लोकशाही धोक्यात की..

विवेक मराठी    17-Jun-2026   
Total Views |
"Eknath Shinde's Operation Tiger: Successfully Accomplished"
.

Operation Tiger
उबाठात राहिलात की भविष्यात तुम्हाला काय प्राप्त होईल असे निश्चित उत्तर काय आहे, त्याचे प्रामाणिक उत्तर ‘शून्य’ आहे. सत्तेच्या राजकारणातील खेळाडूंना ते लवकर समजत आणि ज्यांना समजले ते शिंदे सेनेत गेले, हीदेखील एक स्वाभाविक प्रक्रिया आहे. ती न समजून घेता लोकशाही धोक्यात आली, संविधान धोक्यात आले, असली अर्थहिन वटवट एकतर करू नये आणि करायचीच असेल तर वटवट करण्यापूर्वी लोकशाही म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, याचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे.
सध्या बातम्यांत ऑपरेशन टायगरची  Operation Tiger चर्चा फार चालू होती. उद्धव सेनेतून ठाकरे सेनेत खासदार जाणार अशी प्रथम चर्चा होती आणि चर्चेचा शेवट उद्धव सेनेतून सहा खासदार शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. म्हटले तर बातमी सनसनाटी आहे आणि म्हटले तर बातमीत सनसनाटीपणा काहीच नाही. याचे कारण असे की, हे होणार ही काळ्या दगडावरची रेघ होती. ती का, एवढेच फक्त समजून घ्यायचे आहे.
 
 
पक्षातून अशी फाटाफूट झाली की, नाना पटोले, संजय राऊत, पवार घराण्यातील उगवते तारे, हे बोलू लागतात की, भाजपा लोकशाही संपवत चालला आहे, विरोधी पक्षांना संपविण्याचे राजकारण भाजपा करीत आहे. संविधान धोक्यात येत चालले आहे. लोकशाही वाचविली पाहिजे. संविधान टिकविले पाहिजे, वगैरे...वगैरे...वगैरे. कुणी सुळे, कुणी अंधारे मग प्रकाश पाडू लागतात की, हे अत्यंत धोकादायक राजकारण आहे. खरोखर असेच आहे का?
 
 
ममताच्या तृणमूल काँग्रेसमधून खासदार गेले. उद्धव सेनेतून खासदार गेले, यात लोकशाही कशी धोक्यात आली? लोकशाही म्हणजे लोकांनी, लोकांकरवी, लोकांसाठी चालविलेले राज्य. खासदार हे लोकप्रतिनिधी आहेत. त्यांना असे वाटले की, आता तृणमूल काँग्रेसमध्ये राहून किंवा उबाठामध्ये राहून काहीही उपयोग नाही. लोकांसाठी लोकशाही राज्य चालवायचे असेल तर लोकांनी ज्यांना पूर्ण नाकारले आहे, त्या नेत्यांबरोबर राहून काही लोकशाही वाचणार नाही.
 
 
म्हणून या सर्वांचा पक्ष सोडण्याचा निर्णय हा लोकशाही समृद्ध करणाराच निर्णय आहे. लोकभावनांची ज्यांना काहीही कदर नाही आणि जे आपल्या घमेंडीत चोवीस तास जगतात, त्या नेत्यांना ममता बॅनर्जी आणि उद्धव ठाकरे असे म्हणतात. आपल्या पक्षातील खासदारांनी किंवा आमदारांनी पक्ष सोडू नये, असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनी त्यासाठी आवश्यक ती कोणतीही मेहनत घेतली नाही. पक्ष उभा करताना तो विचाराच्या आधाराने उभा करावा लागतो. गुंडशाही, झुंडशाही, वसुलीशाही, शिव्यांची शाही, अभद्रवाणी ही पक्षाची विचारसरणी होऊ शकत नाही. याचा बंगाली चेहरा अभिषेक बॅनर्जी आहे आणि महाराष्ट्रातील चेहरा संजय राऊत आणि सुषमा अंधारे आहेत. ज्या पक्षात असे नेते आहेत, त्या पक्षात खासदार आणि आमदार टिकले तर ते मोठे राजकीय आश्चर्यच मानले पाहिजे.
 
 
व्यक्ती राजकारणात का भाग घेते? हा एक मूलभूत प्रश्न आहे. राजकारणात भाग घेण्याची अनेक कारणे आहेत. त्यातील दोन-तीन महत्त्वाची कारणे अशी - राजकारणाच्या माध्यमातून उत्तम जनसेवा करता येईल आणि लोकहिताचे परिवर्तन घडवून आणता येईल, असे प्रामाणिकपणेे वाटणारा एक वर्ग असतो. दुसरा वर्ग असा असतो की, ज्याला असे वाटते की, विचारधारा जर बलवान झाली तर केवळ पक्षच बलवान होणार नाही तर आपला देशही सामर्थ्यसंपन्न होईल आणि जगावर चांगल्या प्रकारचे प्रभुत्व आपण निर्माण करू शकू. राजकारण्यांचा तिसरा वर्ग असा आहे की, सत्तेमुळे होणारे लाभ खूप आकर्षित करतात. गाडी, घर, बंगला, आणि विविध मार्गाने येणारा अमाप पैसा याचे आकर्षण वाटणारा खूप मोठा वर्ग आहे.
 
 
या तिसर्‍या प्रकारात बसणारे राजकारणी स्वतःचे हित सोडून अन्य काहीही करीत नाही, त्यांची संख्याही भरपूर आहे. पहिल्या दोन प्रकारातील राजकारणी प्रामाणिकपणे राजकारण करणारे आहेत. अशांची मोट पक्षात बांधावी लागते. ते काम पक्ष नेतृत्वाचे असते. नेतेच जर स्वार्थांध झाले, अल्पबुद्धीचे झाले, दीर्घदृष्टीचा अभाव असणारे झाले तर अशी मंडळी पक्षात टिकणे अशक्य आहे. दुय्यम दर्जाच्या नेतृत्वाखाली प्रतिभावान, निष्ठावान, लोक फार काळ राहू शकत नाहीत. हा संघटनशास्त्राचा नियम आहे. हा नियम आताच्या प्रादेशिक पक्षफुटीला कारण झालेला आहे.
 
 
राजकारण करताना महत्त्वाकांक्षा बाळगावी लागते. महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय राजकारणी होता येत नाही. आमदार, खासदार, होऊन सत्ता हस्तगत करणे, मिंंत्रपद प्राप्त करणे, या महत्त्वाकांक्षा असल्याशिवाय राजकारणात यश प्राप्त करणे अशक्य आहे. आणि जेव्हा पक्षनेतृत्व अशी परिस्थितती निर्माण करते की, जर तुम्ही पक्षात राहिलात तर राजकारणातील प्रगतीचे सर्व द्वारे तुमच्यासाठी बंद होत जातील. उबाठात राहून काय मिळणार आहे किंवा हाच प्रश्न असा विचारूया की, उबाठात राहिलात की भविष्यात तुम्हाला हे प्राप्त होईल असे निश्चित उत्तर काय आहे, त्याचे प्रामाणिक उत्तर ‘शून्य’ आहे. सत्तेच्या राजकारणातील खेळाडूंना ते लवकर समजत आणि ज्यांना समजले ते शिंदे सेनेत गेले, हीदेखील एक स्वाभाविक प्रक्रिया आहे.
 
 
ती न समजून घेता लोकशाही धोक्यात आली, संविधान धोक्यात आले, असली अर्थहिन वटवट एकतर करू नये आणि करायचीच असेल तर वटवट करण्यापूर्वी लोकशाही म्हणजे काय, संविधान म्हणजे काय, याचे ज्ञान प्राप्त करून घ्यावे. या ज्ञानातून लोकशाही बळकट करण्यासाठी स्वपक्षात काय करता येईल याचे स्वभान आणि संविधान याबाबतीत नेमकी कोणती दिशा देते, हेदेखील समजेल. या पक्षफुटीमुळे लोकशाही धोक्यात न येता पक्षनेतृत्व धोक्यात आले आहे, हे ध्यानात ठेवावे.
 

रमेश पतंगे

रमेश पतंगे हे ज्येष्ठ विचारवंत, लेखक म्हणून प्रसिध्द आहेत. वैचारिक वाङ्मयात भर घालणारी अनेक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत.  साप्ताहिक विवेकचे संपादक म्हणून प्रदीर्घ काळ त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे ते अध्यक्ष आहेत. तसेच सामाजिक समरसता मंच, भटकेविमुक्त विकास परिषद, समरसता साहित्य परिषद या सामाजिक संस्थांचे ते संस्थापक आहेत. पांचजन्य नचिकेता पुरस्कारासह अनेक सन्माननीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.