“सर्व समस्याचं निराकरण ‘संवाद’ - जिथे संवाद संपतो, तिथे संघर्ष सुरू होतो”- प्रशांत पोळ, सुप्रसिद्ध संशोधक व लेखक

विवेक मराठी    14-May-2026   
Total Views |
मुंबई : “संवाद, सहअस्तित्व आणि समन्वय या त्रिसूत्रीचे पालन भारत प्राचीन काळापासून ते आजपर्यंत करत आला आहे, म्हणून भारतीय संस्कृती आजही अबाधित आहे. सर्व समस्यांचं निराकरण ‘संवाद’ आहे. जिथे संवाद संपतो तिथे समस्या सुरू होते, देवर्षी नारदांनी दिलेला हा सल्ला आजही कालोचित आहे. नारदीय सूक्त, विदूर नीती यातूनही हेच स्पष्ट होते. आपले महाकाव्य आणि प्राचीन साहित्य शतकानुशतके हाच संदेश देत आले आहेत. महाभारत आणि रामायण या दोहोंचा अभ्यास केला तरी हेच लक्षात येते की, संवाद संपतो तेव्हा त्याची जागा युद्ध घेते.” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध संशोधक व लेखक प्रशांत पोळ यांनी विश्व संवाद केंद्राने आयोजित केलेल्या ’देवर्षी नारद पत्रकार सन्मान 2026’ यावेळी केले.
 
vsk 
 
विश्व संवाद केंद्र, मुंबई आयोजित ‘देवर्षी नारद पत्रकार सन्मान 2026’ कुर्ला-बांद्रा संकुल NSE मुंबई येथे शनिवार दि. 9 मे 2026 रोजी पार पडला. विविध श्रेणींतील पत्रकार आणि कंटेंट क्रिएटर्स अशा एकूण 12 जणांना देवर्षी नारद सन्मान देऊन गौरविण्यात आले. ज्येष्ठ पत्रकार आणि प्रसिद्ध यूट्यूबर ’भाऊ तोरसेकर’ यांना या वर्षीचा ’जीवनगौरव सन्मान’देऊन गौरविण्यात आले.
 
 
 
पुढे प्रशांत पोळ म्हणाले,“संवाद हे भारतीय संस्कृतीचे मूळ स्वरूप आहे. आज जगभरात अनेक देश युद्धाच्या सावटाखाली आहेत, त्याचे कारणच मुळी संवादाचा अभाव आहे. या असंतुलित वातावरणात जगाचे संतुलन राखण्याचे सामर्थ्य जगात फक्त भारतीय संस्कृतीत आहे. ”
 

vsk 
 
clash of civilisations (सभ्यतेचा संघर्ष) या महत्त्वपूर्ण विषयावर परिसंवाद झाला. लेफ्टनंट जनरल (निवृत्त) आर. आर. निंभोरकर (माजी आयुध महासंचालक, भारतीय लष्कर) आणि संदीप वासलेकर (लेखक व लोकनीती तज्ज्ञ) यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार मिलिंद भागवत यांनी संवाद साधला. भारताची संस्कृती ‘वसुधैव कुटुंबकम्’ मानणारी आहे. मात्र जागतिक माध्यमसमूहांकडून कायमच भारताचा हा सर्वसमावेशक विचार दडपण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे, असे वासलेकर यांनी मांडत भारतीय संस्कृती-सभ्येतेचे महत्त्व अधोरेखित केले. तर निंभोरकर म्हणाले,“आपली संस्कृती सर्वसमावेशक असली तरी आजचा भारत लष्करी आणि सामारिकदृष्ट्यादेखील सामर्थ्यशील आहे. तिन्ही संरक्षण दले आजमितीला कुठल्याही आक्रमणाला तोंड देण्यासाठी सुसज्ज आहेत. आपली संस्कृती सहअस्तित्व मानत असल्यानेच भारतीय शांतीसेना ज्या देशात असते तेथील नागरिकांकडून कधीही तक्रारी येत नाहीत.” आपली संस्कृती आणि त्यातून प्रकट होणारे सामर्थ्य हेच आपले बलस्थान आहे, याची मांडणी या चर्चासत्रातून करण्यात आली.
 
vsk 
 
विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या कामाचे स्वरूप आणि त्यामागचा हेतू डॉ. निशीथ भांडारकर यांनी उपस्थितांपुढे मांडला. विश्व संवाद केंद्र मुंबईचे अध्यक्ष सुधीर जोगळेकर यांनी या सन्मान सोहळ्याच्या 26 वर्षांच्या प्रवासाविषयी सांगताना, देवर्षी नारद सन्मानामागची माहिती विशद केली. ते म्हणाले,“ याला पुरस्कार न म्हणता सन्मान म्हणतो, हे याचे वेगळेपण आहे. यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज अथवा शिफारशी न स्वीकारता, याकरिता तज्ज्ञांची निवडसमिती नेमण्यात येते. या सन्मानार्थी पत्रकारांपासून प्रेरणा घेऊन समाजहित आणि राष्ट्रहित साधणारे पत्रकार घडावेत हा उद्देश आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत पुरस्कारवापसीचे गालबोट लागले नाही.”
 
vsk 
 
देवर्षी नारद सन्मानाने गौरविण्यात आलेल्या पत्रकारांपैकी प्रातिनिधीक स्वरूपात भाऊ तोरसेकर यांनी मनोगत व्यक्त करताना पत्रकारितेचा मूलमंत्र सांगितला. ते म्हणाले,“अर्धवट माहितीआधारे पांडित्य करणे हे नेहमीच घातक असतेे. एखाद्या घटनेमागील वा कृतीमागील अथर्र्बोध उकलून त्याचे विश्लेषण करणे म्हणजे पत्रकारिता. ”
 
 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विश्व संवाद केंद्र, मुंबईच्या संपादक मनाली दीक्षित यांनी केले, तर केंद्राचे कार्यकारी प्रमुख चंद्रशेखर वझे यांनी आभार प्रदर्शन केले. या भव्य सोहळ्याची सांगता राष्ट्रगीताने झाली.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.