@डॉ. अशोक कुकडे
श्यामाप्रसादजींच्या बलिदानानंतर 65-70 वर्षांनी अनेक कठीण अडथळ्यांना पार करून श्यामाप्रसादजींनी दिलेली घोषणा मोदीजींच्या काळात वास्तवात आली आहे. म्हणून या प्रसंगी बंगालच्या या सुपुत्राचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करूया.
बंगाल प्रांत (बंग प्रदेश), हा क्रांतिकारक समजला जातो. बंगाली समाजाच्या ऊछअमध्येच क्रांतीला आवश्यक गुणधर्म ठासून भरलेले आहेत. अंदमानच्या कुप्रसिद्ध सेल्युलर कारागृहात तेथे शिक्षा भोगलेल्या भारतीयांची यादी लावलेली आहे. या क्रांतिकारकांत 90 टक्के नावे बंगाली आहेत. नुकत्याच झालेल्या बंगाल विधानसभेच्या निवडणूक निकालांनी एक आगळीवेगळी क्रांतीच केली आहे. पण ही लोकशाहीच्या मार्गांनी केली असल्यामुळे जवळपास रक्तहीन झालेली आहे.
भारतीय जनता पार्टीने नेत्रदीपक विजय मिळविला आहे. मागील विधानसभेत 77 आमदार होते. ती संख्या जवळपास तिपटीने वाढली. पंधरा वर्षांपूर्वीपर्यंत बंगाल विधानसभेत भाजपाचे प्रतिनिधित्व नगण्य होते. वास्तविक भाजपाचे (जुन्या जनसंघाचे) संस्थापक, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी हे बंगालचे सुपुत्र. यानिमित्ताने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या अनेक स्मृती माझ्या मन:पटलावर उमटू लागल्या. डॉ. मुखर्जी, पंडित नेहरूंच्या पहिल्या केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्री होते. मूळ ते हिंदू महासभेचे सदस्य, त्यामुळेच नेहरूंच्या मुस्लीम अनुयायांच्या विरोधात त्यांनी मंत्रीमंडळाचा राजीनामा दिला. पूर्णपणे नव्याने काळानुरूप ध्येय व व्यवहार ठेवणारी राजनैतिक शक्ती उभी करावी म्हणून त्यांनी रा. स्व. संघाचे तत्कालीन सरसंघचालक पू. गोळवलकर गुरुजींशी चर्चा केली. त्यातूनच भारतीय जनसंघाची स्थापना झाली, हे वर्ष होते 1951-52.
1952च्या सुरुवातीलाच पहिल्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या. नुकत्याच स्थापन झालेल्या भारतीय जनसंघाचे तीन सदस्य लोकसभेत पोहोचले. कलकत्त्याहून डॉ. श्यामाप्रसादजी लोकसभेवर निवडून आले. या पहिल्या लोकसभेत पंडित नेहरूंच्या राजनैतिक क्षमतेच्या तोडीचा नेता, म्हणजे डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी. अत्यंत बुद्धिमान, प्रखर राष्ट्रभक्त तसेच उत्तम संघटक असलेले श्यामाप्रसादजी लोकसभा अक्षरशः गाजवत असत.
मला ही गोष्ट माझ्या भाग्याची वाटते की, मी त्यांना जवळून पाहिले. पुण्यातील संघ शाखांच्या एकत्रीकरणासमोर त्यांचे भाषण (बौद्धिक वर्ग) झाले. पुण्यातील (ध्रुव) संघस्थान या मैदानावर 1952 सालच्या निवडणुकांनंतर हा कार्यक्रम झाला. हे मैदान पुण्यातील भिकारदास मारुती मंदिर व सुभाषनगर यांच्यामध्ये आहे. ते विस्तीर्ण स्वरूपात होते. महाराष्ट्रात अजून जनसंघाची स्थापना झालेली नव्हती.
संघाचा कार्यक्रम असल्यामुळे नित्य शाखेसारखा ध्वज, प्रार्थना इ. सर्व उपचारांसकट कार्यक्रम संपन्न झाला. श्यामाप्रसादजींचा परिचय महाराष्ट्र प्रांताचे तत्कालीन प्रांत प्रचारक मा. बाबाराव भिडे यांनी करून दिला. त्यानंतर डॉ. श्यामाप्रसादजी यांचे भाषण झाले. माझ्या डोळ्यांसमोर त्यांची ती भव्य मूर्ती आजही स्पष्ट दिसते. त्यांच्या भाषणातील बंगाली उच्चार आजही स्पष्ट आठवतात. ‘मातृभूमीची सेवा’ (त्यांचा उच्चार ‘शेबा’ असा होता) हा विषय त्यांनी सुमारे 45 मिनिटे प्रस्तुत केला. आम्हा सर्वांनाच या संधीचे अप्रूप तेव्हा वाटले. आजतर या ’स्मृती’ स्मरणकोषातल्या अत्यंत मौल्यवान अशा वाटतात. त्यानंतर यथावकाश महाराष्ट्रात भारतीय जनसंघाची स्थापना झाली.
आता नुकताच भारतीय जनता पार्टीला मिळालेला विजय, याच्यामागे 70 वर्षांची खडतर तपश्चर्या आहे. दुर्दैवाने 1953च्या जूनमध्ये अवघ्या 51व्या वर्षी डॉ. श्यामाप्रसादजींचा काश्मीरच्या शेख अब्दुल्लाच्या तुरुंगात रहस्यमय मृत्यू झाला. काश्मीर हे भारताचे अभिन्न अंग आहे. हे प्रस्थापित करण्यासाठी श्यामाप्रसादजींनी काश्मीरात प्रवेश करून सत्याग्रह केला होता. शेख अब्दुल्ला यांनी त्यांना गजाआड केले होते. डॉ. श्यामाप्रसादजींनी दिलेली काश्मीरसंबंधीची घोषणा त्यावेळी फार प्रसिद्ध झाली होती. काश्मीरचे भारतात विधिवत विलिनीकरण झाले नव्हते. ते अजूनही स्वायत्त संस्थान होते. म्हणूनच श्यामाप्रसादजींनी अशी घोषणा दिली होती....‘एक देश में दो निशाण, दो विधान और दो प्रधान नही चलेंगे, नही चलेंगे.’
श्यामाप्रसादजींच्या बलिदानानंतर 65-70 वर्षांनी अनेक कठीण अडथळ्यांना पार करून श्यामाप्रसादजींनी दिलेली घोषणा मोदीजींच्या काळात वास्तवात आली आहे. म्हणून या प्रसंगी बंगालच्या या सुपुत्राचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करूया. श्यामाप्रसादजींच्या मृत्यूनंतर काँग्रेस, कम्युनिस्ट व ममतादीदी यांच्या दीर्घ अन्यायी राजवटीच्या जोखडात अडकलेला पश्चिम बंगाल आता मुक्त झाला आहे.
विवेकानंद हॉस्पिटल, लातूर