@किशोर रामचंद्र निर्मळ
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर अहिल्यानगर जिल्हा कार्यवाह आणि निष्ठावान स्वयंसेवक लव शंकरराव शिंदे यांचे अचानक झालेले निधन हा संघ परिवारासाठी मोठा धक्का आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहणारा लेख..
गुरुवार, दिनांक 5 मे 2026 रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास लवजींचे राहत्या घरी (अशोकनगर, ता. श्रीरामपूर) हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अचानक निधन झाले. या बातमीने आम्हा सर्व स्वयंसेवकांना प्रचंड धक्का बसला. लवजी आणि आमचा दैनंदिन संबंध यायचा. त्यांचे निधन होण्याच्या अवघे दोन दिवस आधीच आम्ही दोघांनी पुणतांबा, राहाता आणि शिर्डी असा एकत्र प्रवास केला होता. या प्रवासात संघाचे आगामी कार्यक्रम, उपक्रम आणि योजना यांवरच चर्चा झाली.
त्यांनी मला सांगितले होते की, ते पुढील जून महिन्यात नोकरीतून निवृत्त होत आहेत. निवृत्तीनंतर हॉस्टेल सोडून ते श्रीरामपूर शहरात कायमचे राहणार होते. श्रीरामपूरमधूनच बालकांची दैनंदिन शाखा सुरू करण्याचा त्यांचा मानस होता. आता पूर्ण वेळ संघकाम करण्याची त्यांची तयारी होती. पण अचानक एखादा दिवस मध्ये जातो आणि ते गेल्याची बातमी येते...या कलियुगात आयुष्याची अनिश्चितता किती वाढली आहे, याची जाणीव काळीज चिरून जाते. राहाता येथील आमचे मित्र आणि ज्येष्ठ पत्रकार सतीशराव वैजापूरकर यांनी आम्हा दोघांचा सत्कार केला होता, त्याचे छायाचित्र आणि तो प्रवास आमचा अखेरचा ठरला.
शनिवार, दिनांक 16 मे 2026रोजी अहिल्यानगरचा प्राथमिक संघ शिक्षा वर्ग सुरू झाला. या वर्गाच्या उद्घाटन सत्राचा वक्ता म्हणून मी तिथे गेलो होतो. तिथे गेल्यानंतर नुकत्याच तयार केलेल्या बौद्धिक कक्षाला वर्गाच्या अधिकार्यांनी ’दिवंगत लव शंकरराव शिंदे कक्ष’ असे नाव दिल्याचे पाहिले आणि काळजात धस्स झाले. ज्या वर्गाचे सत्र घेण्यासाठी कदाचित लवजी स्वतः माझ्यासोबत आले असते, तिथे वर्ग कक्षाला त्यांचे नाव पाहावे लागल्याने मनात काहूर माजले. अशा प्रसंगातून जाताना मनाची होणारी कालवाकालव सहन होण्यासारखी नसते. आपला सखा, सवंगडी आणि सहकारी असा अनपेक्षितपणे सोडून गेला की हे असे होणे स्वाभाविकच आहे.
लवजींचा स्वभाव काहीसा तापट होता. ते कधीही कुणाच्या पाठीमागे बोलत नसत. जे काही असेल ते समोरासमोर स्पष्ट बोलणे हा त्यांचा स्वभाव सर्वांना ठाऊक होता. यानिमित्ताने मला एक गोष्ट सांगावीशी वाटते. कोणी आपल्याला काही बोलले की आपण लगेच नाराज होतो, आपला अहंकार दुखावला जातो आणि अपमान झाल्याची भावना मनात येते. अशा वेळी समोरचा माणूस ’काय बोलला’ याचा विचार करून नाराज होण्यापेक्षा, तो ’का बोलला’ याचा विचार केला तर मन अस्वस्थ होणार नाही.
लव शिंदे आणि मी उत्तर अहिल्यानगर जिल्हा कार्यकारिणीमध्ये अनेक वर्षे एकत्र काम केले. आम्ही शेकडो वेळा एकत्र प्रवास केला. परगावी निवासी बैठकींना सोबत जाताना त्यांचे अनुभव, त्यांची विचारशैली, त्यांचे व्यवस्थापन आणि कार्यकर्त्यांविषयीचा त्यांचा सेवाभाव जवळून पाहता आला. त्यांच्याकडून मलाही संघकार्य शिकायला मिळाले.
कार्यकर्ते घडवण्याची त्यांची एक विशिष्ट पद्धत होती. कामात कार्यकर्त्यांकडून झालेला गहाळपणा किंवा निष्काळजीपणा त्यांना अजिबात आवडत नसे. अशा वेळी ते मागे-पुढे न पाहता स्पष्ट शब्दांत त्या कार्यकर्त्याची कानउघाडणी करायचे. आपल्यामुळे संघकामाचे नुकसान होऊ नये आणि काम मागे पडू नये, याकडे त्यांचा कटाक्ष असायचा.
त्यांचा स्वभाव अत्यंत शिस्तप्रिय होता. असे असूनही स्वयंसेवकांना वेळप्रसंगी मार्गदर्शन करणे, मदत करणे आणि त्यांची योग्य ठिकाणी जोडणी करून देणे, हे मी अनेकदा पाहिले आहे. ’संघाची आज्ञा शिरसावंद्य’ हा त्यांचा शिरस्ता होता आणि त्यांनी तो अखेरपर्यंत प्रामाणिकपणे निभावला. आता कुठे त्यांच्या आरामाचे दिवस येणार होते, पण त्यांची ही अकाली एक्झिट सर्वांना हिरमुसले करून गेली. त्यांच्यासारख्या गुणी कार्यकर्त्याचा सहवास मिळणे हे भाग्याचेच म्हणावे लागेल.
या वेळी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा या गीताची आणि लतादीदींच्या जन पळभर म्हणतील हाय हाय, मी जाता राहील कार्य काय? अशा भावगीतांची आठवण येते. पण, संघ परिवारात मात्र असे होत नाही. कार्यकर्त्याने केलेले कार्य संघात कधीही विस्मृतीत जात नाही. लवजींच्या कार्याची दखल आणि आठवण नेहमीच ताजी राहील.
चालत राहणे, चालत राहणे हाच आपला मंत्र आहे... हे संघगीत आपल्याला हेच सांगते की काळ कोणासाठी थांबत नाही. चालत राहणे क्रमप्राप्त आहे आणि तेच आपले प्रारब्ध आहे. लवजींच्या आठवणींना उजाळा देताना अनेक प्रसंग डोळ्यांसमोर तरंगत आहेत. माझ्या या प्रिय सहकार्याला आणि मित्राला मी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो.
- किशोर रामचंद्र निर्मळ 9763727777
लेखक हे उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या श्रीरामपूर तालुक्यातील किसान कनेक्टचे संचालक आहेत.