महा-चतुर एआय चॅटबॉट युवकांचा मार्गदर्शक

विवेक मराठी    11-May-2026
Total Views |
lodha
आज काळाच्या वेगाने पुढे जाण्यासाठी खाजगी क्षेत्राने कृत्रिम बुद्धिमत्तेचा अत्यंत प्रभावी वापर केला आहे. केंद्र शासनासह महाराष्ट्र शासनानेही अत्यंत प्रभावीपणे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यास प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या ‘महा-चतुर एआय चॅटबॉट’ त्याची प्रचिती येते. त्याबाबतचा हा लेख..
केंद्र सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या ‘इंडिया एआय जर्नी’ अहवालानुसार शासन स्तरावर एआयचा वापर करणार्‍या अग्रगण्य राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. एआय आधारित पोलिसिंग, कृषी क्षेत्रातील एआय प्रयोग, रोगनिदानासाठी एआयचा वापर, स्मार्ट सिटी व वाहतूक नियंत्रणासाठी एआय अशा अनेक प्रकारे महाराष्ट्राने आपले वेगळेपण दाखवले आहे आणि टिकवून ठेवण्यात यश मिळविले आहे. ‘महा-चतुर एआय चॅटबॉट’ हे त्याचेच एक पुढील पाऊल म्हणता येईल. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘महा-चतुर एआय चॅटबॉट’ हस्ते लोकार्पण करण्यात आले. राईट वॉक फाउंडेशनच्या भागीदारीतून कौशल्य, उद्योजकता व नाविन्यता विभागाने हा चॅटबॉट म्हणजेच डिजीटल प्लॅटफॉर्म विकसित केला आहे.
lodha 
राज्यातील युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार, उद्योजकता आणि मार्गदर्शन एकाच व्यासपीठावर उपलब्ध करून देणारा ‘महा-चतुर एआय चॅटबॉट’ हा महाराष्ट्रासाठी परिवर्तनकारी उपक्रम आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या पुढाकारातून विकसित करण्यात आलेला हा चॅटबॉट देशातील राज्य शासनाने तयार केलेला अशा प्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम आहे. या चॅटबॉटमुळे युवा वर्गाचा शिक्षण ते रोजगार हा प्रवास अधिक सुकर होईल आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ त्वरित उपलब्ध होईल.
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महा-चतुर एआय चॅटबॉट काय आहे?
 
महा-चतुर एआय चॅटबॉट म्हणजे एआय आधारित विशिष्ट माहिती पुरविणारी संवाद प्रणाली. या प्रणालीद्वारे युजरला अगदी साध्या भाषेत प्रतिसाद मिळतो. या चॅटबॉटचा वापर हा व्हॉटसपद्वारे करता येऊ शकतो. सामान्यपणे आपण व्हॉटसपवर संवाद करतो त्याप्रमाणेच एक क्रमांक लाभार्थ्याला प्राप्त होईल आणि त्या क्रमांकावर व्हॉटसपप्रमाणे संवाद साधता येईल. भविष्यात अशा चॅटबॉटचे स्वतंत्र अ‍ॅपही विकसित होऊ शकते. महाराष्ट्रात शिकाऊ उमेदवारीच्या क्षेत्रात बदल घडविण्यासाठी आणि रोजगाराभिमुख उमेदवारांचा वेळ वाचण्यासाठी हा चॅटबॉट विकसित करण्यात आला आहे.
‘महा-चतुर’चा उद्देश
 
विविध क्षेत्रातील शिकाऊ उमेदवारांना प्रशिक्षण देण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (एनएपीएस) आणि महाराष्ट्र शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजना (एमएपीएस) आहेत. या योजनांचा लाभ घेताना युवकांना काही तांत्रिक अडचणी येत होत्या. या अडचणी दूर करण्याच्या उद्देशाने ‘महा-चतुर एआय चॅटबॉट’ विकसित करण्यात आला आहे. आतापर्यंत या दोन्ही योजनांकरिता नोंदणी करण्यासाठी दोन ते तीन दिवसांचा अवधी लागत होता. मात्र ‘महा-चतुर’मुळे ही नोंदणी प्रक्रिया केवळ पंधरा मिनिटांत होणार आहे. ग्रामीण व शहरी भागातील युवकांना प्रशिक्षणासह नोकरीभरती वगैरे सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. तसेच तक्रारनिवारणाची सुविधा आहे. भविष्यात मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेकरिताही या चॅटबॉटचा वापर करण्यात येणार आहे.
 
lodha 
महा-चतुरची वैशिष्ट्ये
 
* महा-चतुर चॅटबॉटमध्ये चॅट आधारित संवाद सुविधा आहे, ज्यामध्ये वापरकर्ते साध्या भाषेत प्रश्न विचारू शकतात. व्हॉइस सपोर्टची सुविधादेखील उपलब्ध आहे.
* वापरकर्त्याला त्वरीत प्रतिसाद मिळतो आणि वापरानुसार प्रणाली स्वतःमध्ये सुधारणा करते राहते. ही प्रक्रिया निरंतरपणे सुरू असते.
* ग्रामीण व शहरी युवकांना कौशल्य प्रशिक्षण, रोजगार संधी, उद्योजकता मार्गदर्शन, अर्ज प्रक्रिया, असेसमेंट आणि मार्केट लिंकेज अशा सर्व सेवा एकाच ठिकाणी डिजीटली चोवीस तास उपलब्ध होणार आहेत.
या चॅटबॉट प्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन झालेले आहे. वापरकर्त्यांकरिता लवकरच हा चॅटबॉट उपलब्ध होणार आहे.
सह्याद्री अतिथीगृह येथे कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या ‘चॅटबॅाट’लोकार्पण व सामंजस्य करार पार पडले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मंगल प्रभात लोढा, अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, राज्य नाविन्यता सोसायटीचे आयुक्त डॉ.अमित सैनी, व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक सतीश सूर्यवंशी, जपानचे वाणिज्यदूत हितोमि साटो, जर्मनीचे वाणिज्य दूत क्रिस्टोफ हेलिअर, कोरियाचे वाणिज्य दूत यो डाँवॉन, फिनलँडचे वाणिज्य दूत इरिक एफ हॉलस्ट्रॉम तसेच विविध उद्योग व शैक्षणिक संस्थांचे प्रतिनिधी, आंतरराष्ट्रीय भागीदार उपस्थित होते.
समारोप
महा-चतुर एआय चॅटबॉट हा महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल परिवर्तनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. या उपक्रमामुळे शासन सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख बनत आहेत.