कर्मयोगींचा सन्मान... कृतज्ञतेचा उत्सव

विवेक मराठी    08-May-2026   
Total Views |
Karmayogi Award 2026
वंचितांची सेवा हीच खरी ईश्वरसेवा मानून आदिवासी पाड्यांवर, गावकुसात, खेडोपाडी ज्ञानाचा दीप लावणार्‍या शिक्षकांचा आणि संस्थांचा गौरव म्हणजे ‘कर्मयोगी पुरस्कार 2026’. कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थेच्या वतीने ‘एकल शिक्षक मेळावा 2026’ मध्ये सदर पुरस्कार सोहळा पार पडला. सोहळ्याचा हा वृत्तांत-
‘चलो जलाये दीप वहाँ, जहाँ अभी भी अँधेरा है।’ या संघगीताच्या ओळीतून प्रेरणा घेऊन अनेक संघ कार्यकर्ते तसेच समाजातील सज्जनशक्ती समाजपुरूषाला आपला देव मानून त्याची सेवा करते. असाच सेवाभाव जपणार्‍या कर्मयोगींचा सन्मान गेली दोन वर्षे ’कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्था’ करत आहे. हा सन्मान सोहळा एकल शिक्षक मेळाव्याच्या माध्यमातून मुंबईत होतो. यंदाचा ‘एकल शिक्षक मेळावा 2026’ शनिवार दि. 2 मे 2026 रोजी गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथे पार पडला.
 
 
संवेदना, सहजता आणि सर्वसमावेशकता या त्रिसूत्रींवर ’कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’चे बिजारोपण झाले. विदर्भातील भाजपाच्या पहिल्या फळीतील शिलेदार असलेले लक्ष्मणराव मानकर यांच्या निःस्वार्थी व समर्पित भावनेचे गाढ संस्कार तेथील कार्यकर्त्यांवर झाले होते. म्हणूनच लक्ष्मणरावांच्या निधनानंतर नितीन गडकरी, विलास फडणवीस, मनोहरराव शेंडे, अरविंद शहापूरकर या संघसंस्काराच्या मुशीतून घडलेल्या कार्यकर्त्यांनी लक्ष्मणरावांचे कार्य चिरंतन स्मरणात रहावे या विचाराने 1996साली ’कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’ची स्थापना केली.
 
 
”समाजातील तळागाळातील सोशित, पीडित, वंचित, आजच्या आधुनिक युगातही जे अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गोष्टींसाठीही झगडत आहेत, अशांना ईश्वर मानून त्याची निरंतर सेवा करणे हेच विचारसूत्र पं. दीनदयाळ उपाध्याय यांनी अंत्योदयातून मांडले आहे. गेली तीस वर्षे हेच विचारसूत्र घेऊन आदिवासी वस्तीपाड्यांवरील राहणार्‍या मुलामुलींमधील क्षमता, कर्तृत्व, गुणवत्ता यांना संधी देण्याचे कार्य ‘मानकर ट्रस्ट’च्या वतीने करीत असल्याचे,“ संस्थेचे प्रेरणास्रोत असलेले केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी या कार्यक्रमात सांगितलेे.
 
Karmayogi Award 2026 
 
''संस्थेचे कार्य केवळ विदर्भापुरते सीमित न ठेवता त्याचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असावे यासाठी संस्था प्रयत्नशील आहे,'' असेही ते पुढे म्हणाले. यंदा ठाणे येथील वसुंधरा संजीवनी मंडळ, तसेच यवतमाळ येथील पं. दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान आणि दत्तात्रय बबनराव वारे या शिक्षकांना हा पुरस्कार देण्यात आला. या सर्वांचे कार्यही अंत्योदयाचे आहे.
‘कार्यमग्न हे जीवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती’ या ओळीचा अर्थ कर्मयोगी पुरस्काराचे पहिले सत्कारमूर्तीं असलेल्या ‘वसुंधरा संजीवनी मंडळ’ या संस्थेच्या संस्थापकांचे काम पाहिले तर लक्षात येतो. वसुंधरा संजीवनीचे संस्थापक आनंद भागवतकाका यांचे वय वर्ष केवळ 92 आहे. मनाने चिरतरुण असलेल्या भागवतकाकांची या वयातही समाजातील समस्यांची चिंता आणि त्यावरच्या उपाययोजनेसाठी धडपड चालू असते. मुरबाड आणि शहापूर येथील मोठ्या धरणांच्या सावलीतही स्थानिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो. त्यासाठी जलव्यवस्थापन, जलसंवर्धन यातून जनजागृतीची चळवळ त्यांनी आणि त्यांच्या टीमने वसुंधराच्या माध्यामातून उभी केली आहे.
यवतमाळ येथील ‘दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान, या संस्थेलाही पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पं. दीनदयाळजींच्या अंत्योदय आणि एकात्म मानव दर्शन या संकल्पनांनी प्रेरित होऊन समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित घटकाला शिक्षण, आरोग्य, स्वावलंबन, आणि संस्काराच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जास्रोत घडवीत आहेत. तर काही वेळा आस्मानी संकटाने आत्महत्याग्रस्त कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून आयाबहिणींना भाऊबीजेच्या नात्याने जोडत आहेत. या भगिनीप्रेमातून त्यांना आत्मनिर्भरतेचे धडे देऊन स्वयंसिद्धा करण्याची किमया केली ती सेवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी. आतापर्यंत प्रशिक्षण व मदतीच्या बळावर 449 कुटुंबांना त्यांनी नवजीवन दिले आहे. यवतमाळ येथून सुरू झालेली ही चळवळ आज विदर्भ आणि मराठवाड्यात विस्तारली आहे.
 
उत्तम पिढी घडविण्याचे काम समाजातील कोणता घटक करीत असेल तर तो शिक्षक. कर्मयोगी पुरस्काराची तिसरी सत्कारमूर्ती म्हणजे शिक्षकी पेशात असलेले दत्तात्रेय बबनराव वारे. या शिक्षकाने केवळ शाळा उभारल्या नाहीत, तर शिक्षणाची नवी परिभाषा घडविली. वाभळेवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेत अभिनव उपक्रम आणि शिक्षकांना योग्य प्रशिक्षण देऊन या शाळेला भारतातील ’झिरो एनर्जी स्कूल’ म्हणून आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिली. ही समस्त देशासाठी अभिमानास्पद बाब आहे.
 
 यवतमाळ येथील पं. दीनदयाळ सेवा प्रतिष्ठान
vivek
 
अशा या ‘कर्मयोगी 2026’ पुरस्कार्थींचा सन्मान चाफ्याची परडी, शाल, मानपत्र, सन्मानचिन्ह आणि त्यांच्या स्तुत्य कार्यासाठी दोन लाख रूपयांचा धनादेश ’कै. लक्ष्मणराव मानकर स्मृती संस्थे’च्या वतीने देण्यात आला. त्यांच्या या पुरस्काराने ’गेट वे’च्या समुद्रकिनार्‍याचे खारे वारे मंद सुवासाने आणि सत्कारमूर्तींच्या कार्य ऊर्जेने प्रफुल्लित झाले होते, हे खरे.
या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली. कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री राजेश शिरवाडकर, भाजपातील अनेक नेतेमंडळी - कार्यकर्ते, संघ स्वयंसेवक, सिने अभिनेते सुनील शेट्टी, आणि एकल विद्यालयाचे 1400 शिक्षक उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावरील उपस्थितांनी आपले विचार व्यक्त केले.
 
 
”भारत हा जगातील तरुण देश आहे आणि हीच भारताची ताकद आहे. या युथ पॉप्युलेशनला ’स्किल पॉप्युलेशन’मध्ये कन्व्हर्ट करण्याची आवश्यकता आहे, आणि तेच काम कसोशीने मानकर ट्रस्टचे एकल विद्यालय करीत आहे,” असे विचार महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केले.
 
 
“आदिवासी समाजाची स्वतंत्र ओळख आहे. देव, देश, संस्कृती, अस्मिता, यांचे जतन या समाजाने केले आहे, हा भारताचा गौरवशाली वारसा पुढे नेण्याचे कार्य आदिवासी समाज करीत आहे. आणि या समाजाच्या मूळ स्वरूपाला धक्का न पोहोचविता मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य मानकर ट्रस्ट करीत आहे, ही समाजासाठी परिवर्तनाची नांदी ठरणार आहे,“ असे मत आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी मांडले.
 
 
या कृतज्ञतेच्या उत्सवाला विचारांचे कोंदण घातले गेले ते परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी यांच्या उद्धबोधनाने. ते म्हणाले,“एकांती आत्मसाधना, लोकांती परोपकार हे आपल्या भारताचे जीवनसूत्र आहे, तो आपला भारतीय स्वभाव आहे. या स्वभावाचे खर्‍या अर्थाने जतन, संवर्धन कोण करीत असेल तर आपला जनजाती बांधव. म्हणून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य म्हणजे दया नव्हे, उपकार नव्हे तर ते आपले कर्तव्य आहे, किंबहुना ही सेवा स्वतःला शुद्ध करणारी क्रिया आहे.
 
 
अस्मितेशिवाय अस्तित्व टिकत नाही. व्यक्तीचे स्वत्व, बळ, तेज आणि वैभव हे तिच्या ओळखीचे आधारस्तंभ आहेत. हे स्वत्व जपले आहे ते, आदिवासी समाजाच्या पालांवर-वस्त्यांवर. समाजातील प्रत्येक व्यक्ती ईश्वररूप आहे, या भावनेतून केलेली सेवा खरी साधना आहे. ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही आपली संस्कृती आहे. स्वकल्याणापासून विश्वकल्याणापर्यंत हित साधणारी. तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगायचे तर ‘स्वहिताचा धंदा आपण करीत रहावे.”’
“विकासाच्या प्रवासाच्या गतीमुळे जे आपले मूळ(भारतीयत्व) सुटले आहे, ते जनजाती समाजातून घ्यावे आणि त्या समाजातील बांधवांना विकासाच्या प्रवाहात हातात हात घेऊन सोबतीने पुढे आणावे, असा उभयपक्षी संबंध वाढवून हे वर्तुळ पूर्ण करावे. हे केले तरच आजच्या असंतुलित जगाला आधार देण्याची क्षमता एकमात्र भारत देशात निर्माण होईल,” हा विश्वास सरसंघचालकांनी या प्रसंगी व्यक्त केला आणि ’मानकर ट्रस्ट याच दिशेने मार्गक्रमण करीत आहे’, असेही आवर्जून नमूद केले.
 
 
या कार्यक्रमास व्यासपीठावर पररपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्यसभा खासदार मायाताई इवनाते, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘कै. लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट’चे अध्यक्ष अतुल शिरोडकर यांनी केले. आभार प्रदर्शन मिलिंद कानडे यांनी केले. वैयक्तिक गीत अमर कुलकर्णी यांनी सादर केले. तर कार्यक्रमाचे आखीवरेखीव व नेटके सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने करण्यात आली.

पूनम पवार

 सा. विवेकमध्ये उपसंपादक कार्यरत आणि विवेक व्यासपीठ अंतगर्त खास महिलांसाठी विवेकज्योती या उपक्रमाची जबाबदारी. रुईया कॉलेज मुंबई येथून (राज्याशात्र / मराठी साहित्य) पदवीधर. महिला आणि समाजातील विविध विषयांवरील लिखाणाची आवड.