“अलीकडे समाजात होणार्या दुर्दैवी घटना पाहिल्या तर मन विषण्ण होते. समाजातील मन हेलावून टाकणार्या या घटना पाहिल्या की संस्कारक्षम पिढ्या घडविण्यासाठी सर्वात जास्त गरज आहे ती सकस साहित्याची, हे प्रकर्षाने जाणवते. समाजातील अनेक घटकांनी यात सहभाग घेतला तरी याचे नेतृत्व महाराष्ट्र साहित्य परिषदेला करावे लागेल, ”अशा शब्दांत साहित्यसंस्कृतीची निकड व त्यासाठी मसापची जबाबदारी या विषयी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार यांनी आपले मत व्यक्त केले.
‘महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे’ ही मराठी साहित्याच्या संवर्धनासाठी अथकपणे कार्यरत असलेली सर्व साहित्य संस्थांची मातृसंस्था. या संस्थेच्या नवनिर्वाचित संचालक मंडळातील सदस्यांचा सत्कार आणि सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिराम भडकमकर लिखित ‘इन्शाल्लाह’ या कादंबरीच्या अभिवाचनाचा रौप्य महोत्सवी प्रयोग गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी प्रभादेवी येथील ’रवींद्र नाट्य मंदिरातील सुप्रसिद्ध पु. ल. देशपांडे कला अकादमी’च्या लघु नाट्यगृहात पार पडला. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, प्रबोधिनीचे व्यवस्थापन समिती सदस्य राजेश पांडे, प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळपाटील, सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिराम भडकमकर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेेचे अध्यक्ष योगेश सोमण हे मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र परिषदेच्या संचालक मंडळातील सदस्य, महाराष्ट्रातील अनेक नामवंत प्रतिभावंत साहित्यिक, पत्रकार आणि सिने-नाट्य कलांवतांची मांदियाळी या कार्यक्रमास उपस्थित होती.
“51 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी आणीबाणी लादली गेली होती आणि महाराष्ट्रातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या साहित्यिकांनी आणीबाणीला विरोध केला होता. त्यातील एक पु.ल. देशापांडे हे होते. त्यांच्याच नावे असलेल्या सभागृहात आज कलाकारांचा आणि साहित्यिकांचा सत्कार होतोय, हा विलक्षण योगायोग आहे. लोकशाहीला सुदृढ करण्याचे काम रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी ’प्रशिक्षण, प्रबोधन आणि संशोधन’ या त्रिसूत्रींतून अविरत करीत आहे.” असे प्रबोधिनीचे कार्यकारी संचालक अभिराम घड्याळपाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, राजेश पांडे यांनी आपल्या मनोगतात म्हटले,“’जेन झी’ म्हणून ओळखली जाणारी आजची पिढी सकस साहित्याची रूची असणारी आहे आणि त्याचा प्रत्यय आम्हास पुणे पुस्तक महोत्सवास येत आहे. आगामी 12 ते 20 डिसेंबर रोजी होणार्या पुस्तक महोत्सवाचे निमंत्रण त्यांनी यावेळी दिले. त्याशिवाय यंदाचे शंभरावे साहित्य संमेलन प्रत्येकाच्या मुखी असावे आणि त्यासाठी पुणे पुस्तक महोत्सव आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी यांचा सक्रिय पाठिंबा राहील.” अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
सत्कार आणि पुस्तक प्रकाशन
‘महाराष्ट्र साहित्य परिषद’चे अध्यक्ष कला व साहित्य क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व योगेश सोमण, कार्यवाह डॉ. स्वाती महाळंक, सुप्रसिद्ध गझलकार- पत्रकार प्रदीप निफाडकर, कार्यवाह सुनील महाजन, सुनेत्रा मंकणी, प्रसाद मिरासदार यांचा सत्कार करण्यात आला. तसेच अंजली कुलकर्णी, नितीन संगमनेरकर, डॉ. आशुतोष जावडेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य - प्रतिभा सराफ, विद्या देवधर, गजानन नारे, जळगाव जिल्हा प्रतिनिधी - गणेश आव्हाड, वासुदेव वले, राजेंद्र लाखे, प्रभाकर आोव्हाळ, पुणे जिल्हा प्रतिनिधी - राजन लाखे, यांचा सत्कार करण्यात आला. याच वेळी विद्या देवधर यांच्या ‘पंचधारा’ पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
सत्कारमूर्ती योगेश सोमण यांनी सत्कार स्वीकारताना, जबाबदारी खूप मोठी आहे याची जाणीव असल्याचे सांगितले. 100व्या साहित्य संमेलनाच्या साहित्यवारीत सहभागी होण्यासाठी 15 ऑगस्ट ते 10 जानेवारी 2027पर्यंत हाती घेतलेल्या एका उपक्रमाची त्यांनी माहिती दिली. उपक्रमाच्या या कालखंडात ‘नांदी शतक महोत्सवी साहित्य संमेलनाची’ या शीर्षकांतर्गत 99 एकदिवसीय साहित्य संमेलने आयोजित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.‘ या उपक्रमासाठी मसाप आणि तिचे घटक कामाला लागले आहेतच, आपल्या सगळ्यांच्या सदिच्छा आणि सक्रिय सहकार्य गृहीत आहे.’असे आवाहन योगेश सोमण यांनी केले.
“पु.भा. भावेंच्या अध्यक्षतेखाली पुण्यामध्ये जवळजवळ 50 वर्षांपूर्वी झालेले साहित्य संमेलन एका वैचारिक अस्पृश्यतेपोटी उधळून लावले. त्याच पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे अशा वैचारिक अस्पृश्यतेला विरोध करणार्यांची राजवट सुरू होत आहे, हे चित्र आशादायी आहे. कारण साहित्यक्षेत्र हे अस्पृश्यतेपासून कायमच दूर राहिले पाहिजे, हीच महाराष्ट्राची परंपरा आहे, त्याच परंपरेला समृद्ध करण्याची जबाबदारी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनियुक्त कार्यकारिणीची आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या नवनियुक्त कार्यकारिणीने समाज प्रगल्भ होण्यासाठी सकस साहित्याची निवड योग्यपद्धतीने करावी, प्रकाशन संस्थांसाठीचे निकष नक्की करावेत आणि साहित्याची प्रचार -प्रसिद्धी, संशोधनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी, तसेच नवोदित लेखक घडविण्यासाठी कार्यशाळा घ्याव्यात.” अशा काही सूचना प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी आपल्या भाषणात केल्या.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात मुस्लीम समाजातील वास्तव, अंधश्रद्धा, राजकारण, सामाजिक सुधारणा आणि हिंदू समाजाचा मुस्लीम समाजाकडे पाहण्याचा दृष्टीकोन यांसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर प्रकाश टाकणार्या सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिराम भडकमकर लिखित ‘इन्शाल्लाह’ कादंबरीच्या अभिवाचनाचा रौप्य महोत्सवी प्रयोग सादर झाला. अतिशय परिणामकारक आणि उपस्थित सर्वांना अंतर्मुख करणार्या या अभिवाचनात अभिराम भडकमकर यांच्यासह सुशील इनामदार, सलीम मुल्ला, सचिन सुरेश आणि स्वाती चिटणीस सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाचे यजमान पद रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडे तर याचे आयोजकत्व महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्याकडे होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिप्ती भागवत यांनी केले.