battle india pakistan

एप्रिल आणि ऑगस्ट 1965 मधील दोन छुप्या युद्ध मोहिमा असफल झाल्यामुळे अखेर पाकने 1 सप्टेंबर 1965 रोजी भारताविरुद्ध जाहीर युद्ध सुरू केले. युद्धाचे विश्लेषण करणारे अभ्यासक नेहमी एक महत्त्वाचे मुद्दे सूत्र मांडतात की, ज्याच्या शस्त्राचा पल्ला लांब, तो साधारणपणे युद्ध जिंकतो. युरोपीय पुराणकथांमध्ये गोलायथ हा एक भीमकाय योद्धा असतो. आपल्या प्रचंड गदेने तो सगळ्या शत्रूंचा चक्काचूर उडवत असतो. त्याचा प्रतिस्पर्धी डेव्हिड हा एक किरकोळ अंगकाठीचा पोरगा असतो; पण त्याच्या हातात लांबवर मारा करणारी गोफण असते. डेव्हिड डोके वापरतो. तो गोलायथच्या गदेच्या पल्ल्यापासून लांब उभा राहतो आणि तिथून आपल्या हाताच्या गोफणीने गोलायथवर सणाणून धोंडे मारत राहतो. त्यातील एक धोंडा वर्मी बसून बलाढ्य गोलायथ मरतो आणि दुबळा भासणारा डेव्हिड जिंकतो. ज्याच्या शस्त्राचा पल्ला लांबचा, तो युद्ध जिंकतो.
1962 च्या चीनबरोबरच्या मानहानीनंतर भारताच्या संरक्षण धोरणात बदल झाला होता. आपण कितीही लोकप्रिय असलो तरी युद्धात पराभव झाल्यास जनता आपल्याला क्षमा करणार नाही, हे समजून चुकल्यामुळे पंडित नेहरूंनी संरक्षण धोरणात आधुनिकता आणली. नामदार यशवंतराव चव्हाण यांना संरक्षणमंत्रीपद दिले. यशवंतरावांनी अतिशय ‘प्रॅक्टिकल’ भूमिका घेऊन भूदल, नौदल आणि वायुदल यांच्या सेनापतींना त्यांची सैन्यदले अद्ययावत बनवण्याची पूर्ण मोकळीक दिली. पंतप्रधान पंडित नेहरू आणि अर्थमंत्री कृष्णम्माचारी यांच्याकडे पाठपुरावा करून केंद्रीय अर्थसंकल्पात संरक्षण खात्यासाठी चांगल्या रकमेची तरतूद करून घेतली. भूदल प्रमुख आणि सरसेनापती जनरल जयंतनाथ चौधरी, नौदल प्रमुख अॅडमिरल भास्कर सोमण आणि वायुदल प्रमुख एअर मार्शल अर्जनसिंग यांनीही धडाक्याने आपापल्या सैन्यदलांचे अद्ययावतीकरण सुरू केले.
रणगाडे आणि तोफा
1965च्या या युद्धात नौदलाची भूमिका फारशी नव्हतीच. त्यामुळे तूर्त आपण भूदल आणि वायुदल यांच्याबद्दलच तुलनात्मक विचार करूया. पाकिस्तानकडे 594 पॅटन आणि 330 शेरमन असे एकूण 924 रणगाडे होते. यांपैकी पॅटन हा अत्याधुनिक अमेरिकन बनावटीचा रणगाडा अभेद्य म्हणून जगभर गाजत होता. पॅटनवर बसवलेली 90 मि.मी. ची तोफ 2000 यार्ड अंतरापर्यंत मारा करू शकत होती. तसेच रात्रीच्या अंधारात दिसू शकणारी इन्फ्रारेड उपकरणे त्याच्यावर बसवलेली होती. हा पॅटन रणगाडा सोव्हिएत रणगाड्याशी झुंजण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेला होता. शेरमन हा अँग्लो-अमेरिकन बनावटीचा रणगाडा मात्र तसा तुलनेने जुना होता. 1945 साली दुसरे महायुद्ध संपल्यानंतर ब्रिटिश रणगाडा दलाने काढून टाकलेले रणगाडे पाकिस्तानी सैन्यदलाने, तसेच भारतानेसुद्धा खरेदी केले होते.
भारताजवळ 472 शेरमन आणि 270 सेंच्युरियन असे मिळून एकूण 742 रणगाडे होते. आता इथे भारतीय सेनेतल्या इंजिनियर तरुणांची कमाल सांगायला हवी. 1948च्या भारत-पाक युद्धात इंजिनियर खात्याने11 हजार फूट उंचीवरच्या झोजिला खिंडीत रणगाडे चढवले होते. हा जगावेगळा पराक्रम आपण यापूर्वी पाहिलेलाच आहे. आता, भारताने ब्रिटनकडून घेतलेले शेरमन रणगाडे प्रत्यक्ष दुसर्या महायुद्धात लढलेले होते; म्हणजे 1965 साली ते किमान 20 वर्षे जुने झालेले होते. सेंच्युरियन रणगाडे हे पूर्णपणे ब्रिटिश उत्पादन होते.
ते 1946 साली बाजारात आले. साधारण 1950 ते 1960 या कालखंडात भारताने ते ब्रिटनकडून खरेदी केले. म्हणजे तेसुद्धा किमान पाच ते दहा वर्षे जुनेच होते. पण भारतीय इंजिनिअरिंग दलातल्या तरूणांनी आपले बुद्धिकौशल्य पणाला लावून शेरमन आणि सेंच्युरियन या दोन्ही रणगाड्यांमध्ये, आपल्याला हवे तसे भरपूर बदल केले. त्या क्षेत्रातले जाणकार लोक गंमतीने असे म्हणत असत की, या आमच्या पोरांनी या दोन्ही रणगाड्यांची फक्त ‘चॅसी’ तीच ठेवली आहे. बाकी सगळेच बदलले आहे.
पाकिस्तानकडे असलेल्या तोफा या मुख्यतः 105 मि.मी. आणि 155 मि.मी. हॉवित्झर तोफा होत्या. त्या अमेरिकेने ‘मिलिटरी असिस्टन्स प्रोग्रॅम’(एम.ए.पी.)अंतर्गत पाकला पुरवलेल्या असल्यामुळे त्यांना मॅप तोफा असेच म्हटले जात असे. हॉवित्झर तोफा आणि बिगर हॉवित्झर तोफा यांच्यात असा फरक आहे की, बिगर हॉवित्झर तोफा या एखादा पक्का बंकर फोडायचा असला, एखादी युद्धनौका बुडवायची असली, एखादा रणगाडा फोडायचा असला तर वापरतात; आणि हॉवित्झर प्रकारातल्या तोफा समोरून येणार्या शत्रूच्या पायदळाचा खुर्दा उडवण्यासाठी, काही अंतरावर असलेले शत्रूचे एखादे ठाणे, एखादे गाव उद्ध्वस्त करण्यासाठी वापरल्या जातात. त्यामुळे हॉवित्झर तोफांचा मारा जास्त बेछूट आणि संहारक असतो.
याउलट भारताकडे ब्रिटिश बनावटीच्या 25 पाऊंडी मैदानी तोफा, 5.5 इंची मध्यम तोफा, 3.7 इंची पहाडी तोफा अशा बिगर हॉवित्झर आणि काही 105 मि.मी. हॉवित्झर होत्या. कोणतीही तोफ किंवा बंदूक जेव्हा डागली जाते, तेव्हा तिच्या नळीमधल्या दारूचा एक छोटासा स्फोट होतो. त्या स्फोटाच्या झटक्याने तोफेचा गोळा किंवा बंदुकीची गोळी वेगाने लक्ष्यावर फेकली जाते. या क्रियेची प्रतिक्रिया म्हणून तोफेचा गोळा समोर उडाल्यावर तोफ थोडीशी मागे ढकलली जाते. तसेच बंदुकीची गोळी उडाल्यावर बंदुकीचा लाकडी दस्ता बंदूक झाडणार्याच्या खांद्यावर जोरात आदळतो. याला म्हणतात ‘री-कॉईल’. परंतु आता आधुनिक तंत्रज्ञानाने असा पाठीमागे दणका न देणार्या तोफा शोधून काढल्या आहेत. त्यांना ‘री-कॉईललेस गन’ (आर.सी.एल. गन) असे म्हणतात. या आर.सी.एल. तोफा साधारणपणे जीपवर बसवल्या जातात. त्या मात्र भारत आणि पाक दोघांकडेही होत्या.
नॅट विमानांची गंमत
युद्ध सुरू होते वेळी पाकिस्तानकडे ’120 सेबर जेट’, ’30 बी-57 बॉम्बर्स’, ’20 स्टार फायटर्स’ आणि ’12 आर.टी. 33’ अशी एकंदर 182 विमाने होती. यांपैकी सेबर जेट हे अत्याधुनिक विमान म्हणजे ‘आभाळातला हत्ती’ कसे मानले जात होते आणि 1500 यार्डांवर मारा करू शकणार्या त्याच्या तोफा आणि पंखाखाली क्षेपणास्त्रे धारण करण्याची त्याची क्षमता यांनी जगभर एक दहशत निर्माण केलेली होती, हे आपण पूर्वी पाहिलेले आहे.
आता या तुलनेने भारताकडे ’व्हॅम्पायर’, ’मिस्टेअर्स’, ’तुफानी’, ’हंटर्स’, ’नॅट’ आणि ’मिग-21’ अशी विविध प्रकारची एकूण 450 विमाने होती. म्हणजे नुसत्या आकड्यांकडे पाहिले तर भारताकडे पाकच्या दुप्पटीहून अधिक विमाने होती. पण...
एक ’मिग-21’ सोडले तर भारताची ही सगळी विमाने किमान 15 ते 20 वर्षे जुनी होती. पंखांखाली क्षेपणास्त्रे धारण करण्याची क्षमता असलेले एकही विमान भारताकडे नव्हते. ’मिग-21’ हे आधुनिक विमान युद्ध सुरू होण्यापूर्वी नुकतेच भारताला सोव्हिएत रशियाकडून मिळाले होते. त्यामुळे ते लगेच युद्धासाठी वापरणे जरा जोखमीचे होते.
प्रत्यक्षात युद्धामध्ये ’सेबर जेट’ या आभाळातल्या हत्तीला ’नॅट’ किंवा ’फॉलंड नॅट’ हे भारताचे चिमुकले विमान भलतेच भारी ठरले. ’नॅट’ म्हणजे एक प्रकारची माशी. माशीएवढ्या छोट्या आणि फक्त दोन तोफा धारण करू शकणार्या ’नॅट’ विमानाचे सामर्थ्य कशात होते? तर ते त्याच्या चपळपणात, वेगात होते. ’सेबर जेट’ हे पाकिस्तानी आभाळातला हत्ती उड्डाण केल्यापासून एका मिनिटात नऊ हजार फूट उंची गाठत होता; तर ’फॉलंड नॅट’ ही माशी एका मिनिटांत 10 हजार फूट उंची गाठत होती. हा वेग, ही चपळाई हेच ’नॅट’चे सामर्थ्य होते. हे पुढे प्रत्यक्ष लढाईत सिद्ध झाले.
पण ’नॅट’चे हे वैशिष्ट्य त्या भारतीय वायुदल सेनापतीने हेरले. त्याच्या त्या दूरदृष्टीचे कौतुक करायलाच हवे. जसे दख्खनच्या पठारावर उंच आणि तगड्या अरबी घोड्यांपेक्षा मध्यम उंचीची पण अत्यंत चिवट आणि काटक असे भीमथडी तट्टेच जास्त उपयोगी ठरतील; सह्याद्रीच्या दर्याखोर्यांत, अडचणीच्या प्रदेशांत लढण्यासाठी लांबलचक आणि सरळ पात्याच्या तलवारीपेक्षा आखूड आणि वाकड्या पात्याची तलवारच जास्त उपयुक्त ठरेल, हे ज्या द्रष्ट्या सेनापतीने जाणले, त्यांचे नाव शहाजीराजे भोसले.
तसेच पाकिस्तानी वायुदलाकडे कोणती विमाने आहेत आणि त्यांच्याशी लढण्यासाठी आपल्याला आपल्या माफक बजेटमधून काय घेता येईल, हे ज्याने जाणले, त्या सेनापतीचे नाव प्रतापचंद्र लाल.
लालसाहेब पुढे 1971च्या युद्धात भारतीय वायुदलाचे प्रमुख म्हणजे एयर चीफ मार्शल होते. मात्र ’फॉलंड नॅट’ची खरेदी त्यांनी ब्रिटनच्या ’वेस्टलँड एअरक्राफ्ट’ या कंपनीकडून जेव्हा केली, तेव्हा ते एअर कमोडोर या पदावर होते. एखादा वैमानिक जेव्हा भारतीय वायुदलात अधिकारी म्हणून दाखल होतो, तेव्हा त्याला फ्लाईंग ऑफिसर हे पद दिले जाते. म्हणजे वायुदल अधिकार पदाच्या चढत्या भाजणीमध्ये फ्लाईंग ऑफिसर ही सर्वात पहिली पायरी असते. मग फ्लाईट लेफ्टनंट, स्क्वाड्रन लीडर, विंग कमांडर, ग्रुप कॅप्टन, एअर कमोडोर, एअर व्हाईस मार्शल, एअर मार्शल आणि अखेर एअर चीफ मार्शल अशा नऊ पायर्या चढून एखादा अधिकारी सर्वोच्च पदावर पोहोचू शकतो.
तर एअर कमोडोर प्रतापचंद्र लाल हे भारतीय वायुदलाला उपयुक्त अशा विमानांची खरेदी करायला इंग्लंडला गेलेले असताना ’वेस्टलँड एअरक्राफ्ट’ या कंपनीची ’सुपर मरीन स्विफ्ट’ आणि ’फॉलंड नॅट’ अशी दोन विमाने त्यांना पसंत पडली. पण ’वेस्टलँड’ कंपनीचा मालक टेडी पेटर नाराज होता.
क्रमश: