बदलत्या काळानुसार राहणीमान बदलले तरी संस्कृतीचा मूळ गाभा टिकवणे गरजेचे आहे. आज संस्कारांचे रूपांतर केवळ प्रदर्शनात होत असून त्यातील अर्थ हरवत चालला आहे. आधुनिकतेची कास धरताना पाश्चात्त्यांचे अंधानुकरण करण्यापेक्षा, त्यांच्यातील शिस्त आणि नीतिमत्ता स्वीकारणे अधिक गरजेचे आहे. जुन्यातील कालबाह्य गोष्टी सोडून आणि नवी विधायक मूल्ये आत्मसात करून संस्कारांचे संवर्धन करायला हवे. हाच खरा विवेक आहे.
नवरी तयार होत असताना गुरुजींचा निरोप आला - ”मुलीला घेऊन या!“ तिचा मेकअप करणारी आर्टिस्ट थंडपणे म्हणाली, ”अशीच घाई करत असतात बाई हे! आपल्याला वेळ लागणार आहे हां अजून. तिकडे मुहूर्त टळला तरी तिचे काय जाते!“
वधू सजून आल्यावर, स्टेजवर विधी सुरू झाले आणि नेमकी समोरची मोक्याची जागा पाच ते सात व्हिडिओग्राफर व फोटोग्राफर्सनी अडवून धरलेली होती. ’तुमचे येणे हाच आमचा आहेर’ असे आग्रहाचे निमंत्रण स्वीकारून आलेले पाहुणे समोरच्या खुर्च्यांवरून फोटोग्राफर्सची पाठ बघत बसले!
वरमाला घालून झाल्यावर नवरा-नवरी कपडे बदलायला जे गायब झाले, ते आलेल्या पाहुण्यांची जेवणे झाली तरी उगवले नाही. काही पाहुण्यांवर उत्सवमूर्तींना न भेटताच निघून जाण्याची वेळ आली.
देशकालानुरूप भाषा बदलते. पोषाख बदलतात. जगभरातील इतर लोकांशी संबंध येतो. त्यातून विचारांची, पद्धतींची देवाण-घेवाण होते. या बदलत्या काळासोबत जर संस्कार बदलले नाहीत तर ते उपयोगी (ीशश्रर्शींरपीं) ठरणार नाहीत. आपण जर त्यांना आहे असे घट्ट धरून ठेवायचा प्रयत्न केला, तर ते संस्कार आणि ओघाने आपणही काळाच्या मागे पडू. तसेच नावीन्याच्या हव्यासापायी सगळेच सोडून दिले, तर आपण आपली ओळख हरवून बसू. आपण आपली सांस्कृतिक मूल्ये तर जपली पाहिजेत आणि आवश्यक ते नवीन बदलसुद्धा स्वीकारले पाहिजेत.
काळानुसार संस्कारांचे बाह्य रूप कितीतरी बदलले आहे. काही बदल चांगले आहेत, अनुकरणीय आहेत. तर काही अगदी वाईट, तिरस्करणीय. काही संस्कार गळून गेले आहेत. काही तर अगदी विस्मृतीत गेले आहेत. काही विकृत झाले आहेत. काहींवर पाश्चात्त्य मुलामा चढला आहे. आणि काही नवीन संस्कारांचीसुद्धा भर पडली आहे.
जसे, अंतिम संस्कारबद्दल जुना संस्कार सांगतो - “यमराजाला प्रार्थना करा. गेलेल्या जीवाला त्रास न होवो. मृतात्म्यास सद्गती लाभो.” नवीन काळ सांगतो - “मृत्यूपश्चात नेत्रदान करावे, अवयवदान करावेत.“ कोणी देहदानसुद्धा करतात. कालानुरूप या नवीन पद्धतींचा समावेश आपल्या संस्कारांमध्ये यायला हवा. त्यासाठी नवीन मंत्र लिहिले जाऊ शकतात का? किंवा 15 दिवस चालणारे विधी आताच्या धावत्या जीवनशैलीसाठी लेारिलीं करता येतील का?
काही संस्कार समारंभात नको त्या गोष्टी आल्या आहेत. जसे ’मुंज’, हा संस्कार अक्षरश: लग्न केल्याच्या थाटात करतात. पण ना बटूला, ना त्याच्या आई-वडिलांना, ना आलेल्या पाहुण्यांना हा संस्कार का केला जात आहे? त्याचा अर्थ काय आहे? ह्याने बटूच्या जीवनात काय फरक पडणार आहे? हा उपदेश पोहोचतच नाही.
’प्रबोधिनी’सारखी संस्था ह्या प्राचीन आणि महत्त्वाच्या संस्काराची नवीन काळासाठी नवीन रचना करते. इयत्ता सातवी, आठवीत शिकणार्या मुला-मुलींना तुम्ही आता विद्येचे व्रत घेणार आहात, तेव्हा विद्यार्थी दशेत तुम्ही कसे वागावे? अभ्यास कसा करायचा? विद्यार्थ्याचे गुण कोणते? ते कसे आत्मसात करायचे? अशा अनेक गोष्टी वर्षभरातील वेगवेगळ्या उपक्रमातून शिकवते. उपनयन संस्कारातील मंत्र, त्यांचा अर्थ नीट सांगितला जातो. ही पद्धत खरे तर शाळा-शाळांमधून रूढ व्हायला हवी. हा शैक्षणिक संस्कार शाळेनेच मुलांवर करावा.
हा संस्कार का गरजेचा आहे याचे उदाहरण पहा - आजकाल दहावीच्या शेवटच्या दिवशी शाळा संपली, की काही मुले आपल्या वर्गाची मोडतोड करतात. कॉलेजमध्ये ठरससळपस च्या केसेस घडतात. कॅम्पसमध्ये ड्रग्स घेतले जातात. एखाद्याला र्लीश्रश्रू केले जाते.
अशा घटना होऊ नयेत, यासाठी संस्काराची गरज आहे. शाळेविषयी आपलेपणा, गुरुजनांच्या विषयी आदर, सहाध्यायींप्रती स्नेह, आपल्यापेक्षा लहान विद्यार्थ्यांच्या विषयी आपुलकी, विद्यार्थी दशेत ब्रह्मचर्य व्रताचे पालन ... या गोष्टी उपनयन संस्काराच्याद्वारे झाल्या तर वाईट गोष्टींना आळा बसेल.
लग्न या संस्कारच्या बाबतीत तर अनेक विकृती आल्या आहेत. अगदी लग्नच करणार नाही, पासून मुले नको त्यापेक्षा मांजरी -कुत्री पाळू, इथपर्यंत काही ठिकाणी रुखवत म्हणून ताट-वाटीपासून अलमारी-सोफ्यापर्यंत संपूर्ण संसार मांडून दिला जातो. आणि दुर्दैवाने अजूनही काही ठिकाणी हुंडा दिला-घेतला जातो. (रुखवत आणि हुंडा या दोन्ही पद्धती भारतीय नाहीत. धार्मिक नाहीत. शास्त्राला धरून नाहीत.)
आजकाल मराठी विवाहात अनेक पाश्चिमात्त्य गोष्टी डोकावू लागल्या आहेत - वर तर अनेक वर्षे काळा सूट घालतच होता. आता वधूने पांढर्या रंगाचा गाऊन घालायला सुरुवात केली आहे. आपल्याकडे काळा आणि पांढरा हे दोन्ही रंग शुभ प्रसंगी घालत नाहीत. ते केक कापतात म्हणून आम्हीपण केक कापतो. ते बॅचलर पार्टी करतात म्हणून आम्हीपण करणार. कॉपी करावी; पण समजून उमजून!
कॉपी करायचे असेल तर पाश्चिमात्य लोकांकडून हे जरूर कॉपी करावे-
1. तेथील वधू आणि वर लग्नासाठी एक-एकच ड्रेस विकत घेतात.
2. एकाच दागिन्याची - अंगठीची देव घेव करतात.
3. वधू पक्ष आणि वर पक्ष वेळ पाळतात.
4. मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत, एकच इवेंट करतात.
5. वधू आणि वर लग्नाच्या आधी प्रीस्टला भेटून रंगीत तालिम करतात. लग्नात घेण्याच्या शपथा पाठ करतात.
6. भारतीय वधू पिवळी साडी नेसते म्हणून तिथली लीळवश पिवळा गाऊन घालत नाही. तिथला वरसुद्धा कुर्ता घालत नाही. दोघेही तिथला पारंपरिक पोशाख घालतात.
7. आपण मंगळसूत्र घालतो म्हणून तिथली वधू - तू माझ्यासाठी इवलूशी अंगठी काय घेतो? मला पण चांगले घसघशीत काळ्या मण्यांचे नेकलेस हवे! असे म्हणत नाही. ते स्वत:च्या चालीरिती व्यवस्थित सांभाळतात.
8. ॠर्ळींळपस रुरू ींहश लीळवश म्हणजे वधूचे पिता मुलीला घेऊन येतात आणि तिचा हात मुलाच्या हातात देतात. (अगदी कन्यादानासारखे) पण पाश्चात्य वधू मुलगी म्हणजे काही वस्तू आहे का देऊन टाकायला? अशा शंका काढत नाही. ते आपल्या प्रथा जाणून घेतात, त्या मागची भावना समजून घेतात आणि त्याप्रमाणे करतात.
मराठी लग्नांमध्ये संगीत प्रकारपण आला आहे. पंजाबी लग्नांमधील संगीत-हे नात्यातील स्त्रियांनी एकत्र येऊन म्हटलेली लग्नाची लोकगीते आहेत. आपल्या-विहिणी, उखाणे, मंगलाष्टकांच्यासारखी. बॉलीवूडने पंजाबी प्रकार सिनेमात आणला. आणि मराठी लग्नांच्या संगीतमध्ये बॉलीवूडची गाणी आली. संगीत हवे असेल, तर ते आपल्या ढंगात असावे. वधू-वराच्या मित्र मंडळींनी, भावंडांनी मंगलाष्टक गाणारा फ्लॅश मॉब करायला काय हरकत आहे? किंवा दोन्ही पक्षात उखाण्यांची अंताक्षरी करायला काय हरकत आहे? नवीन गोष्टी येऊ देत; पण त्याने आपल्या संस्काराचे प्राण, मूल्य आणि वळसपळीूं हरवता कामा नये. इतकेच नाही तर त्याने आपला संस्कार अधिक चांगला व्हावा.
महाराष्ट्रात एक काळ असा होता की ऋतुशांती संस्कार अत्यंत वाजतगाजत वरात वगैरे काढून केला जात असे. त्या सगळ्या झगमगाटाने आणि त्याला आलेल्या अत्याधिक उत्सव स्वरूपाने लोकांनी त्रस्त होऊन तो संस्कारच बंद केला. आणि त्याबरोबर त्या मागे असलेली मुली, आता तू मोठी झालीस. आता तुझ्या शरीरात अमुक बदल घडतील... वगैरे संवाद होणे जे खरे तर अपेक्षित होते आणि गरजेचे होते; तेही संपून गेले. मग, जे ज्ञान घरातील ज्येष्ठ स्त्रीकडून कळणे अपेक्षित होते, ते विकृत स्वरूपात कुठल्या मैत्रिणिकडून अर्धवट कळायला लागले.
एकूण काय? तर अती तिथे माती असेही नको आणि संस्कारहीन पिढी सुद्धा नको. संस्कारांचा उद्देश प्रदर्शन करणे नसून, आंतरिक उत्थान आणि विकास घडवून आणणे आहे. ते लक्षात घेऊन, समतोल साधत, राजहंसासारख्या नीरक्षीर विवेकाने आपण हितकारक गोष्टी वेचायला हव्या. जुनी मूल्ये जपावीत, अनावश्यक दिखाऊपणा कमी करावा, कालबाह्य गोष्टी सोडायला हव्यात आणि नवीन चांगल्या गोष्टी आत्मसात कराव्यात.
आजच्या काळाला अनुरूप असे संस्कारांचे नवे अर्थ (ळपींशीिीशींरींळेप) केले गेले पाहिजेत. धर्मगुरू आणि धर्मशास्त्राच्या अभ्यासकांनी संस्कारांच्या पोथ्यांच्या नव्या आवृत्त्या तयार करून, त्यातील विचार आजच्या पिढीला समजेल अशा सोप्या आणि सुसंगत भाषेत मांडायला हवे.