अमोल तपासे -
9960673789

नागपूरच्या ‘वनामती’ सभागृहातील ‘संघ गंगा के तीन भगीरथ’ या पहिल्या प्रयोगाच्या अभूतपूर्व यशानंतर निर्मात्या सारिका पेंडसे आणि दिग्दर्शक संजय पेंडसे यांनी एका वर्षात 100 प्रयोगांचा अद्भूत संकल्प सोडला. हा संकल्प पूर्ण करणे हे एखाद्या ‘भगीरथ’ प्रयत्नापेक्षा कमी नव्हते, पण निष्ठेच्या बळावर अशक्य ही शक्य झाले. शून्यातून विश्व निर्माण करणार्या आणि राष्ट्रवादाचे बीजारोपण करणार्या महापुरुषांची गाथा आज शंभर प्रयोगांच्या सुवर्णशिखरावर पोहोचली आहे. या प्रवासाविषयी थोडक्यात माहिती सांगणारा लेख..
‘साधनेविण जे साध्य होते, त्यासी चमत्कार म्हणती’...पण जेव्हा ही साधना राष्ट्रभक्तीने रसरसलेली असते आणि ध्येयवादाने भारलेली असते, तेव्हा इतिहास घडतो. ’संघ गंगा के तीन भगीरथ’ या नाटकाचा प्रवास म्हणजे केवळ रंगमंचावरील काही तासांचे सादरीकरण नसून, तो एका अथांग प्रखर राष्ट्रभक्तीच्या अनुभूतीचा प्रवाह आहे. शून्यातून विश्व निर्माण करणार्या आणि राष्ट्रवादाचे बीजारोपण करणार्या महापुरुषांची गाथा आज शंभर प्रयोगांच्या सुवर्णशिखरावर पोहोचली आहे.
प्रसिद्ध वक्ते आणि लेखक श्रीधरराव गाडगे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून ’संघ-गंगा’ प्रवाहित झाली आहे. त्यांच्या लेखणीत असे सामर्थ्य आहे की, नाटकातील प्रत्येक संवाद प्रेक्षकांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत प्रज्वलित करतो. हे नाटक केवळ मनोरंजन नाही, तर तो संस्कारांचा एक समृद्ध वारसा आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रथम तीन सरसंघचालकांचे जीवनचरित्र या नाटकाच्या रूपाने साक्षात रंगमंचावर जिवंत होते, तेव्हा प्रेक्षक केवळ प्रेक्षक राहत नाहीत, तर त्या महान परंपरेचे साक्षीदार बनतात.
या ऐतिहासिक नाट्यप्रवासाचा श्रीगणेशा 30 एप्रिल 2025 रोजी नागपूरच्या ’वनामती’ सभागृहात झाला. रा. स्व. संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य मा. भैयाजी जोशी यांच्या वंदनीय उपस्थितीत आणि मार्गदर्शक प्रा. रवींद्र भुसारी, निखिल मुंडले यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रयोगाला एक वैचारिक उंची प्राप्त झाली.
पहिल्या प्रयोगाच्या अभूतपूर्व यशानंतर निर्मात्या सारिका पेंडसे आणि दिग्दर्शक संजय पेंडसे यांनी एका वर्षात 100 प्रयोगांचा अद्भूत संकल्प सोडला. हा संकल्प पूर्ण करणे हे एखाद्या ’भगीरथ’ प्रयत्नापेक्षा कमी नव्हते, पण निष्ठेच्या बळावर अशक्य ही शक्य झाले.
या नाट्यप्रवासाला गती दिली ती रामटेकच्या प्रयोगाने. राज्याचे मंत्री ना. आशिष जयस्वाल यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर सामाजिक उत्तरदायित्व म्हणून पाच प्रयोगांच्या प्रायोजकत्वाची जबाबदारी पेलली. तिथून निघालेली ही ’नाट्यदिंडी’ महाराष्ट्र ओलांडून गुजरात, राजस्थान, उत्तरप्रदेश, उत्तरांचल आणि कोकणच्या डोंगरदर्यांत पोहोचली.
टाईम्स ऑफ इंडियाचे प्रसाद पुल्लीवार, मंत्री मंगल प्रभात लोढा, अरुण लाखानी, देवेश पेंढरकर आणि अजय संचेती यांसारख्या दानशूर आणि सक्रिय व्यक्तिमत्त्वांच्या पाठबळामुळे या नाटकाला राष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले. नाटकाचा 25वा प्रयोग नागपूरच्या सुरेश भट सभागृहात रंगलेल्या या सोहळ्याला केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी, कृष्ण गोपाल आणि मनमोहन वैद्य यांच्या उपस्थितीने कलाकारांचे चैतन्य द्विगुणित झाले. मुंबईचे ’रवींद्र नाट्यमंदिर’ सुवर्णमयी 50व्या प्रयोगाचे साक्षीदार ठरले. सांस्कृतिक कार्यमंत्री ना. आशिष शेलार यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. गुजरात दौर्यात सलग 38 तास बसचा प्रवास करून, थकवा बाजूला सारून 40व्या तासाला जुनागडच्या 1,000 प्रेक्षकांसमोर दिलेला प्रयोग या टीमच्या समर्पणाची साक्ष देतो.
अहेरीच्या दुर्गम भागात 600 ग्रामस्थांनी स्वतःची वाहने करून नाटकाला लावलेली हजेरी, हीच या कलेला मिळालेली सर्वात मोठी पावती आहे. 90 प्रयोगांचा टप्पा पार करून ही गंगा आता राजधानी दिल्लीत पोहोचली आहे. दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांच्या सहकार्याने 91 ते 100 या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रवासाचा अंतिम आणि शंभरावा प्रयोग दिल्लीतील ’केशव कुंज’ (झेंडेवाला) येथे पार पडणार आहे. यावेळी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजयाताई रहाटकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे यात एकही व्यावसायिक कलाकार नाही. आपला संसार, नोकरी, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदार्या सांभाळून केवळ राष्ट्रभक्तीच्या ओढीने ही सामान्य माणसं रंगमंचावर ’असामान्य’ कामगिरी करत आहेत.
याचे संपूर्ण श्रेय दिग्दर्शक संजय पेंडसे आपल्या टीमवर्कला आणि पडद्यामागील कलाकारांच्या अहोरात्र परिश्रमाला देतात.
’संघ गंगा के तीन भागीरथ’ हे केवळ दोन अंकी नाटक नसून, तो राष्ट्रभक्तीच्या जीवनरसांनी भरलेला एक आविष्कार आहे. हा संस्कारांचा प्रवाह घराघरात आणि मनामनात पोहोचला असून, भारतीय रंगभूमीच्या इतिहासात हा प्रयोग एका देदिप्यमान सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल यात शंका नाही.