चिरंतन स्थिरतेचे महाकाव्य

विवेक मराठी    05-May-2026   
Total Views |
vivek
वडाचे झाड केवळ श्रद्धेचा विषय नसून, ते आपल्या आरोग्यासाठी निसर्गाने दिलेले एक अक्षय्य वरदान आहे. मघा नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेला वटवृक्ष हा निसर्गातील स्थिरतेचे, विशालतेचे आणि दीर्घायुष्याचे सर्वोच्च प्रतीक आहे. या नक्षत्रावरील व्यक्तींनी आपल्या आयुष्यात स्थिरता, दीर्घायुष्य आणि पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी गावाबाहेर, मंदिराजवळ किंवा मोकळ्या परिसरात एक तरी वडाचे झाड नक्की लावावे.
भारतीय संस्कृतीत ज्या वृक्षाला ’अक्षय्य’ (कधीही नष्ट न होणारा) मानले आहे, तो महावृक्ष म्हणजे ’वड’. मघा नक्षत्राचा आराध्य वृक्ष असलेला वटवृक्ष हा निसर्गातील स्थिरतेचे, विशालतेचे आणि दीर्घायुष्याचे सर्वोच्च प्रतीक आहे. मघा नक्षत्राची देवता ’पितर’ (पूर्वज) आहेत. ज्याप्रमाणे आपले पूर्वज आपल्याला आशीर्वाद आणि भक्कम आधार देतात, तसाच हा वटवृक्ष आपल्या पारंब्यांद्वारे मातीला घट्ट धरून ठेवतो आणि सजीव सृष्टीला मातेच्या ममतेने आसरा देतो.
 
 
पुराणांनुसार प्रलयाच्या वेळी जेव्हा सर्व जग जलमय होते - तेव्हा भगवान बालमुकुंद(विष्णू) याच वटवृक्षाच्या पानावर शयन करतात; अशी भागवतात कथा आहे.
 
 
करारविन्देन पदारविन्दं मुखारविन्दे विनिवेशयन्तम्।

वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि ॥
 
 
असा उल्लेख शास्त्रात आला आहे. स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या ’शिष्यांना पारंब्या धरून राहा’, असा उपदेश केला होता. याचा अर्थ त्यांच्या प्रत्यक्ष शिष्यांच्या अनुग्रहाने मूळ संप्रदायाचा विस्तार करा असे वडाचे रूपकच त्यांनी वापरले होते; हे विशेष!
’वटपौर्णिमा’ या सणाला सुवासिनी स्त्रिया वडाची पूजा करतात, कारण सत्यवान आणि सावित्रीची कथा वटवृक्षाशी जोडलेली आहे. हा वृक्ष अखंड सौभाग्याचे आणि पतीच्या दीर्घायुष्याचे प्रतीक मानला जातो.
 
 
वड हा अतिशय विशाल, डेरेदार आणि शेकडो वर्षे जगणारा महावृक्ष आहे. याच्या फांद्यांवरून मुळे(पारंब्या) फुटतात आणि जमिनीकडे वाढतात. जमिनीत रुजल्यावर या पारंब्या नवीन खोडासारख्या बनतात ज्यामुळे मूळ वृक्ष नष्ट झाला तरी हा वृक्ष पारंब्यांच्या आधाराने शेकडो वर्षे जिवंत राहतो आणि विस्तारत जातो. याची पाने जाड, लंब वर्तुळाकार आणि हिरवीगार असतात. याला फुले येत नाहीत तर खोडाला आणि फांद्यांना थेट लाल रंगाची गोलाकार फळे येतात.
 
 
आयुर्वेदीय दृष्टीकोन : शीतल आणि स्तंभक
 
आयुर्वेदात वडाची साल, पाने, पारंब्या, फळे (टेबुर्णे), आणि चीक (क्षीर) या सर्वांचा औषधी उपयोग अत्यंत बारकाईने सांगितला आहे. त्याचा रस कषाय (तुरट) असून गुण गुरू (जड), रूक्ष (कोरडा) आणि वीर्य शीत तर विपाक कटू सांगितला आहे.
 
 
वड हा प्रामुख्याने कफ आणि पित्तशामक आहे. याचा ’तुरट’ रस आणि थंड वीर्य शरीरातील अतिरिक्त स्राव थांबवण्यासाठी (स्तंभन) श्रेष्ठ आहे.
 
 
आरोग्यासाठी उपयोग
 
 
1. दंतविकार आणि मौखिक आरोग्य : वडाच्या पारंब्या दात घासण्यासाठी (दंतधावन) उत्कृष्ट दातवण म्हणून वापरल्या जातात. याचा तुरट रस हिरड्यांना घट्ट करतो, दात हलणे थांबवतो आणि तोंडातील दुर्गंधी व जंतूंचा नाश करतो.
 
 
2. स्त्रियांचे विकार आणि गर्भधारणा : आयुर्वेदात वडाला ’गर्भस्थापक’ मानले आहे. वडाचे कोवळे अंकुर(वटशुंग) दुधात वाटून दिल्यास गर्भस्थापनेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतात. अंगावरून पांढरे जाणे किंवा अतिरक्तस्राव या त्रासात वडाच्या सालीचा काढा उत्तम कार्य करतो.
 
 
3. अतिसार आणि त्वचाविकार : जुलाब किंवा रक्ती आव होत असल्यास वडाच्या पानांचा किंवा सालीचा काढा दिला जातो. तसेच, वडाचा चीक हा उत्तम ’व्रणरोपक’ आहे. टाचांना पडलेल्या भेगांवर किंवा न भरणार्‍या जखमांवर हा चीक लावल्यास त्वरित आराम मिळतो आणि जखम भरून येते. अर्थात् याबाबत वैद्यांचा प्रत्यक्ष सल्ला आवश्यक आहे.
 
 
vivek
 
संशोधन काय सांगते?
 
आधुनिक वैद्यकशास्त्र, बायोकेमिस्ट्री आणि फार्माकोलॉजीने वटवृक्षावर सखोल संशोधन केले असून आयुर्वेदातील सिद्धांतांना वैज्ञानिक पुष्टी दिली आहे:
 
1. गट मायक्रोबायोम आणि गॅस्ट्रोप्रोटेक्टिव्ह गुणधर्म
 
आधुनिक संशोधनानुसार; वडाच्या सालीचा आणि पानांचा अर्क आतड्यांची जळजळ कमी करण्यासाठी आणि पोटातील अल्सर (Peptic Ulcers) बरे करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहे. याचा तुरट गुण आतड्यांच्या अस्तराचे रक्षण करतो. पचनसंस्था आणि मेंदूचा (Gut-Brain Axis) घनिष्ठ संबंध पाहता, वडातील हे घटक चयापचय सुधारण्यात आणि पचनसंस्थेतील अत्यंत उपयुक्त जिवाणूंची वाढ करून नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात मोलाची भूमिका बजावतात.
 
 
2. फायटोकेमिस्ट्री आणि अँटी-ऑक्सिडंट्स : वडाच्या पारंब्या, साल आणि पानांमध्ये ’बेंगालेनोसाईड’, ’ल्युकोसायनिडिन’, टॅनिन आणि विविध दुर्मिळ फ्लेव्होनॉइड्स आढळतात. हे अत्यंत शक्तिशाली अँटी-ऑक्सिडंट्स असून ते पेशींचे ’ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस’पासून रक्षण करतात. तसेच, या अर्कामध्ये ब्रॉड-स्पेक्ट्रम अँटी-मायक्रोबियल गुणधर्म सिद्ध झाले आहेत, जे विशेषतः तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करतात.
 
3. कार्डिओव्हॅस्कुलर हेल्थ आणि अँटी-डायबेटिक : वडाच्या अर्कावर झालेल्या अनेक क्लिनिकल ट्रायल्समध्ये असे दिसून आले आहे की, तो रक्तातील लिपिड प्रोफाईल सुधारतो. तो वाईट कोलेस्ट्रॉल (LDL) कमी करून रक्तवाहिन्यांचे काठिण्य रोखण्यास मदत करतो. याशिवाय, ’बेंगालेनोसाईड’ या घटकामध्ये प्रबळ ’हायपोग्लायसेमिक’ (रक्तातील साखर कमी करणारे) गुणधर्म आढळले आहेत, जे मधुमेहाच्या व्यवस्थापनात अत्यंत उपयुक्त ठरतात.
 
पर्यावरणाचा रक्षक आणि ’बायोडायव्हर्सिटी हब’
वड हा पर्यावरणासाठी केवळ एक वृक्ष नसून ती एक स्वतंत्र परिसंस्था म्हणजे इकोसिस्टम आहे. शेकडो पक्षी, कीटक, खारुताई आणि इतर प्राणी वडाच्या फळांवर आणि आश्रयावर जगतात. हा वृक्ष अत्यंत उष्ण आणि कोरड्या हवामानातही जमिनीतील ओलावा टिकवून ठेवतो आणि आपल्या विशाल छत्राखाली परिसरातील तापमान अनेक अंशांनी कमी ठेवण्याचे महान कार्य करतो.
 
 
मघा नक्षत्रावर जन्मलेल्या व्यक्तींनी वटवृक्षासारखे खंबीर, विशाल हृदयाचे आणि इतरांना सावली (आधार) देणारे असावे. या नक्षत्रावरील व्यक्तींनी आपल्या आयुष्यात स्थिरता, दीर्घायुष्य आणि पितरांचे आशीर्वाद मिळवण्यासाठी गावाबाहेर, मंदिराजवळ किंवा मोकळ्या परिसरात एक तरी वडाचे झाड नक्की लावावे. हा महावृक्ष केवळ परिसराला प्राणवायू आणि सावली देणार नाही, तर अनेक पिढ्यांसाठी आरोग्याचे आणि स्थिरतेचे एक अक्षय्य वरदान ठरेल.
 
- लेखक आयुर्वेद वाचस्पती आहेत.

वैद्य परीक्षित शेवडे

वैद्य परीक्षित शेवडे हे एक आयुर्वेदिक डॉक्टर, लेखक आणि वक्ते आहेत,  आयुर्वेदाच्या तत्त्वांचा आणि आधुनिक विज्ञानाचा वापर करून आरोग्यविषयक मार्गदर्शन करतात, विशेषतः 'आयुर्वेद वाचस्पति' म्हणून ते ओळखले जातात आणि त्यांचे लेख, पुस्तके तसेच समाज माध्यमांवरून ते लोकांपर्यंत आरोग्यविषयक जनजागृती करतात..