केरळम् सत्ता मिळाली, तरी काँग्रेस अस्वस्थच

विवेक मराठी    19-May-2026   
Total Views |
Congress Kerala
 Congress Kerala
 
काही झाले, तरी काँग्रेसमधील अंतर्गत कलह काही कमी होत नाही. केरळममध्ये बहुमताने सरकार येऊनही मुख्यमंत्र्यांची निवड करण्यासाठी काँग्रेसला दहा दिवस लागले. देशाचे स्वयंघोषित भावी नेतृत्व म्हणून स्वत:ला प्रोजेक्ट करणारे राहुल गांधी यांना एका छोट्याशा राज्याचा मुख्यमंत्री निवडता येत नाही, त्यांनी दिलेल्या मुख्यमंत्र्यावर पक्षातील नेते नाराजी व्यक्त करतात, तर त्यांनी परदेशात जाऊन पुन्हा आत्मचिंतन करण्याची पुन्हा वेळ आली असे म्हटले, तरी वावगे ठरू नये.
काँग्रेस पक्ष आणि अंतर्गत कलह हे नवीन नाहीत. ग्रामपंचायतीपासून ते दिल्लीपर्यंत या अंतर्गत कलहामुळे काँग्रेस पक्षाची वाताहत झाली आहे. प्रत्येक राज्यात काँग्रेस पक्षामध्ये दोन ते तीन गट आहेत. यामुळे काँग्रेस पक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. अशा कलहामुळे अनेक ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील सत्तेपासून दूर राहावे लागले आहे. महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत याचा प्रत्यय आला. मोठ्या कष्टाने भाजपाकडून चंद्रपूरची महानगरपालिका काँग्रेसने जिंकली होती. पण धानोरकर आणि वडेट्टीवार यांच्यातील अंतर्गत वादामुळे, जिंकूनही ती महानगरपालिका काँग्रेसला गमवावी लागली होती. अंतर्गत कलहाचा काँग्रेसला जणू शापच आहे. स्थानिक नेत्यांपासून ते केंद्रीय नेत्यांपर्यंत काँग्रेसमध्ये दोन ते तीन गट आहेत. काँग्रेसची ही स्थिती केंद्रातील व राज्यातील सत्ता गेल्यानंतर सुधारेल असे वाटत होते. पण सुंभ जळला, तरी... अशी स्थिती आहे. नुकतेच काँग्रेसला केरळममध्ये यश मिळाले. दहा वर्षांची डाव्यांची सत्ता उलटवली. विजयाचा आनंद मोठा होता. पण यानंतर काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी तीन गटांमध्ये संघर्ष, लॉबीइंग सुरू झाले. तब्बल दहा दिवस यावर मोठा खल झाला. मीडियातून सुप्त संघर्षाच्या बातम्या येऊ लागल्या.. अखेर नाइलाजस्तव काँग्रेसने व्ही.डी. सतीनशन यांची वर्णी लावली. खरे तर एवढ्या वर्षांनी सत्तेत काँग्रेस येत आहे, याचा मतदारांना आणि कार्यकर्त्यांना वेगळा आनंद असतो. मतदारांनी डाव्यांना नाकारून पुन्हा काँग्रेसला संधी दिली. पण काँग्रेसला मुख्यमंत्रिपदासाठी एक उमेदवार निवडताना इतका वेळ लागावा, हे आश्चर्यकारकच आहे.
 
काय होता संघर्ष?
 
केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटच्या विजयानंतर मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेसमध्ये तीव्र अंतर्गत चुरस निर्माण झाली होती.  मुख्यमंत्रिपदासाठी अखेर सतीशन यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली. पण ही निवड करताना केरळम काँग्रेसमधील अंतर्गत वाद बाहेर आला. विजयानंतर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल, केरळ विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते व्ही.डी. सतीशन आणि ज्येष्ठ नेते रमेश चेन्निथला यांच्यात स्पर्धा होती. काँग्रेसचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल हे राहुल गांधी यांच्या जवळचे होते. त्यामुळे त्यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी सुरुवातीपासूनच चर्चेत होते. पण त्यांना काँग्रेसचे सहकारी पक्ष असलेल्या मुस्लीम लीगचा पाठिंबा नव्हता. पक्षाने निरीक्षक म्हणून पाठवलेल्या मुकुल वासनिक यांनाही मुख्यमंत्रिपदासाठी नेता निवडताना असंख्य अडचणी येत होत्या. व्ही.डी. सतीशन यांच्या समर्थकांची मोठी संख्या होती. पण त्यांना खासदारांचा पाठिंबा नव्हता. अखेर प्रदीर्घ चर्चेनंतर आणि पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर, काँग्रेस हायकमांडने व्ही.डी. सतीशन यांच्या नावाची घोषणा केली. पण काँग्रेस खासदारांचा त्यांच्या नावाला विरोध होता. अखेर यामध्ये उडी घेतली ती खा. प्रियांका गांधी यांनी. वायनाडमध्ये त्या खासदार आहेत. त्यांच्या वायनाडमधील प्रचारात सतीशन यांनी मोठी भूमिका बजावली होती. त्यामुळेच त्यांनी व्ही.डी. सतीशन यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचे बोलले जात आहे. यातून एक दिसून येते की, काँग्रेसमध्ये राहुल गांधी यांच्यापेक्षा प्रियांका गांधी यांचे वर्चस्व तर वाढत नाही ना? कारण राहुल गांधी यांनी के.सी. वेणुगोपाल यांच्या नावाला पसंती दिली होती. पण प्रियांका गांधी यांनी ती बदलली.
 
दुसरीकडे या निवडीमुळे काँग्रेसचे नेते, खासदार शशी थरूर नाराज झाले. विदेशी जाण्याचे कारण देऊन ते शपथविधी सोहळ्यास अनुपस्थित राहिले.
 
ही अवस्था केरळममधील जनतेला नवीन असेल. काँग्रेसचा पक्ष हा आपल्याच अलिखित नियमांचे पालन करीत आहे. 2018 साली मध्य प्रदेशमध्ये आणि राजस्थानमध्ये काँग्रेसचे सरकार आले, तेव्हा हीच स्थिती होती. मध्य प्रदेशात कमलनाथ यांना मुख्यमंत्री करावे की ज्योतिरादित्य राजे सिंदिया यांना मुख्यमंत्री करावे, या साठमारीत कमलनाथ यांना मुख्यमंत्री केले गेले. पण नंतर सिंदिया यांनी पक्षाला रामराम करून भाजपामध्ये प्रवेश केला. खरे तर काँग्रेसने कमलनाथ यांच्याऐवजी सिंदियांसारख्या युवा नेत्याला संधी देणे क्रमप्राप्त होते. पण तसे न झाल्याने सिंदिया यांनी आपल्या समर्थक आमदारांसह पक्ष सोडला. त्यामुळे मध्य प्रदेशातील काँग्रेसची सत्ता गेली. तेच राजस्थानमध्येही दिसून आले. ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत यांना मुख्यमंत्री केल्याने सचिन पायलट नाराज झाले. आज त्याचे परिणाम काँग्रेस भोगत आहे. माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील वादामुळे राजस्थानमध्ये पक्षाची अवस्था बिकट होत चालली आहे. हे कर्नाटकातही दिसून येते. काँग्रेसचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी. शिवकुमार यांच्यातील वाद आता विकोपाला जात आहेत. पण सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवण्याची हिंमत राहुल गांधी दाखवू शकत नाही.
 

vivek 
 
केरळममध्ये इंडिया आघाडी दिसली नाही
 
केरळमचे नवे मुख्यमंत्री म्हणून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व्ही.डी. सतीशन यांनी 18 मे 2026 रोजी शपथ घेतली. तिरुवनंतपुरम येथील सेंट्रल स्टेडियममध्ये पार पाडलेल्या या शपथविधी सोहळ्याला काँग्रेससह विविध राजकीय पक्षांतील अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पण या सोहळ्यास काँग्रेसच्या नेत्यांव्यतिरिक्त इंडिया आघाडीचा एकही नेता उपस्थित नव्हता. एवढेच काय, शेजारच्या तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री व काँग्रेसने ज्यांना पाठिंबा दिला आहे, ते जोसेफ विजय हेसुद्धा उपस्थित नव्हते. खरे तर यात काँग्रेसला शक्तिप्रदर्शन करून इंडिया आघाडीत आपण कसे मोठे भाऊ आहोत, हे दाखवण्याची संधी होती. पण काँग्रेसने कोणालाही न बोलवता... इंडिया आघाडीच्या भविष्याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.