@संध्या धुरी
फक्त इयत्ता नववी शिकलेला आणि वडिलांसोबत सायकलवर रद्दी गोळा करणारा मुलगा आज 2000 पेक्षा जास्त मोठ्या कंपन्यांना पेपर श्रेडिंगची सेवा देतोय, यावर कदाचित विश्वास बसणार नाही. पण पुण्याच्या भीमा शिंदे यांनी ‘श्रेडर्स, पुणे’ ब्रँडच्या माध्यमातून हे प्रत्यक्ष करून दाखवले आहे. कंपन्यांच्या दारात जाऊन गोपनीय कागदपत्रांची सुरक्षित विल्हेवाट लावतानाच, आजवर 1900 टन कागद रिसायकल करून 32000 पेक्षा जास्त झाडे वाचविली आहेत. भीमा शिंदे यांचा हा पर्यावरणपूरक व्यवसाय नक्कीच दिशादर्शक ठरेल असाच आहे.
5 जून हा दिवस ’जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन केले जाते. झाडे लावण्यापासून ते कचरा व्यवस्थापनापर्यंत अनेक विषयांवर चर्चा होते. पण याच कचर्यातील एका प्रकाराकडे, रद्दीकडे एका वेगळ्या नजरेने पाहून, त्यातून एक यशस्वी आणि पर्यावरणपूरक उद्योग उभा करता येतो, हे पुण्यातील 29 वर्षांच्या तरुणाने सिद्ध करून दाखवले आहे. फक्त नववी शिकलेला, वडिलांसोबत सायकलवरून रद्दी गोळा करणारा एक सामान्य मुलगा जेव्हा कॉर्पोरेट जगतातल्या मोठमोठ्या कंपन्यांना अतिशय विश्वासार्ह आणि गोपनीय सेवा पुरवणारा यशस्वी उद्योजक बनतो, तेव्हा ती कथा केवळ एका उद्योजकाची राहत नाही, तर ती अनेकांसाठी प्रेरणा ठरते. ही थक्क करणारी यशकथा पुण्यात कोथरूड परिसरात राहणार्या भीमा शिंदे यांची आहे. रद्दीच्या व्यवसायातून सुरुवात करून आज ’पेपर श्रेडिंग’ आणि ’कागद पुनर्वापर’ क्षेत्रात त्यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे.
भीमा शिंदे यांच्या संघर्षाची सुरुवात इतर कोणत्याही सामान्य मुलासारखीच होती. घरची परिस्थिती अतिशय बेताची, बिकट होती. यामुळे त्यांना केवळ नववीपर्यंतच शिक्षण घेता आले. शिक्षण सुटले तरी जिद्द सुटली नव्हती. 2016च्या सुमारास भीमा आपल्या वडिलांच्या व्यवसायात उतरले. त्यांचे वडील सायकलवर दारोदारी, गल्लोगल्ली फिरून रद्दी गोळा करायचे आणि भीमा ती रद्दी दुकानात आणून टाकायचे. पुण्यात कोथरूड परिसारत त्यांचा एक छोटासा 5 बाय 5 चा रद्दीचा गाळा होता.
दिवसभर कष्ट करूनही म्हणावा तसा नफा मिळत नव्हता. कारण बाजारामध्ये दारोदारी रद्दी घेणारी खूप दुकाने झाली होती. स्पर्धा वाढली होती आणि या पारंपरिक व्यवसायातून मोठमोठ्या ऑफिसेस, कॉर्पोरेट कंपन्यांची रद्दी मिळवणे खूप कठीण होते. सुरुवातीच्या संघर्षमय दिवसांबद्दल भीमा सांगतात, ”वडिलांसोबत सायकलवरून रद्दी गोळा करायला जात होतो. पण आम्हाला मोठमोठ्या ऑफिसेसची रद्दी मिळत नव्हती. म्हणावा तसा आर्थिक नफा होेत नव्हता.” तेव्हा या स्पर्धेत टिकण्यासाठी वेगळे केले पाहिजे हे भीमा यांनी अचूक ओळखले.
'पेपर श्रेडिंग’ची सुरुवात
कॉर्पोरेट कंपन्यांकडे असणारा रद्दी कागद हा साधा सुधा नसून, त्यात त्यांच्या कंपनीची अत्यंत महत्त्वाची, गोपनीय माहिती (Confidential Data) असते. कॉर्पोरेट क्लायंट्सकडून भीमा यांना, ’आम्हाला कंपनीची गोपनीय कागदपत्रे रद्दीत द्यायची आहेत. पण ती योग्य प्रकारे विल्हेवाट लावून रद्दीत देण्याची सुविधा आहे का? आमच्याकडून तुमच्याकडे आलेला एकही महत्त्वाचा कागद मिस होता कामा नये, याची खात्री तुम्ही द्याल का? तुमच्याकडे श्रेडर मशीन आहे का?’ अशी विचारणा व्हायची.
अशाप्रकारे भीमा यांना ’पेपर श्रेडिंग’ (कागदाचे बारीक तुकडे करून विल्हेवाट लावणे) हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना सुचली. आपल्या या निर्णयाविषयी भीमा सांगतात, ”गोपनीयतेची पूर्वअट असलेली सेवा ग्राहकाला देणे आणि हे करत असताना त्यांचा कोणताही महत्त्वाचा कागद गहाळ होऊ न देणे हे माझ्यासमोरचे आव्हान होते. म्हणून या कामासाठी आम्ही श्रेडिंग मशीन घेण्याचे ठरवले.”
इथूनच भीमा यांच्या ’पेपर श्रेडिंग’ या व्यवसायाच्या दिशेने पहिली पावले पडली. आपल्या या निर्णयाविषयी भीमा सांगतात, ”श्रेडिंगचा व्यावसाय सुरू करण्यापूर्वी वेबसाईट तयार करून घेतली. वेबसाईट सुरू केल्यावर थोड्याच दिवसांनी तीन लाखांची श्रेडिंगची मशीन घेतली. दीड लाखांचा एक सेकंड हँड (जुना) टेम्पो घेतला. नव्या व्यवसायासाठी भांडवल उभे करण्यासाठी घरच्यांनी आर्थिक मदत केली. आता दारोदारी रद्दीची खूप दुकाने झाली आहेत. त्यामुळे काहीतरी वेगळे करायचे आहे म्हणून मी हा व्यवसाय जिद्दीने सुरू केला आणि सुदैवाने तो यशस्वी सुद्धा झाला.”
'श्रेडर्स पुणे’ची स्थापना आणि कल्पक तंत्रज्ञान
वेबसाईट सुरू केल्यानंतर भीमा यांनी मागे वळून पाहिले नाही. त्यांनी ’श्रेडर्स पुणे’ (Shredders Pune) या आपल्या अधिकृत ब्रँडची स्थापना केली. केवळ पारंपरिक पद्धतीने ऑफसाईट श्रेडिंग करण्याऐवजी भीमा यांनी स्वतःच्या कल्पकतेने एक अनोखा प्रयोग केला. याविषयी सांगताना ते म्हणाले, ”आम्ही ’श्रेडर्स पुणे’च्या माध्यमातून केवळ हेवी-ड्युटी श्रेडर्स तयारच करत नाही, तर मी स्वतः एका गाडीवर बसवता येईल अशी एक खास ’मोबाईल हेवी-ड्यूटी पेपर श्रेडर’ मशीन तयार केली आहे. यामुळे आम्ही थेट ग्राहकाच्या दाराशी जाऊन त्यांच्या डोळ्यासमोर ऑन-साईट श्रेडिंगची सेवा देऊ शकतो.”
गोपनीयता आणि विश्वास : कॉर्पोरेट जगतात मारलेली भरारी
सर्वसामान्य माणसाला वाटू शकते की ’श्रेडिंग’ म्हणजे फक्त कागदाचे बारीक तुकडे करणे. पण बँका, सरकारी कार्यालये, आयटी कंपन्या आणि हॉटेल्ससाठी ही त्यांच्या सुरक्षेची गोष्ट असते. जुने आर्थिक दस्तावेज, मेडिकल रेकॉर्ड्स किंवा प्रोजेक्ट रिपोर्ट चुकीच्या हातात पडले, तर मोठे नुकसान होऊ शकते.”कॉर्पोरेट जगताची हीच गरज भीमा यांनी ओळखली आणि ’100% गोपनीयता’ हा आपल्या व्यवसायाचा पाया बनवला.
आत्तापर्यंतच्या यशाबद्दल आणि प्रवासाबद्दल भीमा सांगतात, ”मी फक्त नववीपर्यंत शिकलो आहे. घराची परिस्थिती बेताची असल्यामुळे वडिलांसोबत हा व्यवसाय करू लागलो. आज आम्ही तब्बल 2000 पेक्षा जास्त क्लायंट्सना आमची यशस्वी सेवा पुरविली आहे. यामध्ये पुण्यातील ’मॅरियट हॉटेल’, ’डायकिन कंपनी’ यांसारख्या मोठ्या ब्रँड्सचा समावेश आहे. मी आतापर्यंत ज्या ज्या कंपन्यांसोबत काम केले आहे, त्यांचे लोगो मी माझ्या वेबसाईटवर टाकले आहेत. आज पुण्यात ‘श्रेडर्स’च्या उद्योगामध्ये पहिले नाव माझेच येते.
क्लायंटला सेवा देण्याच्या पद्धतीबद्दल भीमा सांगतात, “माझ्याकडे सध्या माण, हिंजवडी, बाणेर, औंध, पाषाण अशा परिसरातील पेपर श्रेडिंगचे भरपूर काम आहे. लोकांचा किंवा क्लायंटचा फोन आल्यावर मी स्वतः ऑफिसमध्ये जातो, त्यांची भेट घेतो. कागदांची क्वांटिटी कमी असेल तर त्यांना आमच्या रद्दी दुकानात श्रेडिंग करून घेण्यासाठी बोलावतो; पण जर क्वांटिटी जास्त असेल, तर आम्ही आमची गाडी आणि कामगार पाठवून देतो. मोठमोठ्या क्लायंटसोबत उठणे, बसणे आणि त्यांचा विश्वास संपादन करणे, हा एक खूप मोठा अनुभव मला या व्यवसायामुळे मिळाला आहे.”
व्यवसायाचा ताळेबंद आणि पर्यावरण रक्षणाचा थेट संबंध
भीमा शिंदे यांच्या व्यवसायाचे स्वरूप आता व्यावसायिक तर आहेच, पण तेवढेच ते पर्यावरणपूरकही आहे. अनेकदा कंपन्या म्हणतात की, ‘आम्हाला श्रेडिंग करून द्या आणि हा माल तुम्हीच घेऊन जा, आमचे पैसे नकोत.’ हा सर्व श्रेड केलेला कागदाचा माल भीमा आपल्या गोदामात आणतात आणि तिथून तो पुढे ’पेपर रिसायकलिंग’साठी (पुनर्प्रक्रियेसाठी) पाठवला जातो. कागद जाळला जात नसल्यामुळे वायू प्रदूषण टळते.’
या कामातून झालेल्या पर्यावरण बदलाविषयी भीमा अतिशय अभिमानाने सांगतात,“पुणे शहरात गोळा झालेला हा सर्व श्रेड केलेला पेपर मी पुढे रिसायकलिंगसाठी पाठवतो, जेणेकरून पर्यावरणाची हानी कुठेही होऊ नये. 2016पासून मी वडिलांच्या दुकानात येऊ लागलो, तेव्हा कोथरूडमध्ये त्यांचा फक्त 5 बाय 5 चा स्टॉल होता. तिथून सुरू झालेला हा प्रवास 2020मध्ये सुरू केलेल्या या श्रेडिंग व्यवसायाने खर्या अर्थाने बदलला. आम्ही आज गोडाऊन, मशीन अशा सर्व सोयी उभ्या केल्या आहेत. आजपर्यंत आम्ही 1900 टनांपेक्षा जास्त कागद यशस्वीरित्या रिसायकल केला असून जवळपास 32 हजारांपेक्षा जास्त मोठे वृक्ष तोडण्यापासून वाचवले आहेत.”
भीमा यांनी आपल्या व्यवसायाची व्याप्ती वाढवत आता फक्त कागदापुरती मर्यादित न ठेवता ’ई-वेस्ट स्क्रॅप’ (E-waste Scrap) क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. जुने संगणक, लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही, प्रिंटर आणि स्कॅनर यांसारख्या इलेक्ट्रॉनिक कचर्याचे सुरक्षित विघटन आणि पुनर्वापर करण्याचे कामही ’श्रेडर्स पुणे’ करत आहे, ज्यामुळे पर्यावरणाची हानी मोठ्या प्रमाणावर रोखली जात आहे.
तरुण पिढीला संदेश
आज अनेक सुशिक्षित तरुण नोकरीच्या मागे धावत असतात किंवा छोट्या व्यवसायांना कमी लेखतात. भीमा शिंदे अशा तरुणांना सांगतात की,“कोणताही व्यवसाय छोटा किंवा मोठा नसतो. ज्या रद्दीच्या आणि कचर्याच्या व्यवसायाकडे लोक दुर्लक्ष करतात, तिथेच मला संधी दिसली. तरुणांनी पारंपरिक वाटेने न जाता, मार्केटची गरज ओळखून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली पाहिजे. जर प्रामाणिकपणे कष्ट केले आणि ग्राहकांचा विश्वास जिंकला, तर यश नक्की मिळते.”
8793673672
www.shredderspune.com