भारतीय जनता पार्टीचा विचार करता सत्तेवर असलेला हा पक्ष कोणताही प्रादेशिक पक्ष पूर्णपणे संपविणार नाही. तो जिवंत राहणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक आहे. संसदीय लोकशाहीत विरोधाची पोकळी निर्माण करून चालत नाही. ज्या पक्षाला नियंत्रणात ठेवता येईल असा विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला आवश्यकच असतो. संसदीय राजनितीचा हा सिद्धांत आहे. पक्षफुटीच्या या रणधुमाळीत या नीतीचे पालन भाजपा करीत आहे, हे समजणे फार आवश्यक आहे.
तृणमूूल काँग्रेस फुटली आहे. विधानसभेत ऋतब्रत बॅनर्जी यांच्याबरोबर 58 (काही जणांनी हा आकडा 60 असा दिला आहे) आमदारांनी अशी घोषणा केली की, आम्हीच तृणमूल काँग्रेस आहोत, ममता बॅनर्जी आमच्या मार्गदर्शक आहेत (म्हणजे नेत्या नाहीत.) ही झाली राजकीय भाषा. पक्षातून फुटून तर निघायचे आहे, परंतु फुटीर गट नसून आम्हीच खरा पक्ष आहोत, असे सांगायचे. महाराष्ट्राने याचा अनुभव घेतला आहे.
प्रादेशिक पक्षात अशी फूट झाली की, ज्यांना राजकीय घडामोडीचे अर्धवट ज्ञान असते असे पत्रकार आणि विश्लेषक याचे खापर भाजपाच्या डोक्यावर फोडतात. भाजपा प्रादेशिक पक्षांस संपविण्यास निघाला आहे, असली बेअकली वटवट सुरू करतात. अशी वटवट ऐकायची नसेल आणि ज्यांना काही सुधारणा करून घ्यायची असेल त्यांनी स्वातंत्र्यानंतरच्या भारताच्या राजकीय पक्षांच्या वाटचालीचा इतिहास अभ्यासला पाहिजे. राजकीय पक्षातील फूट हा भारतीय राजकारणाला नवीन विषय नाही. सुरुवात आपण प्रजा समाजवादी पक्षापासून करू. स्वातंत्र्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना झाली. या पक्षात जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, अशोक मेहता, आचार्य जे.बी. कृपलानी, मधु लिमये, डॉ. राममनोहर लोहिया इत्यादी त्या काळातील पहिल्या श्रेणीचे राजकीय नेते होते. पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत या पक्षाने देशभर उमेदवार उभे केले. हे सर्व राजकीय नेते तत्त्वनिष्ठ राजकीय भ्रष्टाचारापासून मुक्त जीवनमूल्यांना प्राधान्य देणारे नेते होते. त्यांची बरोबरी करील असा नेता आजच्या विरोधी दलात सापडणे दुर्मीळ आहे.
स्वातंत्र्यानंतर प्रजा समाजवादी पक्षाची स्थापना झाली. या पक्षात जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, अशोक मेहता, आचार्य जे.बी. कृपलानी, मधु लिमये, डॉ. राममनोहर लोहिया इत्यादी त्या काळातील पहिल्या श्रेणीचे राजकीय नेते होते.
काँग्रेस पक्षाने 1955 ‘आवडी अधिवेशनात‘ समाजवादी समाजरचनेचा ठराव केला. केंद्रात काँग्रेसचीच सत्ता होती. त्यामुळे सत्तेच्या माध्यमातून समाजवादी धोरणे अमलात आणली जातील, असा त्याचा अर्थ झाला. प्रजा समाजवादी पक्षाला लक्षणीय असे राजकीय यश मिळाले नाही. पक्षामध्ये वैचारिक मतभेद वाढत गेले. नेत्यांचा एक गट असा तयार झाला की, ज्याने काँग्रेसशी सहकार्य केले पाहिजे, असे म्हणणे सुरू केले. दुसरा गट असा झाला की, काँग्रेस हा भांडवलशाही आणि जमीनदारांची बाजू घेणारा पक्ष आहे, तो मजूर आणि शेतकर्यांच्या विरोधी आहे, म्हणून काँग्रेसशी सहकार्य करू नये.
या मुद्द्यांवरून प्रजा समाजवादी पक्षात घमासान वैचारिक युद्ध सुरू झाले. विरोधी गटाचे नेतृत्व डॉ. राममनोहर लोहिया यांनी केली. जॉर्ज फर्नांडिस, मधु लिमये यांनी त्यांना साथ दिली. यथावकाश पक्ष फुटला आणि समाजवादी पक्ष (अखिलेशच्या समाजवादी पक्षाशी याचा काहीही संबंध नाही) निर्माण झाला. यानंतर समाजवादी पक्षात किंवा समाजवादी राजकीय चळवळीत इतकी फाटाफूट झाली की, कोण कोठे आहे, हे समजणेदेखील अवघड झाले. समाजवादी पक्षाचा पुढे संयुक्त समाजवादी पक्ष झाला. आणीबाणीपर्यंत हा पक्षफुटीचा प्रवास आणि पुन्हा एकत्र येण्याचा प्रवास सुरू राहिला.
त्या काळी ‘जनसंघ’ (आजच्या भारतीय जनता पार्टीचे पूर्वीचे नाव) होता. तेव्हा कोणत्याही पत्रकाराने किंवा राजकीय विश्लेषकाने समाजवादी फाटाफुटीस जनसंघ जबाबदार आहे, असे मूर्खपणाचे विधान केले नाही. त्यावेळच्या पत्रकारांची आणि राजकीय विश्लेषकांची उंची फार मोठी होती.

यानंतर आपण काँग्रेस पक्षाकडे येऊया. लालबहादूर शास्त्री यांच्या अकाली निधनानंतर श्रीमती इंदिरा गांधी पंतप्रधान झाल्या. काँग्रेसचे तेव्हा अध्यक्ष होते, कामराज नाडर. श्रीमती इंदिरा गांधींना पंतप्रधानपदी बसविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. इंदिरा गांधी स्वतंत्र वृत्तीच्या आणि प्रचंड कार्यशक्तीच्या नेत्या होत्या. सत्तेच्या राजकीय डावपेचात त्या अतिशय तज्ज्ञ होत्या. त्यांनी पक्षातील जुन्या पिढीतील कामराज, मोरारजी देसाई, निजलिंगप्पा अशा दिग्गज नेत्यांविरूद्ध संघर्ष सुरू केला. त्याचा परिणाम 1967साली काँग्रेसफुटीत झाला. जुन्या नेत्यांच्या काँग्रेसला नाव पडले ’सिडिंकेट काँग्रेस’आणि श्रीमती इंदिरा गांधी यांच्याबरोबर असणार्या नेत्यांना आणि त्यांच्या पक्षाला नाव पडले, ’इंदिरा काँग्रेस’. राजकीय पक्षाची शक्ती उमेदवार निवडून आणण्यात असते. संघटन काँग्रेसला म्हणजे सिंडिकेट काँग्रेसला दारूण अपयश आले. जनता इंदिरा गांधीच्या मागे उभी राहिली. काँग्रेसमधील ही सर्वात मोठी फूट आहे.
तेव्हाही जनसंघ होता. जनसंघाच्या डावपेचामुळे ही फूट पडली असे बावळट विधान तेव्हा कोणी केले नाही. या फुटीला कारण इंदिरा गांधींची अनिर्बंध सत्तालालसा आणि ती पूर्ण करण्यासाठी स्वपक्षातील ज्येष्ठ नेत्यांना राजकीयदृष्ट्या हतबल करण्याची रणनीती आहे.
यानंतर आपण भारतीय कम्युनिस्ट पक्षाकडे येऊ. 1964साली हा पक्ष फुटला. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (मार्क्सवादी - माकपा) आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी (भाकपा) असे दोन पक्ष झाले. प्रजा समाजवादी पक्षाप्रमाणे भारतीय कम्युनिस्ट पार्टी ही देशातील अतिशय महत्त्वाची पार्टी होती. मार्क्सच्या विचारसरणीवर आधारित या पार्टीची स्थापना झाली. 1920 आणि 1925 अशी दोन वर्षे पार्टी स्थापनेची वर्षे सांगितली जातात. (पार्टीच्या लोकांतच स्थापनेविषयी मतभेद आहे) मार्क्सच्या विचारसरणीवर आधारित 1917 साली रशियात साम्यवादी क्रांती झाली. या क्रांतीचा जगभर प्रचंड परिणाम झाला. बुद्धिमान तरुण मार्क्सच्या विचारांकडे ओढले गेले. समाजातील दैन्य, दुःख, दारिद्रय समाप्त करण्याचा साम्यवाद हा एकच मार्ग आहे, असे त्यांना प्रामाणिकपणे वाटले.
कम्युनिस्ट चळवळीतील नेते चारित्र्यसंपन्न होते. त्यांची राहणी अत्यंत साधी असे. सत्तास्थानी येऊनही त्यांनी कधी स्वत:चे घर भरण्याचा कार्यक्रम केला नाही. विचारांच्या बाबतीत ते फार कडवे रााहिले. वैचारिक कडवेपणामुळे पक्षात शिस्त राहिली; परंतु त्याचवेळी कडवेपणातही मतभेद निर्माण होत गेले. चीनने रशियाच्या कम्युनिस्ट पक्षाची साथ सोडली. 1962 साली भारतावर आक्रमण केले. कम्युनिस्ट पक्षातील एक गट असा निघाला, ज्याने चिनी फौजांचे ’मुक्तिसेना’ म्हणून स्वागत केले. पक्षातील एक गट रशियाधार्जिणा राहिला.
रशियाचे धोरण श्रीमती इंदिरा गांधींच्या समर्थनाचे होते. कम्युनिस्ट पक्षाचे डोके नेहमीच मॉस्कोमध्ये राहिले. मॉस्को सांगेल तसे करायचे. त्यामुळे इंदिरा गांधींना पाठिंबा देणारा एक गट तयार झाला. चीनचे समर्थन करणारा दुसरा गट तयार झाला आणि पक्षात फूट पडली. 1964 साली पक्षात फूट असताना इंदिरा गांधींचा विषय नव्हता, तो नंतर आलेला आहे. लोकशाही पद्धतीत काम करून समाजवादी क्रांती शक्य आहे असे मानणारा गट तयार झाला आणि हिंसक मार्गानेच क्रांती केली पाहिजे असे मानणारा दुसरा गट तयार झाला. त्यातून नक्षलवादी चळवळ सुरू झाली. भारतात लोकशाही मार्गाने केरळमध्ये प्रथमच कम्युनिस्ट पक्षाचे सरकार आले. नबुंद्रीपाद मुख्यमंत्री झाले, एवढा प्रभाव या पक्षाचा होता.
फाटाफुटीनंतर मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी बंगालमध्ये सत्तेवर आली. ज्योती बसूंचे शासन तीस वर्षांहून अधिक काळ बंगालमध्ये राहिले. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस स्थापन करून बंगालमधून कम्युनिस्टांची सत्ता संपवून टाकली. कम्युनिस्ट पक्षाच्या फाटाफुटीचा इतिहास हा एका पक्षाचे दोन तुकडे एवढ्यापुरताच मर्यादित राहत नाही, नंतरही त्यात फाटाफूट होत गेली आहे. या फाटाफुटीला जनसंघ जबाबदार आहे, असे माझ्यातरी वाचनात नाही.
पक्षाच्या फाटाफुटीचा इतिहास तसा खूप मोठा आहे. प्रादेशिक पक्ष फुटले. पंजाबमधील अकाली दल फुटले. महाराष्ट्रातील शेकापा संपला. रिपब्लिकन पक्षाचे किती तुकडे झाले ते मोजता येणार नाहीत. काँग्रेस पक्षातून ’केरळ काँग्रेस’, ’ओरिसा काँग्रेस’, ’तृणमूल काँग्रेस’, शरद पवारांची ’समाजवादी काँग्रेस’ असे अनेक प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. आणीबाणीच्या काळात जनता पक्ष निर्माण झाला. हा पक्ष 1977 साली केंद्रात सत्तेवर आला. नंतर अडीच वर्षांत हा पक्ष फुटला. पक्षातील जनसंघीय बाहेर पडले आणि 1980 साली त्यांनी भारतीय जनता पक्षाची स्थापना केली. भारतीय जनता पक्षामुळे पक्ष फुटला असे जर कुणी विधान केले तर बावळटपणाचा पुरस्कार त्याला देण्यास काही हरकत नाही.
पक्षफुटीचा इतिहास काही कारणे अधोरेखित करते. ती अशी- 1) आत्यंतिक सत्ताकांक्षा, 2) वैचारिक मतभेद, 3) सत्तेच्या लाभापासून वंचित राहण्याची भीती, ही तीन कारणे पक्षफुटीची ठरतात. ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस फुटली, याचे कारण हा पक्ष एक व्यक्तिकेंद्री आणि सत्ताकांक्षी केंद्रावर उभा राहिला. सत्तेची महत्त्वाकांक्षा असणारे अनुकूल संधीची वाट बघत राहिले. 4 मेनंतर ती संधी त्यांना मिळाली, परिणाम आपल्या समोर आहेत.
एकेकाळी मुख्य धारेतील पक्ष वैचारिक मतभेदामुळे फुटले. तृणमूल काँग्रेसकडे कोणताही विचार नाही. ममता बॅनर्जी या आंदोलन उत्तम करू शकतात, लोकभावना चेतवू शकतात, पण त्यांच्याकडे कोणतेही राजकीय तत्त्वज्ञान नाही. सत्तेचा आणि संपत्तीचा लाभ घेण्यासाठी त्यांच्या भोवती लोक गोळा झाले. त्यांचे चेहरे आपण रोज पाहिलेले आहेत. पक्षाकडे विचार नसेल तर सत्ता जाताच पक्ष फुटतो. कारण पक्षात कशासाठी राहायचे? सत्ता नाही, पैसा नाही, प्रतिष्ठा नाही, म्हणून नेते आणि कार्यकर्ते पक्षाला रामराम ठोकतात. या संदर्भात भारतीय जनता पक्षाचे वेगळेपण ठसठशीतपणे समोर येते. प्रदीर्घ काळ हा पक्ष सत्तेच्या जवळही नव्हता, पण पक्ष कधी फुटला नाही. वैचारिक बांधिलकी इतकी प्रबळ आहे की, सत्ता मिळो अथवा न मिळो पक्षाचे काम करतच राहायचे, अशी कठोर साधना पक्ष कार्यकर्ते करीत राहिले.
भारतीय जनता पार्टीचा विचार करता सत्तेवर असलेला हा पक्ष कोणताही प्रादेशिक पक्ष पूर्णपणे संपविणार नाही. तो जिवंत राहणे त्यांच्या दृष्टीने आवश्यक आहे. संसदीय लोकशाहीत विरोधाची पोकळी निर्माण करून चालत नाही. ज्या पक्षाला नियंत्रणात ठेवता येईल असा विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला आवश्यकच असतो. संसदीय राजनितीचा हा सिद्धांत आहे. पक्षफुटीच्या या रणधुमाळीत या नीतीचे पालन भाजपा करीत आहे, हे समजणे फार आवश्यक आहे.