NEET - अवघड प्रश्न - निश्चित उत्तरे

शिक्षणक्षेत्रातले अराजक कारणे आणि उत्तरे

विवेक मराठी    29-May-2026
Total Views |
 NEET
 
@ डॉ. अशोक कुकडे
 
 
NEET
 
अलीकडेच ‘नीट’ प्रवेशपरीक्षेदरम्यान झालेल्या पेपरफुटीने शैक्षणिक जगत ढवळून निघाले. या घटनेचा शैक्षणिक क्षेत्राशी थेट संबंध असला तरी ती घडण्यामागे अनेक कारणांची क्लिष्ट गुंतागुंत आहे. या समस्येमुळे विद्यार्थीजगताचे तर नुकसान झाले आहेच, पण त्याचबरोबर संपूर्ण समाजावरही दूरगामी परिणाम होणार आहेत. म्हणूनच या संदर्भात एक लेखमाला प्रकाशित करण्याचे ठरवले आहे. या लेखमालेत शिक्षणतज्ज्ञांचा, विचारवंतांचा, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित बुजुर्ग व्यक्तींचा सहभाग असेल. या अराजकामागच्या कारणांचा वेध घेणे आणि त्यावर उपाय सुचवणे हा हेतू यामागे आहे. वाचकांनीही यावर जरूर मत व्यक्त करावे. निवडक मतांचा अंकात समावेश केला जाईल. या विषयातली आपली मते/ विचार vivekeditgmail.com वर आपल्या मोबाईल क्रमांकासहित पाठवावेत.
 
सध्या देशभरामध्ये एक महत्त्वाचा विषय चर्चेच्या मूर्धन्य स्थानी आहे. तो विषय आहे, ’नीट’च्या परीक्षेमधल्या ‘पेपर फुटीचा’. त्याने सर्व समाजजीवन व्यापून टाकलेले आहे. त्याचे कारण असे की समाजातील फार मोठ्या वर्गाच्या नित्य जीवनाशी त्याचा संबंध आहे. अनेकांच्या संपूर्ण जीवनाचे भवितव्य या परीक्षेवरती निश्चित होत असते. वैद्यकीय व्यवसायाकडे जाण्याची ओढ ही आज फार मोठ्या प्रमाणावर आहे. त्याची कारणे हा ह्या लेखाचा विषय नाही. परंतु जी प्रचंड खळबळ आज माजली आहे आणि ह्याविषयी जे अनेक वाद निर्माण झाले आहेत, त्या विषयी चर्चा करणे हे अनिवार्य आहे.कारण भविष्यात समाजजीवनातील महत्त्वाच्या विविध घटकांच्या भवितव्याशी हा विषय निगडीत आहे.
 
 
ह्या परीक्षेमध्ये वेगवेगळे घटक गुंतलेले आहेत. परीक्षार्थी- विद्यार्थी हा सगळ्यात महत्त्वाचा. परीक्षा यंत्रणा हा दुसरा महत्त्वाचा. त्यातील प्रश्नपत्रिका तयार करणे हा एक व वितरण व्यवस्था करून प्रत्यक्ष परीक्षा घेणे हा दुसरा.. असे घटक आहेत. ही सगळी प्रक्रिया राबविणारी शासकीय किंवा शासन नियोजित व्यवस्था हा तिसरा घटक. देशव्यापी असलेल्या ह्या परीक्षेत सुमारे 23 लाख विद्यार्थी ह्या खेपेस बसले होते. ही अवाढव्य यंत्रणा राबविणे हे सोपे काम नव्हे. त्यामध्ये अनेक ठिकाणी ’loopholes’ असतात, निर्माण करता येतात. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे यातील सर्व व्यवहारांची सर्व स्तरावरची गोपनीयता. त्या गोपनियतेलाच तडा जाऊन यंदाची परिस्थिती उद्भवली आहे.
 
 
ही संपूर्ण रचना पूर्णपणे सुरक्षित, fullproof करणे हे सोपे काम नव्हे. प्रत्येक स्तरावर प्रचंड जागरुकता आणि त्याच बरोबर विश्वसनीय रचना ह्यांची जरुरी आहे. हे सर्व राबविणार्‍या या यंत्रणेने खूप प्रयत्नाने हे काम गेली अनेक वर्षे बर्‍यापैकी चालवले आहे. यंदाच्या वर्षी त्यामध्ये व्यत्यय आला. बघता बघता या प्रश्नाने एखाद्या जलद पसरणार्‍या साथीच्या रोगाचे स्वरूप घेतले.
 
 
ह्यातल्या दोन घटकांचा मी विशेष परामर्श घेणार आहे. पहिला विषय-वैद्यकीय अभ्यासक्रमाविषयी असलेली क्रेझ. ही अक्षरशः वेडेपणा वाटावी इतकी वाढली आहे. मी स्वतः गेली साठ-पासष्ट वर्षे वैद्यकीय व्यवसाय, वैद्यकीय शिक्षण व ह्या सर्वांचा सामाजिक संदर्भ ह्यामध्ये खोलवर गुंतलेलो आहे. मला असे वाटते की, वैद्यकीय व्यवसायाची ही क्रेझ अनाठायी आहे. या परीक्षेला बसणारे अनेक विद्यार्थी ह्या अभ्यासक्रमाच्या पात्रतेसाठी आवश्यक क्षमतांपासून खूपच लांब असतात. अशांच्या गर्दीमुळे परीक्षेची व्याप्ती वाढते नव्हे. तर तिला सूज येते. हे टाळता आले तर फार बरे होईल.
 
 
ह्या NEET परीक्षेला आत्यंतिक महत्त्व आल्यामुळे तो जणू जीवनमरणाच्या युद्धाचा विषय झाला आहे. Everything is fair in love and war या उक्तीप्रमाणे कुठल्याही वैध/अवैध/नैतिक/ अनैतिक/असामाजिक मार्गाने यश मिळविणे हेच उद्दिष्ट विद्यार्थी पालक व शैक्षणिक संस्था यांच्यासमोर राहते आहे. त्यातून आजचा हा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. आपण ज्या मार्गाचा अवलंब करत आहोत त्याचे दूरगामी परिणाम शिक्षण, व्यवसाय, समाज, ह्यांच्यावर काय होणार आहेत ह्याचा विचार न करता केलेली अनिष्ट अशी ही सामूहिक कृती होते. सर्वांच्याच व्यापक व दीर्घकालीन हितासाठी हे थांबणे आवश्यक आहे. कारण कुठलाही भ्रष्ट मार्ग हा शेवटी समाजाच्या सर्व क्षेत्रावर विपरीत परिणाम करतो. भ्रष्टाचार वाढतो, अर्थकारण बदलते, विविध स्तरावरती ह्याचा दुष्प्रभाव जाणवतो. ह्या प्रक्रियेतून निर्माण होणारे वैद्यकीय व्यावसायिक कसे असतील असा प्रश्न समोरच्याला पडतो. किंबहुना तसे अनुभव गेल्या दशकामध्ये येऊ लागले आहेतच. हे टाळायचे दोन मार्ग आहेत.
 
 
पहिला मार्ग कायद्याची कठोर अंमलबजावणी. फार व्यापक प्रमाणात कायदे मोडले जात असतील तर कुठलीही मोठी यंत्रणा त्याला पूर्णपणे अटकाव करू शकत नाही. तथापि, शासनाच्या विविध यंत्रणांच्या मार्फत शक्य तेवढे कठोर राहून कायदा मोडणार्‍याला धाक बसेल अशी यंत्रणा स्थिरपणे उभी राहिली पाहिजे, ती उभी करणे हे खूप कष्टाचे व अतिशय व्यापक असे काम आहे. ही व्यवस्था सातत्याने राबविणे हेही सोपे नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा मुळापासून पुनर्विचार करणे आवश्यक आहे. NEET ह्या परीक्षापद्धतीच्या सर्व रचनेवरती फार बारकाईने नजर ठेवावी लागेल. कुठलाही गैरव्यवहार उघडकीस आला की त्यावर कठोर कृती करावी लागेल. हे करण्यासाठी एक निर्दोष व स्वच्छ त्रयस्थ यंत्रणा निर्माण करावी लागेल. आजच्या समाज रचनेत व मानसिकतेत हे काम खूप अवघड, पण अनिवार्यही आहे.
 
 
सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा सामाजिक मानसिकतेचा आहे. ’मी /आम्ही, सामाजिक दृष्टीने कोणताही गैरव्यवहार करणे हे गुन्हा करण्यासारखे आहे, अशी वृत्ती निर्माण करणे आवश्यक आहे. खरा चांगला समाज तो, ज्याला चांगल्या मार्गावर चालण्यासाठी कायद्याच्या धाकापेक्षा सद्विचाराचे कुंपण हे बंधनात ठेवते. त्यामुळे हे काम विद्यार्थी, पालक, समाज व शासन ह्यांच्या मानसिकतेशी आणि व्यवहारांशी संबंधित आहे. अशी आदर्श स्थिती निर्माण होऊ शकते का? किमान काही संस्था व व्यवस्था मला अशा माहिती आहेत की जेथे योग्य त्या प्रकारचे संस्कार करून अशी स्थिती जवळपास पूर्णांशाने निर्माण केलेली आहे. ही संख्या आज कदाचित नगण्य असेल. विद्यार्थ्यांना ’मी कॉपी करून किंवा अन्य गैरमार्गाने यश मिळवणार नाही’ असा दृढ संस्कार हवा. तसे झाल्यास पालकांना आपल्या पाल्यासाठी बेकायदेशीर व्यवहार करणे हे अनुचित वाटेल. शिक्षण संस्थांना दिखाऊ यशासाठी ज्ञानदान करण्याऐवजी परीक्षार्थी निर्माण करणे महत्त्वाचे वाटणार नाही व समाजाला खोट्या प्रतिष्ठेचे व मोठेपणाचे आकर्षण वाटणार नाही गैरव्यवहारांना सामाजिक प्रतिष्ठा व मोठेपणा प्राप्त होणार नाही, अशी सामाजिक मानसिकता सर्वदूर निर्माण झाली पाहिजे.
 
 
 
हे सर्व आदर्श व अशक्यप्राय वाटते. परंतु सुदृढ समाज बांधणीसाठी ते आवश्यक आहे. मी वर म्हटल्याप्रमाणे समाजात आजही असा विचार व व्यवहार करणारे घटक अस्तित्वात आहेत. तशा ठोस संस्कारांची व्यवस्था त्या त्या परिवारात, संस्थांत वा समाज घटकांत प्रत्यक्ष उदाहरणांच्या मध्यामातून राबवली जाते. असे अमीट संस्कार करणे हेच ह्या प्रश्नावरील अत्यंत अवघड पण अनिवार्य उत्तर आहे. परंतु त्या दृष्टीने वाटचाल करावीच लागेल. जगामध्ये काही समाज हे अत्यंत भ्रष्ट म्हणून ओळखले जातात’. त्यांचे राष्ट्रजीवन हे अत्यंत निम्न स्तरावरती राहिले आहे. उलट जेथे सामाजिक चारित्र्याचे संस्कार दृढ आहेत, तेथे समाजजीवन उन्नत झालेले अनुभवास येते. ह्याची उदाहरणे उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास आपल्या जवळपास आणि जगभरही दिसतील.
 
 
म्हणून कुठलाही जवळचा आकर्षक मार्ग न स्वीकारता सर्वांच्या व्यापक हिताचा ’उत्तम सामाजिक संस्कार’ करण्याचा दीर्घकालीन सतत प्रयत्नांचा मार्ग हाच ह्या विषयात उत्तम परिणाम मिळवून देऊ शकेल. आज काही ठिकाणी जे शक्य झाले आहे ते व्यापक प्रमाणावर सर्वदूर होऊ शकेल का?
 
 
लेखक, विवेकानंद हॉस्पिटलचेसंस्थापक विश्वस्त असून आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS)चे माजी सदस्य आहेत.