मुलांच्या रूपाने गवसली देशसेवेची वाट...

---आणि घर संघाचे झाले.

विवेक मराठी    05-May-2026
Total Views |
@ सोनाली विपुल सोनार
संसार सांभाळताना मनात देशसेवेचं अपुरं स्वप्न जपणार्‍या आईच्या संघर्षाला तिच्याच लेकरांनी नवा अर्थ दिला-लेक राष्ट्राला समर्पित झाली, तर मुलगा ‘शाखेत मी काही द्यायला जातो’ म्हणाला. विविध आव्हानांवर मात करत एका सामान्य घराचं ‘संघाच्या घरात’ झालेलं रूपांतर प्रेरणादायी ठरलं आहे.

rss
 
 
मी मूळची अहमदाबादची; पण लग्नानंतर खान्देशातील शहादा शहरात आले. लहानपणापासूनच मनात देशसेवेची एक सुप्त ओढ होती. वाटायचं, देशासाठी आपणही काहीतरी करावं; पण मार्ग सापडत नव्हता. संसाराचा प्रपंच, सामाजिक रूढी आणि कौटुंबिक जबाबदार्‍या यात मी पूर्णपणे गुंतून गेले होते. मला अनुष्का आणि अनुज ही दोन अपत्ये आहेत. या मुलांच्या संगोपनात मी माझं स्वप्न कुठेतरी विसरून गेले होते.
 
2018 सालची गोष्ट. आमच्या घराशेजारील चौकात ‘राष्ट्र सेविका समिती‘ची शाखा सुरू झाली. सुरुवातीला मला वाटलं की, हे काम फक्त पुरुषांचं किंवा मुलांंचंच असतं. माझ्या मुलांच्या शिक्षिका तेजश्री शास्त्री ताईंनी मला समितीच्या कार्याची ओळख करून दिली. अनुष्का आणि अनुज दोघेही शाखेत जाऊ लागले. शाखा घराजवळ असल्यामुळे मुलांना विशेष अडचण वाटली नाही.
मी घरी भरतनाट्यमचे क्लासेस घ्यायचे. एकदा वर्गात मुलींना कलेबद्दल सांगताना मी ’समर्पण’ हा शब्द वापरला. तेव्हा दहा वर्षांची अनुष्का ताडकन म्हणाली, ”आई, मी आधीच समर्पण केलं आहे-समितीला, भगव्या ध्वजाला आणि माझ्या राष्ट्राला!“ तिचे ते शब्द ऐकून मी थक्क झाले. मनात सुखाची एक लहर उमटली की, आपण मुलांना शाखेत पाठवून योग्य दिशा दिली आहे.
 
असाच अनुभव मुलाबाबतही आला. एकदा घरात कोणातरी मोठ्या माणसाने अनुजला विचारले, “अरे, रोज शाखेत जाऊन तुला काय मिळतं?“ आठ वर्षांचा अनुज शांतपणे म्हणाला, “मी शाखेत काही ’मिळवायला’ नाही, तर माझ्याकडे जे आहे ते ’द्यायला’ जातो.“ या उत्तरानं माझ्या डोळ्यांत पाणी आले. जे काम मी अनेक वर्षं करू शकले नाही, ते आता माझी मुलं करतील, असा विश्वास मला वाटू लागला.
 
एकत्र कुटुंब आणि कुटुंबाचे जुन्या वळणाचे विचार..अशा वातावरणात मुलांच्या या कार्याला पाठिंबा देणं सोपं नव्हतं. ’शाखेचा अभ्यासात काय उपयोग?’ असा प्रश्न विचारला जायचा. घरातल्या पुरुष मंडळींना बाहेर जाणे सोपे होते; पण स्त्रियांना प्रत्येक पावलावर विचारावे लागे. अशा वेळी माझी आई नेहमी म्हणायची, “मुलं चांगल्या मार्गावर आहेत, त्यांना पाठिंबा देणे ही तुझी जबाबदारी आहे.“
 
मग मी एक मार्ग निवडला. सासरकडील मंडळींची आनंदाने सर्व कर्तव्ये पार पाडत गेले. त्यांचेही मनपरिवर्तन झाले आणि त्यांनी संघकाम हे राष्ट्रीय कार्य आहे या भावनेतून अनुष्का व अनुजच्या संघकार्याला संमती दिली.
 
अनुष्काची जिद्द मोठी होती. 2019 चा प्रवेश वर्ग असो वा 2020-21 मधील लॉकडाऊनमधील ऑनलाईन उपक्रम...तिने स्वतःला झोकून दिलं होतं. 2022 मध्ये ती स्वतः शिक्षिका झाली आणि गावातील 9 ते 10 मुलींना घेऊन जळगावच्या वर्गाला गेली. 2023 मध्ये भुसावळला घोषवर्ग (वाद्य पथक) होता. घरातून विरोध होता, प्रवास कठीण होता; पण तिने सार्वजनिक वाहनांनी प्रवास करून तो वर्ग पूर्ण केला.
 
तिथून आल्यावर तिने एकच ध्यास घेतला...यंदा दसर्‍याला आपल्या गावात ’घोष संचलन’ झालंच पाहिजे! आमच्याकडे वाद्ये नव्हती; पण म्हणतात ना, प्रामाणिक प्रयत्नांना देव फळ देतो. गावातीलच गोयल परिवाराने 30 हजार रुपयांचे वाद्य साहित्य समितीला भेट दिले आणि सरावाला सुरुवात झाली.
 
सरावाच्या वेळीही काही लोकांनी विरोध केला. घोषचा आवाज होतो म्हणून मुलींना रागवले गेलं. गंमतीची गोष्ट म्हणजे, याच लोकांना गणपतीतील कानठळ्या बसवणार्‍या डीजेचा त्रास होत नसतो. अखेर आम्ही एका शाळेचं पटांगण निवडलं. दर रविवारी सर्व वाद्ये स्वतः वाहून नेणं, सराव करणं आणि परत आणणं असा आमचा नित्यक्रम सुरू झाला.
 
अखेर तो दिवस उजाडला! तहसील कार्यालयाची परवानगी घेऊन, रस्त्यावर रांगोळ्या काढून घोष वाद्याचं संचलन निघालं. गावानं कौतुक केलं. आज अनुष्का नंदुरबार जिल्ह्याची शारीरिक प्रमुख म्हणून जबाबदारी सांभाळत आहे.
 
आज चित्र पूर्णपणे बदलले आहे. आमच्या घरी आता समितीचे प्रचारक येतात, तेव्हा घरातील सर्व मंडळी त्यांच्याशी आनंदाने संवाद साधतात. अनुजलाही आता संघ वर्गाला जाण्यासाठी कोणाला विचारावे लागत नाही. मुलांच्या माध्यमातून का होईना, आमचं संपूर्ण कुटुंब आज संघ विचारांशी जोडलं गेलं आहे. ज्या देशसेवेचं स्वप्न मी पाहिलं होतं, ते आज माझ्या मुलांच्या रूपानं माझ्या घरातच अवतरलं आहे.