मित्र शत्रू कसा होतो?

विवेक मराठी    05-May-2026   
Total Views |
जागतिक राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू नसतो आणि कायम मित्र नसतो. शत्रू-मित्र या सापेक्ष कल्पना आहेत. कुणी सांगावे आणखी 25-30 वर्षांनंतर इराण आणि अमेरिका पुन्हा एकमेकांचे मित्र होणार नाहीत. हे सर्व विषय परिस्थितीजन्य असतात. आजच्या घडीचे सत्य सांगायचे तर इराण आणि अमेरिका एकमेकांचे शत्रू आहेत आणि दोघेही एकमेकांना शरण आणण्याच्या पवित्र्यात उभे आहेत. हा संघर्ष दीर्घकाळाचा आहे, त्यात कोण जिंकेल आणि कोण हरेल हे येणारा काळच आपल्याला सांगेल.
 

iran israel and america
 
 
आज अमेरिका आणि इराण यांच्यात युद्ध चालू आहे. काही काळापुरता युद्धविराम झालेला आहे; परंतु युद्ध पुन्हा कधी सुरू होईल हे सांगता येणार नाही. अमेरिका इराणला शत्रू राष्ट्र मानते आणि इराणही अमेरिकेला शत्रू राष्ट्र मानतो. अनेक वाचकांना पुढील वाक्य वाचून आश्चर्य वाटेल की, 1979पर्यंत इराण हा अमेरिकेचा घनिष्ठ मित्र होता. या मित्राला अमेरिकेने संज्ञा दिली होती,‘मध्यपूर्वेतील पोलीसमन’. मध्यपूर्वेतील हा पोलीसमन अमेरिकेचा कट्टर शत्रू कसा झाला? हे एकदा समजले की, आजचे अमेरिका-इराण युद्ध का चालू आहे आणि ते किती काळ चालेल याचे उत्तर वाचकांना आपोआप सापडेल.
 
 
इराणचे प्राचीन नाव आहे, पर्शिया. भारताप्रमाणे हा अतिशय प्राचीन देश आहे. समृद्ध संस्कृती आहे. समृद्ध भाषा आहे. पर्शियाचा इराण हा 21 मार्च 1935 साली झाला. इराणचा अर्थ होतो, आर्य लोकांचा देश. हे आर्यवंशीय इराणी आपल्या देशात पारशी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या धर्माचे नाव आहे, ‘पारशी धर्म’. इराणवर इस्लामचे आक्रमण झाल्यावर ते भारतात आले. दुधात साखर मिसळावी तसे ते भारतीय समाजाशी एकरूप झाले. मुंबईत एके काळी सर्व महत्त्वांच्या रस्त्यांवरील कॉर्नरची हॉटेलस इराणी असत आणि त्यातीलच 1925 सालापासूनचे पेडर रोडवरील प्रसिद्ध असे हॉटेल ’लाईट ऑफ पर्शिया’ होय. या इराणी हॉटेलसचा गाजलेला पदार्थ चहा आणि मस्का पाव असे. असा आपला इराणशी खाण्यापिण्याचा संबंध आहे.
 
 
अमेरिकेचा इराणशी संबंध खाण्यापिण्याच्या विषयावरून आला नाही. 7 डिसेंबर 1941साली अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर जपानने अचानक हल्ला केला. तोपर्यंत अमेरिका दुसर्‍या महायुद्धात उतरली नव्हती. 8 ऑगस्टपासून अमेरिकेचा दुसर्‍या महायुद्धात प्रवेश झाला. 1941 सालापासून अमेरिका दुसर्‍या महायुद्धात उतरली. दुसर्‍या महायुद्धात इराणचे भू-सामरिक स्थान अतिशय महत्त्वाचे झाले. त्याची तीन कारणे आहेत, ती अशी -
 
1) इराणमध्ये समृद्ध तेलसाठे सापडले होते आणि तेलाचे उत्पादन सुरू झाले होते. त्याची मालकी ब्रिटीश कंपनीकडे होती. या तेलसाठ्यांचे रक्षण करणे, युद्धकाळातील सर्वात महत्त्वाचे काम झाले.

2) इराणच्या सीमा रशियाला लागून आहेत. जून 1941ला हिटलरने रशियावर चढाई केली. रशियाला इराणमार्फत रसद पुरविणे युद्धनितीचा महत्त्वाचा भाग झाला. त्यापूर्वीच रशियाने इराणचा उत्तरेकडील प्रदेश आपल्या ताब्यात घेतला होता.
 
3) जर्मनीचाही इराणवर डोळा होता. जर्मन हस्तक इराणमध्ये कार्यरत होते. राजसत्तादेखील त्यांना थोडी अनुकूल होती.
 
 
इराणचे तेल हे इराणला वरदानही आहे आणि शापही आहे. 1901 साली इराणमध्ये काजर राजवंशाची राजवट होती. या राजवटीने इराणची नैसर्गिक संपत्ती परकीय कंपन्यांच्या घशात घालायला सुरुवात केली. कारण तेव्हा इराण हा तुलनेने गरीब देश होता.
 

iran israel and america मैत्रीचा अंत आणि जनआक्रोशाचा उदय : 1979ची इस्लामिक क्रांती, ज्याने अमेरिका-इराण संबंधांतील विश्वासाची राखरांगोळी केली.
 
पैशाची कमतरता होती. त्यात इराणचे तेलसाठे शोधून काढण्याचे काम ब्रिटीश तेलतज्ज्ञ विल्यम्स नॉक्स याला देण्यात आले. खूप वर्ष संशोधन केल्यानंतर 1908साली इराणमध्ये जगातील सर्वाधिक तेलसाठे आहेत याचा शोध लागला. इंग्रज हे व्यापारी, वसाहतवादी आणि वर्चस्ववादी लोक आहेत. त्यांनी कजर राजवटीशी करार केला आणि अ‍ॅग्लो पर्शियन ऑईल कंपनी स्थापन केली. नंतर तिचे नामकरण इराणियन ऑईल कंपनी असे झाले आणि शेवटी तिचे नाव ब्रिटीश पेट्रोलियम कंपनी असे झाले. या नामांतराचा स्वतंत्र इतिहास आहे. त्याचा एका वाक्यात सारांश असा की, तेलाची संपत्ती इराणची, तिच्यावर मक्तेदारी ब्रिटीशांची, आणि इराणच्या झोळीत मात्र दोन मूठभर दाणे, असा हा सगळा इतिहास आहे.
 
 
पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाने युद्धशस्त्रांचे यांत्रिकीकरण केले. तोफा, रणगाडे, हवाईदल, युद्धनौका या सर्वांना तेलाची ऊर्जा लागते. दोस्त राष्ट्रांची (अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, रशिया इ.) ही सर्व गरज इराणच्या तेलाने भागविली. म्हणून इराणचे महत्त्व प्रचंड वाढले. याचवेळी प्राचीन देश असलेल्या इराणमध्ये राष्ट्रवादाचे वारे वाहू लागले. संपत्ती आपल्या देशाची, मालकी परक्यांची, आपल्या झोळीत भिकेचे दाणे आणि परकीय लोक सर्व मलिदा खाणार. हे इराणी जनतेला आकलन होत गेले, ती जागी होत गेली आणि ज्या राजवटी ब्रिटन आणि अमेरिकेला शरण गेल्या आहेत, त्यांच्याविरूद्ध प्रचंड जनआक्रोश उभा राहत गेला.
 
 
इराणमध्ये पहिली राज्यक्रांती 1925 साली झाली. कजर राजवंशाच्या सेनेतील रेझा खानने उठाव केला. राजघराणे हाकलून लावले आणि तो स्वतः राजा झाला. तिथून रेझा खान पेहलवीची राजवट सुरू झाली. या पहिल्या पेहलवीला ब्रिटीशांनी पदच्युत केले, कारण तो जर्मनांशी जवळीक करू लागला होता आणि त्याचा मुलगा मोहम्मद रेझा पेहलवी याला सिंहासनावर बसविले. त्याची राजवट 1979 सालच्या इस्लामिक क्रांतीने संपली. तोपर्यंत इराणमध्ये ज्या घटना घडल्या आहेत, त्याने इराण आणि अमेरिका संबंधाला जबरदस्त तडे गेले.
 

iran israel and america 
राजनैतिक संवादाचे सुवर्णयुग
जेव्हा जागतिक राजकारणात अमेरिका-इराण घनिष्ठ मित्र होते.
(रिचर्ड निक्सन आणि इराणचे शाह मोहम्मद रेझा पहलवी)
 
 
या घटना अशा - अमेरिका आणि ब्रिटनने ज्या मोहम्मद रेझा पेहलवी याला राजगादीवर बसविले, त्या पेहलवीला जनसमर्थन नव्हते. राज्यशास्त्राचा मूलभूत सिद्धांत असा आहे की, कोणतीही राजवट पर्याप्त जनसमर्थनाशिवाय दीर्घकाळ टिकू शकत नाही. जनसमर्थन ज्यांना नसते असे राज्यकर्ते राज्यदहशतीचा उपयोग करून राज्य करू लागतात. विरोधकांना पकडणे, त्यांचा छळ करणे, त्यांची संपत्ती जप्त करणे आणि त्यांना ठार करणे, या मार्गाने हे लोक जातात. इराणचा पेहलवीही याच मार्गाने जाऊ लागला.
 
 
त्याच्या विरूद्ध इराणी जनतेने उठाव केला आणि या पेहलवीला देश सोडावा लागला. इराणमध्ये पहिली लोकशाही क्रांती- इस्लामी क्रांती नव्हे, जी 1951 साली झाली आणि मोहम्मद मोसादेग हे देशाचे पंतप्रधान झाले. त्यांना प्रचंड जनसमर्थन होते. क्रांतीचे अग्रदूत म्हणून त्यांचा जगात बोलबाला झाला. प्रसिद्ध टाईम्स मॅगझिनने 1952 साली घोषित केले की, मोहम्मद मोसादेग हे ‘मॅन ऑफ द इयर’ आहेत. टाईम्समध्ये अशा प्रकारे येणे हा फार मोठा गौरव समजला जातो.
 
 
इराणमध्ये लोकशाही राजवट टिकली नाही. लोकांना ती नको होती असे नाही. अमेरिका आणि ब्रिटनला ती नको होती. कशी विसंगती असते पाहा. ब्रिटनला लोकशाहीची जननी म्हणतात आणि अमेरिकेला व्यक्ती स्वातंत्र्याची जननी म्हणतात. या दोन्ही जननींना इराणमधील लोकशाही अपत्य मात्र नको होते, म्हणून या अपत्याचा गर्भपात करण्याची योजना त्यांनी आखली. त्याचे कारण असे झाले-
 
 
मोहम्मद मोसादेग यांनी पंतप्रधान होताच तेल कंपनीचे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय केला. यामुळे व्यापारी ब्रिटिशांचे धाबे दणाणले. एकाच वेळी सोन्याची दहा अंडी देणारी कोंबडी आपल्या हातून निसटली आहे, याचे लोकशाही जननीला अतिशय दुःख झाले आणि ब्रिटनने इराणवर प्रचंड आर्थिक निर्बंध लादले. आज जे अमेरिका करीत आहे, तेच ब्रिटनने त्यावेळी केले. इराणचे तेल खरेदी करता कामा नये, असा आदेश ब्रिटनने सोडला. परंतु ब्रिटन हे शक्तिक्षीण राष्ट्र झाले होते. अमेरिकेला बरोबर घेतल्याशिवाय इराणची तेल कंपनी आपल्याला मिळू शकत नाही, हे त्यांच्या लक्षात आले.
 
 
अमेरिकेला बरोबर घ्यायचे तर अमेरिकेच्या नाजूक जागेवर चिमटा काढण्याची गरज होती. अमेरिकेची नाजूक जागा होती, रशियाच्या कम्युनिझमचा वेगवेगळ्या देशात प्रचार रोखणे. रशिया इराणमध्ये कम्युनिस्ट राजवट आणण्याचा प्रयत्न करतो आहे, हे खोटेनाटे पुरावे गोळा करून ब्रिटिशांनी अमेरिकेच्या गळी उतरविले. अमेरिका जागी झाली. मोसादेग याची राजवट उलथून पाडण्याचे हे काम सीआयए एजन्ट रूझवेल्ट यांच्याकडे देण्यात आले. या कामासाठी त्याला लाखो डॉलर देण्यात आले. त्याने इराणमधील राजाविषयी सहानुभूती असणार्‍या सेनाधिकार्‍यांना फितूर केले. आंदोलन करणारे अनेक गट उभे केले. वेगवेगळ्या संघटनांना पैसा पुरवला.
 

iran israel and america 
 मोहम्मद मोसादेग : इराणमधील लोकशाही क्रांतीचे प्रणेते आणि साम्राज्यवादाविरुद्ध लढणारे एक झुंजार लोकनेते.
 
या सर्वांनी मोहम्मद मोसादेग यांच्या विरूद्ध उठाव केला. नंतर त्यांना अटक करण्यात आली आणि पुढे मरेपर्यंत राहत्या घरी त्यांना कैदेत ठेवण्यात आले. 1953 साली ही ’तिसरी क्रांती’ झाली. म्हणजे इराणमध्ये लोकशाहीची हत्या झाली, ती ब्रिटन आणि अमेरिकेने केली. मोसादेग यांच्या पदच्युतीची (सीआयए) कागदपत्रे आता उघड झालेली आहेत आणि ती उपलब्धही आहेत.
ब्रिटन आणि रशिया हे दोघेही वसाहतवादी आहेत. अमेरिका तशी नाही, असा एक गोड समज इराणी जनतेचा होता. त्या विश्वासाची मोसादेग यांच्या पदच्युतीने राखरांगोळी झाली. आपण समजतो तशी अमेरिका नसून तीदेखील लांडग्याचा कळपातील लांडगाच आहे, हे इराणी जनतेच्या लक्षात आले आणि इथून अमेरिकन विरोधाचे पाणी तापत गेले आणि उकळत गेले. यातील गमतीचा भाग असा की, इराणी जनता आपल्याविरूद्ध संधी सापडताच उठाव करील ही गोष्ट अमेरिकेच्या लक्षातच आली नाही. कदाचित त्यांचे हेरखाते झोपी गेले असावे.
 
 
मोसादेगच्या जागी पुन्हा मोहम्मद रेझा पेहलवी इराणचा बादशहा झाला. आपण ब्रिटन आणि अमेरिकेच्या साहाय्यामुळे राजा आहोत, ही गोष्ट हा राजा कधी विसरला नाही. ‘ख रा र्ूेीी ोीीं ेलशवळशपीं रपव श्रेूरश्र ीर्शीींरपीं’ या मानसिकतेतून तो राज्य करू लागला. त्याला सुरक्षितपणे राज्य करता यावे, म्हणून अमेरिकेच्या सीआयएने गुप्त पोलीसयंत्रणा बसवून दिली. तिचे नाव होते,‘सावक’. या गुप्त पोलिस अधिकार्‍यांचे सर्व प्रशिक्षण सीआयएने केले. चौकशी कशी करायची, छळ कसा करायचा, आरोप कसे शोधून काढायचे, पाळत कशी ठेवायची, गुप्त माहितीचे संकलन कसे करायचे, इत्यादी सर्व प्रशिक्षण अमेरिकेने करून दिले. आणि या पेहलवीच्या राज्यात इराणी तरूण आणि तरूणी तुरूंगात गेल्या, तेवढ्याच गायबही झाल्या.
 
 
इराणला रिचर्ड निक्सन (अमेरिकेचे 37 वे राष्ट्राध्यक्ष) यांनी 1972 साली भेट दिली. पेहलवीला त्यांनी कोरा चेक दिला. पाहिजे तेवढी शस्त्रास्त्रे आणि युद्धसामग्री अमेरिकेकडून तुम्ही खरेदी करा, असे त्यांना सांगितले. त्यावेळच्या वर्तमानपत्रात इराणने किती शस्त्रेे खरेदी केली, किती युद्धनौका खरेदी केल्या याच्या बातम्या येत असत. मध्यपूर्वेतील तेलसाठ्यांचे रक्षण हा पोलीसमन करीत राहील, असा अमेरिकेला भरोसा वाटला. यानंतर जिमी कार्टर यांनी तेहरानला भेट दिली. शाहचे तोंड भरून कौतुक केले. अमेरिकेचा अत्यंत विश्वासू सहकारी अशी स्तुतीसुमने उधळली.
 
 
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मालिकेतील जिमी कार्टर (अमेरिकेचे 39 वे राष्ट्राध्यक्ष) हे अकार्यक्षम राष्ट्राध्यक्ष म्हणून नोंदले गेले आहेत. त्यांच्या काळात त्यांचा मित्र मोहम्मद रेझा पेहलवी याला इराणी जनतेने सिंहासनावरून हाकलून लावले. आयातुल्ला खोमेनी या शिया धर्मपंडिताला या पेहलवीने चौदा वर्षे देशाबाहेर हाकलून लावले होते. चौदा वर्षांचा वनवास संपवून आयातुल्ला खोमेनी इराणमधील 1979च्या उठावाचे नेतृत्व करण्यासाठी पॅरिसहून परत आले. त्यांचे इराणी जनतेने विजयी योद्धा म्हणून स्वागत केले. या क्रांतीला ‘इस्लामिक क्रांती’ अशी संज्ञा प्राप्त झाली. एकाच शतकातील ही इराणमधील चौथी क्रांती होती.
आयातुल्ला खोमेनी यांनी घोषणा दिली की, आम्हाला पूर्वही नको आणि पश्चिमही नको; आम्ही इस्लामी सरिया राजवटीचा तिसरा मार्ग स्वीकारणार आहोत. खोमेनी यांच्या राजवटीच्या काळात तेहरान येथील अमेरिकन दूतावासाला विद्यार्थ्यांनी घेराव घातला. हा घेराव 444 दिवस होता. दूतावसातील 60 अमेरिकन कर्मचार्‍यांच्या डोळ्यांवर आणि तोंडावर पट्टी बांधून टीव्हीच्या कॅमेर्‍यासमोर उभे करणयात आले. जगभर ही चित्रे गेली. एका दूतावासावरील हल्ला हा कर्मचार्‍यांवरील हल्ला नसून दूतावास ज्या देशाचा आहे, त्या देशावरील तो हल्ला असतो. यामुळे अमेरिकन जनमत आयातुल्ला खोमेनीच्या राजवटीच्या विरोधात गेले. ते संतप्त झाले, सुडाची भावना निर्माण झाली. ‘दोस्त दोस्त ना रहा, प्यार प्यार ना रहा’ हे गाणे इथे बरोबर लागू पडते.
 
 
आणखी एक कारण आहे, ते म्हणजे इराणचा अणू कार्यक्रम. नागरी उपयोगासाठी अणुतंत्राचा उपयोग आणि अणूबाँब बनविण्यासाठी त्याचा वापर यात फरक आहे. अणूबाँबसाठी 100 टक्के शुद्ध युरेनियम लागते. ते करण्याचे तंत्रज्ञान किचकट आहे. दोस्तीच्या काळात अमेरिकेनेच इराणला एक अणूभट्टी दिली. युरेनियम दिले. त्याचा उपयोग करून 1980 पासून इराणने अणूबाँबसाठी युरेनियमच्या शुद्धीकरणाचा विषय चालविला. त्यावर प्रतिबंध घालण्यासाठी युनोमार्फत अमेरिकेने आतापर्यंत खूप प्रयत्न केले. इराणवर प्रचंड आर्थिक बंधने घातली. इराण आणि अमेरिका संबंध आणखी रसातळाला जाण्याचे एक प्रकरण घडले, ते म्हणजे अमेरिकेच्या युद्धनौकेने आखातातून दुबईकडे जाणार्‍या प्रवासी इराणी विमानाला पाडले. त्यात 290 प्रवासी आणि विमान कर्मचारी ठार झाले. अशा प्रकारे प्रवासी विमान पाडणे हा आंतरराष्ट्रीय कायद्याने गुन्हा आहे. पण महासत्ता अमेरिकेच्या गळ्यात घंटा कोण बांधणार!
 
 
दोन देशातील मैत्री ते दुश्मनी याचा हा थोडक्यात प्रवास आहे. जागतिक राजकारणात कुणी कुणाचा कायम शत्रू नसतो आणि कायम मित्र नसतो. शत्रू-मित्र या सापेक्ष कल्पना आहेत. कुणी सांगावे आणखी 25-30वर्षांनंतर इराण आणि अमेरिका पुन्हा एकमेकांचे मित्र होणार नाहीत. हे सर्व विषय परिस्थितीजन्य असतात. आजच्या घडीचे सत्य सांगायचे तर इराण आणि अमेरिका एकमेकांचे शत्रू आहेत आणि दोघेही एकमेकांना शरण आणण्याच्या पवित्र्यात उभे आहेत. हा संघर्ष दीर्घकाळाचा आहे, त्यात कोण जिंकेल आणि कोण हरेल हे येणारा काळच आपल्याला सांगेल.

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.