माहीम-केळव्याची पानगाथा

विवेक मराठी    22-May-2026
Total Views |
संध्या धुरी
9930461330
एकेकाळी वसईच्या वाड्यांतून दरवळणारा नागवेलीच्या पानांचा सुगंध आजही माहीम-केळवेच्या मातीत जिवंत आहे. धार्मिक परंपरा, आयुर्वेद, व्यापार आणि शेतकर्‍यांच्या कष्टांनी समृद्ध झालेली ही पानसंस्कृती काळाच्या बदलत्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी झुंज देत आहे. हवामान बदल, वाढता खर्च आणि मजुरांची टंचाई अशा संकटांशी सामना करत ‘कालीपट्टी’ पान आता जागतिक ओळखीच्या ‘जीआय टॅग’कडे आशेने पाहत आहे.
 
 
Betel Leaf
 
भारतीय परंपरेत प्रत्येक शुभ कार्यात, मंगल प्रसंगी आणि धार्मिक विधींमध्ये मानाचे स्थान मिळवणारे हिरवेगार पान म्हणजे नागवेलीचे पान. आपल्या संस्कृतीत ’पानवेल’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पानाला केवळ धार्मिक महत्त्व नाही, तर त्यामागे आरोग्य, आयुर्वेद आणि जीवनशैलीचा समृद्ध वारसाही दडलेला आहे. फार प्राचीन काळापासून जेवणानंतर मुखशुद्धीसाठी तांबूल सेवनाची परंपरा आहे. नागवेलीचे पान, कात, चुना, सुपारी, वेलची, लवंग आदी पदार्थांनी तयार होणार्‍या ’त्रयोदशी गुणी’ विड्याचा उल्लेख चरक, सुश्रुत, वात्स्यायन आणि कालिदास यांच्या संस्कृत ग्रंथांतही आढळतो. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, केरळम् आणि तमिळनाडू या राज्यांत पानवेलीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते.
 
 
पानवेलीचे पीक हे प्रामुख्याने ऑगस्ट महिन्यात लागवड केले जाणारे बारमाही पीक आहे. हे पीक जितके फायदेशीर, तितकेच अत्यंत कष्टाचे आणि खर्चिक मानले जाते. महाराष्ट्रात ’गंगेरी’, ’कुर्‍हे’, ’नाबकर’, ’पांढरी’, ’काळी’, ’बांगला’ आणि ’कपुरी’ या विविध प्रकारांची लागवड केली जाते. राज्यात बहुतांश ठिकाणी ’कपुरी’ जातीची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेली ‘कृष्णा पान’ ही जात विशेष लोकप्रिय ठरत आहे. या जातीची पाने आकाराने मोठी व जाड असून त्यांचा टिकाऊपणा उत्तम असतो. लंबगोलाकार आकार आणि आकर्षक पोत ही या जातीची वैशिष्ट्ये मानली जातात. नागवेलीच्या पिकाला प्रामुख्याने उष्ण आणि दमट हवामान मानवते. कडाक्याची थंडी, कोरडी हवा किंवा तीव्र उष्णतेची लाट हे पीक सहन करू शकत नाही. पाण्याचा उत्तम निचरा होणारी सुपीक जमीन नागवेलीच्या लागवडीसाठी आदर्श मानली जाते.
राज्यातील बहुतांश भागात मोकळ्या शेतात ‘मळा’ तयार करून नागवेलीची शेती केली जाते. नागवेलीला थेट सूर्यप्रकाश सहन होत नसल्यामुळे वेलींना सावली आणि नैसर्गिक आधार मिळावा म्हणून शेवरी, पांगारा किंवा हॅलिडे यांसारख्या उंच झाडांची आधी लागवड केली जाते.
 
 
खान्देशातील जळगाव जिल्ह्यातील पाचोरा आणि भडगाव परिसर ‘कापरी’ किंवा काळ्या पानांसाठी संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. तापी-गिरणा खोर्‍यातील काळ्या कसदार मातीत ही पाने विशेष बहरतात. चवीला वैशिष्ट्यपूर्ण तिखट, गडद हिरवी आणि शौकिनांच्या पसंतीची अशी ही पाने मानली जातात. कडक उन्हाळ्यातही येथील शेतकरी मोठ्या चिकाटीने मळे जिवंत ठेवतात. आयुर्वेदिक औषधांमध्येही या कापरी पानांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.
 
 
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील मिरज आणि कवठेमहांकाळ परिसर ‘मिठ्ठा’ किंवा पांढर्‍या पानांसाठी ओळखला जातो. येथील हवामान तुलनेने कोरडे असले, तरी विहिरीच्या पाण्यावर शेतकरी ही शेती यशस्वीपणे करतात. येथील पानांना विशेष गोडवा आणि मऊपणा लाभलेला असतो. पालघरच्या पांढर्‍या पानांप्रमाणेच सांगलीच्या मिठ्ठा पानालाही उत्तर भारतात मोठी मागणी आहे. येथून दररोज पानांचे शेकडो पारंपरिक करंडे परराज्यात पाठवले जातात. विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी हा भाग ‘नागपुरी’ पानांचे मोठे व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध आहे. नागपुरी पान आकाराने मध्यम, चवीला किंचित तिखट-गोडसर आणि टिकाऊ असते. विदर्भातील कडक उन्हाळ्यापासून वेलींचे संरक्षण करण्यासाठी मळ्याभोवती वाळलेल्या गवताचे किंवा झावळ्यांचे दाट कुंपण उभारले जाते.
 
 
माहीम-केळवे ’पानाचा’ प्रवास
 
याउलट, पालघरच्या किनारपट्टी भागात ‘मळा’ ऐवजी ‘पानाची वाडी’ ही संज्ञा प्रचलित आहे. ही वाडी म्हणजे एक परिपूर्ण आणि नैसर्गिक ‘मल्टीक्रॉपिंग इकोसिस्टम’ मानली जाते. समुद्राकडून येणारा दमट वारा आणि रेतीमिश्रित गाळाची जमीन नागवेलीसाठी नैसर्गिक हरितगृहासारखे कार्य करते.
 
 
उत्तर कोकण किनारपट्टी भागातील वैविध्यपूर्ण शेतीमध्ये पानवेलीच्या शेतीला विशेष ऐतिहासिक महत्त्व आहे. पालघर जिल्ह्यात ही शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. एकेकाळी वसईच्या काळ्या पानाची निर्यात होत असे, तर माहीम-केळव्याच्या पानांना देशभरातील बाजारपेठेत विशेष स्थान मिळाले होते.
 
 
वसईतील कृषिभूषण शेतकरी जयवंत चौधरी यांनी पानवेली शेतीत विशेष काम केले असून, त्यांच्या अनुभवातून ‘बहुगुणी श्रीमंत पानवेल’ हे पुस्तक साकारले आहे. या पुस्तकात पानवेलीचा इतिहास, वसईचा पान उद्योग, माहिमचा पान इतिहास, केळवे गावच्या पान व्यापाराची आखाती देशांपर्यंत पोहोचलेली परंपरा तसेच भारतातील पान उद्योगाचा संक्षिप्त आढावा मांडण्यात आला आहे.
 
सचिन चुरी                 आणि             जयेश राऊत
Betel Leaf  
 
स्वातंत्र्यपूर्व काळात पालघर परिसरात ‘कलकत्ता पान’ म्हणून ओळखली जाणारी काळी पाने मोठ्या प्रमाणावर येत असत. त्यांना चांगला बाजारभाव मिळत असल्याचे लक्षात आल्यानंतर वसईचे बागायतदार भायजी जगू राऊत आणि इतर शेतकर्‍यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन जमीन, बियाणे, लागवड पद्धती आणि बाजारपेठेचा अभ्यास केला. त्यानंतर सुमारे 1880च्या काळात वसईत प्रथम काळ्या पानाची लागवड सुरू झाली. मात्र 1920 साली पानवेलीवर ‘मर’ रोगाचा प्रादुर्भाव झाला आणि काही वर्षांतच वसईतील मोठ्या प्रमाणावरील पानवेल नष्ट झाली. तरीही शेतकर्‍यांनी खचून न जाता या व्यवसायाला पुन्हा उभारी दिली. लोकनेते अण्णासाहेब वर्तक यांच्या पुढाकारातून 1930मध्ये ‘वसई पान मर्चंट असोसिएशन’ची स्थापना झाली आणि पान व्यापाराला नवे बळ मिळाले. पान वाहतुकीसाठी वसई ते डेहराडून अशी स्वतंत्र रेल्वे बोगी जोडण्यात आली होती, ही त्या काळातील ऐतिहासिक घटना मानली जाते.
 
 
त्या काळात वसईच्या पानांचा व्यापार गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश, पंजाब तसेच पाकिस्तानातील सिंध, कराची आणि वायव्य सरहद्द प्रांतापर्यंत पोहोचला होता. 1914च्या सुमारास बळवंत जगन्नाथ वर्तक यांनी वसईतून काळ्या पानाचे बियाणे आणून माहीम येथे लागवड सुरू केली. त्यानंतर केळवे परिसरातही पानवेलीची शेती मोठ्या प्रमाणावर वाढली आणि ‘केळवे पान विक्रेता संघ’ स्थापन झाला.
 
 
फाळणीनंतर 1954मध्ये पाकिस्तानने भारतीय पान आयातीवर बंदी घातल्यानंतर वसई-माहीम पान व्यापाराला मोठा फटका बसला. पुढे 1964-65मध्ये माहिम विविध कार्यकारी सहकारी संस्थेने पान व्यापार सुरू केला; मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे तो बंद पडला. त्यानंतर 1972मध्ये माहिममधील वीस पान उत्पादकांनी एकत्र येऊन ‘महिकावती पान संघ’ स्थापन केला आणि खासगी पातळीवर व्यापार सुरू ठेवला. आजही हा व्यापार सुरू आहे. आज उत्तर भारतातील बाजारपेठेत वसई, केळवे आणि माहिमच्या पानांना मोठी मागणी आहे. मात्र मजुरांची कमतरता, वाढता उत्पादन खर्च आणि बाजारमूल्यातील अस्थिरता यांसारख्या कारणांमुळे पानवेल व्यवसायाला उतरती कळा लागल्याचे जयवंत चौधरी नमूद करतात.
 
 
शेतकर्‍यांचे अनुभव
 
 
मुंबईच्या उपनगरीय रेल्वेच्या पश्चिम मार्गावरील महत्त्वाचे केंद्र आणि पालघर जिल्ह्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणार्‍या वसई-विरारच्या प्लॅटफॉर्मवर आज उतरले, की नजरेस पडतात ती फक्त सिमेंट-काँक्रीटची उंच जंगले आणि धावपळीचे शहरी जीवन. पण एक काळ असा होता, जेव्हा वसई-विरार परिसर नागवेलीच्या हिरव्यागार वाड्यांनी नटलेला होता. काळाच्या ओघात वसई-विरारचे स्वरूप बदलले, मात्र ‘नागवेलीच्या पानांचा’ हा समृद्ध वारसा आजही माहीम-केळवे पट्ट्याने जपून ठेवला आहे.
 

Betel Leaf  
 
सध्या माहीम-केळवे परिसरात पानवेलीचा व्यवसाय करणार्‍या वाडी मालकांची तिसरी-चौथी पिढी कार्यरत आहे. “पान खुडणे ही एक कला आहे. बोटाला स्पर्श झाला की समजते, कोणते पान बाजारात जाण्यासाठी तयार आहे,“ असे सांगताना पालघर जिल्ह्यातील माहीम गावचे पानवेल शेतकरी जयेश मधुकर राऊत (वय 60 वर्षे) भावूक होतात.
 
 
ते सांगतात, “1989मध्ये वडिलांच्या निधनानंतर बहिणींची लग्ने होईपर्यंत आम्ही वाड्या सांभाळल्या आणि गेली चाळीस वर्षे हा वारसा मी एकटाच पुढे नेत आहे. माझ्याकडे दोन एकरांची वाडी असून, दिवसाआड चाळीस ते पंचेचाळीस हजार पाने काढली जातात. पूर्वी वाड्यांवर केळीच्या झापांचा आधार असायचा; आता त्याजागी शेडनेट, बांबू आणि ठिबक सिंचन आले आहे. ड्रिपमुळे पाण्याचा त्रास कमी झाला, पण मजुरांची टंचाई वाढली. खर्च वाढत गेला आणि भाव कमी होत गेले, त्यामुळे छोटा शेतकरी या व्यवसायापासून दूर गेला.“
 
 
“पूर्वी माहीम-केळव्याची पाने रेल्वेने मुंबईत आणि तिथून थेट दिल्लीमार्गे उत्तर प्रदेशात पाठवली जात होती. मात्र आता ती रेल्वे वाहतूक बंद झाली आहे. तरीही या परंपरेने हार मानलेली नाही. माहीम आणि केळव्याचे व्यापारी आता एकत्र येऊन ट्रकद्वारे दिल्लीमार्गे उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत पाने पोहोचवत आहेत. वसईमध्ये आज सिमेंटचे जंगल उभे राहिले असले, तरी माहीम-केळव्याच्या बाजाराने पानावरील अस्सल गोडवा अजूनही जिवंत ठेवला आहे,“ असे जयेश राऊत अभिमानाने सांगतात.
 
 
जयेश राऊत यांच्या या कथनातून केवळ एका शेतकर्‍याचा वैयक्तिक प्रवास उलगडत नाही, तर पालघर पट्ट्यातील पानशेतीचे बदलते समाज-अर्थकारण, परंपरेशी असलेली नाळ आणि काळाच्या प्रवाहात टिकून राहण्यासाठी सुरू असलेला शेतकर्‍यांचा संघर्षही अधोरेखित होतो.
 
 
केळवे येथील प्रगतशील शेतकरी आणि पानवेलीचे व्यापारी सचिन चुरी (वय 49 वर्षे) यांचा अनुभव पारंपरिक पानशेतीला आधुनिकतेची आणि व्यापार दृष्टीकोनाची नवी दिशा देणारा ठरतो. इयत्ता बारावीपर्यंत शिक्षण घेतलेल्या सचिन गेल्या दहा वर्षांपासून शेतीत, तर मागील सहा वर्षांपासून पानवेलीच्या निर्यात व्यापारात सक्रिय आहेत. आजोबांकडून चालत आलेला पानशेतीचा वारसा त्यांनी केवळ जपला नाही, तर आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत त्याला अधिक सक्षम बनवले आहे.
 
 
सचिन चुरी सांगतात, “सध्या आमची दोन एकर पानशेती आहे. सुरुवातीला पॉलिहाऊसमध्ये झरबेरा फुलशेती केली होती; मात्र नंतर त्याच ठिकाणी पानवेलीची लागवड सुरू केली. पॉलिहाऊसमुळे पावसावर नियंत्रण ठेवता येते आणि तापमान 16 ते 18 अंशांच्या खाली जात नाही. त्यामुळे वर्षभर, म्हणजेच बारा महिने उत्पादन घेणे शक्य होते. वेलींना आधार देण्यासाठी आम्ही जंगलातील काठ्यांचा वापर करून मांडव तयार करतो.“
 
 
केळवे परिसरातील बाजारपेठ आणि पानशेतीच्या अर्थकारणाविषयी बोलताना ते सांगतात, “आमच्या भागातील ‘कालीपट्टी’ पाने चवीला तिखट आणि रंगाने गडद हिरवी असतात. त्यामुळे उत्तर प्रदेशात या पानांना मोठी मागणी आहे. हवामान अनुकूल असल्यास आम्ही दोन दिवसांत तब्बल 80 हजार पाने तोडतो. केळवे परिसरात सुमारे 200 ते 250 छोटे-मोठे शेतकरी या व्यवसायात कार्यरत आहेत आणि बाजाराच्या दिवशी जवळपास 500 टोपल्या पानांची विक्री होते. थंडीच्या दिवसांत उत्पादन घटल्याने मोठ्या पानांच्या एका टोपलीला सहा हजार रुपयांपर्यंत दर मिळतो. या व्यवसायामुळे माझ्याकडे 20 ते 22 मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे.“
 
 
सचिन चुरी यांच्या अनुभवातून पानशेतीतील परंपरा, आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार, बदलते बाजारव्यवस्थापन आणि ग्रामीण रोजगारनिर्मिती यांचा सुंदर संगम दिसून येतो.
 
 
आव्हाने आणि उपाय
 
 
पालघर जिल्ह्यातील पानवेलीची शेती आज अनेक गंभीर आव्हानांसमोर उभी आहे. समुद्रकिनारी भाग असल्यामुळे ‘खारट हवेचा’ परिणाम नियंत्रित करणे हे बागायतदारांसाठी मोठे आव्हान ठरत आहे. वाढते तापमान, अनिश्चित पाऊस आणि बदलते हवामान यामुळे नागवेलीवर ‘करपा’ आणि ‘मर’सारख्या रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. परिणामी, शेतकर्‍यांना बुरशीनाशकांवर अधिक खर्च करावा लागत आहे. समुद्रकिनार्‍यावरील गाळाची माती पानवेलीच्या वाढीस पोषक असली, तरी वाढत्या खारटपणामुळे वेलींच्या आयुष्यावर परिणाम होत असल्याची चिंता बागायतदार व्यक्त करत आहेत.
 
 
पानशेती ही केवळ पारंपरिक शेती नसून, चोवीस तास लक्ष द्यावे लागणारा अत्यंत मेहनतीचा व्यवसाय आहे. प्रचंड शारीरिक कष्ट आणि त्याच्या तुलनेत मिळणारा कमी मोबदला यांमुळे आजची तरुण पिढी या व्यवसायापासून दूर जात असून शहरातील नोकरीकडे अधिक आकर्षित होत आहे.
 
 
ही परिस्थिती बदलण्यासाठी आणि पानशेतीचा वारसा टिकवण्यासाठी शेतकरी काही महत्त्वाच्या मागण्या पुढे करत आहेत. प्रगतशील शेतकरी सचिन चुरी यांच्या मते, “पान उत्पादकांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन झाल्यास त्यांच्या प्रश्नांची थेट दखल घेतली जाऊ शकते. कडाक्याची थंडी, अतिवृष्टी किंवा अवकाळी पावसामुळे अनेकदा संपूर्ण पानवेलीचे नुकसान होते. अशा संकटाच्या काळात सरसकट पीक विम्याऐवजी पानशेतीसाठी स्वतंत्र आणि विशेष विमा कवच असणे आवश्यक आहे. यासोबतच ठिबक सिंचन, शेडनेट आणि लोखंडी मांडव उभारणीसाठी मिळणारे सरकारी अनुदान वेळेवर मिळावे,“ अशीही शेतकर्‍यांची मागणी आहे.
 
 
माहीम-केळवे पानाला ‘जीआय टॅग’ची प्रतीक्षा
 
ज्याप्रमाणे डहाणूचा चिकू, जळगावची केळी आणि रत्नागिरीचा हापूस आंबा यांनी जागतिक स्तरावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे, त्याचप्रमाणे पालघर जिल्ह्यातील ‘माहीम-केळवे’च्या प्रसिद्ध काळ्या पानाला अर्थात ‘कालीपट्टी’ला देखील जागतिक मान्यता मिळावी, ही आजची गरज बनली आहे. यासाठी पालघरमधील पान उत्पादक, व्यापारी आणि व्यावसायिक आता ‘जीआय टॅग’च्या प्रतीक्षेत आहेत.‘जीआय टॅग’ (ॠशेसीरहिळलरश्र खपवळलरींळेप) म्हणजे एखाद्या विशिष्ट प्रदेशातील उत्पादनाला मिळणारे भौगोलिक मानांकन. एखाद्या उत्पादनाची गुणवत्ता, वैशिष्ट्ये आणि ख्याती ही त्या प्रदेशातील हवामान, माती आणि पारंपरिक कौशल्यांशी निगडित असेल, तर त्या उत्पादनाला हा विशेष दर्जा दिला जातो. यामुळे त्या उत्पादनाची नक्कल करणे कठीण होते आणि त्याला कायदेशीर संरक्षण प्राप्त होते.
 
 
माहीम-केळवे परिसरातील ‘कालीपट्टी’ पानाची चव, रंग आणि टिकाऊपणा ही त्याची खास वैशिष्ट्ये मानली जातात. त्यामुळे उत्तर भारतात या पानाला मोठी मागणी आहे. मात्र, योग्य सरकारी पाठबळ, प्रभावी ब्रँडिंग आणि ‘जीआय टॅग’ मिळाल्यास या विड्याच्या पानाला जागतिक बाजारपेठेत स्वतंत्र ‘ब्रँड व्हॅल्यू’ प्राप्त होऊ शकते. त्याचा थेट फायदा शेतकर्‍यांना चांगल्या दराच्या स्वरूपात मिळेल.
 
 
एकूणच नागवेलीचे पान हे केवळ परंपरेचे प्रतीक नाही, तर पालघरच्या मातीत रुजलेला सांस्कृतिक आणि कृषी वारसा आहे. शेतकर्‍यांची जिद्द, निसर्गाशी सुरू असलेला संघर्ष आणि जागतिक ओळखीची आस यांमधून ‘माहीम-केळवे पान’ आजही आपला अस्सल गोडवा आणि इतिहास अभिमानाने जपताना दिसतात.