“मुंबईकरांच्या सेवेसाठी तत्पर ”- मा. महापौर रितू तावडे

विवेक मराठी    04-Apr-2026   
Total Views |
 
vivek
एक काळ होता जेव्हा राजकारणात महिलांची संख्या बोटावर मोजण्याइतकी होती. पण आज चित्र बदललं आहे. राजकारणात महिलांसाठी आरक्षण आल्यामुळे सक्रिय राजकारणातला महिलांचा सहभाग तर वाढलाच त्याचबरोबर अनेक महत्त्वाच्या पदांवरही त्या विराजमान झाल्या. राज्यातील यंदाच्या महापालिका निवडणुकीत महिला‘राज’ आपल्याला पाहायला मिळालं. राज्यात 29 महापालिकांपैकी 15 महापालिकांची सूत्र महिला महापौरांच्या हातात आहेत. आशिया खंडातील सर्वात श्रीमंत जिचा वार्षिक अर्थसंकल्प काही देशांहून अधिक आहे अशा मुंबई महापालिकेच्या महापौरपदी मा. रितूताई तावडे यांची नियुक्ती झाली आहे. कौटुंबिक राजकीय पार्श्वभूमी नसताना रितू तावडे यांनी राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं. महापौरपदाची सूत्रं हाती घेतल्यावर तातडीने त्यांनी मुंबईतील अनधिकृत बांगलादेशींना फेरीवाल्यांवर कारवाई केली. मुंबईचे पदपथ मोकळे केले. त्यांच्या या तडफदार कृतीचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मा. महापौर रितूताई तावडे यांच्या हस्ते नुकतेच सा. विवेकच्या नवीन स्टुडिओचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी घेतलेल्या त्यांच्या मुलाखतीचा सारांश..
 
राजकारणात आल्यानंतर विविध जबाबदार्‍या तुम्ही सांभाळल्या आहेत, पण महापौरपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर काय बदल वाटतो ?
 
महापौर हे अतिशय सन्मानाचं, मानाचं पद आहे. माहेरी किंवा सासरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना मी स्वकष्टाने, स्वबळावर इथे पोहोचले याचा आनंद आहे. या संपूर्ण प्रवासात माझ्या दोन्ही कुटुंबाची मला साथ होती. सर्वसाधारण गृहिणी असतानाही मी काम करत होते, सामाजिक क्षेत्रात आले तेव्हाही काम करत होते, राजकारणात आल्यावर पहिल्यांदा नगरसेविका झाले तेव्हा अधिक जोमाने काम करायला लागले. आणि आता तर महापौरपदाची मोठी जबाबदारी आहे. माझ्यावर विश्वास ठेवून ही जबाबदारी दिल्याने महिलांसाठी, मुलांसाठी आणि समाजातील प्रत्येक घटकासाठी काम करण्याची संधी मिळाली.
 
महापौर तुमच्या दारी ही संकल्पना नेमकी काय आहे?
 
‘महापौर तुमच्या दारी’ या माध्यमातून सामान्य जनता माझ्यापर्यंत नाही तर मी सामान्य जनतेपर्यंत पोहोचणार आहे. आम्ही आतापर्यंत सात कॅम्प घेतले आहेत. तहसील कार्यालय, कलेक्टर ऑफिस, मुंबई महानगर, राज्य शासनाचे काही विषय असे आम्ही 15-16 काउंटर्स लावले. त्या ठिकाणी तुम्हाला सगळे दाखले अवघ्या 20-25 रुपयात मिळतात. या कागदपत्रांचा देखील बाहेर काळाबाजार होतो. 2-3 हजारांना हे दाखले बाहेर मिळतात. या संकल्पनेमुळे आपली कामं वेळेत होत आहेत हा लोकांमध्ये विश्वास निर्माण झाला. मा. मंगलप्रभात लोढा यांनी सरकार आपल्या दारी हा उपक्रम राबवला होता. आता आम्ही ही संकल्पना राबवत आहोत. लोकांच्या सुविधेसाठी, सेवेसाठी आम्ही ही संकल्पना सुरु केली आहे. मुंबईकरांच्या सेवेसाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत.
 
 
 
महिलांना राजकारण कळत नाही असं म्हंटल जायचं पण आज परिस्थिती बदलली आहे. महिलांची राजकारणातली रूची वाढली आहे आणि त्यांचा सहभागही... मुंबई महापालिकेत महिलाराज पाहायला मिळत आहे, तर महिलांच्या या वाढत्या सहभागाविषयी काय सांगाल...?
 
आपण समान न्याय, समान हक्कांविषयी बोलतो तर महिलांना कायम दुय्य्म का समजलं जातं? महिला पुरुषांपेक्षा सक्षम आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे मातृशक्तीचा विजय आपण महापालिका निवडणुकीत पाहिला. मुंबईत पालिकेत 227 नगरसेवकांपैकी 138 महिला नगरसेविका आहेत. 27 समित्यांपैकी 17 समित्यांवर महिला चेअरमन आहेत. मला असं वाटतं की महिलांसारखी ताकद कोणामध्येच नाही. जी महिला घर, परिवार सांभाळू शकते ती समाजही उत्तमपणे आणि प्रामाणिकपणे सांभाळू शकते. एक स्त्री हातात घेतलेलं काम पूर्णत्वास नेते त्यामुळे कामाप्रतीची निष्ठा महिलांमध्ये दिसते.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून पहिल्यांदा संबोधित केलं तेव्हा महिलांना, मातृशक्तीला केंद्रस्थानी ठेवलं. महिलांसाठी वेगवेगळ्या कल्याणकारी योजना त्यांनी मांडल्या. तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींवर विश्वास ठेवला आणि आम्हाला संधी दिली. महिला सक्षम असतात त्यामुळे फक्त राजकारणातच नाही तर प्रत्येक क्षेत्रात महिलाशक्तीने पुढे यावं.
 
राजकारणातील व्यक्तींवर टीका सातत्याने केली जाते, या टीकेकडे तुम्ही कसं पाहता?
 
आपण जे करतो ते योग्य आहे यावर विश्वास असेल तर टीकेचा विचार केला जात नाही. तुम्ही कितीही चांगलं काम केलं तरी टीका होतच राहणार आणि ती गरजेची सुद्धा आहे. कामाचा व्याप इतका मोठा आहे आणि अजून खूप चांगलं काम करायचं आहे त्यामुळे कोण काय बोलतंय, टीका करतंय याचा विचार करायला अजिबात वेळ नाही. विरोधकांना एकच सांगणं आहे माझी साडी, घड्याळ याविषयी सतत बोलण्यापेक्षा, टीका करण्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून सभागृह चालवूया. मुंबईकरांचं लक्ष आहे कारण साडेचार वर्षांनी नगरसेवक बसले आहेत. चांगल्या गोष्टींवर माझ्याशी चर्चा करा, मुंबईकरांच्या समस्या, नालेसफाई, पाणीटंचाई अशा विषयांवर आपण एकत्रित चांगलं काम करू. विरोधकांच्या काही सूचना असतील तर त्या माझ्यापर्यंत पोहोचवा, त्यावर आपण काम करू. थोडक्यात टीका करण्यापेक्षा एकत्रित येऊन चांगलं काम केलं तर मला अधिक आवडेल.
 
मुलाखतकार : बागेश्री पारनेरकर

बागेश्री पारनेरकर

सा. विवेकमध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. रेडिओ, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल माध्यमात काम करण्याचा अनुभव. विविध माध्यमातून योग आणि आहार विषयक लेखन. नाट्य, नृत्य, संगीत क्षेत्राची आवड. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनाचा अनुभव...