच्या व्यक्तीसुद्धा अतिशय साधेपणाने राहतात, वागतात... जसे की एक स्वयंसेवक आणि संघातील मोठा पदाधिकारी, ज्यांच्याकडे बरेच दायित्व आहेत ते एकसारखेच आहेत, कुणालाही कुठेही पदाचा गर्व नाही हे नव्याने पाहायला, शिकायला मिळाले.
 
 
संघातील सहकारी किंवा कुणीही आले तरी त्यांची कुटुंबियांशी ओळख करून दिली जाते ही गोष्ट मला फार चांगली वाटते. सर्वजण आपापले व्यवसाय, नोकरी सांभाळून संघाची कामं करत असतात. यामुळे घरी येणार्‍यांप्रती एक आदरभाव निर्माण होतो. यजमानांना संघकार्यासाठी जास्तीचा वेळ द्यावा लागला तरी ते चांगल्या व्यक्तींसोबत आहेत आणि एक प्रकारची देशसेवाच करत आहेत हा विश्वास असतो.
 
माझे यजमान बर्‍याच गोष्टींबद्दल सांगत असतात. एखादा कार्यक्रम घेतला तर आधी पूर्वतयारी, प्रत्यक्ष काम करणार्‍या व्यक्तींसोबत काही नवीन स्वयंसेवक पण असतात जेणेकरून ते पुढच्या वेळेसाठी तयार होतात. कार्यक्रमानंतरची बैठक यामध्ये कार्यक्रमाचा लेखाजोखा, व्यवस्था कशी झाली, अनावश्यक खर्च कुठे टाळता येईल, ज्यांनी काम चोख केले त्यांच्या कामाची दखल घेणे, नवीन स्वयंसेवकांना बरेचदा त्यांच्या घरी भेट देऊन प्रोत्साहन देणे वैगेरे अनेक आयामांनी एका कार्यक्रमाचा विचार केला जातो. किती चांगली पद्धत आहे ही! यामुळे स्वयंसेवकामध्ये नकळत शिस्त अंगी बाणली जाते.
 
 
मी एक स्थापत्य अभियंता(civil engineer)आहे. मी स्वभावाने मितभाषी, त्यात माझे काम म्हणजे computerवर structural drawings काढण्याचे. यामुळे फारसं कुणासमोर बोलण्याची, present करणार्‍याची वेळ माझ्यावर कधी आली नाही. माझ्या मुली संभाजीनगरमधील ओंकार बालवाडी, आणि नंतर ओंकार विद्यालयामध्ये शिकत होत्या/आहेत. ही शाळा डॉ. संजीव सावजी सर आणि मधुश्री सावजी ताईंनी सुरू केलेली आहे. त्यातून आदरणीय मधुश्री सावजीताईंच्या मार्गदर्शनात आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासाने विद्या भारतीच्या एका कार्यशाळेच्या निमित्ताने मी वेगवेगळ्या गावी गेले. ती कार्यशाळा विद्या भारती आणि वराहमिहिर सायन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली होती. यामधे वेगवेगळ्या गावी अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांना एकत्रित करून भारतीय शास्त्रज्ञांबद्दल (अगदी भास्कराचार्य, महर्षी कणाद पासून)माहिती द्यायची होती आणि काही प्रयोग सादर करायचे होते. त्यावेळी मी प्रथमच पाचशे विद्यार्थ्यांसमोर माहिती आणि प्रयोग सादर केले. मला कधी वाटले नव्हते मी हे करू शकेन पण सावजीताईंनी दाखवलेल्या विश्वासाने ते शक्य झाले. कार्यक्रमानंतर अनेक विद्यार्थी, शिक्षक येऊन भेटले. पहिल्याच दिवशी एवढं समाधान मिळालं की त्यासाठी शब्दच नाहीत. या कार्यशाळेसाठी मी प्रचितीताई, ज्योतीताई जोशी आणि वराहमिहिरच्या प्रतिमा ताईंसोबत धुळे, अहमदपूर, भडगावला गेले होते. विद्या भारतीच्या या ताईंनी मला पहिल्याच भेटीत आपलंसं केलं. माझ्याशी त्या अगदी आपलेपणाने बोलायच्या. एका कार्यशाळेला आमच्यासोबत विद्या भारतीचे मोठे पदाधिकारी मा. शेषाद्री डांगे (आण्णा) आले होते. कार्यशाळा संपल्यानंतर त्यांनी मला आवर्जून सांगितले की, तुझ्या या कामाचा जो आनंद, समाधान चेहर्‍यावर दिसतं आहे तो टिकण्यासाठी विद्या भारतीच्या एखाद्या विषयाचा अभ्यास सुरू कर आणि एवढंच नाही तर त्यांची जेव्हा जेव्हा भेट झाली त्यावेळी याबद्दल त्यांनी विचारणा केली.
 
 
आता सध्या संघ शताब्दी वर्षानिमित्त विद्या भारतीचा सप्तशक्ती संगम हा मातृशक्तीसाठीचा कार्यक्रम सुरू आहे. यावेळी देखील आम्हां सामान्य कार्यकर्त्यांना सावजीताई, अर्चनाताई, अनघाताई, गौरीताईंनी वक्ता म्हणून तयार केले. आणि परत एकदा त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मी वेगवेगळ्या शाळांमध्ये कार्यक्रमाच्या आयोजनापासून सुरुवात करून वक्ता म्हणून विद्या भारतीचे विषय आणि विचार मांडायला लागले.
 
 
या संघकार्यातून माझे व्यक्तिमत्व घडते आहे आणि मला एक प्रकारे देशासाठी फूल ना फुलाची पाकळी काम करण्याचे समाधान मिळते आहे. माझ्या कुटुंबातूनही यासाठी प्रोत्साहन तर आहेच, शिवाय माहेर व सासरच्या नातेवाईकांचे आशीर्वादही हे काम करत राहण्याची सतत प्रेरणा देतात.
 
मी सर्वांनाच असे आवाहन करते की त्यांनीदेखील संघाच्या माध्यमातून आपल्या रुचीनुसार यथाशक्ती सहभाग घ्यावा जेणेकरून तुम्ही देखील एका आत्मिक समाधानाची अनुभूती घेऊ शकाल.