कोणत्याही राजकीय नेत्याची शक्ती जनतेची शक्ती असते. जनतेची मते हीच त्याची शक्ती. ती जर पुरेशी मिळाली नाही तर तो राजनेता आपल्यासारखाच सामान्य माणूस असतो. आपल्या सार्वभौमत्वाची शक्ती कुणालाही देत असताना आणि घराण्यातील वारशांना देत असताना सार्वभौम जनतेने खूप खोलवरचा विचार करण्याची गरज आहे. भक्तीभावाने शक्ती देणे युक्तिसंगत नाही. भक्ती-शक्तीचा समन्वय साधला पाहिजे. तो राजघराण्यातील आहे म्हणून त्याला नाकारण्याचे कारण नाही आणि तो राजघराण्यातील आहे म्हणून त्याला डोक्यावर घेऊन नाचण्याचेही कारण नाही. त्याची पारख करावी...
महाराष्ट्रामध्ये स्वातंत्र्यानंतर काही राजकीय घराण्यांचा उदय झाला. यातील काही घराण्यांच्या मागे स्वातंत्र्य चळवळ, सामाजिक चळवळ, कृषी चळवळ यांची पार्श्वभूमी होती. जनतेने या घराण्यांना जवळ केले. निवडणुकीच्या राजकारणात मते देऊन त्यांना शक्ती दिली. निवडणुकीतील जनतेची मते याचा खूप खोलवरचा अर्थ असतो. लोकशाहीत जनता सार्वभौम असते. मतांच्या द्वारे जनता आपले सार्वभौमत्व त्यांच्या पसंतीच्या राजनेत्यास देते.
लोकशाहीत कोणत्याही राजकीय नेत्याची शक्ती जनतेकडून प्राप्त झालेली शक्ती असते. सामान्य व्यवहारात पैसा एक शक्ती असते. ज्ञान हीदेखील एक शक्ती असते आणि गुंडगिरीची देखील शक्ती असते. या शक्तींचा आपल्याला इथे विचार करायचा नाही. लोकशाहीतील राजकीय शक्तीचा विचार इथे करायचा आहे.
आजच्या महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीचा विचार करता महाराष्ट्रात तीन-चार मोठी घराणी यांच्या अवतीभवती महाराष्ट्राचे राजकारण फिरत असते. पवार, ठाकरे, आंबेडकर आणि पाटील अशी या घराण्यांची नावे आहेत. या घराण्यातील दुसर्या-तिसर्या पिढीतील मुले, नातवंडे, मुली अशा परिघातच राजकारण फिरत असते. परिवाराच्या या राजकारणाला ‘घराणेशाहीचे राजकारण’ म्हणतात. लोकशाहीमध्ये वंशपंरपरेने सत्तेवर येण्याचा प्रकार नसतो, हा राजेशाहीचा गुणधर्म आहे आणि काही ठिकाणी हुकूमशाहीचा गुणधर्म आहे. लोकशाहीत घराणेशाही बसत नाही.
डॉ. बाबसाहेबांनी घटना समितीच्या अखेरच्या भाषणात लोकशाहीपुढील गंभीर धोक्यांची चर्चा केली आहे. त्यातील एक मुद्दा त्यांनी व्यक्तिपूजेविषयी मांडला आहे. लोकशाहीच्या संवर्धनात आस्था असणार्या सर्वांना जॉन स्टुअर्ट मिल यांनी दिलेला सावधगिरीचा इशारा लक्षात ठेवावा लागेल. त्यांच्या मते,“लोकांनी आपले स्वातंत्र्य कितीही मोठा माणूस असला तरी त्यांच्या चरणी अर्पण करता कामा नये. तसेच त्यांच्यावर इतका विश्वास ठेवू नये की जेणेकरून त्याला प्राप्त अधिकारांचा तो लोकांच्या संस्था उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग करील.”
या मुद्द्याचा त्यांनी आणखी उदाहरणे देऊन विस्तार केलेला आहे. आपल्याकडे व्यक्तिपूजेचे स्तोम खूप मोठे आहे. अन्य देशात ते त्या मानाने फार कमी आहे. अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांना तिसर्यांदा राष्ट्राध्यक्ष होण्याची गळ घालण्यात आली. तेव्हा ते म्हणाले की,‘वंश परंपरागत राजेशाही नको, म्हणून आपण ब्रिटीश राजाविरूद्ध युद्ध केले. मला तिसर्यांदा राष्ट्राध्यक्ष बनवून तीच प्रथा तुम्ही अमेरिकेत आणू इच्छिता, हे बरोबर नाही.’ तिसर्यांदा मिळणारे राष्ट्राध्यक्ष पद त्यांनी नाकारले.
डॉ. बाबासाहेब यांनी या व्यक्तिपूजेविषयी आपल्या भाषणात इशारा दिला. तो त्यांच्याच शब्दात असा,“धर्मातील भक्ती ही आत्म्याच्या मुक्तीचा मार्ग असू शकेल. परंतु राजकारणात भक्त किंवा व्यक्तिपूजा ही अधःपतन आणि अंतिमतः हुकूमशाहीकडे नेणारा हमखास मार्ग ठरतो.” हा मुद्दा इतका बोलका आहे की, त्यावर वेगळे भाष्य करण्याची गरज नाही. लाल संविधान हातात घेऊन फिरणार्यांनी संविधान निर्मात्यांचा हा इशारा आपल्या डोक्यात कोरून ठेवावा.
कोणत्याही राजकीय नेत्याची शक्ती जनतेची शक्ती असते. जनतेची मते हीच त्याची शक्ती. ती जर पुरेशी मिळाली नाही तर तो राजनेता आपल्यासारखाच सामान्य माणूस असतो. आपल्या सार्वभौमत्वाची शक्ती कुणालाही देत असताना आणि घराण्यातील वारशांना देत असताना सार्वभौम जनतेने खूप खोलवरचा विचार करण्याची गरज आहे. भक्तीभावाने शक्ती देणे युक्तिसंगत नाही. भक्ती-शक्तीचा समन्वय साधला पाहिजे. तो राजघराण्यातील आहे म्हणून त्याला नाकारण्याचे कारण नाही आणि तो राजघराण्यातील आहे म्हणून त्याला डोक्यावर घेऊन नाचण्याचेही कारण नाही. त्याची पारख करावी आणि त्यासाठी पुढील चार कसोट्यांचा वापर करावा असे मला वाटते.
1) राजकीय ज्ञान - ज्याला वारसा हक्काने जवळ करायचे आहे त्याच्याकडे किती राजकीय ज्ञान आहे, याची परीक्षा केली पाहिजे. राजकीय सत्ता भारतीय संविधानाप्रमाणे राबवावी लागते. या संविधानाचे त्याला काही ज्ञान आहे का? ज्याला आपण आपले सार्वभौमत्व देणार आहोत, त्याला सामाजिक इतिहासाचे ज्ञान आहे का? महाराष्ट्रातील जातिप्रथा, जातीजातींचे विषय, अस्पृश्यतेची चळवळ, अशा सर्व विषयांचे अगदी काटेकोर नसले तरी व्यवहारिक ज्ञान असणे फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. अगदी शिवकाळात जाण्याची गरज नाही; परंतु एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकातील महाराष्ट्राचा राजकीय इतिहास उत्तम प्रकारे माहीत असणे गरजेचे आहे. केवळ घराण्याचे नाव घेऊन मिरवण्यात काही अर्थ नसतो.
2) जनतेच्या प्रश्नाची जाण - ज्याला सार्वभौमत्वाचा काही अंश देणार आहोत, त्याला सामान्य जनतेच्या प्रश्नांची कितीशी जाण आहे, हे पारखून घ्यायला पाहिजे. समाजात सर्वसामान्य माणसांची बहुसंख्या असते. शिक्षण, आरोग्य, निवारा, कामधंदा हे प्रत्येकाचे जिव्हाळ्याचे प्रश्न असतात. घराण्याचे नाव लावणार्या बालक किंवा बालिकेकडे या प्रश्नांची किती माहिती असते? याला जोडून समूहाचे काही प्रश्न असतात. शेतकरी, कामगार, प्रवासी, असे समूह तयार होतात, त्यांचे प्रश्न वेगळे असतात. आणि काही प्रश्न फार जटील असतात. एक प्रश्न सोडवत असतानाच दुसरे प्रश्न तयार होतात, म्हणून या प्रश्नांची सैद्धांतिक आणि व्यवहारिक माहिती अशा घराणे दीपकांना आहे का, हे आपण बघायला शिकले पाहिजे.
3) दृष्टी कोणती आहे? - ज्याला आपले सार्वभौमत्व द्यायचे आहे, तो दृष्टी असलेला आहे की दृष्टीहिन आहे, हे जनतेने पारखून बघायला हवे. इथे दृष्टी याचा अर्थ काय होतो, हे पुढील काही शब्दातून आपल्या लक्षात येईल. त्याची जातीय दृष्टी आहे का, केवळ स्वजातीचाच विचार करतो का? त्याची दृष्टी प्रादेशिक असेल तर तो ज्या प्रदेशात राहतो, त्या प्रदेशापुरता विचार करेल आणि त्याची दृष्टी भाषिक असेल तर तो भाषेचे नको असलेले प्रश्न उकरून काढेल. त्याचा शिक्षण, आरोग्य, कामधंदा याच्याशी काही संबंध नाही. आणि त्याची दृष्टी सर्वसमावेशक असेल तर तो सर्व विषयांचा सारासार विचार करील. कोणतीही टोकाची भूमिका घेणार नाही. समन्वय आणि संतुलन साधण्याचा प्रयत्न करील आणि त्याहीपलीकडे त्याची दृष्टी राष्ट्रीय असेल तर तो राष्ट्राचा प्रथम विचार करेल. अगोदर राष्ट्र, मग माझा प्रांत, त्यानंतर माझा जिल्हा, मग माझी भाषा, असा त्याच्या विचारांचा क्रम राहील. देश सुरक्षित राहिला तर माझ्या मतदार संघातील नागरिक सुरक्षित राहतील. त्याची शेती नीट होईल, उद्योग-व्यवसाय नीट चालतील.
4) जनतेत रमणारा - जनतेत रमणारा असा हा घराण्याचा दीपक आहे का? त्याची कठोर परीक्षा जनतेने केली पाहिजे. अलिशान गाड्यांतून फिरणारा, अनेक फार्महाऊस बाळगणारा, अलिशान घरात राहणारा, कपड्याची इस्त्रीही बिघडू न देणारा, महागड्या हॉटेलमध्ये पार्ट्या करणारा, जननेता होऊ शकत नाही. भगवद्गीतेमध्ये एका श्लोकात म्हटले आहे की, ‘जो लोकांस न कंटाळे, लोकही न कंटाळति त्यास’ ही जननेत्याची ओळख आहे. राजकीय नेत्याला सतत जनतेमध्ये फिरत रहावे लागते. ममता बॅनर्जीच्या राजकारणाला नाकारण्याची शंभर कारणे आहेत; परंतु जनतेमध्ये उतरण्याचा-मिसळण्याचा उत्साह अनुकरणीय आहे. त्यांनी घरात बसून सरकार चालविले नाही. वेगवेगळ्या घराण्यातील राजपुत्र आणि राजपुत्री किती झोपडपट्ट्यांत फिरतात, किती कोळीवाड्यात जातात, गावकूस आणि बाहेरील वस्तीत त्यांचा वावर असतो का, लोकांच्या जगण्याच्या प्रश्नांविषयी ते किती संवेदनशील आहेत, या सर्वांची पारख आपण केली पाहिजे.
घराण्याच्या नावाची भक्ती ही राजकीय मुक्तीचा मार्ग होत नाही. अशी भक्ती आपल्याला गुलामीत नेते आणि हा भक्तीचा विषय चार-दोन घराण्यांपुरता किंवा दोन-चार पक्षांपुरता मर्यादित आहे, असे नाही. त्याची व्याप्ती सार्वत्रिक आहे. लोकशाही राजवट सुखकारक होण्याच्या काही पूर्वअटी आहेत आणि त्या सर्व अटींचे पालन करण्याची जबाबदारी सर्वसामान्य माणसांवरच आहे. कोणत्याही राजकीय पक्षावर नाही आणि कोणत्याही राजकीय नेत्यावर नाही.
या अशा पूर्वअटी आहेत. 1) देशाच्या राज्यघटनेविषयी साक्षर असणे आणि राज्यघटनेने घालून दिलेली जीवनमूल्ये प्रत्यक्ष जीवनात जगणे, प्रत्येक मतदाराचे प्राथमिक कर्तव्य आहे. 2) मतदान करताना भावना बाजूला ठेवून विचार करून मतदान केले पाहिजे. मतदान कुणाला करायचे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे, परंतु ते आंधळ्या भक्तीने करू नये, डोळसपणे केले पाहिजे. 3) मतदार म्हणून आपल्याला याची सदैव जाणीव पाहिजे की, सर्व सत्तेचा उगम हा आमच्यातून (प्रजा) होत असतो. देशात सर्वसत्ताधीश आम्ही आहोत. राजेशाहीच्या भाषेत सांगायचे तर आम्ही राजे आहोत. म्हणून आम्ही जो विचार करू, तशी आमची राजकीय रचना उभी राहील. आमचे चुकीचे निर्णय एखाद्या राजकीय पक्षाच्या अपयशाचे कारण ठरतील एवढा हा मर्यादित विषय नाही. आमचा चुकीचा निर्णय आम्हाला दुःखाच्या खड्डयात घेऊन जाईल. म्हणून नित्य सावध असले पाहिजे, सावध विचार केला पाहिजे आणि सावध व्यवहार केला पाहिजे.