मराठ्यांचा देकार्त महादेवशास्त्री पुणतांबेकर

विवेक मराठी    05-May-2026   
Total Views |
Mahadevshastri Puntambekar

vivek
सतराव्या व अठराव्या शतकातील रणधुमाळीत भारतात अनेक तात्त्विक व दार्शनिक समीकरणे निर्माण झाली. याच बौद्धिक परंपरेत महाराष्ट्रातून उदयास आलेले आणि काशीच्या (वाराणसी) ज्ञानपीठावर आपल्या अफाट तार्किक बुद्धिमत्तेचा दबदबा निर्माण करणारे तत्त्वज्ञ म्हणजे महादेवशास्त्री पुणतांबेकर. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धातील ते प्रख्यात ‘नव्य-नैयायिक’ होते.
सतराव्या व अठराव्या शतकातील भारत प्रचंड राजकीय आणि सांस्कृतिक उलथापालथींच्या काळातून जात होता. याच काळात अभूतपूर्व बौद्धिक घुसळणीतून भारतीय समाज आणि येथील बौद्धिक जगतही जात होते. भारतीय तत्त्वज्ञानाच्या उत्क्रांतीचा आणि विकासाचा हा काळ. युरोपीय प्रबोधन आणि भारतातील तत्कालीन विद्वत-जगत यांचा वेगळ्या प्रकारे संबंध निर्माण होण्याचा हा काळ. यातून निरनिराळी तात्त्विक व दार्शनिक समीकरणे भारतात निर्माण झाली. भारतीय ज्ञान निर्मितीचा विचार केल्यास एक रंजक पण वैचारिकदृष्ट्या तितकाच प्रगल्भ असा प्रवास या काळात पाहायला मिळतो.
 
 
सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात फ्रान्समधून आलेला एक प्रवासी, विद्वान आणि वैद्य फ्रँक्वा बर्नियर मुघल दरबारी आला.तत्कालीन युरोपीय तत्त्वज्ञान आणि नव्याने निर्माण होत असलेले युरोपीय वैद्यकशास्त्र यात बर्नियर निष्णात होता. मुघल शासकांना या काळात युरोपीय वैद्यकाच्या महत्त्वाचा साक्षात्कार झालेला असल्याने साहजिकच मुघल दरबारी वैद्यक तज्ज्ञ म्हणून त्याची वर्णी लागली. तत्कालीन मुघल समाज, दारा आणि औरंगजेब, दिल्लीचे राजकारण, संस्कृती आणि सोबतच भारतातील विद्वत जगत यावर सखोल प्रकाश टाकणारे त्याचे प्रवासवर्णन म्हणजे ’ट्रॅव्हल्स इन द मोगुल एम्पायर’.
 
 
सोबतच युरोप ते भारत या प्रवासात त्याला दिसलेले समाज, संस्कृती आणि विविध मानवजाती यांचे वर्णन करणाराही एक विस्तृत ग्रंथ त्याने लिहिला. औरंगजेबाच्या दरबारी असलेला पण वेगळ्या विचारसरणीचा एक आमीर दानिशमंद खान बर्नियरचा आश्रयदाता होता. आपल्या आश्रयदात्यासाठी बर्नियर याने रेने देकार्त आणि पिएर गसेंडी या दोन फ्रेंच तत्त्वज्ञांच्या ग्रंथांचे फारसीमध्ये भाषांतर केले. हा भारतीय विचारविश्वात देकार्तचा प्रवेश मानता येईल.
 
 
1658-59 ते 1669-70 पर्यंत बर्नियर भारतात होता आणि या कालखंडात त्याचा बनारस येथील गाढे विद्वान कवींद्र सरस्वती यांच्याशी घनिष्ठ संबंध आला. कवींद्र सरस्वतींच्या भोवती भारत भरातील मातब्बर विद्वानांचे एक मोठे वर्तुळ होते. कवींद्र आणि त्यांचे विद्वत मंडल व बर्नियर यांमध्ये तब्बल तीन वर्षे नियमित संवाद होता. बर्नियरमुळे भारतात देकार्त आला आणि देकार्तच्या प्रवेशामुळे पाश्चात्य ’कार्टेशियन’ विवेकवादाची ओळख येथील विचारवंतांना झाली, असे म्हणता येते. याचे सर्वांत मोठे लक्षण म्हणजे कवींद्र वर्तुळातील विद्वान जयराम न्यायपंचानन यांचा ’पदार्थामाला’ हा ग्रंथ.
 
 
परंतु, अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ’युरोपियन तर्क आणि देकार्तचा ’बुद्धिवाद’ भारतात नव्याने धडकत असताना येथे आधीच एक प्रगत, तर्ककठोर आणि सूक्ष्म अशी बौद्धिक ज्ञानमीमांसा शिखरावर पोहोचली होती. ही प्रणाली म्हणजे ’नव्य-न्याय’. चौदाव्या शतकात मिथिला आणि बंगालमध्ये गंगेश उपाध्याय यांनी निर्माण केलेली ही परंपरा सतराव्या शतकापर्यंत अत्यंत प्रगल्भ झाली होती. या प्रगल्भ परंपरेने युरोपातून आलेल्या तर्क सिद्धांतांना आपल्या मांडणीतून वरच्या पायरीवर नेले. युरोपातून आले आणि घेतले असे न होता, त्यावर सखोल विचारमंथन होऊन नवी सैद्धांतिक मांडणी पुढे आली.
 
 
याच बौद्धिक परंपरेत महाराष्ट्रातून उदयास आलेले आणि काशीच्या (वाराणसी) ज्ञानपीठावर आपल्या अफाट तार्किक बुद्धिमत्तेचा दबदबा निर्माण करणारे तत्त्वज्ञ म्हणजे महादेवशास्त्री पुणतांबेकर. सतराव्या शतकाचा उतरार्ध हा साधारण त्यांचा काळ. भारताच्या वैचारिक, तार्किक आणि वैधानिक म्हणजेच कायदा-न्यायाच्या विचारविश्वात त्यांचे योगदान देकार्तच्या योगदानाइतकेच पायाभूत आणि क्रांतिकारी ठरले.
 
 
महादेवशास्त्री पुणतांबेकर सतराव्या शतकाच्या उत्तरार्धातील (अंदाजे सन 1670 ते 1700 च्या दरम्यान) प्रख्यात ’नव्य-नैयायिक’ होते. त्यांच्या घराण्याचे मूळ महाराष्ट्रातील गोदावरी नदीच्या काठी वसलेल्या ’पुणतांबे’ या ऐतिहासिक गावात. पुणतांबे याकाळी तर्कशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रसिद्ध होते. महादेवशास्त्रींच्या वडिलांचे नाव ’मुकुंद’ होते. मुकुंदशास्त्री हे स्वतः षड्दर्शनांचे गाढे अभ्यासक होते. उच्च विद्याविभूषित होण्यासाठी आणि तत्कालीन ज्ञानकेंद्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी महादेवशास्त्रींनी काशी गाठली.
 
 
सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात काशीमध्ये दाक्षिणात्य विद्वानांचा प्रबळ असा गट कार्यरत होता. पुणतांबेकर, शेष, भट/भट्ट (गागाभट्ट यांचे घराणे), आणि धर्माधिकारी या घराण्यांनी काशीत वेदांत, मीमांसा आणि न्यायशास्त्र म्हणजेच तर्कशास्त्र या क्षेत्रांत आपली मक्तेदारी निर्माण केली होती. महादेवशास्त्रींनी नव्य-न्यायाच्या अत्यंत कठीण ग्रंथांवर भाष्य करून तत्कालीन बंगाली आणि मैथिली पंडितांचे वर्चस्व मोडून काढले.
 
 
महादेवशास्त्रींचा काळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि त्यानंतरच्या मराठा स्वातंत्र्ययुद्धाचा काळ. मराठा सत्तेच्या उदयामुळे आणि ’स्वराज्य’ स्थापनेमुळे मराठी जनांमध्ये केवळ राजकीयच नव्हे, तर सांस्कृतिक आणि बौद्धिक आत्मविश्वास निर्माण झाला होता. या काळात मराठ्यांनी सुरू केलेली ’श्रावणमास दक्षिणा’ व्यवस्था मराठी विद्वानांसाठी आर्थिक आणि संस्थात्मक मदत ठरत होती. पुढे दक्षिणेत तंजावरला व्यंकोजीराजांनी स्थापन केलेल्या मराठा सत्तेनेही नव्य-न्यायाला मोठा राजाश्रय दिला. तिथेही पुणतांबेकर घराण्यातील पुढील पिढ्यांनी योगदान दिले.
 
 
नव्य-न्याय ही केवळ वादविवादाची कला नाही. हे दर्शन म्हणजे अत्यंत गुंतागुंतीची ’ज्ञानमीमांसा’होय. या ज्ञानमीमांसेसाठी त्यात अतिशय काटेकोर अशी पारिभाषिक रचना आढळून येते. या दर्शनात महादेवशास्त्रींनी स्वतंत्र ग्रंथांची निर्मिती केली. ‘कोरे वाद-प्रतिवाद करणे’ या ग्रंथांचे उद्दिष्ट नसून त्यातून तर्कशुद्ध विचाराची नवी पद्धत त्यांनी उभी केली.
 
 
’न्याय कौस्तुभ’ हा महादेवशास्त्रींचा सर्वांत महत्त्वाचा आणि स्वतंत्र ग्रंथ. या ग्रंथात त्यांनी ज्ञानाच्या ’प्रामाण्यवादाची’ सखोल चर्चा केली आहे. एखादे ज्ञान ’खरे’ (प्रमा) आहे की ’खोटे’ (अप्रमा) हे ठरवण्याचे निकष त्यांनी यात मांडले. प्रत्यक्ष, अनुमान आणि शब्द या तीन मुख्य प्रमाणांचे त्यांनी सूक्ष्म आणि तांत्रिक विश्लेषण केले. सोबतच ’व्याप्तिरहस्य’आणि ’भवानंदीवरील टीका’ हे त्यांचे आणखीन दोन महत्त्वाचे ग्रंथ. अनुमान किंवा तर्काचा मुख्य पाया म्हणजे ’व्याप्ती’ (स्पष्ट सहगामित्व- जसे जिथे धूर असतो तिथे अग्नी असणारच). महादेवशास्त्रींनी ’व्याप्तिरहस्य’ लिहून या नियमातील अपवाद म्हणजेच त्रुटी कशा शोधायच्या हे स्पष्ट केले.
 
 
बंगालच्या भवानंद सिद्धांतवागीश यांच्या नव्य-न्यायावरील ग्रंथांवर महादेवशास्त्रींनी ’दीधितीगूढार्थप्रकाशिका’ (किंवा ’सर्वोपकारिणी’) नावाची टीका लिहिली. ही टीका इतकी अचूक होती की, तिने भवानंदांच्या मूळ ग्रंथातील अस्पष्टता दूर करून त्यांना भारतीय तत्त्वज्ञानात अढळ स्थान मिळवून दिले. या संपूर्ण ग्रंथनिर्मितीमध्ये देकार्तमार्गे आलेल्या विचारपद्धतीचा पुरेपूर वापर तर दिसून येतोच सोबतच नव्या तार्किक सिद्धांतांची मांडणीही महादेवशास्त्रींनी केली. देकार्त आणि महादेवशास्त्री यांच्या वैचारिक पद्धतींमध्ये विलक्षण साम्य दिसून येते.
 
 
देकार्तने ’मी विचार करतो, म्हणून मी आहे’ या तत्त्वातून ज्ञानाचा निर्विवाद पाया शोधण्याचा प्रयत्न केला. त्याने प्रत्येक गोष्टीवर तर्कशुद्ध संशय घेण्यास सांगितले. महादेवशास्त्रींनीही ’न्यायकौस्तुभ’मध्ये कोणतीही गोष्ट केवळ परंपरेने आली म्हणून गृहीत न धरता, तिची ’व्याप्ती’ सिद्ध झाल्याशिवाय तिला सत्य न मानण्याचा आग्रह धरला. महादेवशास्त्रींनी ’तर्क’ (म्हणजेच ’Reductio ad absurdum’, उदाहरणार्थ खोटे बोलणे नेहमी हितकर असते हे विधान जर असे मानले तर काय अनिष्ट प्रसंग उद्भवेल हे दाखवणे म्हणजे ’तर्क’) आणि ’संशय’ या दोन देकार्तच्या संशयवादाशी पूर्णपणे समांतर संकल्पना सविस्तर विकसित केल्या.
 
 
देकार्तने तत्त्वज्ञान आणि गणिताची सांगड घालत विचारांमध्ये भूमितीय अचूकता आणण्याचा प्रयत्न केला. महादेवशास्त्रींनी याहून एक पाऊल पुढे टाकले. त्यांनी तात्त्विक भाषेचे असे एक स्वरूप विकसित केले ज्याला ’परिष्कार’ म्हणले जाते. ’अवच्छेदक’, ’अवच्छिन्न’, ’प्रतियोगी’ यांसारख्या तांत्रिक संकल्पना निर्माण करून वैचारिक मांडणीतील संदिग्धता समूळ नष्ट केली. हे एक प्रकारचे ’वैधानिक सत्ताशास्त्र’ होते. एका वाक्याचा, विचाराचा किंवा विधानाचा दुसरा कोणताही अर्थ निघूच शकत नाही, विपर्यास होऊच शकणार नाही इतकी स्पष्टता आणण्याचे शास्त्र महादेवशास्त्रींनी निर्माण केले.
 
 
युरोपीयन विचारवंतांनी विश्वाचे स्पष्टीकरण करताना किमान तत्त्वांचा वापर करण्यावर भर दिला. यातून विज्ञानातील ’पायाभूत तत्त्वाचा’ म्हणजेच ’फर्स्ट प्रिन्सिपल’ सिद्धांत निर्माण झाला. महादेवशास्त्रींनीही ’अनावश्यक पदार्थांचे खंडन’ करत ’संपूर्ण लाघव’ या तत्त्वाचा वारंवार वापर केला. जर एखादा निष्कर्ष कमी गृहीतकांवर सिद्ध होत असेल, तर त्यात अधिक गुंतागुंत करणे म्हणजे ’गौरव दोष’ त्यांनी मानला. पुणतांबेकरांनी हा दोष टाळून भारतीय तर्काला अत्यंत तीक्ष्ण बनवले.
 
 
’न्याय’ या शब्दाचा मूळ अर्थ ’तर्कशास्त्र’ किंवा ’तत्त्वज्ञान’ असा आहे. परंतु, या तर्कशास्त्राचा तत्कालीन न्यायव्यवस्थेत (न्यायालये, हुजूर इन्साफ, गोतसभा, मजलसी येथे) खटले चालवताना आणि न्यायदान करताना भक्कम उपयोग केला गेला हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. महादेवशास्त्रींनी तयार केलेले हे तर्कशास्त्राचे नियम मराठा साम्राज्यकालीन न्यायाधीशांसाठी ’पुरावा कायदा’ म्हणजेच ’एव्हिडन्स अ‍ॅक्ट’प्रमाणे काम करत होते.
 
 
मराठ्यांच्या न्यायव्यवस्थेत जमिनीचे (वतन, इनाम, मिरासदारी) वाद मोठ्या प्रमाणावर असत. अनेकदा खोटी पत्रे (बनावट महजर किंवा फर्मान) न्यायालयात सादर केली जात. असे खटले हाताळण्यासाठी तीक्ष्ण तर्क ’न्यायकौस्तुभ’ने दिला. समजा एखाद्या खटल्यात एका व्यक्तीने जुने वतनपत्र सादर केले, ज्यावर एखाद्या विशिष्ट राजाची राजमुद्रा आहे. अशा वेळी न्यायाधीशांना कौस्तुभातील ’अनुमान प्रमाणा’चा वापर करावा लागे. न्यायाधीशांना ’व्याप्ती’ (सहगामित्व) तपासावी लागे. जर पुराव्यावरील शाई, कागदाचा प्रकार आणि राजमुद्रा ही त्या राजाच्या कालखंडाशी नित्य व स्पष्टसंबंध (व्याप्ती) ठेवणारी नसेल, तर तिथे ’व्यभिचार’ उत्पन्न होतो. पुणतांबेकरांच्या तर्कपद्धतीनुसार, जिथे व्याप्ती खंडित होते, तिथे ’हेत्वाभास’ (दोषपूर्ण तर्क) सिद्ध होतो आणि तो पुरावा न्यायालयात तात्काळ बाद ठरवला जात असे. खर्‍या आणि खोट्या पुराव्यांमधील सूक्ष्म फरक ओळखण्यासाठी हे तर्कशास्त्र न्यायाधीशांचे मुख्य हत्यार होते.
 
 
मराठा न्यायव्यवस्थेत (उदा. हुजूर हाजीर मजलसी) साक्षीदारांचा जबाब हा मुख्य पुरावा मानला जाई. परंतु कोणत्या साक्षीदारावर विश्वास ठेवायचा? न्यायाने ’शब्द’ प्रमाणाची व्याख्या करताना ‘आप्तवाक्यं शब्दः‘ असे म्हटले आहे. महादेवशास्त्रींनी ’आप्त’ कुणाला म्हणायचे याचे तांत्रिक निकष स्पष्ट केले होते.न्यायनिवाड्यात साक्षीदार जर रागीट, लोभी, फायदा होणारा किंवा वादी-प्रतिवादीचा जवळचा नातेवाईक असेल, तर त्याचे शब्द ’आप्तवाक्य’ मानले जात नसे. ’न्यायकौस्तुभ’मधील नियमानुसार, साक्षीदाराला घटनेचे ’प्रत्यक्ष ज्ञान’ असणे अनिवार्य होते. जर साक्षीदाराने म्हटले की मी असे ऐकले आहे, तर तो पुरावा दुय्यम मानला जाई. शिवाय, साक्षीदाराचे वाक्य ऐकताना त्यातील ’तात्पर्य’ आणि ’आकांक्षा’ (अर्थपूर्ण वाक्यरचना) विश्लेषणातून तपासूनच न्यायालयात निकाल दिला जात असे.
 
 
आधुनिक न्यायशास्त्रात जसा ’मेन्स रेआ’ (गुन्हेगारी हेतू) अत्यंत महत्त्वाचा असतो, तसाच अत्यंत प्रगत विचार ’न्याय कौस्तुभ’मध्ये मांडला होता. एखादी कृती जाणीवपूर्वक केली आहे की अनावधानाने घडली आहे, हे ठरवण्यासाठी पुणतांबेकरांचे तर्कशास्त्र मानवी कृतीचे तीन टप्प्यांत विश्लेषण करते.
 
1. ज्ञान व बुद्धी
 
 
2. चिकीर्षा (कर्म करण्याची इच्छा) आणि
 
 
3. कृती.
 
समजा खटल्यात एका व्यक्तीच्या कृतीमुळे दुसर्‍या व्यक्तीच्या गुरांचा मृत्यू झाला किंवा आग लागून नुकसान झाले. तत्कालीन न्यायसभेत न्यायाधीश ’न्यायकौस्तुभ’च्या आधारे तपासत असत की, उपरोक्त कृती करताना व्यक्तीच्या मनात ’चिकीर्षा’ (जाणीवपूर्वक नुकसान करण्याची इच्छा) होती का? जर ती घटना केवळ योगायोगाने किंवा अज्ञानामुळे घडली असेल, तर तिथे ’चिकीर्षा’ हा दुवा तुटतो. अशा वेळी गुन्ह्याचे स्वरूप बदलते. जर कृती ’ज्ञान व बुद्धिपूर्वक केली’ असे सिद्ध झाले तरच कडक ’दंड’ दिला जाई; अन्यथा त्याला केवळ नाममात्र ’प्रायश्चित्त’ किंवा नुकसानभरपाई द्यावी लागे. मानवी मनाच्या आणि हेतूच्या अवस्थांचे तांत्रिक आणि कायदेशीर पृथक्करण नव्य-न्यायातील महादेवशास्त्रींच्या कौस्तुभाच्या आधारावर केले जात असे.
अनेकदा दोन पक्ष एकाच अधिकारावर दावा करत आणि दोघेही पुरावे देत. अशा वेळी न्यायाधीश ’तर्क’ (अनिष्ट प्रसंग दाखवणे) वापरत. जर ’अ’ या व्यक्तीचा दावा खरा मानला, तर 50 वर्षांपूर्वी झालेला ’ब’ हा प्रस्थापित ऐतिहासिक तह खोटा ठरतो. पण ’ब’ हा तह सत्य आहे हे सर्वांना माहीत आहे. म्हणून ’अ’चा दावा खोटा असलाच पाहिजे. हे जे तर्कशुद्ध आणि पायरी-पायरीने केले जाणारे विश्लेषण तत्कालीन न्यायालयात (जसे पुढे रामशास्त्री प्रभुणे यांनी केले) वापरले जाऊ लागले त्याचा सैद्धांतिक पाया पुणतांबेकर आणि त्यांच्या पुढील नैयायिकांनी रचला.
 
 
महादेवशास्त्री पुणतांबेकर सतराव्या शतकाच्या उत्तरार्धातील भारतीय बौद्धिक क्षितिजावरचे ’कौस्तुभ’ रत्न होते. फ्रँक्वा बर्नियरच्या काळात ज्याप्रमाणे पाश्चात्य जग देकार्तच्या कार्टेशियन तर्काच्या माध्यमातून विवेकवादाच्या आणि शास्त्रीय तत्त्वज्ञानाच्या नव्या युगात प्रवेश करत होते, त्याचप्रमाणे भारतात पुणतांबेकरांसारखे विद्वान नव्य-न्यायाच्या माध्यमातून मानवी विचारांना, विवेकपूर्ण विचाराच्या अचूकतेला आणि तर्कशास्त्राला परिपूर्णतेच्या अत्युच्च शिखरावर घेऊन जात होते.
 
 
त्यांचे सर्वात मोठे यश म्हणजे यातून निर्माण झालेली किंवा समृद्ध झालेली वैधानिक आणि तार्किक विचारव्यवस्था. केवळ पोथ्यांपुरती किंवा मठांपुरती ती मर्यादित न राहता या तर्कशास्त्राने तत्कालीन मराठा न्यायव्यवस्थेला अभेद्य, पारदर्शक आणि तर्कशुद्ध पाया मिळवून दिला. वसाहतवादी युरोपीय कायद्यांच्या आणि विचारांच्या आगमनापूर्वी भारतात प्रगत, तर्कनिष्ठ, सूक्ष्म आणि आधुनिक अशी ’न्याय व्यवस्थेची’ विचारप्रणाली यशस्वीरीत्या विकसित होत होती.

राजस वैशंपायन

राजस वैशंपायन 
राजस वैशंपायन इतिहास, सांस्कृतिक जतन आणि प्राचीन ज्ञानप्रणाली, विशेषतः मराठी आणि संस्कृतमधील ज्ञानप्रणाली या विषयांवर काम करतात. साध्य सा. विवेकमध्ये कार्यरत आहेत..