मराठ्यांना अभिप्रेत शास्त्रीय ज्ञानपरंपरा सांगणारे‘सिहोर स्कूल’

वेध अज्ञात इतिहासाचा

विवेक मराठी    04-Apr-2026
Total Views |
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विल्किन्सन यांच्या भोवती मराठी विद्वानांचा एक मोठा गट निर्माण झाला. आपल्या ज्ञानपरंपरांचे आधुनिकीकरण व्हावे आणि त्यातून जागतिक ज्ञाननिर्मिती क्षेत्रात एतद्देशीय ज्ञानाने योगदान द्यावे असे या गटास वाटत होते. या गटाची परिणती पुढे प्रसिद्ध ‘सिहोर स्कूल’मध्ये झाली. प्राचीन सिद्धांत ग्रंथांचा साकल्याने अभ्यास, सोबतच युरोपीय विज्ञानाचा सखोल अभ्यास व त्यातून नवा समन्वय असे याचे स्वरूप होते. पारंपरिक पठण ते प्रायोगिक विज्ञान असा अभिनव मार्ग मराठ्यांच्या या ज्ञानकेंद्रात निर्माण झाला.

 
vivek
 
@राजस वैशंपायन

अठरावे शतक म्हणजे मराठ्यांच्या राजकारणाचा आणि साम्राज्याच्या चौफेर उत्कर्षाचा काळ. एकीकडे भारतभरात मराठ्यांची सत्ता विस्तारत असताना प्रशासन, व्यवस्था निर्मिती, तीर्थक्षेत्रे, स्थापत्य, कला अशा अनेक बाबतीत मराठी शासकांनी स्वतःचा स्वतंत्र ठसा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यात भारतीय ज्ञाननिर्मितीचे क्षेत्र मागे कसे राहील? एतद्देशीय ज्ञानमीमांसा आणि ज्ञाननिर्मिती क्षेत्रातही मराठी शासक आणि मराठी व्यवस्थांनी अमूलाग्र म्हणावे असे बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात होऊ घातलेल्या प्रबोधन आणि आधुनिकीकरणाच्या संपूर्ण प्रक्रियेची सुरुवात मराठी साम्राज्याच्या काळात झाली होती असे म्हणता येते. मागील लेखात आपण लक्ष्मीदेवींचे कायदा आणि धर्मशास्त्र क्षेत्रातील अतुलनीय योगदान पाहिले, या लेखात आपण वैज्ञानिक आणि शास्त्रीय ज्ञाननिर्मिती क्षेत्रातील मूलभूत योगदान पाहूया.
 
 
पाश्चात्त्य विज्ञान आणि शास्त्रे ज्या गतीने या कालखंडात वाढत होती त्याचा गंधही भारतातील ज्ञानपरंपरेला नव्हता असे नाही. उलट, एतद्देशीय ज्ञानपरंपरेला पाश्चात्य प्रत्यक्ष-वादी, अनुभवजन्य विज्ञान आणि शास्त्रांशी जोडून मानवी ज्ञानशाखेत मोलाची भर घालण्याचे मोठे कार्य या काळात होत होते. मराठा प्रभाव क्षेत्रातील मध्य भारतात निर्माण झालेले ’सिहोर केंद्र’ हे या प्रक्रियेचे स्पष्ट उदाहरण. मराठी शासकांनी आपापल्या प्रभावक्षेत्रात नवीन काळाशी सुसंगत अशा ज्ञाननिर्मितीच्या परिसंस्था निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या नव्या परिसंस्थेत उभ्या राहिलेल्या पाठशाळांत फलज्योतिषाची जागा गणित आणि खगोल-भौतिकशास्त्राने घेतली, पठणाधारित शिक्षेची जागा गणितीय तर्कशास्त्राने घेतली, पौराणिक विश्वरचनाशास्त्राची जागा भूगोलाने घेतली, वैद्यकात प्रायोगिक दृष्टीकोन आणला जाऊ लागला. पाश्चात्यांच्या परिमाणात्मक विज्ञानाच्या क्षेत्रातील ज्ञानाचे सखोल परीक्षण करून केवळ निष्क्रिय स्वीकृतीने नव्हे तर समर्थ बौद्धिक घुसळण, संवाद आणि प्रगल्भ समन्वयाने परिष्कृत झालेले मराठ्यांच्या ज्ञाननिर्मितीचे युग आपल्यासमोर उभे राहते. इथे शब्दप्रामाण्य मागे पडू लागले होते. त्यामुळे 19व्या शतकाच्या उत्तरार्धात तर्क, तत्त्वज्ञान, भौतिकी, वैद्यक वा खगोलशास्त्राच्या गतिशील ज्ञानमीमांसक अभिसरणाच्या केंद्रस्थानी मराठी मुलखात तयार झालेले अनेक कुशाग्र, बुद्धिवादी मराठी विद्वान होते.
 
 
भारतभरात सत्ता स्थापन केलेल्या मराठ्यांची मनीषा सकल हिंदू धर्माचे सबलीकरण करण्याची होती. राजकारणापासून ते सैन्य व्यवस्था, शासन व्यवस्था ते उद्योग, आणि एतद्देशीय ज्ञानाचे फक्त जतन नव्हे तर कालसुसंगत अभिवृद्धी अशा सर्व बाबतीत मराठी शासक जागतिक परिमाणांत विचार करण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते. वाराणसी किंवा काशी सारख्या तीर्थांच्या धार्मिक, अध्यात्मिक आणि बौद्धिक पुनरुद्धारासाठी मराठी शासक प्रयत्नशील होते. घाट, धर्मशाळा आणि मंदिरे यांचा जीर्णोद्धार किंवा नव-निर्मिती इतक्यावरच मर्यादित न राहता, शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पवार अशा सर्वच सत्ताधीशांनी वाराणसीला ज्ञाननिर्मितीची राजधानी करण्यासाठी भरघोस प्रयत्न केले.
 
 
येथे 1791 साली अनेक पाठशाळा एकत्र करून निर्माण झालेले बनारस संस्कृत महाविद्यालय (जे आज संपूर्णानंद संस्कृत विश्वविद्यालय म्हणून ओळखले जाते.) हे भारतीय आणि पाश्चात्य ज्ञानाचे संगमस्थान म्हणून मोठे व्हावे असा मानस मराठी प्रशासकांचा होता. त्यासाठी आपापल्या प्रदेशांतून होतकरू आणि हुशार विद्वानांना हे सत्ताधीश तेथे पाठवत असत. ब्रिटीश आणि भारतीय प्रशासक यांनी एकमेकांच्या सहकार्याने हे महाविद्यालय अखंड चालू ठेवले होते. यातून तर्कशास्त्र, व्याकरण, गणित, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, वैद्यक अशा अनेक क्षेत्रात ज्ञाननिर्मितीचे आधुनिक प्रवाह वाराणसीमध्ये निर्माण झाले.
 

vivek 
 
मराठ्यांच्या विस्तारलेल्या प्रदेशांत पारंपरिक शिक्षा पद्धतीत मोठा बदल झाला. ग्वाल्हेर, इंदोर, बडोदा, नागपूर, धार, तंजावर अशा विविध ठिकाणी एतद्देशीय आणि पाश्चात्य अशा दोन्ही ज्ञानशाखा सामावून घेणार्‍या पाठशाळा उभ्या राहिल्या होत्या. परदेशातून आलेले नवे दृष्टीकोन आणि नवीन शास्त्रे यांचा पारंपरिक विद्वानांना सखोल परिचय होऊन त्यातून नवीन भारतीय ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया सुरू होण्यासाठी मराठी शासकांनी आपल्या देशांत उपलब्ध पाश्चात्य (फ्रेंच आणि ब्रिटीश) अधिकारी आणि विद्वानांच्या मदतीने ज्ञाननिर्मितीची नवी केंद्रे निर्माण केली. मराठ्यांनी निर्माण केलेल्या या ज्ञानकेंद्रांनी हजारो वर्षे जुन्या अध्यापन पद्धतींमध्ये रुजलेल्या पारंपारिक विद्वानांचा युरोपीय अनुभवजन्य ज्ञानाच्या विस्तारणार्‍या ज्ञानभांडाराशी थेट आणि अनेकदा संघर्षपूर्ण संपर्क आणि संवाद घडवून आणला. यातूनच तत्त्वज्ञान, तर्कशास्त्र, भौतिकी, खगोलशास्त्राच्या व विश्वरचनाशास्त्राच्या ज्ञानशाखेत सखोल ज्ञानमीमांसक घर्षण निर्माण झाले. पारंपरिक पौराणिक भारतीय विश्वरचनाशास्त्र भूकेंद्री आणि मूलत: सपाट पृथ्वीचे प्रतिमान मांडत असे. हे प्रतिमान दृश्यात्मक आणि वैचारिकदृष्ट्या मध्यवर्ती, अवाढव्य अशा मेरू पर्वताने व्याप्त होते. त्याभोवती सूर्य, ग्रह आणि नक्षत्रे विश्ववायूंच्या प्रवाहाने फिरत असतात असे मानले जात असे. याउलट, मराठ्यांच्या ज्ञानकेंद्रांत अनुभवजन्य आणि निरीक्षणात्मक विज्ञानावर आधारित युरोपीय कोपर्निकन सूर्यकेंद्री अवकाशीय प्रतिमान, गोलीय भूमिती, त्रिकोणमिती आणि न्यूटोनियन यांत्रिकीच्या वैश्विक नियमांचा अभ्यासही सुरू करण्यात आला होता.
 
 
वाराणसीसारख्या कर्मठ वातावरणात हे नवे विचारप्रवाह निर्माण होणे कठीण होते. त्यामुळे मराठी प्रदेशांतून अनेक विद्वानांना तिथे पाठवून ज्ञाननिर्मिती क्षेत्रात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. पाश्चात्य ज्ञानशाखांशी निर्माण करावयाचा संवाद व त्याची तात्त्विक चौकट वाराणसीच्या पारंपरिक शास्त्रार्थ कक्षांमध्ये निर्माण होणे अवघड होते. ही मूलभूत तात्त्विक चौकट मध्य भारतातील शिंदे-होळकरांच्या मराठा-प्रभाव प्रदेशात, विशेषतः भोपाळजवळील सिहोर या शहरात घडवली गेली. या क्रांतिकारी समन्वयाचे शिल्पकार बॉम्बे सिव्हिल सर्व्हिसमधील विद्वान आणि राजकीय प्रतिनिधी लॅन्सेलॉट विल्किन्सन होते. भास्कराचार्य लिखित खगोल-भौतिकी सिद्धांत ग्रंथ ’सिद्धांतशिरोमणी’ या ग्रंथाचे इंग्रजी भाषांतर त्यांनी केले.
 
 
एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात विल्किन्सन यांच्या भोवती मराठी विद्वानांचा एक मोठा गट निर्माण झाला. आपल्या ज्ञानपरंपरांचे आधुनिकीकरण व्हावे आणि त्यातून जागतिक ज्ञाननिर्मिती क्षेत्रात एतद्देशीय ज्ञानाने योगदान द्यावे असे या गटास वाटत होते. या गटाची परिणती पुढे प्रसिद्ध ’सिहोर स्कूल’मध्ये झाली. प्राचीन सिद्धांत ग्रंथांचा साकल्याने अभ्यास, सोबतच युरोपीय विज्ञानाचा सखोल अभ्यास व त्यातून नवा समन्वय असे याचे स्वरूप होते. पारंपारिक पठण ते प्रायोगिक विज्ञान असा अभिनव मार्ग मराठ्यांच्या या ज्ञानकेंद्रात निर्माण झाला. या सिहोरविषयी वेगळे सांगायचे झाले तर सर्वच होळकरांचे गणित आणि गणितीय तार्किक मांडणीवर जीवापाड प्रेम. आपल्या राज्यात तर्कशुद्ध गणिताचा विकास व्हावा यासाठी अहिल्यादेवींपासून सर्वच होळकरांनी कटाक्षाने प्रयत्न केला. या तर्कशुद्धशिक्षा-परंपरेत निष्णात विद्वानांची मोठी फळीच सिहोर केंद्राला लाभली.
 
 
या सिहोरमध्ये तयार झालेले पहिले महत्त्वाचे विद्वान ठरतात सुबाजी बापू. सुबाजीबापूंनी पौराणिक, सैद्धान्तिक आणि कोपर्निकन व न्यूटनच्या प्रणालींची अत्यंत बारकाईने तुलना करणारे संस्कृत व मराठी ग्रंथ निर्माण करण्यात निर्णायक भूमिका बजावली. खगोल-भौतिकी क्षेत्रात त्यांनी सिद्धांतशिरोमणी प्रकाश, अविरोध प्रकाश या दोन मूलभूत ग्रंथांचे लेखन करून कोपर्निकन खगोलशास्त्र आणि भास्कराचार्यांचे खगोलशास्त्र यांचा तौलनिक आणि मूलगामी अभ्यास मांडला.
 
 
विल्किन्सन आणि सुबाजी बापू यांचे सहकार्य खगोल-भौतिकीशास्त्राच्या पलीकडे जाऊन सामाजिक सुधारणांच्या क्षेत्रापर्यंत पोहोचले. सामाजिक क्षेत्रात सुबाजी बापूंच्या विद्वतकार्याचा परिणाम म्हणजे ’वज्रसूची’चे (हिंदू धर्मातील अवगुणांवर टीका करणारा बौद्ध ग्रंथ) इंग्रजी, मराठी व संस्कृत प्रकाशन. याच वज्रसूचीवर त्यांनी मराठी व संस्कृत लघु-टंका या नावाची टीकाही लिहिली. उत्तर आणि मध्य भारतात प्रचलित भृणहत्या प्रथेवर, जात्यंध व्यवस्थेवर आसूड ओढण्यासाठी हा ग्रंथ लिहिल्याचे ते म्हणतात. पण सोबतच भारतीय जाती-व्यवस्थेच्या निर्मितीमागे असलेला मूलभूत सामाजिक विचार व त्याचे महत्त्व अधोरेखित करणारा ’मत-परीक्षा-शिक्षा’ हा ग्रंथही त्यांनी लिहिला. आधुनिक सामाजिक आणि वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात रुजवण्यासाठी एतद्देशीय ज्ञान परंपरांचाच वापर करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांची सखोलता यातून दिसते. पुण्यातील पारंपारिक विद्वानांच्या प्रखर विरोधाला न जुमानता, सुबाजी बापूंचे ग्रंथ या काळातील मराठे प्रभाव-क्षेत्रातील अनेक पाठशाळा व विद्यालयांत प्रमाणित पाठ्यपुस्तके बनले.
 
 
सिहोरच्या प्रयोगातून निर्माण झालेले ऐतिहासिकदृष्ट्या पुढील महत्त्वपूर्ण फलित म्हणजे बापू देव शास्त्री नावाचा तरुण, प्रतिभावान महाराष्ट्रीय विद्वान. अहमदनगर येथील महाराष्ट्रीय कुटुंबात जन्मलेल्या बापू देवांनी आपले सुरुवातीचे शिक्षण मराठी भाषेत आणि पारंपारिक संस्कृत अंकगणित व बीजगणितात पंडित धुंडिराज यांच्या मार्गदर्शनाखाली घेतले. या तरुणाची अफाट विश्लेषणात्मक प्रतिभा ओळखून, लॅन्सेलॉट विल्किन्सन यांनी पंडित सेवा राम जोशी यांच्याकडे ’सिद्धांत’ आणि मिस्टर विल्यम्स यांच्याकडे इंग्रजी भाषेचा अभ्यास करण्यासाठी त्यांना बनारस संस्कृत कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून दिला. विल्किन्सन यांनी यापूर्वी बापू देवांनी भास्कराचार्यांच्या ’सिद्धांतशिरोमणी’वर लिहिलेल्या निबंधांचे मूल्यमापन केले होते, ज्यावरून गुंतागुंतीचे बीजगणित प्रक्रिया आणि गोलीय त्रिकोणमिती (spherical trigonometry) सोडवण्यातील त्यांची बुद्धिमत्ता सिद्ध झाली होती.
 
 
वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी, बनारस संस्कृत महाविद्यालयात आधुनिक गणित आणि खगोलशास्त्राचे शिक्षक म्हणून त्यांची नियुक्ती झाली. या पदाचा वापर त्यांनी भारतीय वैज्ञानिक शिक्षणाचे स्वरूप पूर्णपणे बदलून टाकण्यासाठी पुढील अनेक दशके केला आणि एकोणिसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली आणि व्यापक मान्यताप्राप्त भारतीय खगोलशास्त्रज्ञ ठरले. त्यांच्या अफाट विद्वत्तेमुळे त्यांना ’रॉयल एशियाटिक सोसायटी ऑफ ग्रेट ब्रिटन अँड आयर्लंड’ची फेलोशिप, कलकत्ता विद्यापीठाची मानद फेलोशिप आणि ब्रिटीश सरकारकडून ’महामहोपाध्याय’ व ’कम्पॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द इंडियन एम्पायर’ (उC.I.E.) यांसारख्या अत्यंत प्रतिष्ठेच्या पदव्या प्राप्त झाल्या.
 
 
याशिवाय, आधुनिक खगोलभौतिकी खर्‍या अर्थाने आपल्या मातीत रुजायची असेल, तर त्यासाठी एतद्देशीय संज्ञा-संग्रहाची आवश्यकता ओळखून बापू देवांनी युरोपीय गणितीय, तत्त्वज्ञानविषयक आणि खगोलशास्त्रीय ग्रंथांचे संस्कृत आणि हिंदीमध्ये भाषांतर करण्याचा महत्त्वपूर्ण व आजीवन प्रकल्प चालविला. त्यांच्या विस्तृत प्रकाशन संपदेमध्ये ’त्रिकोणमिती’ (संस्कृत व मराठी), ’बीजगणित’ (हिंदी, संस्कृत व मराठी), आणि ’गोलनिर्णय’ (हिंदी, संस्कृत व मराठी) यांचा समावेश होतो. या ग्रंथांनी स्फेरीकल ज्योमेट्री, ट्रीगोनोमेट्री हे मूलभूत गणिती विषय भारतीय भाषांत आणलेच नाहीत तर त्या-त्या विषयांत नवे मूलभूत सैद्धांतिक दृष्टीकोनही प्रस्थापित केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी अमेरिकन मिशनरी एबनेझर बर्जेस याच्यासोबत ’सूर्य सिद्धांता’च्या इंग्रजी भाषांतराचे सह-लेखन केले.
 
 
बापू देव शास्त्रींनी गणिताच्या, भौतिकशास्त्राच्या अभ्यासाचे आधुनिकीकरण करण्यात प्रचंड यश मिळवले. यापुढील खगोल-भौतिकी क्षेत्रातील मोठी प्रगती त्यांचे पुतणे आणि बौद्धिक वारसदार, गोविंद देव शास्त्री यांनी घडवून आणली. गोविंददेव शास्त्रींनी लिहिलेला भूमिभ्रमण हा ग्रंथ म्हणजे तत्कालीन खगोल-भौतिकी क्षेत्रात जागतिक स्तरावर मोठे योगदान ठरला. या ग्रंथाने अनेक पाश्चात्य सिद्धांत मूळ भारतीय ज्ञानशाखेत आणले, आणि सोबतच भारतीय ज्ञानपरंपरेच्या जोरावर खगोल-भौतिकी क्षेत्रात नवे सिद्धांत व विचारही स्थापित केले. हा ग्रंथ आणि त्याचे महत्त्व याविषयी आपण पुढील भागात पाहू.