@अपर्णा देशपांडे
आपल्या घरातील जुन्या सायकली, संगणक किंवा वाचलेली पुस्तकं आपण अनेकदा भंगारात/रद्दीच्या दुकानात देतो. पण आपल्यासाठी निरुपयोगी झालेल्या गोष्टींना पुन्हा नवं रूप देऊन, दुर्गम भागातील हजारो मुलांपर्यंत पोहोचवण्याचं मोलाचं काम प्रवीण महाजन आणि त्यांचे सहकारी करत आहेत. पुनर्वापरातून पर्यावरण रक्षण आणि समाजसेवा एकत्र कशी साध्य करता येते, हे दाखवणारी ही विशेष मुलाखत...
आपल्या घरात अडगळीत पडलेली किंवा आपण भंगारात/रद्दीत टाकून देणारी वस्तू दुसर्या कोणाचं आयुष्य बदलू शकते का? हो, नक्कीच बदलू शकते!
शहरात मुलं मोठी झाली की त्यांच्या सायकली मोडीत काढल्या जातात, तसेच कंपन्यांमधील जुने संगणक-लॅपटॉप निरुपयोगी म्हणून फेकून दिले जातात. हा वाढता कचरा पर्यावरणासाठी एक मोठी डोकंदुखी ठरत आहे.
पण, मूळचे नंदुरबारचे आणि सध्या पुण्यात राहणारे प्रवीण महाजन व त्यांचे सहकारी याच टाकून दिलेल्या वस्तूंना दुरुस्त करून, दुर्गम भागातील गरजू मुलांपर्यंत पोहोचवण्याचं एक मोलाचं काम करत आहेत. या पुनर्वापरामुळे खेड्यापाड्यातील हजारो विद्यार्थ्यांचं आयुष्य सुकर तर झालंच आहे, शिवाय पर्यावरणाचा र्हास रोखण्यासही मदत होत आहे.
‘सा. विवेक’साठी अपर्णा देशपांडे यांनी घेतलेल्या या मुलाखतीतून प्रवीण महाजन यांच्या याच पर्यावरणपूरक आणि समाजशील उपक्रमांचे विविध पैलू समोर आले आहेत.
आपण चालवत असलेल्या ’सायकल बँक’उपक्रमाची थोडक्यात माहिती द्या. उपक्रमाची कल्पना कशी सुचली?
प्रवीण महाजन : साधारण 2019च्या सुरुवातीला मी पुण्यात डहाणूकर कॉलनीत राहत असताना सोसायटीमधील एका ताईंनी त्यांच्याकडील सायकल किलोच्या भावानं भंगारवाल्याला देताना पाहिलं. त्या सायकल अतिशय महागड्या आणि सुस्थितीतल्या होत्या. ते बघून माझं मन सुन्न झालं. मला माझं आणि माझ्या भावंडांचं बालपण आठवलं. शाळेत जाण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यातील कोठली ते शहादा असं फार मोठं अंतर पायी जात असू. कारण तेव्हा सायकल घेण्यासारखी आमच्या कुटुंबाची परिस्थिती नव्हती. ह्या सायकल बघून मला लहान लहान गावात आमच्यासारखी पायपीट करणारी शाळकरी मुलं दिसू लागली. त्यावेळी गरजू मुलांना अशा सायकलींची किती तीव्र गरज आहे हे मला आतून जाणवलं. कारण आज खेड्यापाड्यांत एस.टी. महा बस पोहोचत नाही. मी भंगारवाल्याकडून त्याने सांगितलेल्या भावात त्या पाच सायकल विकत घेतल्या. थोडीफार डागडुजी केली आणि खाजगी बस मधून स्वखर्चानं त्या सायकल कोठली ह्या माझ्या गावी नेल्या. तिथं जेव्हा विद्यार्थ्यांना त्या सायकल दिल्या, तेव्हा एका अनामिक समाधानानं मन भरून गेलं. त्या मुलांना झालेल्या आनंदानं मला त्यांच्या गरजेची तीव्रता जाणवली.
आपल्या थोड्याशा प्रयत्नानं समाजातील एका वर्गाच्या दृष्टीनं निरुपयोगी वस्तूमुळे दुसर्या वर्गातील व्यक्तीचं आयुष्य इतकं सुखकर होऊ शकतं ह्याची प्रचिती आली. त्यातून मोठ्या प्रमाणात हे काम हाती घेण्याची कल्पना सुचली.
या उपक्रमाला व्यापक स्वरूप कसं प्राप्त झालं?
प्रवीण महाजन : गावातील मुलांना दिलेल्या त्या सुरुवातीच्या पाच सायकलींनंतर मला या कामाची खरी दिशा सापडली. मी समाज माध्यमांवर पुण्यातील नागरिकांना एक आवाहन केलं, की तुम्हाला नको असलेल्या जुन्या सायकल आम्हाला द्या, आम्ही त्या खेड्यापाड्यातील गरजू मुलांना आणि विशेष करून मुलींना देऊ. पुणेकरांनी आमच्या हाकेला इतका कमालीचा प्रतिसाद दिला, की आमच्याकडे काही दिवसातच सगळ्या वृत्तपत्रांनी पण त्याची नोंद घेत बातमी देऊन नागरिकांना पुन्हा आवाहन केलं. शहराच्या सगळ्या भागातून म्हणजे पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, शिवाजी नगर, कोथरूड, पेठा आणि मोर्शी या परिसरातून सायकलींचा प्रचंड ओघ सुरू झाला. आम्ही त्यांची ’सायकल बँक’ तयार केली. सध्या पिंपरी चिंचवड परिसरात मोर्शी आणि पुणे शहरात वारजे-माळवाडी इथं आम्ही सायकली गोळा करून खाजगी जागांवर जमा करून ठेवतो. एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात दुरुस्त करून ठेवलेल्या सायकल जमा झाल्या की, टेम्पो भाड्यानं घेऊन त्यांचे शाळाशाळांत वितरण सुरू करतो. वृत्तपत्रातील आवाहन वाचल्या नंतर काही दुर्गम ग्रामीण भागातील शाळांनी स्वतःहून आमच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना सायकलींची गरज असल्याचं कळवलं. आतापर्यंत आम्ही 2000हून अधिक सायकलींचं वाटप केलेेलं आहे. अगदी छोट्या आकाराच्या सायकल आम्ही बालवाड्यांमध्ये दिल्या. आम्हाला सध्या आमच्या सगळ्या उपक्रमांना अखंड सुरू ठेवण्यासाठी मोर्शी किंवा भोसरी विभागात जागेची नितांत गरज आहे. 1000 चौ. फू. इतकी जागा किमान भाडेतत्त्वावर किंवा दान म्हणून मिळाली तर आमच्या कामाला आणखी गती मिळेल.
खरंच खूपच मोठं काम आहे हे. गरजूंना सायकल वाटप करण्याचा एकूण आकडाही समाधान देणारा आहे. तुम्ही माहिती सांगताना ’आम्ही’ असा उल्लेख केला. तुमची संस्था आहे का?
प्रवीण महाजन : हो. सायकल वितरण करण्यापूर्वीच आम्ही नंदुरबार इथं ’युवक मित्र परिवार’ ह्या नावानं संस्था सुरू केली होती. साधारण 2018मध्ये ही संस्था नोंदणीकृत झाली. त्याचे एकूण सात मुख्य सदस्य आहेत. पैकी तिघे कल्पेश राजपूत, उमेश माळी आणि श्वेता महाजन नंदुरबारमधून काम करतात. पुण्याहून सचिन म्हसे, बादलसिंग गिरासे, गणेश सूर्यवंशी आणि प्रदीप देवरे काम करतात. आमचे हे सर्व सदस्य त्यांच्या उत्पन्नाचा एक हिस्सा संस्थेच्या कामासाठी देतात. सायकल गोळा करणं, दुरुस्त करणं आणि टेम्पो मार्फत दुर्गम ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना नेऊन पोहोचवणं अशी सगळी जबाबदारी आमची संस्था उचलते.
कुठलाही सामाजिक उपक्रम म्हटला की चांगले-वाईट अनुभव आले. तुम्हालाही असे अनुभव आले असतील...
प्रवीण महाजन : हो, भरपूर अनुभव येतात. चांगले अनुभव म्हणजे नागरिकांनी उत्स्फुतपणे सायकलींचे दान केले, काहींनी स्वतः दुरुस्ती करून दिल्या. काहींनी आर्थिक मदत केली. विविध विभागाच्या नगरसेवकांनीही मदत केली. वाईट अनुभव म्हणजे एका सोसायटीच्या अध्यक्षांनी फोन करून आम्हाला सायकल उपलब्ध करून दिल्या. आम्ही जाऊन त्या सायकल ताब्यात घेतल्या, संस्थेकडून त्यांना तसं पोचपत्र दिलं, फोटोही काढले. काही दिवसांनी तिथल्या एका नागरिकाने अत्यंत रागात त्यांची सायकल न विचारता कशी नेली असा प्रश्न केला, आणि सायकल परत मागितली. आम्ही अचंभित झालो होतो. सायकलचं वाटप झालेलं असल्यामुळे ती परत देणं शक्यच नव्हतं. आम्ही सायकल मालकांना समजावून सांगितलं. दिलगिरी व्यक्त केली. ते एका पुण्यकर्माचा हिस्सा झाले आहेत हेही सांगितलं. सायकलची किंमत देण्यास तयारही झालो होतो. पण सोसायटीच्या अध्यक्षांशी बोलून शहानिशा केल्यावरही आमच्यावर चोरीचा आरोप करत ते पोलिसात गेले. पोलिसांचेही चांगले वाईट अनुभव आम्हाला येत असतात; पण त्यावेळी तिथल्या पोलीस अधिकार्यांनी आमची बाजू नीट ऐकून घेतली. त्या मालकास सायकलीच्या खरेदीची पावती मागितली, जेणेकरून योग्य तो मोबदला त्यांना आम्ही देऊ शकू, पण त्यांच्याकडे पावती नव्हती. शेवटी कसं बसं ते प्रकरण मिटलं. तिथून पुढे आम्ही सायकल ताब्यात घेताना खूप जास्त शहानिशा करून मगच सायकल नेऊ लागलो. बर्याचदा आमचा सायकल नेणारा टेम्पो पोलीस अडवतात. मग त्यांना सगळे कागदपत्र दाखवून उपक्रमाची नीट माहिती द्यावी लागते.
सायकल बँक व्यतिरिक्त तुमचे इतरही उपक्रम असतील. त्याबद्दल सांगा.
प्रवीण महाजन : सायकल बँक उपक्रमाच्याही आधी म्हणजे 2018पासून आम्ही संगणक वितरण आणि संगणक साक्षरता अभियान सुरू केलेलं आहे. वापरून झालेल्या संगणकाचे सी.पी.यू घ्यायचे, जुन्या बाजारातून मॉनिटर विकत घ्यायचे आणि सगळे पार्ट जोडून नीट वापरात येईल असा संगणक तयार करायचा. पुण्यातील ’सेवा सहयोग’ ही संस्था या उपक्रम मोठ्या प्रमातात राबवते. त्यांच्याकडून मला संगणक वाटपाची संकल्पना सुचली.
आमचे सहकारी सचिन म्हसे हे इलेक्ट्रीकल इंजिनियर आहेत.त्यांच्या साहाय्याने आम्ही नागरिकांकडून वापरात नसलेले संगणक गोळा करतो. काही मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांच्या संपर्कात आहोत. त्यांना नको असलेल्या लॅपटॉप आणि संगणकाच्या वेगवेगळ्या भागांना जोडून, त्यातील डेटा डिलिट करून, त्यात दुरुस्त्या करून आम्ही आजवर राज्यभरात तब्बल 113 शाळांना संगणक विभाग उभे करून दिले आहेत. लहान गावातील मुलांना संगणक साक्षर करण्यासाठी आमची संस्था गेली अनेक वर्ष अथक प्रयत्न करत आहे.
याव्यतिरिक्त ’ग्रंथ दान’ आणि ’गाव तिथे वाचनालय’ हा उपक्रमही आम्ही राबवतो. वाचून झालेले चांगल्या अवस्थेतील पुस्तकांचं संकलन करण्यास पुणेकरांनी प्रचंड प्रचंड हातभार लावला आहे. पंधरा हजारांहून अधिक पुस्तकं व ग्रंथ हे लोकांनी दिलेल्या दानातून जमा झाले. पुस्तक वितरणासाठी आम्ही पोर्टरची दुचाकी वापरतो. ते आम्हाला सोयीचं जातं. त्यासाठी आमचं छान नेटवर्क तयार झालं आहे. आम्ही आतापर्यंत 110 पेक्षा जास्त शाळांना आणि वाचनालयांना पुस्तकं प्रदान केलेली आहेत.
वाचकांना आवाहन : आपल्यापैकी कुणाला प्रवीण महाजन यांना त्यांच्या उपक्रमात कुठल्याही प्रकारची मदत करायची असल्यास किंवा त्यांच्या कार्यात जोडले जाण्याची इच्छा असल्यास त्यांच्याशी अवश्य संपर्क करू शकता.
संपर्क क्रमांक : 9529125396
आमचं काम बघून आम्हाला शासनाचा आणखी एक उपक्रम मिळालेला आहे. तो म्हणजे ’क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना’. अनाथ, निराधार किंवा एकल माता असलेल्या, ज्यांना मुलांचा सांभाळ करणे अशक्य आहे अशा तब्बल दोनशे बालकांच्या पालनपोषणावर आम्ही जातीनं लक्ष ठेवतो. योजनेअंतर्गत मुलांचा सांभाळ करणार्या आजी, आई किंवा नातेवाइकांना शासनाकडून दरमहा आर्थिक मदत मिळते. ही रक्कम त्यांच्यापर्यंत पोहोचवून आम्ही त्याचा पूर्ण पाठपुरावा करतो. तसेच मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास व्यवस्थित होतोय ना, हे पाहण्याची जबाबदारीही आमची संस्था पार पाडते. या शिवाय नंदुरबार जिल्ह्यातील शहादा इथे महिला बाल विकास खात्याकडून पोलीस विभागांतर्गत अत्याचार पीडित, फसवणूक झालेल्या अबला महिलांसाठी समुपदेशन आणि मदत केंद्र उभारण्याची तयारी सुरू आहे. येत्या जून 2026पासून लगेचच तोही उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. त्यासाठी शासनाच्या ’मनोधैर्य’योजनेची मदत घेण्यात येईल.
अत्यंत स्तुत्य उपक्रम आहेत सगळे. इतक्या मोठ्या कामाची दखल घेणारे बरेच पुरस्कारही तुम्हाला आणि संस्थेला मिळालेे आहेत. त्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल.
प्रवीण महाजन : 2023मध्ये क्रीडा व युवक कल्याण विभागाचा ’जिल्हा युवा पुरस्कार’ (रुपये 50 हजारांचा धनादेश आणि सन्मानपत्र) आमच्या ’युवक मित्र परिवार’ संस्थेस मिळाला आहे. भारत सरकारच्या ’नेहरू युवा केंद्र’कडूनही संस्थेस पुरस्कार मिळाला आहे. वैयक्तिक पातळीवर मलाही अनेक सन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत, ज्यामुळे आणखी जोमाने काम करण्याची ऊर्जा प्राप्त होते.
आपल्यासारखे व्यक्तिमत्त्व हे आपल्या कार्यातून समाजासाठी मोठं उदाहरण घालून देत असतात. जे समाजल्या एका गटासाठी निरूपयोगी, ते वंचितांसाठी उपयोगी ठरू शकते, हे तुम्ही कृतीतून दाखवून दिलं आहे. सायकल असो वा संगणक वा वाचून झालेली पुस्तकं...त्यांच्या पुनर्वापरातून पर्यावरणाचे रक्षणही अप्रत्यक्षपणे करत आहात.
आपल्यासारख्या युवा व्यक्तीच्या इतक्या मोठ्या कार्याकडे बघून आणखी युवकांना प्रेरणा मिळावी, आपल्या कामात आणखी हात जोडले जावेत आणि समाजाचा पाठिंबा मिळत रहावा यासाठी आपणास शुभेच्छा!