@उत्तरा मोने
सुमित भोसले हे केवळ यशस्वी उद्योजक नाहीत, तर अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी दाखवून दिलं की, योग्य नियोजन, मेहनत आणि शिकण्याची तयारी असेल तर कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. ‘कॅलिफोर्निया 30 फार्म’ आणि शेळीपालन शाळा या त्यांच्या उपक्रमांमुळे अनेकांना रोजगार आणि नवी दिशा मिळत आहे. म्हणूनच ‘भौतिकशास्त्र’ ते ‘शेळीशास्त्र’ हा सुमित भोसले यांचा प्रवास यशस्वी झाला.
आजच्या काळात अनेक तरुण पारंपरिक नोकरीच्या चौकटीबाहेर पडून स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचा धाडसी निर्णय घेत आहेत. शेती आणि पशुपालनासारख्या क्षेत्रांकडेही आता नव्या दृष्टीनं पाहिलं जात आहे. अशाच बदलत्या विचारसरणीचं जिवंत उदाहरण म्हणजे सुमित भोसले. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या या तरुणानं आज ‘कॅलिफोर्निया 30 फार्म’ या नावानं शेळीपालन क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सुमित यांचा प्रवास सरळ नव्हता, पण खूप शिकवणारा होता. भौतिकशास्त्र विषय घेऊन रुईया महाविद्यालयातून पदवी घेतल्यावर त्यांनी ऑडिओ इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा घेतला. त्यानंतर जवळ जवळ सात ते साडेसात वर्ष त्यांनी रेकॉर्डिंग इंजिनिअर म्हणून षीशशश्ररपलश काम केलं. मुंबईतील एका नामवंत कंपनीत झीळपलळरिश्र लेीीशीिेपवशपीं म्हणून चांगल्या पगाराची नोकरी केली. या कामाच्या निमित्तानं देश विदेशातले दौरे केले. चांगली स्थिरता असूनही त्यांना काहीतरी वेगळं करण्याची इच्छा सतत मनात होती. ऑफिसमधल्या ठरावीक वेळा, एकसुरी काम आणि मर्यादित वाढ यामुळे ते समाधानी नव्हते. त्यांना स्वतःचा व्यवसाय उभारायचा होता.
सुमितचे वडील आणि सासरे यांची काही व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती. गावाकडे तळवडेमध्ये जमीन आणि आंब्याची बाग होती. पण कोणीही गावांत स्थायिक नसल्यामुळे ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत होतं. अशातच आपण व्यवसाय उभा करावा, असं सुमितच्या मनात होतंच. असा व्यवसाय ज्यात स्वातंत्र्य असेल, निसर्गाशी नातं असेल आणि काहीतरी अर्थपूर्ण करता येईल. यासाठी त्यांनी कोकणची निवड केली. कोकण म्हटल्यावर भातशेती, आंबा, काजू, नारळ, कोकम याचं उत्पादनच घेतलं जातं. कुक्कुटपालन, डेरी यांसारखे जोडधंदे केले जातात; पण मूळ भौतिकशास्त्राचं शिक्षण घेतलेल्या सुमितनं मात्र शेळीशास्त्राकडे वळायचं ठरवलं.
मात्र केवळ आवड म्हणून व्यवसाय सुरू करायचा नाही, तर पूर्ण तयारीनिशी करायचा, हे त्यांनी ठरवलं. त्यामुळे पहिलं प्रशिक्षण मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालय इथे घेतलं आणि कालांतराने ’नॅशनल शेळी रिसर्च सेंटर’ या उत्तरप्रदेश येथील संस्थेमध्ये जाऊन सखोल प्रशिक्षण घेतलं. या प्रशिक्षणात त्यांनी शेळ्यांची निवड, त्यांचं संगोपन, आरोग्य व्यवस्थापन, प्रजनन, खाद्य नियोजन आणि बाजारपेठेची समज अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टी आत्मसात केल्या. हे प्रशिक्षण त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा ठरला. इथून त्यांना केवळ ज्ञानच नाही, तर आत्मविश्वासही मिळाला.
प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी व्यवसायासाठी योग्य जागेचा शोध घेतला आणि कोकणात तळवडे येथे जमीन विकत घेतली. सुरुवातीला त्यांनी मोठा धोका न घेता छोट्या प्रमाणात काम सुरू केलं. सुरुवातीला म्हणजे 2012मध्ये फक्त 10 शेळ्या आणि एक बोकड घेऊन सुरुवात केली. 100 स्क्वेअर फूटचं छोटीशी शेड बांधली. सुरुवातीला स्थानिक शेळ्यांपासून सुरुवात केली, ज्यामध्ये वजन वाढ अपेक्षेप्रमाणे आणि व्यवसायला पूरक नव्हती, म्हणून राजस्थानहून मोठ्या अंग बांध्याच्या शेळ्या आणल्या आणि त्यावर अभ्यास सुरू केला. मग पुढे या जागेत त्यांनी फार्म तयार केलं. 5020 फूटच्या 5000 स्क्वेअर फूटच्या दोन शेड बांधल्या. या शेडमध्ये 850 ते 900 शेळ्या राहू शकतील एवढी जागा तयार केली. त्यांनी हळूहळू आपली एक व्यवस्था उभी केली. प्रत्येक टप्प्यावर त्यांनी निरीक्षण, अनुभव आणि सुधारणा यावर भर दिला. शेड उभारणं, स्वच्छता राखणं, पाण्याची आणि खाद्याची व्यवस्था करणं या सगळ्या गोष्टी त्यांनी नियोजनबद्ध पद्धतीनं केल्या.
त्यांनी आपल्या फार्मचं नाव ’कॅलिफोर्निया 30 फार्म’ असं ठेवलं. नाव जरी आधुनिक असलं तरी त्यामागचा विचारही तितकाच आधुनिक होता. त्यांनी पारंपरिक शेळीपालनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. शास्त्रीय पद्धतीनं शेळ्यांचं व्यवस्थापन, योग्य जातींची निवड आणि उत्पादनक्षमतेवर लक्ष केंद्रित करून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला. ’कोकणचा ’कॅलिफोर्निया’ झाला पाहिजे’असं अनेक वर्ष कोकणवासियांचं स्वप्न आहे. एकापरीनं सुमितसारख्या तरुणानं ते करून दाखवलं. म्हणजे एका बाजूला कोकणात ज्यांची जमीन आहे, असे तरुण कोकणातून शहराकडे वळतायत आणि सुमितसारखा तरुण शहरातील सुखासीन जीवन सोडून कोकणाकडे वळताना दिसतो आहे.
मुळात सुमित यांचा जन्म मुंबईचा असल्यामुळे ग्रामीण भागाची सवय नव्हती. एखादं झाड लावण्याव्यतिरिक्त शेती काय ते माहीतच नव्हतं. त्यामुळे त्यांच्यासाठी प्राणी सांभाळणं हा तर एकदम नवखाच विषय होता. एक लाखाच्या भांडवलापासून त्यांनी सुरुवात केली. 2014ला सावंतवाडीला जाऊन राहिल्यावर खरं काम सुरू झालं. सुरुवातीला बंदिस्त शेळीपालन केल्यामुळे शेळ्यांचं वजन काही वाढेना. त्यामुळे जन्माला येणार्या पिलांचंही वजन कमीच होतं. मग अभ्यास करून राजस्थानातील शिरोई जातीच्या शेळ्या आणल्या. त्यांची वाढ उत्तम होऊ लागली. त्यांना लागणारा चारा त्यांच्या शेतातच पिकवला जाऊ लागला. असे अनेक प्रयोग करून ’भौतिकशास्त्र’ ते ’शेळीशास्त्र’ हा प्रवास यशस्वी झाला.
सुमित यांच्या यशाची चर्चा वाढू लागल्यावर अनेक लोक त्यांच्याकडे शिकण्यासाठी येऊ लागले. याच मागणीतून त्यांनी शेळीपालन शाळा सुरू केली. ही शाळा त्यांनी काही वर्षांपूर्वी सुरू केली असून येथे नवोदितांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिलं जातं. पुस्तकातलं ज्ञान आणि प्रत्यक्ष अनुभव यामधला फरक त्यांनी ओळखला होता, त्यामुळे त्यांच्या शाळेत प्रत्यक्ष फार्मवर काम करत शिकण्याची संधी दिली जाते. आज या शाळेमुळे अनेक तरुण आणि शेतकरी स्वत:चा व्यवसाय सुरू करत आहेत.
सुमित यांनी व्यवसाय सुरू करताना अत्यंत स्पष्ट नियोजन केलं होतं. किती गुंतवणूक करायची, किती उत्पादन अपेक्षित आहे, बाजारपेठ कुठे आहे, जोखीम काय आहे या सगळ्यांचा त्यांनी बारकाईनं विचार केला. त्यांनी नेहमीच हळूहळू पण स्थिर वाढ या तत्त्वावर काम केलं. त्यामुळे व्यवसायात अनावश्यक धोके टाळता आले आणि टिकाऊ प्रगती साधता आली.
अभियांत्रिकी शिक्षणाचा त्यांनी आपल्या व्यवसायात उत्तम वापर केला. शेडची रचना, वायुवीजन व्यवस्था, पाण्याचा योग्य वापर, तसेच काही प्रक्रिया सुलभ करण्यासाठी त्यांनी तांत्रिक उपायांचा वापर केला. त्यामुळे त्यांच्या फार्मची कार्यक्षमता वाढली आणि खर्चावर नियंत्रण ठेवता आलं. डेटा आणि निरीक्षणाच्या आधारे त्यांनी उत्पादन सुधारण्यावर भर दिला.
आज त्यांच्या व्यवसायाला 15 वर्षं पूर्ण झाली आहेत आणि व्यवसाय सातत्यानं विस्तारत आहे. सध्या ते शेळीपालनाबरोबरच प्रशिक्षण, कन्सल्टन्सी आणि नवीन उद्योजकांना मार्गदर्शन या क्षेत्रातही सक्रिय आहेत. त्यांच्या फार्मवर विविध प्रकल्प सुरू आहेत, ज्यामध्ये आधुनिक शेळीपालन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
व्यवसायात यश मिळवताना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याचाही मोठा वाटा आहे. त्यांच्या पत्नीनं आणि कुटुंबीयांनी त्यांना प्रत्येक टप्प्यावर साथ दिली. पत्नी अक्षया यांनीही मुंबईतून वकिलीचं शिक्षण पूर्ण केलं. सावंतवाडी येथील एका लॉ कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून काम केल्यानंतर पत्नी अक्षया सध्या मुंबईतील एका नामांकित विधी महाविद्यालयात प्राचार्य म्हणून जबाबदारी सांभाळत आहे. त्यांच्या पत्नीनं फार्मच्याही कामात सक्रिय सहभाग घेतला होता, ज्यामुळे सुरुवातीला कामाची जबाबदारी वाटून घेणं सोपं झालं. अर्थात सुरुवातीच्या काळात आर्थिक अनिश्चितता आणि अनेक अडचणी होत्या, पण कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे त्यांनी हार मानली नाही.
आज सुमित भोसले हे केवळ यशस्वी उद्योजक नाहीत, तर अनेकांसाठी प्रेरणास्थान आहेत. त्यांनी दाखवून दिलं की, योग्य नियोजन, मेहनत आणि शिकण्याची तयारी असेल तर कोणताही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. ’कॅलिफोर्निया 30 फार्म’ आणि शेळीपालन शाळा या त्यांच्या उपक्रमांमुळे अनेकांना रोजगार आणि नवी दिशा मिळत आहे.
शेळीपालनासोबत प्रकल्पात हंगामाप्रमाणे झेंडू, कलिंगड आणि स्थानिक भाजीपाला याची व्यावसायिक शेती केली जाते. त्याचबरोबर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आंब्याच्या बागेत ही सुधारणा करून आधीपासून असलेल्या हापूस आंब्याच्या झाडांसोबत पायरी, गोवा मानकूर अशा स्थानिक आंब्याची लागवड आणि विक्री केली जाते.
त्यांची ही कहाणी ग्रामीण भागातील तरुणांसाठी विशेष प्रेरणादायी आहे. शेती आणि पशुपालन हे केवळ पारंपरिक व्यवसाय नसून त्यातही मोठ्या संधी आहेत, हे त्यांनी सिद्ध केलं आहे. सुमित भोसले यांच्यासारखे उद्योजकच ग्रामीण भारताला नवसंजीवनी देत आहेत.