आंबा शेतीचा ‘नाबर’ पॅटर्न!

विवेक मराठी    22-May-2026
Total Views |
 @ उत्तरा मोने 
सिव्हिल इंजिनिअर भूषण नाबर यांनी पारंपरिक आंबा शेतीला आधुनिक व वैज्ञानिक दृष्टीकोन दिला. ’युरेपगॅप’ प्रमाणपत्र मिळवत त्यांनी कोकणातील आंबा थेट ’व्हाईट हाऊस’पर्यंत पोहोचवला.शेतकर्‍यांना संघटित करून त्यांनी आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचे नवे दालन उघडून दिले. त्यांचा हा प्रवास पारंपरिक शेती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा एक आश्वासक चेहरा आहे.
mango
 
 
कोकणातील लाल माती, समुद्राच्या वार्‍यांनी आणि निसर्गाच्या आशीर्वादाने समृद्ध झालेल्या या भूमीत अनेक शेतकरी आपापल्या पद्धतीने शेतीत नवनवीन प्रयोग करत आहेत. मात्र या सर्वांमध्ये काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात जी केवळ स्वतःच्या शेतीपुरती मर्यादित न राहता संपूर्ण परिसरासाठी मार्गदर्शक ठरतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भूषण पद्माकर नाबर हे असेच एक नाव आहे, ज्यांनी आपल्या जिद्द, अभ्यासू वृत्ती आणि प्रयोगशीलतेच्या जोरावर आंबा उत्पादनाला एक वेगळे परिमाण दिले आहे.
 
 
भूषण नाबर यांचा प्रवास पाहिला, तर तो सरळ शेतीतून सुरू झालेला नाही. त्यांनी 1991 साली बी.ई. (स्थापत्य) ही अभियांत्रिकी पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन आपल्या करिअरची सुरुवात बांधकाम क्षेत्रात केली. शिक्षणानंतर त्यांनी आपल्या गावात सिमेंट वस्तू निर्मितीचा व्यवसाय सुरू केला. म्हणजेच त्यांची मूळ ओळख ही एक अभियंता आणि उद्योजक अशी होती. सुरुवातीच्या काळात त्यांनी गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर तसेच कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर म्हणून काम केले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी स्वतःचा फ्लोरिंग टाईल्सचा कारखानादेखील काढला. त्यांचा कारखाना हा जिल्ह्यातील सर्वाधिक फ्लोरिंग टाईल्स विक्री करणारा कारखाना होता आणि त्यांना महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट लघु उद्योजक पुरस्कारदेखील पालकमंत्र्यांच्या हस्ते मिळालेला आहे.
 
 

mango
 
त्यांच्या घरात पारंपरिक आंब्याची बाग असली तरी तिचे व्यवस्थापन करारावर दिले जात असे. या पार्श्वभूमीवर शेती हा त्यांच्या आयुष्याचा मुख्य केंद्रबिंदू नव्हता. मात्र 1997-98च्या सुमारास एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट त्यांच्या आयुष्यात आला. कराराने दिलेल्या आंबा बागेतून अपेक्षित आर्थिक परतावा मिळत नव्हता. ही बाब त्यांच्या व्यावसायिक दृष्टीकोनाला पटली नाही आणि त्यांनी स्वतः बागेचे व्यवस्थापन हाती घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीच्या काळात त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आंबा जातींची ओळख, उत्पादनाचे गणित, बाजारपेठेचे स्वरूप या सगळ्या गोष्टी नव्याने शिकाव्या लागल्या.
 
 
याच टप्प्यावर त्यांच्या जिज्ञासू वृत्तीने काम केले. त्यांनी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांशी संवाद साधला, इतर शेतकर्‍यांच्या बागांना भेटी दिल्या आणि नव्या तंत्रज्ञानाचा अभ्यास सुरू केला. दापोली कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन, इंटरनेटच्या माध्यमातून मिळालेली माहिती आणि स्वतःचा अभ्यास यामुळे त्यांनी आंबा उत्पादनाकडे एक वैज्ञानिक दृष्टीकोनातून पाहण्यास सुरुवात केली.
”माझे शिक्षण बी.ई. सिव्हिल, त्यामुळे बांधकाम व्यवसायातच जास्त लक्ष; वडीलच आंबा बाग बघायचे, त्यामुळे काही वेळा फळाच्या जातीतील फरकही मला समजत नव्हता. पण व्यावसायिक दृष्टीतून कराराने आंबा बाग देणे मला काही फायदेशीर वाटले नाही, त्यामुळे मी स्वतःच बागेचे व्यवस्थापन सुरू केले. 1997पर्यंत आमच्या बागेतून 800 पेटी आंबा निघत होता, पण आता योग्य व्यवस्थापनामुळे जवळजवळ तीन हजार पेटींच्या पुढे आंबा निघतोय. यासाठी मला माझे व्यावसायिक कौशल्य कामी आले. त्यामुळेच मला आता युरेपगॅप प्रमाणपत्र मिळाले आहे.” एकंदरीत बदलत्या परिस्थितीबद्दल भूषण नाबर सांगत होते.
 

mango 
 
युरेपगॅप प्रमाणीकरणाच्या दृष्टीने नाबर यांनी प्रत्येक झाडाची नोंदणी केलेली आहे. त्यांना स्वतंत्र क्रमांक दिलेला आहे. तसेच प्रत्येक झाडाला किती खत दिले, कोणत्या फवारण्या घेतल्या, उत्पादन किती निघाले, फळातील कीडनाशकांचा उर्वरित अंश तपासणीचा अहवाल याचीही नोंद झाडानुसार ठेवण्यात आली आहे. या बागेतील जमीन आणि पाणी परीक्षणदेखील करून घेतले आहे. बागेचा पूर्ण नकाशा हा कुंपणाजवळच लावलेला आहे. त्यामुळे संपूर्ण बागेचे चित्र स्पष्ट होते. याचा फायदा असा, की यावरून ’हार्वेस्ट कोड’ देता येतो. समजा फळांच्या गुणवत्तेबाबत तक्रार आली, तर लगेचच कोणत्या बागेतील, कोणत्या झाडापासून फळ मिळाले आहे, याचा तपास लागतो. पण अजून तशी तक्रार कोणत्याही व्यापार्‍याने केलेली नाही, हे बागेच्या व्यवस्थापनाचे यश आहे.
 
 
त्यांच्या बागेचे क्षेत्रफळ सुमारे 15 हेक्टर असून त्यामध्ये जुनी आणि नवीन अशा दोन्ही प्रकारची आंबा लागवड आहे. विशेष म्हणजे त्यांनी केवळ पारंपरिक पद्धतीवर अवलंबून न राहता आधुनिक व्यवस्थापन तंत्रांचा अवलंब केला.
 
 
भूषण नाबर यांच्या कामातील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे मृद व जल व्यवस्थापन. त्यांनी मृदसंधारणाच्या माध्यमातून जमिनीवर समतल चर आणि बांध बांधून पावसाचे पाणी अडवले, ज्यामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढली. तसेच त्यांनी दोन विहिरी आणि एक कूपनलिका तयार करून सिंचनाची मजबूत व्यवस्था उभी केली.
 

mango 
 
त्यांच्या प्रयोगशीलतेचा आणखी एक उत्तम नमुना म्हणजे डोलोमाईट पावडरचा वापर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आम्लयुक्त जमिनीत कॅल्शियम आणि मॅग्नेशियमची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनी डोलोमाईटचा वापर सुरू केला. या प्रयोगामुळे जमिनीचा पोत सुधारला आणि उत्पादनात लक्षणीय वाढ झाली. आज अनेक शेतकरी त्यांच्या या प्रयोगाचे अनुकरण करत आहेत.
 
 
पीक संरक्षणासाठी त्यांनी पारंपरिक आणि आधुनिक पद्धतींचा सुंदर संगम साधला आहे. झाडांवर पाण्याचा फवारा मारून कीड नियंत्रण करणे, निंबोळी अर्क आणि लसूण पेस्ट यांसारख्या नैसर्गिक उपायांचा वापर करणे, तसेच गरज पडल्यासच नियंत्रित प्रमाणात कीटकनाशके वापरणे या सर्व गोष्टी त्यांच्या व्यवस्थापनात दिसून येतात. विशेष म्हणजे ते दरवर्षी आपल्या फळांचे कीटकनाशक अवशेष परीक्षण करून घेतात आणि त्यामध्ये कोणताही हानिकारक अंश आढळत नाही.
 
 
आंबा हे फळ पिकल्यावरच विकले जाते, त्यामुळे फळे लवकर आणि योग्य प्रमाणात पिकविण्यासाठी नाबर यांनी बागेजवळच ’रायपनिंग चेंबर’ची उभारणी केली आहे. यामध्ये 100 ते 200 पीपीएम या प्रमाणात इथिलिनच्या वाफेचा वापर फळ पिकविण्यासाठी केला जातो. यामुळे फळ लवकर पिकतं, चांगला रंग येतो आणि मुख्य म्हणजे आरोग्याच्या दृष्टीने हे सुरक्षित आहे. या चेंबरसाठी साडेतीन लाख रुपये खर्च आला असून, यामध्ये एका वेळी 600 डझन आंबे तीन दिवसांत पिकविता येतात. गवताचा वापर करून आंबे पिकायला सात दिवसांचा कालावधी लागतो.
 
 
या सर्व प्रयत्नांचा परिणाम म्हणजे उत्पादनात झालेली प्रचंड वाढ. केवळ 15 टनांवरून त्यांनी आंब्याचे उत्पादन 70 टनांपर्यंत नेले, ही त्यांच्या व्यवस्थापन कौशल्याची साक्ष आहे.
 
 
भूषण नाबर यांनी केवळ उत्पादनावर भर दिला नाही, तर काढणी पश्चात प्रक्रियेलाही तेवढेच महत्त्व दिले. त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले अत्याधुनिक खाजगी पॅक हाऊस उभारले आणि इथिलिन रायपनिंग चेंबरची निर्मिती केली. यामुळे आंबा नैसर्गिक पद्धतीने, सुरक्षितरीत्या आणि बाजारपेठेच्या मागणीनुसार पिकवणे शक्य झाले.
 
 
त्यांच्या कामगिरीतील एक अत्यंत उल्लेखनीय बाब म्हणजे आंबा निर्यात. सुरुवातीला त्यांनी आखाती देशांमध्ये निर्यात केली, परंतु गुणवत्तेच्या जोरावर त्यांचा आंबा युरोप, जपान आणि इतर देशांमध्ये पोहोचला. त्यांच्या आंबा बागेतील गोवा मानकूर जातीचा आंबा व्हाईट हाऊसपर्यंतदेखील पोहोचलेला आहे. या सगळ्यासाठी आवश्यक असलेले ‘युरेपगॅप’ प्रमाणपत्र मिळविणारे ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले आणि भारतातील दुसरे आंबा उत्पादक ठरले.
 
 
नाबर यांच्या बागेला आंतरराष्ट्रीय स्तरावरही मान्यता मिळाली आहे. अमेरिका आणि चीनमधील तज्ज्ञांनी त्यांच्या बागेला भेट देऊन व्यवस्थापनाची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले. त्यांच्या कामामुळे भारतातून आंबा निर्यातीस परवानगी मिळण्याच्या प्रक्रियेलाही हातभार लागला. नाबर यांनी पुढाकार घेऊन ’वेंगुर्ला प्रोड्युसर कंपनी लिमिटेड’ या नावाने 2016मध्ये आंबा उत्पादकांची शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन केली. वेंगुर्ला, कुडाळ व सावंतवाडी तालुक्यातील 537 आंबा उत्पादक या कंपनीचे भागधारक आहेत. या कंपनीच्या अपेडा प्रमाणित ‘एक्सपोर्ट पॅक हाऊस’च्या प्रस्तावित प्रकल्पाला शासनाकडून मान्यता मिळाली असून या प्रकल्पाचे बांधकाम चालू आहे. अशा प्रकारे शेतकर्‍यांचा आंबा एकत्रितरीत्या निर्यात करण्याचा प्रयत्न होत आहे.
 
 
या सर्व यशामागे केवळ वैयक्तिक प्रगतीचा विचार नाही, तर समाजाभिमुख दृष्टीही आहे. भूषण नाबर हे शेतकरी सल्ला समितीचे सदस्य असून विविध शेतकरी मेळावे, प्रशिक्षण शिबिरे आणि चर्चासत्रांमध्ये ते मार्गदर्शन करतात. त्यांच्या बागेला भेट देऊन अनेक शेतकरी आधुनिक तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन शिकत आहेत.
 
 
त्यांनी आयोजित केलेला ‘सिंधु अ‍ॅग्रो’ महोत्सव हा जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी एक महत्त्वाचा उपक्रम ठरला. या महोत्सवातून हजारो शेतकर्‍यांना नवीन तंत्रज्ञान आणि बाजारपेठेची माहिती मिळाली.
 
 
या सर्व प्रवासात भूषण नाबर यांना त्यांच्या घरच्यांचे खूप मोठे सहकार्य मिळाले आहे. त्यांची पत्नी स्मिता ह्या लेक्चरर होत्या. सध्या जॉब सोडून पूर्णवेळ त्या नाबर यांच्याबरोबर आंबा व्यवसायामध्येच काम करतात. त्यांची मुलगी शर्वरी हिने कॉम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये बी. टेक केलं आहे. ती सध्या इन्फोसिस कंपनीमध्ये रोबोटिक्स प्रोसेस ऑटोमेशनमध्ये काम करते. तर मुलगा शशांक फूड टेक्नॉलॉजी शिकत आहे. कोकणातील विविध फळांपासून निरनिराळे प्रॉडक्ट्स बनविण्यात त्याला विशेष रुची आहे. त्यामुळे त्यांच्या शेतीतून निर्माण होणार्‍या विविध घटकांचा वापर करून त्याचा उद्योग पुढे उभारला जाऊ शकतो.
 
 
भूषण नाबर यांचा प्रवास ही केवळ एका शेतकर्‍याची यशोगाथा नाही, तर तो आधुनिक शेतीच्या दिशेने वाटचाल करणार्‍या भारतातील बदलत्या कृषी संस्कृतीचा आरसा आहे. त्यांनी दाखवून दिले की शिक्षण, तंत्रज्ञान, व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांच्या जोरावर शेती ही केवळ उपजीविकेचे साधन न राहता एक यशस्वी उद्योगही बनू शकते.
 
 
आजच्या काळात, जेव्हा अनेक तरुण शेतीपासून दूर जात आहेत, तेव्हा भूषण नाबर यांची कथा प्रेरणादायी ठरते. त्यांच्या कार्यातून एक स्पष्ट संदेश मिळतो की शेतीत यशस्वी व्हायचे असेल, तर परंपरा आणि नवतंत्रज्ञान यांचा समतोल साधत, गुणवत्ता आणि बाजारपेठेचा अभ्यास करत पुढे जाणे आवश्यक आहे.