क्रीडा पत्रकार - खेळाची कथा सांगणारे शब्दवीर

Total Views |
 
sports
क्रीडा पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही, तर एक जबाबदारी आहे. खेळातील सत्य, भावना आणि प्रेरणा जगासमोर मांडण्याचे काम या क्षेत्रात केले जाते. जर तुम्हाला खेळाची आवड, लेखनाची ताकद आणि सत्य शोधण्याची जिद्द असेल, तर क्रीडा पत्रकारिता तुमच्यासाठी एक उत्तम, रोमांचक आणि प्रभावी करिअर ठरू शकते.
क्रीडा पत्रकारिता म्हणजे खेळाशी संबंधित बातम्या, विश्लेषण, मुलाखती आणि कथा लोकांपर्यंत पोहोचवणे. क्रीडा पत्रकार हा फक्त बातमी देणारा नसतो, तर तो खेळाडूच्या प्रवासाचा साक्षीदार, दुवा आणि कधी कधी प्रेरणादाता असतो.
 
 
उदा. Indian Premier Leagueमध्ये एखाद्या खेळाडूने शतक ठोकले, तर क्रीडा समालोचक त्या क्षणाचे वर्णन करतो; पण पत्रकार त्या खेळाडूच्या मागील संघर्ष, सराव आणि प्रवासाची सखोल कथा सांगतो.
 
 
अनेक प्रतिभावान खेळाडू स्थानिक किंवा जिल्हास्तरावर चमकत असतात, पण त्यांना त्याहून वरच्या स्तरावर येण्यासाठी संधी मिळत नाही. अशा खेळाडूंना पत्रकार लोकलपासून नॅशनल पर्यंत पोहोचविण्यासाठी मदत करतो. उदा. महेंद्र सिंग धोनी यांच्याबद्दल सुरुवातीला स्थानिक पत्रकारांनी त्यांच्या आक्रमक फलंदाजीबद्दल लेख लिहिले. या कव्हरेजमुळे त्यांची ओळख मोठ्या निवड समित्यांपर्यंत पोहोचली.
 
 
प्रत्येक खेळाडूच्या मागे संघर्षाची एक मोठी कथा असते.
 
उदा. मेरी कोम यांच्या आयुष्यातील अडचणी, कष्ट आणि जिद्द यांची कथा. ती पत्रकारांनी जगासमोर आणली. त्यामुळे त्या केवळ खेळाडू न राहता लाखो लोकांसाठी प्रेरणास्थान बनल्या.
 
 
* क्रीडा पत्रकार खेळाडूला रोल मॉडेल बनवतो.
 
कधी कधी खेळाडूची उत्कृष्ट कामगिरीही दुर्लक्षित राहते. अशावेळी पत्रकार ती लोकांसमोर आणतो.
 
उदा., नीरज चोप्रा यांच्या सुरुवातीच्या यशाबद्दल पत्रकारांनी सातत्याने लेख लिहिले, ज्यामुळे त्यांच्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष गेले.
 
 
* पत्रकारामुळे खेळाडूची कामगिरी योग्य पातळीवर पोहोचते.
 
क्रीडा पत्रकार केवळ कौतुकच करत नाही, तर आवश्यक तेव्हा रचनात्मक टीकाही करतो.
 
 
उदा., एखाद्या संघाच्या सलग पराभवानंतर पत्रकार त्यातील कमतरता दाखवतो-जसे की फिटनेस, रणनीती किंवा निवड.
 
 
* ही टीका खेळाडू आणि संघाला सुधारण्यासाठी मदत करते.
 
 
क्रीडा पत्रकार खेळाडू आणि समाज यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहे.
 
* एका लेखाने संपूर्ण आयुष्य बदलू शकते!
 
नामांकित क्रीडा पत्रकारांच्या यादीतील एक महत्त्वाचे नाव म्हणजे;
 
द्वारकानाथ संझगिरी ज्यांनी क्रीडा पत्रकारितेला केवळ रिपोर्टिंगपुरते मर्यादित ठेवले नाही, तर त्याला साहित्यिक आणि भावनिक उंची दिली. विशेषतः क्रिकेटवरील त्यांच्या लेखनात माहितीबरोबरच विनोद, आठवणी आणि मानवी पैलू यांचा सुंदर मिलाफ असायचा.
 
 
उदा. त्यांनी सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडुलकर यांच्यावर लिहिताना केवळ आकडे सांगितले नाहीत, तर त्यांच्या खेळामागील मानसिकता, शिस्त आणि प्रवास उलगडून दाखवला.
 
 
तसेच, सुनंदन लेले यांनी क्रीडा पत्रकारिता, समालोचन आणि विश्लेषण या तिन्ही क्षेत्रांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते विशेषतः क्रिकेटमधील सखोल ज्ञान, स्पष्ट मत आणि निर्भीड विश्लेषणासाठी ओळखले जातात.
 
 
क्रिकेट पत्रकारितेत आणखी एक मोठं नाव म्हणजे अयाज मेमन. त्यांनी अनेक महत्त्वाच्या सामन्यांचे विश्लेषण करून खेळाडूंच्या कामगिरीवर प्रकाश टाकला आणि त्यांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.
 
 
भारतातील आघाडीचे क्रीडा लेखक बोरीया मजुमदार यांनी अनेक खेळाडूंच्या जीवनावर पुस्तके लिहून त्यांच्या संघर्षकथांना जागतिक स्तरावर पोहोचवले. त्यांच्या लेखनामुळे अनेक खेळाडूंना व्यापक प्रसिद्धी मिळाली.
 
 
क्रीडा पत्रकार हे खेळाची कथा सांगणारे शब्दवीर आहेत.
 
 
खेळ जिंकणारे खेळाडू असतात, पण त्या विजयाची कथा जगापर्यंत पोहोचवणारे असतात क्रीडा पत्रकार. मैदानावर जे घडते तो फक्त स्कोअर नसतो, तर त्यामागे असतो संघर्ष, भावना, रणनीती आणि इतिहास. हे सर्व जिवंतपणे मांडण्याचे काम क्रीडा पत्रकार करतात.
 
 
क्रीडा पत्रकाराची भूमिका ही एखाद्या सामन्याविषयी माहिती देण्यापुरती मर्यादित नसून, संपूर्ण सामन्यांचे वृत्तांकन करणे, खेळाडू व प्रशिक्षकांच्या मुलाखती घेणे, आकडेवारी व योग्य विश्लेषण मांडणे, पडद्यामागील कथा शोधणे आणि डिजिटल कंटेंट (ब्लॉग, व्हिडिओ, सोशल मीडिया) तयार करणे हे सर्व असते.
 
 
उदा. भारतीय क्रीडा पत्रकार संजीव मुखर्जी यांनी IPL मधील मोठ्या वादावर सखोल रिपोर्टिंग करून मोठा प्रभाव निर्माण केला.
 
 
जर तुम्हाला क्रीडा क्षेत्राची आवड असेल आणि त्याच बरोबर उत्कृष्ट लेखन आणि भाषाशैली असेल, खेळाचे सखोल ज्ञान, संशोधन आणि विश्लेषण क्षमता, संवाद कौशल्य, डिजिटल मीडिया स्किल्स (SEO, सोशल मीडिया), निष्पक्षता आणि नैतिकता अशी आवश्यक कौशल्ये जर तुमच्यात असतील तर अशांना ह्या व्यवसायाचे अनेक फायदे होऊ शकतात.
 
 
1. ग्लॅमर आणि ओळख: मोठ्या स्पर्धांमध्ये काम करण्याची संधी.
 
2. प्रवासाची संधी : देश-विदेशात सामने कव्हर करता येतात.
 
3. नेटवर्किंग : खेळाडू, प्रशिक्षक, अधिकारी यांच्याशी संपर्क
 
4. सर्जनशीलता : लेखन, व्हिडिओ, पॉडकास्ट यामध्ये काम करण्याची संधी.
 
 
5. प्रभाव: समाजात क्रीडा विषयावर मत तयार करण्याची ताकद निर्माण होते.
 
 
अधिकृत क्रीडा पत्रकार होण्यासाठी पुढील पदवीधर शिक्षण आवश्यक आहे.
 
 
BJMC (Bachelor in Journalism Mass Communication)
 
MJMC (Master in Journalism Mass Communication)
 
Sports Journalism / Sports Management
 
 
या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्यासाठी प्रवेश परीक्षा उत्तीर्ण होणे महत्त्वाचे आहे. संदर्भासाठी खाली सूचीबद्ध केलेल्या काही प्रवेश परीक्षा आहेत
 
 
IIMC Entrance Exam
 
Jamia Millia Islamia Entrance
 
FTII JET
 
भारतामध्ये Indian Institute of Mass Communication आणि Seamedu School of Pro-Expressionism सारख्या संस्था पत्रकारिता आणि ब्रॉडकास्टिंग कोर्सेस देतात.
 
 
न्यूज चॅनेल्स (टीव्ही), वृत्तपत्रे आणि मासिके, डिजिटल स्पोर्टस्, प्लॅटफॉर्म (Cricbuzz, ESPN इ.), रेडिओ आणि पॉडकास्ट, सोशल मीडिया आणि युट्यूब अशी अनेक क्षेत्रं क्रीडा पत्रकारासाठी उपलब्ध आहेत.
 
 
आज डिजिटल मीडियामुळे संधी झपाट्याने वाढल्या आहेत. त्यामुळे ह्या क्षेत्रात उत्पन्नाची स्थिरता (Income Sustainability) सुद्धा मिळू शकते. सुरुवातीला उत्पन्न कमी असू शकते, पण अनुभव आणि ओळख वाढल्यावर कमाईही झपाट्याने वाढण्यास मदत होते.
 
 
फुल-टाइम जॉब : स्थिर पगार
 
 
फ्रीलान्स : प्रति लेख / प्रोजेक्ट पैसे
 
डिजिटल प्लॅटफॉर्म : युट्यूब, ब्लॉग, सोशल मीडिया
 
भारतामध्ये क्रीडा क्षेत्र वेगाने वाढत आहे. IPL, ISL, PKL यांसारख्या लीगमुळे क्रीडा पत्रकारांची मागणी वाढली आहे. डिजिटल मीडियामुळे प्रत्येक सामना, प्रत्येक खेळाडू आणि प्रत्येक आकडा कंटेंट बनला आहे. क्रीडा पत्रकारिता हा केवळ व्यवसाय नाही, तर एक जबाबदारी आहे. खेळातील सत्य, भावना आणि प्रेरणा जगासमोर मांडण्याचे काम या क्षेत्रात केले जाते. जर तुम्हाला खेळाची आवड, लेखनाची ताकद आणि सत्य शोधण्याची जिद्द असेल, तर क्रीडा पत्रकारिता तुमच्यासाठी एक उत्तम, रोमांचक आणि प्रभावी करिअर ठरू शकते.
 
 
खेळाडू मैदानावर पराक्रम करतो
 
पण त्या पराक्रमाला इतिहासात स्थान मिळवून देतो तो क्रीडा पत्रकार!
 
- लेखिका क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि मेंटॉर आहेत आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स अ‍ॅडव्हायझरीच्या संचालिका आहेत.

वैशाली भिडे बर्वे / अ‍ॅड. रुपाली ठाकूर

- लेखिका क्रीडा शैक्षणिक समुपदेशक आणि मेंटॉर आहेत आणि मॅक्सज्ञान स्पोर्ट्स अ‍ॅडव्हायझरीच्या संचालिका आहेत.